
अमेरिकेतल्या मध्यवर्ती प्रदेशाच्या अफाट गवताळ कुरणांवर एकेकाळी ज्यांचं अक्षरश: साम्राज्य होतं ते म्हणजे बायसन. खांद्यापाशी ६-६॥ फूट उंचीची आणि जवळ जवळ १ टन (१००० किलो) वजनाची ही प्रचंड धुडं, लाखोंच्या संख्येने कळपा कळपाने फिरायची. यांचं डोकं आणि खांदे खूपच अवाढव्य असतात तर त्यामानाने पुठ्ठ्याचा भाग साधारण असतो. नर आणि मादी दोघांनाही आखूड वळलेली शिंग असतात. ऑगस्ट सप्टेंबरमधे यांचा माजावर येण्याचा काळ असतो. स्प्रिंग सीझनमधे वासरांचा जन्म होतो. वासरं वर्षभर आईचं दूध पितात आणि तीन वर्षांची झाली की वयात येतात. यांचे मुख्य भक्षक म्हणजे लांडगे. स्प्रिंग-समर सीझनमधे माद्यांबरोबर छोटी बछडी असताना, त्यांच्यावर लांडग्यांचे हल्ले होतात. कधी कधी ग्रीझली अस्वलं देखील बछड्यांवर हल्ले करून त्यांना मारून खातात.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला सुमारे ६०० लाख (60 millions) बायसन्स अमेरिकेच्या प्रेअरी व ग्रेट प्लेन्सवर चरत असावेत असा अंदाज आहे. या प्रदेशातल्या निरनिराळ्या रेड इंडियन लोकांच्या जमाती, बायसनच्या कळपांच्या, ऋतुमानानुसार होणार्या स्थलांतरा (migration) प्रमाणे, त्यांच्या मागोमाग रानोमाळ भटकत गुजराण करायच्या. बायसनच्या कळपांना घेराव करून, एखाद्या विशिष्ट दिशेने हाकारा करीत न्यायचं आणि मग सार्या कळपाला एखाद्या डोंगरकड्याच्या टोकापर्यंत नेऊन, शेवटी त्या झुंडीला कडेलोट करायला लावून त्यांची शिकार करायची, ही रेड इंडियन लोकांची खास पद्धत. परंतु केवळ जरूरी पुरतीच बायसनची शिकार करून या टोळ्यांचं उदरभरण चालायचं. बायसन म्हणजे या रेड इंडियन जमातींसाठी सर्वस्व होतं, कारण त्यांचं मांस, त्यांच्या जाड केसाळ कातड्याचे कपडे, तंबू, आतड्यांपासून बनवलेल्या धनुष्यांच्या बारीक दोर्या असं सारं काही पुरवणारी, बायसन ही जणू त्यांची कामधेनूच होती. मग स्पॅनिश लोकांबरोबर घोडे आले आणि रातोरात या कुरणांचं आयुष्य बदलून गेलं. वाफेच्या शक्तीने आणि विद्युत शक्तीने शहरवासीयांच्या जीवनात जेवढी क्रांती झाली नसेल, तेवढी उलथापालथ घोड्यांच्या आगमनाने या कुरणांवर झाली.
१८३०-४० च्या सुमारास अमेरिकेचा पश्चिमेकडे विस्तार होऊ लागला होता. मिसुरी राज्यातल्या सेंट लुईस या गावापासून पश्चिम किनार्यावरील कॅलिफोर्निया किंवा ओरेगॉन राज्यापर्यंत सुमारे २००० मैलांचा प्रवास लोक बैलगाड्या किंवा घोडागाड्यांमधून करायचे. हा प्रवास अफाट माळरानांवरून, रखरखत्या वाळवंटांतून, उंचच उंच पर्वत राजींतून, नद्या नाले पार करून असा व्हायचा. रोग राई, स्थानिक रेड इंडियन टोळ्यांचे हल्ले, हिवाळ्यातील हाडं फोडणारी थंडी, उन्हाळ्यातला वाळवंटातला शरीराची लाही लाही करणारा उष्मा, या सार्या दिव्यांना तोंड देता देता हजारो लोक वाटेतच मृत्यूमुखी पडायचे. त्यातच १८४८ साली कॅलिफोर्नियामधे सोन्याचा शोध लागला आणि हा जीवघेणा प्रवास करायला अधिकाधिक लोकांच्या झुंडी उद्युक्त होऊ लागल्या. १८६० च्या दशकात रेल्वे मार्ग पश्चिम किनार्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. युनियन पॅसिफिक रेल्वे कंपनीने नेब्रास्का राज्यातल्या ओमाहा गावापासून पश्चिमेकडे आणि सेंट्रल पॅसिफिक कंपनीने कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅक्रेमॉंटो गावापासून पूर्वेकडे, असा एकाचवेळी रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. १७७६ मैल लांबीचा हा रेल्वे मार्ग या दोन कंपन्यांनी बुलडोझर्स, अवजड यंत्र सामग्री, कंप्युटर्स वगैरे कशाच्याही मदती शिवाय निव्वळ मनुष्यबळावर पूर्ण केला. १० मे १८६९ या दिवशी, एका ठरलेल्या ठिकाणी, दोन्ही कंपन्यांनी दोन दिशांनी बांधत आणलेले रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले गेले आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंतचा हा खंडप्राय देश प्रवासाच्या दृष्टीने एकदम कवेत आल्यासारखा वाटू लागला.
हे रेल्वे मार्ग बांधत असताना बायसनच्या अफाट कळपांचा फारच उपद्रव होऊ लागला. ही प्रचंड धुडं येऊन इंजीनाला धडक द्यायची किंवा हजारो लाखोंच्या संख्येत असलेले हे कळप रेल्वेमार्गावर येऊन गाड्यांचा दिवसेंदिवस खोळंबा करायचे. त्यामुळे पुढे पुढे त्यांची अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या करण्यात येऊ लागली. यातच पुढे बायसन्सची पद्धतशीर हत्या करण्याची एक योजनाच आकाराला येऊ लागली. पद्धतशीर शिकारीच्या या टोळ्यांमधे एक दोन व्यावसायिक शिकारी आणि त्यांचा लवाजमा असायचा. त्यात कातडं सोलणारे कामगार, बंदुका साफ करणारे, बंदुकांत बार भरून देणारे, स्वयंपाकी, लोहार, बरेचसे घोडे आणि वॅगन्स असायच्या. सकाळी लवकर उठून माग काढणारे लोक बायसनच्या कळपांचा ठावठिकाणा धुंडाळून यायचे. मग व्यावसायिक शिकारी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपलं बस्तान मांडून बसायचा आणि हाका करणारे लोक बायसनच्या या कळपाला शिकार्याच्या पुढ्यातून पळायला लावायचे. बायसनच्या मोठाल्या कवट्या छेदून गोळ्या जाऊ शकायच्या नाहीत त्यामुळे समोरून गोळ्या मारण्या ऐवजी डोक्यावर बाजूने गोळ्या मारल्या जायच्या. अशा प्रकारे मोठाले कळप शिकार्याच्या पुढ्यातून जातांना, कैक बायसन गोळ्या लागून गतप्राण व्हायचे. उरलेला कळप जीव घेऊन पळून जायचा. त्यानंतर चामडी सोलणारे मजूर पुढे सरसावायचे. मरून पडलेल्या बायसनच्या नाकातून हातोड्याने ठोकून एक खुंटी जमिनीत मारली जायची. मग त्याची चामडी थोडीशी कापून, त्याची टोकं दोरखंडांनी घोड्यांना बांधून, घोडे विरुद्ध दिशांना धावडवून, बायसनची चामडी सोलून काढली जायची. अशा सोलून वाळवलेल्या कातड्यांचे ढीग लादून वॅगन्स परत फिरायच्या. या कातड्यांपासून फॅक्टर्यांमधे तयार होणार्या चामडी बेल्ट्स, कोट, ब्लॅंकेट्सना युरोपात मोठीच मागणी होती.
१८७३ पासून पुढचं दशकभर शेकड्यांनी, (काहींच्या मते हजारभर), अशा व्यावसायिक शिकारी तुकड्या अमेरिकेच्या या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात बायसन्सचं शिरकाण करत फिरत होत्या. सीझनप्रमाणे रोज सुमारे २००० ते १०,००० बायसन्स मारले जायचे. १८७४-७५ मधे तर अमेरिकन कॉंग्रेसपुढे बायसन पूर्णपणे नामशेष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला, कारण काय तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक रेड इंडियन लोकांच्या जीवन पद्धतीचा कणाच मोडला जावा. या कोत्या मनोवृत्तीपायी गोर्या माणसाच्या आणि रेड इंडियन टोळ्यांच्या संघर्षामधे बायसनचा बळी देण्यात आला. १८८४ पर्यंत लाखोंच्या संख्येने मारले गेल्यामुळे बायसन नामशेष होण्याच्या पंथाला लागले. यानंतर काही लोकांनी या शिरकाणातून बचावलेल्या थोड्या बहुत बायसनचे छोटे छोटे कळप करून त्यांचे पुन:संर्वर्धन करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांची संख्या वाढू लागली आणि आज साधारणपणे १५०,००० बायसन्स पुनश्च अमेरिकेत फिरू लागले आहेत. त्यांची संख्या आता सुदृढ झाल्यामुळे काही राज्यांमधे चक्क त्यांच्या शिकारीला देखील परवानगी मिळू लागली आहे.
क्रमशः ….
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply