अभियांत्रिकी कौशल्य म्हणजे कोणतंही यंत्र रोजच्या कामासाठी उपयोगात आणण्याचं कौशल्य, अशी सहज, सोपी व्याख्या करता येईल; पण मुळात यंत्र म्हणजेच काय? यंत्र म्हणजे अशी वस्तू ज्यायोगे कमी शक्ती खर्च करून कमी वेळेत जास्त काम करता येतं.
मूलभूत अशी पाच साधी यंत्रे आहेत. जगातलं कुठलही यंत्र हे या पाचातील काही किंवा पाचही यंत्रांच्या आधारावरच रचली जातात. चाक, कप्पी (पुली), उतरण, तरफ आणि पाचर, अशी ही पंचयंत्र! कप्पी सोडल्यास, या सर्व यंत्रांचा आपल्या घरात आणि विशेषतः स्वयंपाकखोलीत मुक्त हस्ते वापर केला जातो.
आता पाचर हे साधं यंत्र लक्षात घेऊ या. ज्या वस्तूयोगे एका पदार्थांचे दोन भाग करता येतात, त्याला पाचर म्हणता येईल. पाचरीची एक बाजू धारदार किंवा टोकदार आणि दुसरी बाजू बोथट किंवा जरा रुंद असते. सुरी ही एक प्रकारची पाचर आहे. त्यातही वेगवेगळे पदार्थ चिरण्यासाठी वेगवेगळ्या आकारमानाच्या सुऱ्या असतात. टोमॅटोच्या पातळ चकत्या करण्यासाठी वापरायची सुरी, कांदा कापण्यासाठी वापरता येत नाही. त्यातच एखाद्या महिलेचा अभियांत्रिकी दृष्टिकोन चांगला असेल तर तिच्याकडे तुम्हाला कलिंगड किंवा पपईसारखं मोठ्ठ फळ कापण्यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त लांब पाते असलेली सुरी आढळेल. तसंच त्या सुगृहिणीकडे तुम्हाला पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ कापण्यासाठी गोल पातं असलेली सुरी आढळेल…
काही जणांच्या घरी शंकरपाळ्याच्या पाती चिरण्यासाठी पुढे चक्र असलेलं कातणं (म्हणजे खरंतर गोल पात्याची सुरीच ती) दिसेल. पिझ्झा किंवा शंकरपाळ्याच्या कातण्यामध्ये चाक आणि पाचर या दोन यंत्रांचा मिलाफ लक्षात येतो. पाचरीच्या पात्याला गोलाकार दिल्यामुळे या यंत्रांनी कमी कष्टात जास्त मोठा आणि जास्तच जाडीचा पदार्थ सहज चिरता येतो; पण भाजी चिरण्यासाठी मात्र अशी गोल पात्याची सुरी वापरणं शक्य होत नाही.
Leave a Reply