अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं.
वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात “बेबंदशाही’ आणि “पद्मिनी’ यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. “नटसम्राट’, “पुण्यप्रभाव’, “भावबंधन’, “राजसंन्यास’, “बॅरिस्टर’, “पुरुष’, “पर्याय’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. “बॅरिस्टर’ हे त्यांचं आवडतं नाटक होतं. “पुरुष’ या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. “रायगडचा राजबंदी’ या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला’चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply