काल थोडा वेळ वारा सुटला होता. वाटलं की आता पाऊस येणार पण नाही आला. कुणी तरी विचारले आला का मी म्हणाले चार थेंब आला.
थेंब किती छोटेसे रुप आहे ना पावसाचे. पाण्याचे. अश्रुचे. मात्र ते असते निरनिराळ्या कारणाने व अर्थाने. घरात नळाचे थेंब गळतात बादलीत पडतात. टप टप टप.. ऐकून कंटाळा येतो. हेच थेंब सांगतात थेंबे थेंबे तळे साचते. दोन थेंब बाळाला पाजला की किती मोठे संकट टळते. त्यामुळे राष्ट्रीची भावी पिढी आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहून हातभार लावतात व देश स्वावलंबी बनतो. लेकीच्या लग्नाच्या वेळी पाठवणीच्या वेळी थेंब जमतात आणि डोळ्यातून गंगा यमुना.त्या सांगतात जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. मागे वळून पाहू नकोस लाडके पुढे जा पण या आई बाबांना विसरु नकोस. आणि लेक ते कायम लक्षात ठेवते.. लांब राहणाऱ्या एका प्रिय व्यक्तीला पत्र लिहायला बसले जाते मनात विचारांचे काहूर आहे आणि त्याच बरोबर आठवणींच्या सरीवर सरी कोसळतात. ते शांत झाले की पत्राला सुरुवात केली दोन तीन ओळी झाल्या की भावना अनावर होऊन एका थेंबातच व्यक्त होऊन लिहिलेल्या पत्राद्वारे तिथेच जाऊन पडलेल्या डागाने व्यक्त होतात.
जवळची माणसं कायमची निघून जातात थेंबाचा महापूर धो धो वाहतो. तो काही काळ वहातच असतो. त्याला कुणीही अडवू शकत नाहीतर रक्ताचा थेंबच काय पण पाट वाहत आहे तरीही देशासाठी लढणारा जवान हेच सांगतो की मी शेवटच्या थेंबा पर्यंत लढणार पण देशाची शान राखणार इथेही तोच थेंब आहे.
लेकरं पास होऊन धावत पळत येतात आईच्या कुशीत शिरून प्रगती पुस्तक दाखवतात आलाच थेंब. स्पर्धेत जिंकल्याचे जाहीर होताच आलाच थेंब. नातवंड आली गावाहून आणि जातानाही आलाच थेंब. अस्वस्थ मनाने मंदिरात गेल्यावर समईच्या शांत प्रकाशात. पवित्र वातावरणात देवाच्या रुपाकडे पाहून हात जोडून डोळे मिटले तरी आलाच थेंब. असे कितीतरी प्रसंग आहेत की थेंब येतातच.
सकाळच्या प्रहरी प्रसन्न होऊन अनवाणी पायांनी गवतावर चालताना दवबिंदू पायाला गुदगुल्या करतात आणि दिवसभर त्या जाणिवेचे हसु येतं. आळवावरचा थेंब पाहून बरेच जण बरेच काही अर्थ काढतात. शेवटी थेंबच आहे तो रुप लहान पण अर्थ महान.
एक थेंब निखारा विझवतो.एक थेंब तहान भागवतो एक थेंब मोती बनतो. एक थेंब अंकूर उगवतो. किती रुपात आहे तोच त्याच्या कडून कोणता बोध घ्यावा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. चार थेंब पडले होते तेव्हा आमच्या गुलाबाच्या इवल्याशा पाकळीवर पडले होते पण त्यांनी कुरकुर केली नाही. पेलवत नव्हते तरीही आनंदी होते म्हणून मी बोध घेतला आहे तो सांगतो की कोरोनाचे संकट आपल्याला जड जात आहे पेलवत नाही. बघवत नाही ऐकवत नाही तरीही लक्षात घ्यायचे आहे हा थेंब लवकरच संपणार आहे उडून जाणार आहे. जर आपण नियमित नियमाने वागलो तर थेंब प्रमाणे कोरोनाही भुर्र.
धन्यवाद.
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply