देशभर मी कार्यक्रम करत होतो. पण परदेशातील कार्यक्रमांबद्दल सिंगापूर व्यतिरिक्त फार काही घडले नव्हते. काही आयोजकांकडून ऑफर्स आल्या पण त्यांच्या कार्यक्रमांचा स्तर मला पटत नव्हता. शिवाय त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा दौरा करायचा होता. इतके दिवस म्युझिक अॅकॅडमी बंद ठेवणेही मला शक्य नव्हते. एकूण काय हवे तसे काही घडत नव्हते. पण प्रयत्न मात्र मी करतच होतो. याबाबतीत टोमॅटो सॉस इफेक्ट मला पाहायला मिळाला. टोमॅटो सॉस आपण बाटलीतून डिशमध्ये घ्यायला गेलो की दोन-चार वेळा प्रयत्न करूनही एक थेंबही पडत नाही. पण पुन्हा पुन्हा प्रयत्न केला की एकदम भरपूर सॉस डिशमध्ये पडते. काही वर्षे प्रयत्न करूनही काही घडले नाही आणि एक दिवस ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न महाराष्ट्र मंडळातून फोन आला. या महाराष्ट्र मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण होत होती. त्यासाठी सप्टेंबरमध्ये त्यांना कार्यक्रम हवा होता. यासाठी माझ्या विद्यार्थिनी वंदना परांजपे आणि त्यांचे पती चंद्रशेखर परांजपे यांची मोलाची मदत झाली. हा ऑडिटोरियम शो म्हणजे जाहीर कार्यक्रम असल्यामुळे मला आर्टिस्ट व्हिसा ची गरज होती. यासाठी मला ऑस्ट्रेलियन एम्बसीच्या नवी दिल्ली येथील ऑफिसला जायचे होते. बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता मेलबोर्न महाराष्ट्र मंडळाने केली होती. मला फक्त कागदपत्रांच्या आधाराने मी गायक कलाकार असल्याचे सिद्ध करायचे होते. काम कठीण होते. माझे गाणे त्यांना कळणार नव्हते. मी त्यांना सीडीचे कव्हर फोटोज दाखवले. तरी त्यांना फारसे पटत नव्हते. मग मी त्यांना ऑल इंडिया रेडिओची सव्वादोनशे आणि दूरदर्शनची शंभरपेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टस दाखवली. मग त्यांची खात्री पटली आणि त्यांनी आर्टिस्ट व्हिसा देण्याचे मान्य केले. माझा ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमांचा मार्ग मोकळा झाला. गिरीश कंदलकर हा माझा व्हिजेटीआयचा इंजिनीयर मित्र ऑस्ट्रेलियात होता. मी मेलबोर्नमध्ये त्याच्या घरी राहणार होतो. तेथील थंड वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्याने कार्यक्रमाआधी पाच दिवस येण्याचे सुचवले. त्यानुसार १८ सप्टेंबर २००५ रोजी मी ऑस्ट्रेलियाकडे निघालो. अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ होते. क्वांटाज या ऑस्ट्रेलियन एयरलाईनचे विमान भव्य होते. या विमानातच केंद्रीय अर्थमंत्र्यांचे वित्तीय सहाय्यक श्री. मॉनटेकसिंग अहलूवालिया प्रवास करत असल्याचे मला समजले. मी त्यांची भेट मागितली. आश्चर्य म्हणजे त्यांनीही लगेचच भेटायला बोलावले. ते एका कॉन्फरन्ससाठी सिडनीला चालले होते.
“तू काय करतोस?” त्यांनी विचारले.
“मी गायक आहे, गाण्याच्या कार्यक्रमांसाठी ऑस्ट्रेलियाला निघालो आहे.” मी म्हणालो.
“मी काही कोणी फिल्मस्टार नाही. तू कसे काय मला ओळखलेस? ” त्यांनी प्रश्न केला.
“सर, मी गायक असलो तरी एक इंजिनीयर आहे आणि शेअर मार्केटमधील एक इन्व्हेस्टर आहे. आपल्याला अनेक टीव्हीच्या चर्चासत्रांमध्ये मी ऐकले आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटतो आहे हे माझे नशीबच म्हणावे लागेल.”
“कमाल आहे! एक गायक शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टर आहे याचा अर्थ आपला देश प्रगतीपथावर आहे असेच म्हणावे लागेल.” ते गमतीने म्हणाले. त्यांचा निरोप घेताना मी म्हणालो,
“दिल्लीच्या जमिनीवर आपली भेट केवळ अशक्यच होती. पण आकाशात ती शक्य झाली.” ते हसून म्हणाले, “वेल सेड. माझा एक सल्ला लक्षात ठेव. गाण्याच्या किंवा शेअर मार्केटमधील यशामुळे कितीही वेळा आकाशात फिरलास तरी जमिनीवरचे पाय कधी सोडू नको. नियती कधी जमिनीवर आणेल ते सांगता येत नाही.”
सिडनीला विमान बदलून तब्बल सोळा तासांच्या प्रवासानंतर मेलबोर्नला पोहोचलो. एअरपोर्टवर माझा मित्र गिरीश कंदलकर याने माझे स्वागत केले. अनेक वर्षांनंतर आम्ही भेटत होतो. बॅग्ज घेऊन सुमारे एक तासाने त्याच्या घरी पोहोचलो आणि लक्षात आले की माझा पासपोर्ट, व्हिसा आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्स असलेली बॅग मी घाईघाईने एअरपोर्टवरच विसरलो होतो. अनेक वर्षांनी जवळचा मित्र भेटल्यामुळे त्याच्याशी बोलण्याच्या नादात मी फार मोठी चूक केली होती. तातडीने आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. सुदैवाने ट्रॉलीज जमा करणाऱ्या कर्मचाऱ्याने माझा पाऊच पोलिसांकडे दिला होता. पोलिसांनी आतील गोष्टींची छाननी केल्यानंतर माझा पासपोर्ट आणि पैसे परत मिळाले आणि माझा जीव भांड्यात पडला. मला विमानातील श्री. मॉनटेकसिंग यांचे शब्द आठवले. नियतीने मला विमानातून अक्षरशः जमिनीवर आणले होते. यापुढील सर्व परदेश प्रवासात मी पासपोर्ट आणि पैसे प्राणपणाने जपतो.
मेलबोर्नमध्ये एकाच दिवशी तीनही ऋतूंचा अनुभव येतो. सकाळी ऊन असते. दुपारी थोडा पाऊस पडतो, तर रात्री कडाक्याची थंडी असते. तेथील वातावरणाशी जमवून घेण्यासाठी कार्यक्रमापूर्वी काही दिवस तिकडे येण्याचा गिरीशचा सल्ला अगदी योग्य होता. शिवाय वादक कलाकार मला मेलबोर्नमध्येच मिळणार होते. तेथील लोक कोणती गाणी पसंत करतात याचाही आढावा मी घेतला. २५ सप्टेंबर २००५ रोजी मेलबोर्न महाराष्ट्र मंडळाच्या रौप्यमहोत्सवात एका भव्य सभागृहात मी कार्यक्रम सादर केला. गाणी सादर करताना त्या गाण्यांशी निगडित काही किस्सेही मी रसिकांना ऐकवले. एकूण कार्यक्रम खूपच रंगला. स्टेजवरील कार्यक्रमांची पोचपावती लगेचच मिळते. मला अनेक मैफिलींसाठी निमंत्रणे आली. ऑस्ट्रेलियाजवळील फिजी या बेटावरील अनेक मंडळी ऑस्ट्रेलियात राहतात. हे सर्व लोक हिंदी गझल आणि भजनांचे चाहते आहेत. त्यांच्या क्लबने लगेचच माझी गझल संध्या आयोजित केली. त्याचबरोबर श्री. अजित निमकर, शिरीष बागुल, डॉ. बेट्टीगिरी, समीर आणि विनिता हर्डीकर, अरुण आणि राजश्री साने यांच्यासाठी देखील मी कार्यक्रम केले. माझा मित्र गिरीश आणि त्याची पत्नी अल्पना यांनी उत्तम आदरातिथ्य केले. गिरीशबरोबर अनेक रात्री गप्पांत रंगल्या. उमा परांजपे आणि सुभाष परांजपे यांच्या घरीदेखील मी काही दिवस होतो. सुभाष परांजपे हे स्वतः क्रिकेटचे अंपायर म्हणूनही काम करत होते. त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेस्ट ऑफ वर्ल्डची क्रिकेट मॅचदेखील मी पाहिली. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. भावे यांचादेखील मी आभारी राहीन. ऑस्ट्रेलियाला निघताना माझ्या हातात फक्त एक कार्यक्रम होता. पण मेलबोर्नमध्ये मी सात कार्यक्रम केले. नंतर सिडनीला गेलो. तेथेही एक कार्यक्रम करून मी मुंबईकडे निघालो. ऑस्ट्रेलियाचा माझा दौरा अपेक्षेबाहेर यशस्वी झाला. या दौऱ्याच्या गोड स्मृती माझ्या मनात कायम राहतील. लवकरच घरी परतलो आणि १४ ऑक्टोबरला माझा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला.
जवळजवळ महिनाभर मी ऑस्ट्रेलियात असल्यामुळे अनेक कार्यक्रमांच्या रिहल्सल्स माझ्यामुळे खोळंबल्या होत्या. त्या वेगाने सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात मी गझलच्या कार्यक्रमांसाठी इंदूर आणि दिल्लीला जाऊन आलो. संस्कार भारतीसाठी एक कार्यक्रम केला.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply