
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत उत्साही प्रतिसादात सतत चार तास चाललेली कार्यशाळा संपल्यानंतर त्या दोघींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. ज्वारी व कपाशीवर केलेल्या अत्यंत मौलिक संशोधनाची माहिती त्यांनी सादर केल्यानंतर काही क्षण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर दोघींपैकी एकीने बोलण्यास सुरवात करताच अवघं सभागृह स्तब्ध झालं. तिने केलेलं कथन तिच्याच शब्दात.
‘‘मी कर्नाटकातील एका कृषी विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. भारत सरकार कृषी संशोधनावर दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करत असते, पण तरीही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधित केलेले बियाणे वापरण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. आपल्या देशात १२७ लाख हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी बी.टी. कपाशीची लागवड करीत असल्यामुळे बियाण्यांच्या क्षेत्रात मोन्सँटो या कंपनीने केवळ एकाधिकारच नव्हे तर अक्षरशः दादागिरी निर्माण केली आहे. दरवर्षी ४००० कोटी रुपयांचे कपाशीचे बी.टी. बियाणे आपल्या देशात विकले जाते ज्यापैकी तब्बल ७५० कोटी रुपये रॉयल्टीच्या रूपाने मोन्सँटोच्या खिशात जातात ज्याचा असह्य भार भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या खिशावर पडतो. ही दुर्दैवी परिस्थिती बघून मी प्रचंड अस्वस्थ झाले व कॉटन ट्रान्सजेनिक रिसर्चच्या सहाय्याने आपल्या देशातच बी.टी. तंत्रज्ञान विकसित करण्याचा निश्चय केला. खरं तर सन २००० मध्येच अशा प्रकारच्या संशोधनाला प्रारंभ झाला होता, पण ते संशोधन हा केवळ एक देखावा होता असे २०१२ मध्ये लक्षात आले. एका अमेरिकन कंपनीच्या दबावाखाली ज्या संशोधकांनी संशोधनाचे हे नाटक करून आपल्या देशाची नाचक्की केली त्यांची पदोन्नती करून विद्यापीठाने त्यांना बक्षीस दिले.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मोन्सँटोच्या जीनपेक्षाही प्रभावी व पूर्णतः स्वदेशी जीनचा मी शोध लावला. या संशोधनामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशी जातींचे बी.टी. बियाणे अत्यंत माफक दरात मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. माझ्या संशोधनाचा तपशील विद्यापीठाला सादर करताच माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी जर एखाद्या प्रगत देशात असते तर ज्यासाठी मला सर्वोच्च सन्मान मिळाला असता त्याच संशोधनासाठी विद्यापीठाने माझा मोठ्या प्रमाणात छळ करण्यास सुरवात केली. कोणतेही कारण न देता माझी बदली करण्यात आली, मला पदोन्नती नाकारण्यात आली, अनेक महिने माझा पगार थांबविण्यात आला व विविध प्रकारे माझा छळ करून विद्यापीठ मला आत्महत्येपर्यंत घेऊन गेले. माझा गुन्हा एकच होता की भारतीय संशोधन मला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे होते पण मोन्सँटोने वरपासून खालपर्यंत सर्वांना विकत घेतल्यामुळे विद्यापीठाने मला सुखाने जगू देण्यास नकार दिला. जिथे मी अनेक वर्षे मौलिक संशोधन केले ती प्रयोगशाळाही तोडून फेकण्यात आली.
या छळवादाला कंटाळून १ ऑक्टोबर,२०१५ रोजी मी पंतप्रधानांकडे दाद मागितली तेव्हा १० मे, २०१६ रोजी मला कळविण्यात आले – ‘CASE CLOSED’ (तुमची केस बंद करण्यात आली आहे.)’’
सभागृहात स्मशानशांतता पसरली होती. व्यासपीठावर बसलेल्या संशोधक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला – ”बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशातील सर्वांना विकत घेऊन एक दिवस या देशातील सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहेत का?”
श्रीकांत पोहनकर
संपर्क :
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply