किती तो मोह
आता तरी आवर
गरजेचं खरं काय
याचा करूया विचार
आधीची पिढी
मानी समाधान खरं
पोटापुरत जगणं
आपलं आपण बरं
एक पिळा दोरीवर
दुसरा जोड अंगावर
ठेवणीतले एखाद पातळ
खणात नसे गच्च अडगळ
नसे कधी अतिरिक्त ताण
न ऋतू बदलता वरचेवर आजार
तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न
बाळसे असे कायम अंगावर
टेकता पाठ शांत निज येई
नसे सोस अधिक मनोरंजन सुमार
पिंगळा वेळी आपसूक जाग येई
प्रसन्नचित्ती दिवसाचा हरएक प्रहर
अगदी तसे आता जगणे अशक्य
मान्य! तरी घेऊ त्यातील सार
घरातील, मनातील नकोनकोसे
मोठ्या मनाने करूया हद्दपार
वस्तू, वास्तू, धन अन माणसं
सारेच येथे आहे नश्वर
आला क्षण खऱ्या आनंदात जगूया
तेव्हाचं होईल जीवन सुकर!!
–वर्षा कदम.
Leave a Reply