नवीन लेखन...

थ्रिल !

‘कर्ता करविता परमेश्वर आहे !’ या तत्वावर दृढ विश्वास असणारा मी माणूस आहे. माझ्या मनात जी भावना उत्त्पन्न होते ‘ती ‘हि  तोच करतो.मग त्याच्या कृतीची संकल्पना आणि अंमलबजावणी योजना माझ्या मेंदूत तयार होते.अशा प्रकारे ती माझ्या कृतीत उतरते. सर्वांच्या बाबतीत अशीच प्रक्रिया असावी. फक्त त्याचे श्रेय मी देवाला देतो ,आणि इतरजण ‘मी केले!’ किवा ‘मी करून दाखवले का नाही ?’म्हणून आपलाच ढोल बडवून घेतात!

आज पुन्हा माझी बेचैनी वाढली आहे.  अशी बेचैनी वाढली कि माझे हातपाय किंचित थरथरतात. आपण काहीच धाडस करू शकत नाही.हि भावना कुरतडू लागते. दारू !!छे छे तसले काही व्यसन नाही मला. पण ते अनोखे ‘थ्रील ‘अनुभवायची ओढ ,अशीच आधान मधन लागत असते मला. अर्थात हि पण ‘त्याचीच’इच्छा ! शेवटी कर्ता करविता परमेश्वरच कि !

पूर्वी म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो तो पर्यंत कधी असे व्हायचे नाही. एकदम नॉर्मल होतो. उमाच्या सहवासात उद्याची स्वप्न आणि त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची तयारी करत होतो. एखादी नौकरी लागली कि आपण लग्न म्हणून तिला सांगून टाकलं होत.

पण झाले भलतेच. उमा मला टाळू लागली. एका श्रीमंतांच्या मुलासाठी मला सोडून गली! तेव्हा पहिल्यांदा असाच बेचैन झालो होतो. असेच हातपाय गळून गेले होते. आधी स्वतःचा राग आला होता. मग माझ्या गरिबीचा राग आला.मी गरीब का ? या गरीबीनेच माझी उमा मला दुरावली. पण प्रेमात गरिबी कधीच आड येत नाही. मी खूप गरीब मुलांना श्रीमंत मुली मिळाल्याचं पाहिलं आहे. फक्त त्या आपल्या प्रियकरा साठी आग्रही होत्या. अन हि उमा ! का त्या पैशेवाल्या गोऱ्या माकडाबरोबर गेली? अन मी —माझे काय ? मी कसा जगू तिच्या शिवाय? याचा काही विचार ? ती परतणार नाही ! मला माहित आहे! तिचा बाप त्यांचे लग्न लावून देणार आहे म्हणे ! उमेच्या सहमती शिवाय हे कसे शक्य आहे? उमेचे खरेच माझ्यावर प्रेम असतेतर ती बंड करून माझ्या कडे आली असती. अन ती आली असती तर मी दंड थोपटून प्राण पणाने अख्या जगाशी पंगा घेतला असता ! पण साली उमाच बेईमान निघाली! माझंच नाणं खोटं निघालं. या पोरी अशाच बेईमान, बेवफा साल्या! अश्या विचारात मी असतानाच एक गाडी मला ठोकर मारून गेली. टाळकं चांगलंच सडकल. बहुदा पेव्हमेंट वर आपटलं असावं. ‘साल्या पोरीचं बेईमान ‘ हेच डोक्यात फिरत असताना माझी शुद्ध हरपली !
तीन आठवडयांनी पागुट्या सारखं भक्कम बँडेज घेऊन घरी आलो. पंधरा दिवस सुन्न बसून होतो.

०००

गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या खांबाची उतरती रांग मिणमिणते सोडियम व्हेपर चे लॅम्प डोक्यावर घेऊन उभी होती. माझ्या समोरच हाय हिलचे शूज घालून ती चालली होती. उमा अशीच हाय हिल वापरायची. ती चालताना पण आत्ता होतोय तसा ‘टॉक -टॉक ‘आवाज व्हायचा. अरेच्या हिची उंची पण उमे इतकीच आहे !फार रात्र झाली नव्हती फक्त रात्रीचे साडे दहा वाजून काही मिनिटे झाली असावीत.  मी पॅन्टच्या खिशात हात खुपसून तिच्या मागे निघालो. उमा पाठमोरी अशीच दिसायची ! साली बेईमान , पैशाला आणि गोऱ्या कातडीला हपापलेली ! त्या गोऱ्या माकडाबरोबर गेली! मला लाथाडून ! जाताना काहीच कसे वाटले नाही ग तुला ?माझे डोके गरम होऊ लागले. हार्टबीट वाढले. मी माझ्या विचार चक्रात गुरफटलो होतो. मी केव्हा तिच्या जवळ पोहोंचलो , खिशातली मोबाईलची हेयरफोनची वायर कधी आणि कशी तिच्या माने भोवती गुंडाळी , ‘का ? का गेलीस मला सोडून ? सांग ! सांग!!’ म्हणत दात ओठ खाऊन कधी आवळली ! कळलेच नाही !तिचा डोळे खोबणीतून बाहेर आलेला आणि हातभार जीभ लोम्बणारा मृत देह माझ्या पायाशी पडला तेव्हा मी भानावर आलो ! गल्लीच्या दुसऱ्या टोका पर्यंत तसाच स्ट्रीट लाईटचा निर्जीव उजेड मिणमिणत होता.

०००

दुसरे दिवशी सकाळी थोडी उशिराच जाग आली. खूप दिवसांनी इतकी गाढ झोप लागली होती . तरी डोळे चुरचुरत होते. दारात पडलेला पेपर उघडला . फ्रंट पेजवर ती बातमी होती. ‘अजून हि महिला असुरक्षितच ! अज्ञात माथेफिरू खुनी मोकाट!! तरुण नर्सचा भर रस्त्यात गळा आवळून खून! पोलीस तपास सुरु !’. मी टी. व्ही . सुरु केला तेथे पण तेच. नेहमीचीच चर्चा , नेहमीचाच काथ्याकूट . यावेळस मी कारणीभूत होतो इतकेच. माझ्या हातून हे कृत्य झाल्याचे मला, व्हावा तेव्हडा पश्चाताप झाला नाही. कारण ‘कर्ता करविता परमात्मा असतो!त्याच्याच प्रेरणेने मी हे कृत्य केले आहे .’  हि माझी श्रुद्धा आहे आणि असा विचार केला कि मनाला बरे वाटते! उगाच उदासी  किंवा गिल्ट वाटत नाही ! हा, त्या तरुणी बद्दल थोडे वाईट वाटले. पण मला तरी कुठे माहित होते. तिला माझ्या हातून ‘मुक्ती ‘ मिळणार आहे याची ?शेवटी काय तर ‘तो ‘सारे करवितो! मी फक्त निमित्य मात्र. सारे श्रेय ‘त्यालाच! मला काही नको !पण या प्रसंगा पासून मी खूप सावध झालोय . या नन्तर मात्र असे व्हायला नको ! माझे नशीब बलतरम्हणून  ती हेअर फोनची वायर मजबूत निघाली, त्यावेळेस कोणी गल्लीत नव्हते, मी चेहरा झाकलेला नव्हता , कोठे सीसी असते तर ?हि सारी आणि अजून सुचेल तशी काळजी घ्यावी लागणार होती. पण प्रामाणिक पणे सांगतो. त्या कृत्यात कसले कमालीचे ‘थ्रिल ‘अनुभवले ! नुस्ती नशा -धुंदी-बेहोशी! क्या बात है ! अशी धुंदी साली त्या ड्रुग्स मध्ये सुद्धा नसते . या पुढे दारू तर एकदम पाणचट !!तेव्हा पासून एक वेगळा आवेश आलाय ! अरे ‘हम भी कुछ कम नही ! कुछ भी कर गुजर जा सकते है !’ असा कॉन्फिडन्स आलाय. ती हातपाय गाळल्याची भावना कुठच्या कुठे पळून गेलीय !पण हे सगळं झूट आहे . मी काय करू शकतो ?सारी ‘भगवंताची ‘करणी !!

मग अशी बेचैनी आणि हातपाय गाळल्याचा फील चार सहा महिन्यांनी पुन्हा पुन्हा येऊ लागला!

०००

पोलीस हैराण झालेत. गेल्या चार वर्षा पासून ते त्या पाशवी, सहा तरुणींना यमसदनाल पाठवणाऱ्या सिरीयल किलरचा शोध घेताहेत.

०००

गेल्या चार सहा दिवसान पासून मला पुन्हा बेचैन होतय ! नवीन नॉयलॉनची वायर घेऊन आलोय ! काळपट हुडी खास नव्या प्रोजेक्ट साठीच घेतलीय! ऑर्डीनरी कॅनवास शूज पण घेतलेत. गेल्या खेपेस चुकून चिखलात पाय पडला होता. फूट प्रिंट्स पोलिसांना सापडलेत. भारीच्या बुटाचे प्रिंट एखाद्या वेळेस माग काढू शकतात! असो एकंदर काय तर त्या स्पेशल ‘थ्रिल ‘ साठी एकदम रेडी आहे ! आणि या— या क्षणी माझी नजर समोरच्या प्लॅटफॉर्म वर टाईट ब्लुजीन्स आणि पांढरा बाह्या दुमडलेला इन शर्टमध्ये मोबाईल वर चाट करणाऱ्या तरुणीवर आहे! मी तिला सकाळ पासून फालो करतोय !

०००

अरे यार पुन्हा सकाळ झाली. पुन्हा तीच रोजची मरमर! पण हे असलं जगणं आपणच देवाला मागितलय ! चला आता काय ?उठा . स्वतःलाच आरशात पाहून गुड मॉर्निंग म्हणा . ब्रश करा . तेच तेच रुटीन ,रुटीन अन रुटीन !रचना स्वतःशीच विचार करत आळस देत बेड वरून उठली. आज लवकर ऑफिस गाठावं मागणार होत, कारण एक फॉरेन डेलिगेशनची मिटिंग होती. सेक्रेटरी म्हणून सगळी अरेंजमेंट तिला करावी लागणार होती.

साडेपाच फूट उंची, गव्हाळ रंग, दुधाच्या साई सारखी कोमल त्वचा , आणि गहिरे डोळे! परफेक्ट फिगर! वय पंचेवीस ! पुरुष असो वा बाई एकदा तरी वळून बघाव अस तीच व्यक्तिमत्व होत.

प्रात्यविधी उरकल्यावर तिने मस्त पैकी सेल्फी काढला , फेसबुक आणि whatsup वर गुड मोर्निंग चा स्टेटस टाकला. कॉफीचा मग घेवून ती ग्यालरीत आली. पेपरवाल्याने खालून भिरकावलेली पेपरची गुंडाळी उकलून हेड लाईनवर नजर फिरवली. कुठे तरी बायांचा मोर्चा होता.कोणीतरी मंत्री बायान बद्दल बरळला होता. त्याचा निषेध म्हणून मोर्चा ,आणि त्याचेच फोटो . पण तिची नजर त्या सीरिअल किलरचा बातमीवर पडली. आजवर सहा तरुणींना त्या नराधमाने यमसदनास धाडले होते. त्याचा मोडस अपरांडीचा कोणी तरी अभ्यास करून लिहले होते. सर्व तरुणी बावीस ते पंचेविस वयोगटातील होत्या. ‘म्हणजे माझ्याच वयाच्या ‘ हा विचार रचनांच्या मनात चमकून गेला! नॉयलॉनसारख्या दोरी किंवा वायर वापरून गळे आवळून जीव घेतले होते. त्याने कसलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. फक्त एक जागी त्याचे फूट प्रिंट सापडले होते. त्यावरून तो साधारण सहा फूट उंच असावा असा अंदाज काढण्यात आला होता. आणि सर्व खून रात्री साडे दहा ते एक या दरम्यानच झाले होते.

आजच्या स्पेशल मिटिंग साठी रचनाने तिचा फेवरेट ड्रेस घातला. टाईट ब्लू जीनस आणि पांढरा फुल स्लीव्हचा थोडासा ओव्हर साईझचा  शर्ट ! ऑफिस मध्ये त्यावर एक क्युट जाकेट घातले कि कुठल्याही मिटिंग साठी रचना तय्यार! मेकप वरून शेवटचा हात फिरवून तिने पापण्यांना मस्कारा लावताना स्वतःच्या टपोऱ्या डोळ्यात पाहिलं.या डोळ्यांचा तिला खूप अभिमान होता.त्यांनी कधीच दगा दिला नव्हता! समोरचा काय लायकीचा आहे हे तिला झटकन कळत असे !आज वर फेस रीडिंग आणि बॉडी लँग्वेज समजण्यात कधीच चूक झाली नव्हती. शेवटी तिने आपल्या अंगच्या साडेपाच फुट उंचीत हाय हिलच्या शूजची पाच इंच भर घातली. आणि आपले ‘सौंदर्य ‘ऐटीत मिरवत फ्ल्याट बाहेर पडली. लिफ्ट मध्ये शिरता शिरता तिने कॅब बुक केली. ती बिल्डींगच्या गेट पर्यंत पोहनचे पर्यंत कॅब  आली होती. कॅब मध्ये बसता बसता तिला ड्रायव्हरच्या मिररमध्ये तो एक काळी हुंडी घातलेले माणूस ओझरता दिसला होता.

मिटिंग मस्त झाली होती. डेलिगेशन टीमला एअरपोर्टवर सोडून रचनाने रेल्वे स्टेशन गाठले. ऑफिसेस सुटायची वेळ होती. लोकलसाठी रोज अशीच रष असते. पण तिला त्याची काळजी नव्हती. तिच्याकडे फर्स्ट क्लासचा पास होता. सकाळी तिच्या ऑफिस रूटवर फारसा अडथळा नसायचा म्हणून ती कॅब करायची . पण रोड ट्राफिकच्या त्रासामुळे रात्री परतताना मात्र लोकलनेच यायची. एक मोकळे बाकडे हुडकून तिने शर्टाच्या बाह्य कोपरा पर्यंत फोल्ड केल्या ती रिलॅक्स झाली . अजून तिची लोकल यायला दहा मिनिटे वेळ होता. तिने खिशातला मोबाईल काढला. तिला पुन्हा ते जाणवले. समोरच्या प्लॅटफॉर्म वरील तो काळी हुडी घालून उभा असलेला माणूस !आज तो आपल्याला तिसऱ्यांदा दिसतोय!सकाळी कॅब मध्ये बसताना ओझरता मिरर मध्ये दिसला होता ! मघाशी एरपोर्टवर कोणाला जोरजोरात हात हलवून ‘बाय ‘करत होता ! आणि आता समोरच्या प्लॅटफॉर्म वर ! अरे बापरे, स्टेशन मध्ये येताना पण आपल्या समोरच घुटमळत होता , तो हाच तर होता !! आपला पाठलाग तर करत नसेल ? कोण असेल हा ?मरू दे! कोणी का असेना ! एअरपोर्ट काय अन रेल्वे स्टेशन काय ,सार्वजनिक ठिकाण . येथे कोणीही येऊ शकते ! आपल्याच मनाचा खेळ . असे म्हणून तिने तो पाठलागाचा विचार झटकण्याचा प्रयत्न केला . पण तिचे मन धोक्याची सूचना देतच राहिले. त्याची उंची सहा फुटाच्या आस पासच आहे! आत्ता रात्रीचे नऊ पस्तीस झालेत. लोकल मिळून आपण राहतो त्या सबारब स्टेशनला जाई पर्यंत दहा चाळीस होतील. तेथून फ्लॅट पर्यंत वीस मिनिट . म्हणजे साधारण आकाराची वेळ. त्या सिरीयल किलरची फेवरेट वेळ ! तेव्हड्यात तिची फास्ट लोकल धडधडत आलीच. तिने डब्ब्यात चढताना हळूच पहिले ,तो हुडीवाला तिच्या शेजारच्या बोगीत शिरत होता !

ती आपल्या स्टेशनवर उतरली. ट्रेन निघून गेली. तिने आस पास नजर फिरवली. ‘तो’ कोठे दिसत नव्हता. कदाचित त्याचा स्टॉप पुढे कुठेतरी असेल. मन मोठे विचित्र. नको ते सुचवत असते. तिचा फ्लॅट स्टेशन पासून एक दीड किलोमीटरवर होता. ऑटोवाले येत नसत . आणि पायी जायला कंटाळा यायचा. त्यावर तिने एक उपाय शोधला होता. स्टेशन समोर एक इराण्याच्या जुने कॉफी शॉप होते. तेथली पेस्ट्री आणि कडक कॉफी घेऊन ती तरतरीत व्हायची आणि मग त्या एनर्जीवर  ताडताड पावले टाकत घरापर्यंत पोहचायची. नेहमी प्रमाणे ती इराण्याच्या हॉटेलातून तरतरीत होऊन फ्लॅट कडे निघाली. वाहने तुरळक झाली होती. एखादी कार , किंवा बाइकवरील लव्ह बर्ड्स सुळकन पास होत होती. समोरच्या कोपऱ्या वरल्या अकरा नंबरच्या लेन मधल्या शेवटच्या टोकाच्या ‘इरा कॉम्प्लेक्स ‘मध्ये तिचा फ्लॅट होता. त्या लेन मध्ये एकदा शिरले कि तिला घरी आल्या सारखे सेफ वाटायचे.

ती अकरा नंबरच्या गल्लीत शिरली. मघाचे मनावरचे ओझे केव्हाच उतरले होते. कडेला पार्क केलेल्या कार्स गाढ झोपल्या सारख्या स्थब्ध उभ्या होत्या. सर्वत्र निशब्ध शांतता होती. फक्त तिच्या हाय हिल्सचा पावलांचा ‘टॉक -टॉक ‘ आवाज गल्लीभर घुमत होता! आता काय या चार बिल्डिंग ओलांडल्या कि आपले कॉम्प्लेक्स आलेच.

—–तेव्हड्यात तिला माने भोवती काहीतरी जाणवले . तिने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला पण उशीरच झाला होता! तिचा आवाज घशातच राहिला . माने भोवतीचा तो मजबूत पाश आवळला जात होता गच्च !अधिक गच्च !! तिची प्रतिकार शक्ती लुळी पडली. मानेकडे उचलेले हात गळून खांद्या खाली लोम्बु लागले. गुढग्यातली शक्ती आटून गेली.  कानात तो ‘का ? का गेलीस सोडून ? सांग !सांग !!’म्हणून दात ओठ खाऊन पुटपुटत होता . अंधारलेल्या डोळ्यांना ‘त्याची’ काळी हुडी  धुरकट दिसता दिसता मावळात गेली! आणि फक्त गडद्द अंधार शिल्लक राहिला !

तेव्हड्यात डोळे दिपवणारा प्रकाश पडला . लागोपाठ सायरन वाजवत पोलीस व्हॅन करकचून ब्रेक दाबून माझ्या जवळ थांबली. माझा खेळ खल्लास झाल्याचे स्पष्ट दिसत होते ! पण नेमके वेळेवर पोलीस कशे आले ?

रचनाने रेल्वे स्टेशनवर तिला आलेली शंका पोलीस कंट्रोल रूमला एस .यम . एस करून कळवली होती. आणि त्यांनी त्याची दखलही घेतली होती !

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच . Bye . 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..