ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी यांचा जन्म २७ सप्टेंबर १९१७ कोलकाता येथे झाला.
त्यांचे खरे नाव निलीना सेन होते. त्या समाज-सुधारक केशव चन्द्र सेन यांची भाची होत्या. त्यांनी आपल्या गाण्याची तालीम गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्या कडून घेतली. नंतर त्यांनी रामपूर -सहसवास घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसेन खान आणि बनारस घराण्याच्या रसूलन बाई यांच्या कडे गाण्याचे शिक्षण घेतले.
गाण्याचे शिक्षण चालू असताना नैनादेवी यांचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न कपूरथळा राजघराण्यातील रिपजित सिंह यांच्याशी झाले होते. लग्नानंतर त्या कपूरथळा येथे राहायला गेल्या आणि तिथे त्यांना गाण्याची परवानगी नव्हती.
१९५९ मध्ये पतीच्या निधनानंतर त्या दिल्लीत गेल्या. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी उस्ताद मुश्ताक हुसेन खान यांच्या कडे पुन्हा एकदा संगीत प्रशिक्षण सुरू केले, रसूलन बाई यांचे कडे ठुमरीचे परत शिक्षण घेऊन त्यांनी मैफिलीमध्ये गाण्यास सुरुवात केली. नैनोदेवी या ठुमरी गाण्यांसाठी सर्वाधिक प्रसिद्ध होत्या. ठुमरी बरोबर त्या दादरा आणि गजल गात असत.
त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि नंतर दूरदर्शनसह ती संगीत निर्माता म्हणून ही काम केले. १९७४ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. त्यांची मोठी बहीण साधना बोस या ३० व ४० च्या दशकातील प्रख्यात नर्तकी आणि चित्रपट अभिनेत्री होती. त्यांना ४ मुले होती. त्यांच्या मुलांनी १९९४ साली नैनादेवी फाउंडेशनची स्थापना केली.
नैनादेवी यांचे निधन १ नोव्हेंबर १९९३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply