नवीन लेखन...

ठुमरी क्वीन गिरिजादेवी

धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जात असे त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मर्दानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या.

वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले.

१९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा ‌देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जात असे. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणल्या होत्या, ‘आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. ‘इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.’

गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत असत. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची होती. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात, ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ होती. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असे संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेत असत. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजत असे. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करत असत. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गात असत.

पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या होत्या. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या होत्या. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटत असे, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या होत्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले होते. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलत असत. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणत असत की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही.

गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले होते. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जात असे. आपल्या शिष्यांना त्या सांगत असत घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे.त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या शुभा जोशी, धनश्री पंडित राय, अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.

तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..