नवीन लेखन...

थायरॉइड नियंत्रणात येतो

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. जनसामान्यांना थायरॉइड या आजाराची माहिती करून देणं, आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा लेख.


कर्करोग, क्षयरोग या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती दिसून येते. मात्र ‘थायरॉइड’ या आजाराविषयी लोकांमध्ये म्हणावी तितकी जागृती दिसून येत नाही. थायरॉइड हा आजार दोन प्रकारचा असतो. ‘हायपर थायरॉइड’ आणि ‘हायपो थायरॉइड’. आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथी म्हणजे थायरॉइड. या ग्रंथी शरीरात मानेखालच्या भागात असतात. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो. या ग्रंथीतून ‘T 3’ आणि ‘T 4’ या संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते. शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यावर शरीरातील मेटॅबॉलिझम वाढतं. म्हणजे हृदयाची धडधड वाढते, डोळे मोठे होतात, हाताला घाम सुटतो . मेटॅबॉलिझमचा परिणाम शरीरातील हाडं किंवा हृदयावर होऊ शकतो. हार्मोन्सचं प्रमाण कमी झाल्यास उलट परिणाम होतात.

‘आयोडिन’ हे खनिज थायरॉइड ग्रंथीसाठी उपकारक समजलं जातं. थायरॉइड ग्रंथीचं कार्य, वाढ तसंच मेंदू आणि शरीर यांचा एकूण विकास करण्यासाठी या खनिजाचा उपयोग होतो. थायरॉइड ग्रंथींतून स्र्वणाऱ्या संप्रेरकांमुळे शरीराचं तापमान मर्यादित ठेवलं जातं. रक्तपेशी निर्माण होतात. प्रजोत्पादनासाठी आवश्यक पेशींचं आरोग्य सुधारतं. तसंच स्नायू आणि नसांना बळकटी प्राप्त होते.

‘हायपो थायरॉइड’ (‘थायरॉइड’ या अंत:स्रवी ग्रंथीचं काम कमी होतं) या आजाराचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दिवसाआड किमान एक ते दोन रुग्णांमध्ये या आजाराची किंवा यातल्या काही लक्षणांची सुरुवात दिसतेच. ओळखीच्या चार ते पाच कुटुंबांपैकी एका कुटुंबामध्ये एखादा तरी ‘हायपो थायरॉइड’चा रुग्ण दिसून येतो. कित्येक रुग्ण तर वाढत चाललेल्या वजनामुळे त्रस्त होऊन डॉक्टरांकडे येतात. रक्ततपासणी केल्यानंतर ‘हायपो थायरॉइड’चं निदान होतं.
‘हायपो थायरॉइड’च्या आजारामध्ये खालील लक्षणं दिसून येतात.

वजन अकारण आणि अवास्तव वाढतं.
लवकर थकवा येतो.
कुठल्याही कामात निरुत्साह वाटतो.
अंगावर जास्त करून हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.
सांधेदुखीची समस्या वाढते.
त्वचा सुरकुतते. कोरडी पडते.
हाता-पायांच्या बोटांवरची नखं चपटी आणि खडबडीत होतात.
केस रुक्ष (कोरडे) होतात. जास्त प्रमाणात गळायला लागतात. लवकर पिकतात.
पोट साफ राहत नाही. (कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.)
स्नायूंमध्ये पेटके येतात. (क्रॅम्प्स येणं)
कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
डिप्रेशन येतं.
आवाजात घोगरेपणा वाढतो.

स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या तक्रारी यांसारखी लक्षणं ‘हायपो थायरॉइड’ या आजारात दिसतात. ‘सबक्लिनिकल हायपो थायरॉइड’ म्हणजे ज्यात लक्षणं दिसू लागतात, पण रक्तात TSH (थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स), T3, T4 या संप्रेरकांची पातळी सर्वसामन्य असते. मात्र कालांतराने TSH वाढलेलं आढळतं. आयोडिनची कमतरता निर्माण झाली की, थायरॉइडचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीभोवती थायरॉक्झीनची मागणी करणा-या शरीरातल्या रसायनांचा जमाव वाढतो. थायरॉइड ग्रंथींना सूज येते. शरीराच्या अन्य क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यांचे रक्ताचे रिपोर्ट्स सुरुवातीला सर्वसामान्य (नॉर्मल) असतात, त्यांना इतर डॉक्टरांनी थकव्यासाठी केवळ टॉनिक किंवा अंगावर सूज असेल तर ती कमी करणारी औषधं दिलेली असतात. पण मूळ आजार त्यामुळे बरा होतच नाही. तसंच रुग्णालाही म्हणावा तितका फरक वाटत नाही. अशा पेशंट्समध्ये रिपोर्ट्स नॉर्मल असतानाही जर हायपो थायरॉइड या आजाराची लक्षणं ६० ते ७० टक्के दिसत असतील (सबक्लिनिकल हायपो थायरॉईड) तर त्या अनुषंगाने औषधं सुरू केल्यावर लगेच फरक दिसून येतो.

प्रत्येक वेळी एक नवं फॅड आपल्या देशात येतं. आपणसुद्धा त्यामागे डोळे बंद करून धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती गेल्या १० ते १५ वर्षात आयोडिनयुक्त मिठामुळे झाली आहे. ज्यांना खरोखरच गरज आहे, त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने आयोडाइज्ड मीठ खावं किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडिनचं प्रमाण थोडं वाढवून घ्यावं. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणं त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. या मुद्दयांवर मतमतांतरं भरपूर आहेत.

‘थायरॉइड प्रोफाइल’ म्हणजे T3, T4, TSH ही टेस्ट केल्यास त्या रिपोर्टच्या खाली एक ओळ लिहिलेली असते. ती म्हणजे excess intek of iodinemay lead to highTSH drugh that increases TSH values : iodine. म्हणजे बहुतांश लॅबसुद्धा हे मान्य करतात की, आयोडिनचा वापर मर्यादित असायला हवा.

रोजच्या आहारात आयोडिनची गरज७० ते १५० mcg/day एवढी असते. फक्त १ ग्रॅम आयोडाइज्ड मिठात आयोडिनचं प्रमाण ७७ mcg एवढं असतं. आता विचार करा, आपण दिवसभरात किती मीठ खातो? गरज नसताना आपल्या शरीरात किती आयोडिन जातं? मग का नाही ‘थायरॉइड’चा आजार जडणार.

शाकाहारी लोकांच्या आहारातील आयोडिनची गरज दूध तसंच सालांसहित उकडलेला बटाटा, मुळा, गाजर, लसूण, कांदे, वांगी यांसारख्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते. तर मांसाहारी लोक सी-फूड, अंडी या पदार्थामधून शरीरात निर्माण झालेली आयोडिनची कमतरता भरून काढू शकतात. आयोडिनची कमतरता असल्याची लक्षणं दिसू लागतात तेव्हाच आयोडिन मिठातूनही घ्यावं. मग शरीरात आयोडिनची कमतरता नसताना विनाकारण सरसकट ‘आयोडाइज्ड मीठ’ खाऊ नये. गरज नसताना आयोडाइज्ड मीठ खाण्यापेक्षा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या ‘संधव मीठ’ या मिठाच्या प्रकाराचा जेवणात वापर करावा. संधव (उपवासाचे मीठ) rock salt हे इतर दिवशीही वापरलं तर त्याने नुकसान तर काहीच नाही, उलट ब्लडप्रेशरसारखे (रक्तदाब) इतर आजारही नियंत्रित राहतील. शिवाय या मिठात शरीरासाठी उपकारक असणा-या इतर अन्य खनिजांचंही प्रमाण भरपूर असतं. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असणारं सैंधव मीठ हे सर्वानीच रोजच्या जेवणात वापरायला काहीच हरकत नाही. कारण लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच मानवणारं असं हे मीठ आयुर्वेदालाही मान्य आहे.

शरीरातील आयोडिनचं प्रमाण हे क्लोरीन आणि ब्रोमीनयुक्त पाण्याने कमी होतं. पाणी शुद्ध करण्यासाठी काही ठिकाणी थेट क्लोरीनचा वापर केला जातो. काही ठिकाणी ब्लिचिंग पावडर तर काही ठिकाणी पॉली अल्युमिनाइज्ड क्लोराइडचा वापर केला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी काहीही वापरा, नळाच्या पाण्यावाटे क्लोरीन तुमच्या पोटात प्रवेश करणारच. क्लोरीनचा हा प्रवेश नाकारण्यासाठी एक साधा उपाय आहे. नळावाटे ‘शुद्ध’ करून आलेलं पाणी भरून ठेवून दोन दिवसांनंतर शिळं झालं की वापरावं. तोपर्यंत त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाईल. आपण शरीराला उपकारक ‘शिळं’ पाणी फेकून देतो आणि नळावाटे आलेलं क्लोरीनयुक्त पाणी वापरायला घेतो. मग शरीरातलं आयोडिन कमी होणारच.

व्यायामाद्वारे ‘हायपो थायरॉइड’ या आजारावर नियंत्रण मिळवणं अवघड असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या वजनाच्या चिंतेने रुग्ण ग्रस्त असतो. आहार नियंत्रित करूनही, डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही, अशी रुग्णांची ओरड असते. आयुर्वेदातील ‘पंचकर्म’ या शरीरशुद्धीच्या प्रक्रियेंतर्गत वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य, शिरोधारा करून घेतल्यास हायपो थायरॉइड या आजारावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं, असं आढळून आलं आहे. आयोडिनचं अपुरं सेवन आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लवकर बरे होत नाहीत. त्यासाठी आयोडिनचं अन्नातील प्रमाण योग्य राहील, यासाठी आपण जागरूक राहायला हवं. आयोडिन शरीरात साठवलं जात नाही. त्यासाठी आयोडिन रोजच पण मर्यादित प्रमाणात शरीरात गेलं पाहिजे.

विषेश महत्त्वाचं म्हणजे ‘थायरॉइड’ हा आजार १०० टक्के बरा होत नाही, तर तो १०० टक्के नियंत्रणात ठेवता येतो. रुग्णाची थायरॉइडची गाठ तयार करत नसणारे रसायन योग्य मात्रेत बाहेरून देऊनच थायरॉइड नियंत्रणात ठेवता येतो.

— डॉ.पवन लड्डा

— आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने 

ninad@cybershoppee.com
Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..