सर्वांनीच आत्मसात करणयासारखा अप्रतिम व उत्कृष्ट लेख….
“”ती छडी हरवलीय…..””
पालकसभा संपली.
मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं………
गृहपाठ केला नाही वा वर्गात काहीही आगळीक केली तरी त्याला व्यवस्थित शिक्षा करा.”
“कमाल आहे. अहो, साधी एक पट्टी मारली तरी दुसर्या दिवशी पालक प्रिन्सिपाॅलना भेटतात. आम्हाला समज दिली जाते. तुम्ही तर शिक्षा करा असं सांगताय !”
“योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग आहे असं मला वाटतं. शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायला हवा.”
मला समर्थ विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी पहिली शिक्षा आठवली. हिशेबाचं उत्तर चोरुन लिहिल्याबद्दल भाटवडेकर बाईंनी केलेली.
वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरुन तासभर उभं केलं होतं त्यांनी. अश्रूंची धार लागली होती. शिक्षा संपली न् जवळ घेऊन, थोपटून त्या म्हणाल्या, “अरे, आता हिशेबच काय, कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही.”
हे आठवलं न् हसू आलं
‘”शिक्षा ‘” याचा अर्थ फक्त मारहाण, उपासमार, तणावपूर्ण अबोला असा नाही. शिक्षेचे रुपरंगही बदलत जातात. मुळात शिक्षा करणार्यामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं. तेच नसेल तर त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य प्रकटत नाही.
शिक्षा म्हणजे क्रोधाचा आविष्कार नव्हे; तर हितचिंतनाचा तो एक प्रकार आहे. आठवतं—अभ्यास सोडून मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाहीत हा वडीलांनी केलेला उपदेश विसरुन संध्याकाळी पाहुण्या आलेल्या नातेवाईंकाच्या रंगलेल्या गप्पा मी ऐकत असल्याचे पाहताच काही कळायच्या आत त्यांनी गुडघ्याच्या खाली पोटरीवर वेताच्या छडीने विलक्षण वेगाने प्रसाद दिला. दुसर्या दिवशी सकाळीच ती छडी बंबात टाकण्याची दक्षता मी घेतली.
पाच—सहा दिवसांनी बाजारपेठेत फिरायला गेल्यावर छडीच्या दुकानाशी वडील थांबले न् म्हणाले, ” बघ, तुला कुठली बरी वाटते ती?”
आज वेळीच झालेल्या त्या शासनाचा वारंवार उपयोग होतो. आज पालकांच्या हातातली ती छडी हरवलेली दिसते. पालक आणि शिक्षक यांच्या पाच बोटांतली चार बोटे मायेची असावीत, पण एक बोट वेळीच कर्तव्यकठोर होणारं असावं. योग्य शिक्षा हेही वात्सल्यच, हे न कळल्याने, काटछाट न केलेल्या झाडासारखी मुलं कशीही वाढतात. तसं झाड सुंदर दिसेलही, पण मुलांना मात्र आकार द्यावाच लागतो.
मिठाचं प्रमाण बदलल्यावर पदार्थाचं जे होतं तेच शिक्षेचं प्रमाण अती झाल्यानंही होतं. तेव्हा हा विचार सारासार विवेकानंच घ्यावा.
भिंतीवर नको तो मजकूर लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून ‘श्यामची आई ‘ मधील दहा पानं लिहून आण म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यानं पंधरा दिवसानं अख्खं पुस्तकच लिहून आणल्याचा प्रसंग आजही आठवतो. ‘श्यामची आई ‘ चं ते हस्तलिखित बाड पाहून मी चक्रावलो. ‘ सर, तुम्ही दहाच पानं सांगितलीत. पण मला पुस्तक एवढं आवडलं की लिहावंसंच वाटलं.
श्यामची आई मरण पावल्यावर जेव्हा ती श्यामच्या स्वप्नात येते, तेव्हा सर खूप रडलो मी ! माझ्या चुका कळल्या. आईला यापुढे त्रास द्यायचा नाही, असा मी निश्चय केलाय सर.”
मी म्हटलं, ” आता तुझ्या हातून वाईट लिहिलं जाणं शक्यच नाही. कारण साने गुरूजींनी ‘श्यामची आई ‘ लिहिलं, त्यानंतर तूच लिहिलंस ”
काळ बदलतोय. आता प्रत्येक वर्षी नव्या, अधिक निगरगट्ट मुलांची पिढी वर्गात येताना दिसते. प्रसारमाध्यमांमुळे मुलं एका बाजूला चुणचुणीत, ‘जनरल नाॅलेज’ ने ‘करोडपती’ झालेली दिसतात ; पण बिनधास्त, आगाऊ, रगेलही झालेली ही मुलं पाहिली की वाटतं— यामध्ये निदान आपलं मूल तरी नसावं.
मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष पाहिजे. कारण शब्दात ‘ चारित्र्य ‘ नसेल तर धाक निर्माण होत नाही. घरात आपण कसं वावरतो यातूनच मुलं शिकत असतात. अधिकार ‘पदा’ त तेव्हाच येतो जेव्हा तो स्वत:च्या आचरणात असतो.
शाळेच्या सहलीला गोव्याला गेलेल्या मुलीला बाबा जेव्हा ‘गोव्याची’ घेऊन ये, सांगताना आम्ही शिक्षक ऐकतो, तेव्हा त्या मुलीच्या सैरभर आयुष्याची तयारी घरातूनच होते, हे हताशपणे पाहतो.
घरात सर्व वस्तु आहेत. चैनीच्या, विलासाच्या……,
देह अगदी पूर्ण सुखात लोळेल याची काळजी आपल्यात आर्थिक अनुकूलतेनं घेतली आहे.
आपल्या घरात बघा. काय नाही आपल्या घरात?
सर्व …… सर्व आहे!
फक्त दोन गोष्टी आहेत का, बघा?
कोपर्यातली ” छडी ”आणि “देवघरातलं निरांजन” !
— संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
Leave a Reply