अनघा दिवाळी अंक २०२१ मधील सुभाष सुंठणकर यांची कथा
अर्चना त्या रात्री उशिराच घरी आली. नेहमी मैत्रिणींकडे जाऊन आठच्या आत घरात येणारी अर्चना त्या रात्री पावणे दहा वाजता घरी आली.
तिच्या वडिलाने ‘उशीर का झाला?’ असे विचारल्यावर ती म्हणाली.
“आम्ही मैत्रिणीच्या घरी अभ्यास करत होतो.”
“इतका वेळ? कुणाच्या घरी?”
“आर्याच्या घरी?”
“आर्याच्या घरी? कोण कोण होता?” वडिलांचा संशय.
“मी आणि आर्या….. आणि पल्लवी होती… अं,.. अं.. शिवाय ममता होती.”
“म्हणजे चौघी होता? कोणत्या विषयाचा अभ्यास?”आईने विचारले.
“अर्थात मॅथस्… मॅथस् असल्यामुळेच उशीर होतो ना?… एकेक गणित सुटायला वेळ लागतो… उशीर होणारच…”
“बरं. आता जेऊन झोप जा. सकाळी क्लाससाठी लवकर उठायचे आहे ना?”
मग अर्चना जेवली. तिने आत जाऊन हळूच तन्मयला फोन लावला. व नंतर ती झोपली.
अर्चना झोपली हे पाहून अर्चनाचे आई वडिल राधाबाई आणि अनंत आपापसात कुजबुजू लागले. अर्चना खोटे सांगत असावी. ती दुसरीकडेच गेली असावी. आर्याच्या घरी अभ्यासाला गेली नसावी असे त्यांना वाटू लागले. अर्चनाच्या डायरीत आर्या, पल्लवी, ममताचे फोन नंबर आहेत. उद्या अर्चना गायनाच्या क्लासला गेल्यावर हळूच त्या तिघींना फोन करायचा व त्या खरंच अभ्यास करत होत्या का याची चौकशी करायची, असे अनंत व राधाबाईने ठरवून टाकले.
अर्चनाने उठल्यावर दात घासणे, आंघोळीला जाणे, नाश्ता घेणे या बाबतीत नेहमीप्रमाणे चिडचिड केली. तिने आधी मोबाईलवरचे पन्नास साठ मेसेज वाचले. नंतर ती गायनाच्या क्लासला गेली.
अनंतने डायरीतील आर्याचा फोन नंबर शोधून आर्याला फोन लावला. तो तिच्या बापाने उचलला.
“कोण तुम्ही? अनंतराव? म्हणजे अर्चनाचे वडील.. हां, हां… महागाई काय वाढले हो, पेट्रोलचा दर पूर्वी साठ होता. आता नव्वदच्या वर गेलाय. गॅस सिलिंडर चारशेला होता तो सातशेच्यावर गेलाय. सरकार सामान्य जनतेला छळायला बसलाय बघा. विजेचं बील पूर्वी दोनशे यायचं. आता बाराशे येतय…”
“हो, हो, बरोबर तुमचं म्हणणं. तुम्ही फोन जरा आर्याकडे देता का? आर्याकडे काम होतं.”
“आर्याची सुध्दा कॉलेज फी वाढले बघा. फोन देतो हं आर्याकडे.”
वडिलाने आर्याला बोलावले. आर्याने फोन घेतला. अनंतने आपण कोण ते फोनवर सांगितले.
“हां. अंकल. बोला ना. काही काम होतं का?”
“हो. जरा विचारायचं होतं”
“बोला ना अंकल”
“काल संध्याकाळी अर्चना तुमच्या घरी अभ्यासाला आली होती का?”
हे ऐकताच आर्या सावध झाली. अर्चना काल संध्याकाळी सिनेमाला गेली होती हे तिला माहीत होते. ती तन्मयबरोबर सिनेमाला गेली होती हे ही माहीत होते. आता सावरून घेतले पाहिजे.
“अं.. येस. आली होती ना” आर्याने थाप ठोकली.
“अभ्यासाला आली होती?” अनंतची शंका.
“हो, स्टडी करण्यासाठीच आली होती. अंकल.”
“कोणत्या विषयाचा अभ्यास केला तुम्ही?”
“अर्थात केमेस्ट्रीचा. ऑरगॅनीक केमेस्ट्री.”
“अभ्यास केलात ना? मग ठीक आहे, किती वाजेपर्यंत अभ्यास केला?”
“सहा ते साडे सात… साडे सात कुठले?… साडे आठ वाजले बघा अंकल… साडे आठ… हो. साडे आठ वाजले.”
आर्याने मनात हिशोब घातला. सिनेमा उशिरा सुटला असणार. अर्चना नऊ वाजता घरी गेली असणार. आपण नऊ, सव्वा नऊ पर्यंत अभ्यास केला म्हणून सांगायला हवे होते. पण आता जाऊदेत आपण सारखं आपलं विधान बदलत राहिलं तर अंकलना संशय येईल.
“काही नाही. अर्चनाला काल घरी यायला उशिर झाला म्हणून सहज आपलं विचारलं. काळजी वाटते ना.”
“डोन्ट वरी अंकल.”
“कोण कोण अभ्यास करत होता तुम्ही?”
“कोण कोण म्हणजे?”
“म्हणजे किती जणं? कोण कोण?”
“आम्ही दोघीच.”
“दोघीच ना?”
“होय, दोघीच. मी आणि अर्चना.”
“बरं ठीक आहे. अभ्यास करा. चांगली गोष्ट आहे. अर्चना उशिरा आली म्हणून जरा काळजी वाटली. बरं मी फोन ठेवतो.”
मग अनंतने फोन ठेवला. घडलेला संवाद राधाबाईना सांगितला तेंव्हा राधाबाई म्हणाल्या.
“सगळंच संशयास्पद वाटतंय हो, अर्चना मॅथ्सचा अभ्यास केला म्हणते. आर्या केमेस्ट्रीचा अभ्यास केला म्हणते, आणि साडेआठपर्यंत अभ्यास केला म्हणते. अर्चना तर पावणेदहाला घरी आली. अर्चना म्हणते चौघींनी मिळून अभ्यास केला. आर्या दोघीच म्हणते.”
“अर्चना खोटं बोलली हे नक्की.” अनंत चिडून म्हणाला.
“होय. आता असं करूया. आर्यासुध्दा खोटं बोलत असेल. आपण पल्लवीला विचारलं तर? ती खरं सांगेल.”
“होय, त्यावरून अर्चना खोटे बोलते की आर्या खोटे बोलते ते ही समजेल.”
“लावा पल्लवीला फोन.”
मग अनंतने अर्चनाच्या डायरीतला पल्लवीचा फोन नंबर शोधला पल्लवीला फोन लावला.
तो फोन पल्लवीचा भाऊ पार्थेश याने उचलला.
“पल्लवी आहे का?” अनंतने विचारले.
पुरूषाचा आवाज ऐकून पार्थेशला संशय आला. “कोण तुम्ही?”
“मी अनंत.”
पार्थेशचा संशय जास्तच दुणावला. पल्लवी आपल्या खोलीचा दरवाजा आड करुन सतत कुणाला तरी फोन करत असते, फोन करताना ती हसत खिदळत असते. तासतासभर फोन करते, आपण तिच्या खोलीत गेलो की ती पटकन फोन बंद करते. ती कुणाला फोन करते ते इतके दिवस समजत नव्हतं. आत्ता समजलं. ती अनंतला फोन करते. अनंतबरोबरचे तिचे चाळे चालू द्यायचे नाहीत. एके दिवशी हा अनंत कोण ते शोधून काढून त्याला इंगा दाखवायचा. आत्ता काहीच करायचे नाही. नंतर कधीतरी पल्लवीला धडा शिकवायचा.
मग त्याने किचनमध्ये असलेल्या पल्लवीला फोन आलाय हे सांगितले व तिच्याकडे मोबाईल देऊन तो बाहेर निघून गेला.
“हॅलो.” पल्लवी म्हणाली.
“मी अनंत.”
“अनंत? कोण अनंत? मी अनंत बिनंतला ओळखत नाही.”
“अगं मी अनंत. तुझी मैत्रिण माझी मुलगी.”
“मला शंभर मैत्रिणी आहेत.” पल्लवी ठसक्यात म्हणाली.
“अगं. अर्चना. अर्चना तुझी मैत्रीण ना? ती माझी मुलगी.”
पल्लवीच्या अर्चना नावाच्या दोन मैत्रिणी होत्या. एकीचे इनिशिअल ए.डी. होते. दुसरीचे ए.ए. होते. म्हणजे अर्चना अनंत..
“हां. हा. तुम्ही अर्चनाचे बाप काय.. सॉरी, अर्चनाचे वडील काय? बरं, काय काम होतं?”
“काल अर्चना सिनेमाला गेली होती ना? संध्याकाळी?” अनंतने मुद्दामच विचारले.
पल्लवी एकदम सावध झाली. अर्चनाचे वडील आपल्याकडे अर्चनाची चौकशी करताहेत. ते सगळी माहिती काढायला बघणार सावध राहून उत्तरं दिली पाहिजेत.
“अर्चना ना? होय, सिनेमाला गेली होती. अर्चनाने सिनेमाला जायचं नसतंय काय?” पल्लवीनेच प्रश्न विचारला.
“जाऊदेत सिनेमाला जाऊदेत, माझं काही म्हणणं नाही…”
“मग उगीच कशाला चांभार चौकशी चालवलीत?”
“हे बघ पल्लवी. अर्चना काल सिनेमाला गेली होती हे मला माहित आहे..” अनंतने थाप ठोकली.
“मग?”
“ती कुणाबरोबर गेली होती हे विचारायचं होतं.”
अर्चना तन्मयबरोबर गेली होती हे पल्लवीला माहीत होते.
“कुणाबरोबर म्हणजे? अर्थात माझ्याबरोबर.” पल्लवीने थाप ठोकली.
“तुझ्याबरोबर ना, मग हरकत नाही.”
“मी आणि अर्चना गेलो होतो.”
“तुम्ही दोघीच ना?”
“दोघीच ना म्हणजे काय? सिनेमाला काय शंभर जण जातात?”
“कोणत्या सिनेमाला?”
“मुझे नही मालूम”
“माहीत नाही म्हणजे? सिनेमाला जाता आणि त्या सिनेमाचं नाव माहीत नसतंय?”
“अहो ‘मुझे नही मालूम’ हेच सिनेमाचे नाव आहे.” “अस्सं.. असं…, कोणत्या थिएटरला?”
‘मुझे नही मालूम’ कोणत्या थिएटरला लागलाय ते पल्लवीला माहीत नव्हते.
“साधना टॉकीजला” पल्लवीने थाप ठोकली.
“बरं. बरं. ठीक आहे. अर्चना काल उशिरा आली म्हणून सहज चौकशी केली. उशिरा आली की काळजी वाटते ना? बरं आहे. फोन ठेवतो.”
अनंतने फोन ठेवला. झालेला संवाद राधाबाईला सांगितला तेव्हा राधाबाई म्हणाली…
“सगळं संशयास्पद वाटतंय असं जे मी म्हणते ते बरोबर आहे. आता बघा, अर्चना म्हणते. ती आर्याकडे अभ्यासाला गेली होती. मॅथ्सचा अभ्यास केला. चौघी जणी होत्या. पल्लवी म्हणते. त्या सिनेमाला गेल्या होत्या. दोघी होत्या. साधना टॉकीजला ‘मुझे क्या मालूम’ सिनेमा बघितला. “
“मुझे क्या मालूम नव्हे. मुझे नही मालूम” अनंत म्हणाला.
“मुझे नही मालूम का? बरं. ठीक आहे पण सगळं संशयास्पद आहे.”
“पण या तिघींचं संगनमत असावं असं मला वाटत नाही.”
“संगनमत नाहीच हो. तिघीही निराळंच काहीतरी सांगताहेत.”
“खरं काहीच कळत नाही.”
“मला तरी वाटतंय. ममताला विचारावं.”
“ममताला? नको. गरज नाही.” अनंत पटकन म्हणाला.
“गरज नाही? असं कसं म्हणता हो?”
“नीट विचार कर. अर्चना खोटं सांगते हे नक्कीच. ती अभ्यासाला गेलीच नव्हती. पण मला पल्लवीचं बरोबर वाटतंय.”
“पल्लवीचं? बरोबर वाटतंय? असं कसं हो?”
“हे बघ अर्चना आणि पल्लवी दोघी मिळून सिनेमाला गेल्या असणार. पल्लवीने टॉकीजचं आणि सिनेमाचं नावही सांगिलंय. अर्चना आपल्याला घाबरते. सिनेमाला गेले होते हे सांगितलं तर आपण तिला ओरडणार हे तिला माहीत आहे. म्हणून तिने थाप मारली. अभ्यासाला गेले होते असं सांगितलं. ते खरं वाटावं म्हणून चौघी जणी अभ्यास करत होतो ही थाप मारली. पण रात्री पावणेदहा वाजता आली त्या अर्थी ती पल्लवीबरोबर सिनेमाला गेली असणार.”
“तुमचं पटण्याजोगं आहे हो, मग आर्याचं काय?”
“ती थापाडीच आहे.”
“बरोबर. ती थापाडीच आहे. बरं ते असूदेत. पण मी म्हणते. आपण ममतालाही फोन करूया.” राधाबाईचा आग्रह कायम होता.
“करूयाच म्हणतीस?”
“करूया. करूया. एखादे वेळेस खरे काय झाले ते समजेल.”
“चला. तिलाही फोन करून टाकूया.”
मग अर्चनाच्या डायरीतून फोन नंबर काढून त्याने ममताला फोन लावला.
“काय रे अन्त्या, मध्येच फोन कशाला केलास?” पलिकडून आवाज आला. तो फोन ममता आत्याला लागला. ममता आत्या म्हणजे अनंताची मोठी चुलतबहीण. अनंताहून दहा वर्षाने मोठी, तिचा फोन नंबर अर्चनाने ममता आत्या असे न लिहिता नुसते ममता लिहून नोंदवला होता. मग अनंताला चुलत बहिणीबरोबर पाच सहा मिनिटे बोलावेच लागले. तेवढ्यात त्या ममताआत्याने अनंतला चिक्कूपणा करू नकोस. अधुनमधून सढळ हस्ते खर्च करत जा. असा उपदेश केलाच.
मग अनंतने अर्चनाची डायरी पुन्हा एकदा पाहिली. त्यात आणखी एक ममताचा फोन नंबर मिळाला.
अनंताने ममताला फोन लावला.
या खेपेस ममताच्या वडिलाने अथवा भावाने फोन न उचलता स्वत:च ममताने फोन उचलला.
“हॅलो. कोण बोलंतय?”
“मी अनंत. म्हणजे अर्चना माझी मुलगी.”
“हा. म्हणजे तुम्ही तिचे वडील बोलताय का? नमस्कार.”
“तुला एक विचारायचं होतं.”
“विचारा ना काका.”
“काल संध्याकाळी अर्चना कोठे गेली होती हे तुला माहीत आहे का?”
या प्रश्नासारखी ममता एकदम गोंधळलीच. काय बोलावे हे तिला सुचेना. अर्चना तन्मयबरोबर सिनेमाला गेली होती हे तिला माहीत होते.
“अं.. अं..”
“म्हणजे अर्चना काल संध्याकाळी सिनेमाला गेली होती ना?”
खोटे बोलले तर खरं कधीतरी उघडकीला येईल. त्यापेक्षा खरे सांगून टाकावे. आम्ही अभ्यास करत होतो. आम्ही बागेत फिरायला गेलो होतो. आम्ही आर्याकडे गेलो होतो. अशा थापा मारण्यापेक्षा खरे सांगावे असा विचार करून ती म्हणाली.
“होय. ती सिनेमाला गेली होती.”
“पल्लवीबरोबर गेली होती का?”
“अं?…”
आता मात्र ममता पेचात पडली. अर्चनाने मी पल्लवीबरोबर सिनेमाला गेले होते. असं घरी सांगितलंय की काय? अर्चनाचे बाबा पल्लवीला विचारूनसुध्दा खात्री करून घेतील, आपण खोटे पडायला नको. खरे सांगून टाकावे.
“नाही.”
“पल्लवीबरोबर गेली नाही?” अनंत चकित.
“नाही काका”
“मग कोणाबरोबर गेली होती?”
या प्रश्नाचे उत्तर सांगावे की नाही असा ममताला प्रश्न पडला. ममताचा सुध्दा एक प्रियकर होता, त्याचे नाव ओंकार होते. ओंकारला ती कधी कधी वाचनालयात भेटत होती. कधी कॉलेजच्या मागच्या निर्जन रस्त्यावर भेटत होती. त्याच्याबरोबर सिनेमाला जावे असे तिला फार वाटे. पण तेथे कुणीतरी पाहिले तर काय म्हणून ती घाबरत असे. धाडस करत नसे.
आपली व ओंकारची भेट गुप्त राहिली पाहिजे असे तिला वाटे. तसेच अर्चनाच्या व तन्मयच्या भेटीही गुप्त राहिल्या पाहिजेत असे असे तिला वाटे.
आता अर्चनाच्या बाबांनी तिला पेचात आणले होते.
“अं?”
“अर्चना कोणाबरोबर सिनेमाला गेली होती?”
“एका…. एका…. तरुणाबरोबर…”
“तरुणाबरोबर?” अनंतला धक्काच बसला.
धक्का? तसं पाहिलं तर तो फार मोठा धक्का नव्हता. अर्चना रोज कुणाला तरी फोन करतच होती. तासतासभर फोन करायची. फोनवर हसता खिदळत असायची. कुणाची चाहूल लागली तर फोन ठेवून द्यायची. तसा घरी तिच्याकडे कोणी येत नव्हता. पण ती एखाद्याला बाहेर भेटत असावी.
“अं… होय काका”
“कोण तो तरूण?”
तन्मयचे नाव सांगावे की नाही असा ममताला प्रश्न पडला. नाव सांगितले तर अर्चना चिडणार. नाव सांगितले नाही तर अर्चनाचे बाबा चिडणार. कदाचित आपल्या घरी प्रगट होणार, आपल्या आईबाबांच्या पुढ्यात अर्चनाचे सारे बिंग फुटणार, मग अर्चनाही चिडेल व ओंकारबरोबरचे आपले बिंग फोडेल.
काय करावे? खोटे बोलण्यात अर्थ नाही. खरे फोनवरच सांगून टाकावे.
“आहे एक…”
“त्याला नाव गाव काय आहे की नाही? नाव काय त्याचं?” अनंतने जोरात विचारले.
“त…. तन्मय”
“तन्मय?”
“हो…. तन्मय.”
अर्चना मैत्रिणींना फोन करायची तेंव्हा कधीकधी तन्मयचा उल्लेख असायचा हे अनंतला आठवले.
“तन्मयबरोबर सिनेमाला गेली होती काय? कोणत्या थिएटरला?”
“साधना टॉकीज.”
‘मुझे नही मालूम’ लाच गेली होती ना?
“नाही” आता ममताच चकित झाली.
“नाही? मग?” अनंत चकित झाला.
“मुझे नही मालूम हा रेक्स टॉकीजला आलाय. साधना टॉकीजला इंग्रजी सिनेमा लागलाय.”
“इंग्रजी? कुठला?” अनंत सटपटलाच.
“हेलिकॉप्टर टारझन थ्री.”
“हेलिकॉप्टर टारझन थ्री? हे सिनेमाचे नाव आहे?”
अर्चना कधी इंग्रजी सिनेमा पहात नाही हे अनंतला माहीत होते.
“होय”
“पूर्वी कधी ते दोघे मिळून सिनेमाला गेलेत काय?”
त्या दोघांनी एक दोन सिनेमा दुपारी पाहिलेत असा ममताला संशय होता. पण त्याबाबत काही न सांगता ती म्हणाली.
“मला माहीत नाही… पण पाहिलेले नसणार…”
“बरं. ठीक आहे. म्हणजे काल संध्याकाळी ती अभ्यास करत नव्हती हे खरे आहे ना?”
“अभ्यास? मध्येच कुठला अभ्यास आला काका? सिनेमा थिएटरात कोण कधी अभ्यास करतं का? ती अभ्यास करत नसणारच. ती सिनेमाच पहात असणार.”
“बरं. ठीक आहे. काल अर्चना घरी उशिरा आली म्हणून काळजी वाटली. तेवढ्यासाठीच तुझ्याकडे चौकशी केली. ठीक आहे. फोन ठेवतो.”
असे म्हणून अनंतने फोन ठेवला, घडलेला संवाद राधाबाईला सांगितला.
राधाबाई चिडली. म्हणाली-
“थांब. कार्टी क्लासहून येऊदेत. तिची खरडपट्टीच काढते. अभ्यासाला जाते म्हणून थापा मारते काय? इंग्रजी सिनेमा बघते कार्टी. तेही पर पुरुषाबरोबर. येऊ देत तर. खरडपट्टीच काढते. तिचा बाहेरचा अभ्यास बंद. आजपासून घरीच अभ्यास करायचा.”
मग अनंत म्हणाला-
“सोडायचं नाहीच कार्टीला. तिच्या डायरीत तन्मयचा फोननंबरही दिसला मला. त्यालाही फोन करून बोलावून घेतो. त्याची तंगडीच तोडून ठेवतो. काठी कुठे आहे? काठी शोधून ठेव.”
अनंतही भयंकर संतापलेला होता. आता तन्मयला आपली तंगडी वाचवणेच भाग होते.
– सुभाष सुंठणकर.
Leave a Reply