खरे तर ती मला जेव्हा भेटली तेव्हा इतरांपेक्षा वेगळी होती. साधी मुलगी पण विलक्षण ऍक्टिव्ह , तिचे दिसणे खूप चांगले होते म्हणण्यापेक्षा आकर्षक होते , बेताची उंची , घारे डोळे आणि , पिंजारलेले केस. ती नेहमी म्हणायची तुम्ही असे कसे रहाता? इतरांसारखे व्यवस्थित म्हणजे , अत्यंत टापटीप कपडे , डोक्याला चांगला भांग . तिला मी नेहमी म्हणत असे मी एकदा भांग पडतो ती त्या कंगव्यावर कृपा म्हणावी लागेल. पावडर वगैरे नाही. ती म्हणे अहो अनेक पुरुष कंगवा आणि पुडीत पावडर घेऊन फिरणारे मी बघतले आहेत. मी म्हणालो तुम्हा मुलींचे खूप लक्ष असते सगळ्यांकडे . तशी ती हसली म्हणाली , जसे तुम्हा पुरुषांचे मुलींकडे , स्त्रियांकडे असते तसे आमचेही.
तिच्या माझ्यात जवळ जवळ २५ वर्षाचे अंतर. शेजारीच रहात होती. आम्ही चाळीत रहात असल्यामुळे थंडीत ऊन खायला सकाळी बाहेर असायचो कधी रविवारी तर कधी बँक हॉलीडेला. तिचे कॉलेजचे शिक्षण चालू होते आणि मी नोकरीवाला , लग्न झालेला. चाळीत तसे खेळीमेळीचे वातावरण असे . ती आणि तिची आई रहात होती , वडील आधीच गेलेले होते. ज्यांना डाउट खायचा असेल ते कसेही खातील यावर माझा भरवसा होता. कधी पंधरा दिवसांनी तर कधी महिन्याने सहज भेट होत असे.
एकदा मला ती व्हीटीला फोर्टमध्ये भेटली. इथे कुठे , मी म्हणालो ती म्हणाली इथे मुबई विद्यापीठात आले होते . बी ए ची परीक्षा येईल त्याआधी एम ए ची चौकशी करायला आले .बहुदा परत यावे लागेल. चल आपण चहा मारू , मी म्हणालो तिथेच टपरीवर चहा पीत पीत तिला म्हणालो अरे हा नंबर घे माझ्या मित्राचा आहे , उपयोगी पडेल या विद्यापीठात माझा मित्र वरच्या पोस्टला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या , चहाची आणखी एक राउंड झाली. ती बरेच काही तिच्या आयुष्याबद्दल बोलली . तिचे प्लॅन्स . पण लग्न या विषयावर ती बोललीच नाही. शक्यतो मी लग्न करणार नाही , नाही करावेसे वाटत . मी का विचारले तशी ती म्हणाली सांगेन कधीतरी.
आम्ही दोन्ही दिशेला निघून गेलो. पुढे ती बिझी झाली. मी पण गुंतलो. आम्ही दुसरीकडे ब्लॉक घेतला तेथे रहायला गेलो. जाताना तिला म्हणालो , भेट परत आपले ते , लग्नाचे बोलणे अर्धवट राहिले आहे. ती हसली या वेळा तिचा चेहरा मला आत्मविश्वासाने भारलेला दिसला , तशी ती म्हणाली अजनूही विचार नाही समजले काका. काका या शब्दाने मी जरा चमकलो , तिने मला कधी काका या नावाने हाक मारले नव्हते. कुठल्या मुलीने मला काका म्हटलेले मला अजिबात आवडत नाही , मी नेहमी सांगतो एक वेळ नावाने हाक मार केव्हा माझ्या टोपणनावाने झिपऱ्या नावाने हाक मार चालेल. दिवस जात होते , महिने गेले. खरे तर मी तिला विसरलो. गणपतीला या वर्षी मी चाळीत जायचे ठरवले. आरतीला सगळॆ होतो ती पण होती ,तिला जॉब लागलेला होता , खूप छान दिसत होती . प्रसाद घेऊन बाहेर आलो , मागोमाग ती पण आली ,हळूच म्हणाली काय झिपऱ्या कसा आहेस. मी तीन ताड उडालो. तिच्या तोडून हे शब्द मला अनपेक्षित होते. तशी ती खळखळून हसली. म्हणाली बघ अजूनही लग्न नाही. करायचेच नाही हे ठरवले. इतक्यात एक छोटी मुलगी आई म्हणत आली आणि तिला मिठी मारली. मी चमकलोच . तिच्या दंडाला धरून बाजूला नेले ए बाई हे काय .तिची मुलगी परत खेळायला गेली होती . ती म्हणाली दत्तक घेतली. मला मुल होणारच नव्हते . आपले लग्न व्हावे असे कधीच वाटले नाही , लहानपणी जे घरात पहिले तेव्हाच ठरवले. काय पहिले होतेस. काहीच नाही . आता मात्र मी ठरवले आज आलो तर बोलून जावे. ती शेवटी म्हणाली ….. बाप आणि मुलगी ह्याचे नाते कसे आहे ते मी अनुभवले आहे. तेव्हाच ठरवले. तिचा बाप माझ्या डोळ्यासमोर आला , अत्यंत शांत दिसणारा , आयडियल नवरा दिसणारा , त्याच्या हातून काहीतरी घडले असणारच , मनात शंका आली . ती समजली , मला समजले ते . तसे मला सगळेच समजले म्हणा. तिच्या एक वाक्यावरून तिचा बाप काही वर्षांपूर्वीच वारला होता, ट्रेन मधून पडला, ती आणि तो दोघे नाशिकला जात होते तेव्हा , रात्रीची वेळ होती ,
” गाडीला गर्दी अजिबात नव्हती.” मी समजून गेलो . मी शांतपणे तिला बाय केले. आजही ती भेटते खूप गप्पा होतात. पण लग्नाचा विषय मात्र ती काढत नाही.
सतीश चाफेकर.
Leave a Reply