
पौष महिन्यात येणारा संक्रांतीचा सण हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला एक महत्वाचा उत्सव आहे. ‘ तिळगुळ घ्या, गोड बोला ’ असे एकमेकांना म्हणत नवे जुने स्नेहाचे धागे अधिक घट्ट करण्याचा व एकमताने वागण्याचा संदेश देणारा हा मंगल दिन आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या पुढील सहा महिन्याच्या कालखंडात उत्तर गोलार्ध अधिक प्रकाशमान होणार ही संक्रमण स्थिती ‘मकरसंक्रांती’ म्हणून ओळखली जाते. प्रकाशाच्या मार्गावर नेणारे उत्तरायण शुभ व पवित्र समजले जाते. तसेच या सणानिमित्त आपल्या संस्कृतीतील प्रथा स्नेहवर्धनाची दीक्षा देतातच पण जीवनातले चढ-उतार पचवण्याची शक्ती ही देतात. अवघे जीवन हे सुख-दुःखाच्या दुहेरी धाग्यांनी विणलेले ! जसे मकरसंक्रांत म्हणजे प्रकाशाने अंध:कारावर मिळवलेला विजय तसेच आपण ही सुखद आठवणींनी दुःखावर विजय प्राप्त करूया .
भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. सुगडं पुजणं, बोराचे वाण एकमेकींना देणं, विस्तवावर दूध उतू घालवण. या आणि अशा पारंपरिक प्रथा घरोघरी दिसून येतात. हळदीकुंकू लावून तिळगुळाचे लाडू देऊन ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ अशी प्रेमळ विनंती एकमेकांना करतात. एकमेकांमधले हेवे-दावे विसरून जाण्याचा हा दिवस. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे. आत्मिक एकता व मधुरतेचा संदेश देणारा हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो. ‘वसुधैवं कुटुम्बकम’ ची भावना सर्वांच्या मनात बसवणारा हा सण आहे.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची पद्धत आहे. मोकळ्या वातावरणात, आकाशाच्या छपराखाली उभे राहून तासनतास पतंग उडवत राहण्याची ही कल्पना किती छान ! थंडीच्या सरत्या दिवसात सुर्याखाली उभं राहून पतंग उडवायचा. लाल, निळे,हिरवे, पिवळे …… रंगबिरंगी लहान-मोठे पतंग आकाशात उडत असतात. कुणाचे पतंग झरझर वर चढतात तर कुणाचे पतंग तिथल्या तिथे आकाशात झेप घेत-घेत सपकन खाली येतात. आपल्या कुशल हातानी आपल्या पतंगाला कधी ढील देत, कधी खेचत दिशा देत कुणी दुसऱ्यांचे पतंग कापून काढतो. साऱ्या आयुष्याचा खेळ. प्रत्येक जण आयुष्यभर हा खेळ खेळत असतो. आपापले आशेचे, ध्येयाचे पतंग आयुष्यभर उडवीत असतो. आपल्या कुवतीनुसार त्याला दिशा देतो. ज्याला प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या कुशलतेने हे जमते, त्याचा पतंग आकाशात उंच-उंच जातो. तो उंचीवर असा काही स्थिरावतो की जणू काही त्याला अढळ पदच मिळालंय आणि बाकीचे इतस्ततः कुठे ना कुठे अडकलेले ! काही तर फाटके -तुटके पतंगच गोळा करणारे ! मुळात सूत्रधाराची पकड व्यवस्थित हवी, कौशल्य कमावलेले हवे. वाऱ्याची योग्य दिशा मिळताच सरसरून पुढे जाणारे हात हवे.
खेळाच्या मैदानातून बाहेर येताच हारजीत विसरणारे मन हवे कारण आपण सारे एकाच नावेचे प्रवासी. एकमेकांविषयी स्नेहभाव जपत ह्या छोट्याश्या आयुष्याला विराम द्यायचा आहे. सगळ्यांचे जीवन धकाधकीचे, तणावग्रस्त आहे पण जो आपल्या संपर्कात येईल त्यांना माझ्याकडून सुख लाभावे ही काळजी घ्यावी. सुखाची, ज्ञानाची, सन्मानाची, शक्तींची …… देवाण-घेवाण जरूर करा पण दुःख, ईर्षा, घृणा ….. ह्यांचे वाण देणे संपवूया. तरच हा स्नेहदिप सदा प्रकाश मार्गाने पुढे जात राहील.
चला, तर नवीन वर्षाची सुरुवात सद्भावनेने, नवीन आशेने उंच ध्येयाकडे वाटचाल करणारे राहो. सर्व संबंध स्नेहाच्या धाग्याने घट्ट बांधलेले राहो. खरंतर मनुष्य स्वतःसाठी प्रगती व दुसऱ्यासाठी प्रेम ह्याचीच आस धरून वाटचाल करतो. ह्या मकरसंक्रांतीच्या सणानिमित्ताने ही इच्छा सर्वांचीच पूर्ण होवो.
— ब्रह्माकुमारी नीता.
Leave a Reply