नवीन लेखन...

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला पार्थ बावस्कर यांचा लेख


ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते. इथे तयार झालेला कच्चा माल तिकडून प्रक्रिया करून चकचकीत स्वरूपात आणायचा आणि आव्वाच्या सव्वा दरात विकायचा हा धंदा इंग्रज मोठ्या चलाखीने करत. राजकीय वर्चस्व स्थापण्यासाठी व्यापाराचा मोठ्या खुबीने गोऱ्यांनी वापर केला. ब्रिटिशांना शह द्यायचा असेल तर तो त्यांच्याच पद्धतीने द्यावा लागेल, हे सर्वप्रथम ओळखले टिळकांनी! इंग्रज सरकारने भारतातून किती पैसा नेला याचे हिशेब टिळकांनी मांडले होते. म्हणूनच त्यांनी राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनासोबत स्वदेशीची चळवळ सुरू केली.

स्वदेशी वस्तूंच्या वापराची सुरुवात टिळकांनी स्वतःच्या घरापासूनच केलेली दिसेल. त्या काळात पुण्यात अनेक मुलींच्या अंगात विलायती चिटे नेसलेली असत. विलायती चिटे नेसलेल्या आपल्या सख्या पाहून टिळककन्यांनाही या चकचकीत कपड्यांचा मोह होत असे, अशा प्रसंगी बळवंतराव त्यांना जवळ घेत, स्वदेशीचे महत्त्व समजावून सांगत, विलायती कपडे का वापरू नयेत, स्वदेशी का वापरावेत हे पटवून देत अशी आठवण स्वतः टिळकांच्या कन्येनेच लिहून ठेवली आहे. स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन म्हणून आणि अर्थार्जनाचे साधन म्हणूनही लातूरला भागीदारीत उभारलेली त्यांची स्वतःची जिनिंग फॅक्टरी होतीच! पुढे त्यांनी बॉम्बे स्वदेशी स्टोअर्समध्ये शेअर होल्डर म्हणून गुंतवणूक केली. कंपनीच्या कारभारात ते स्वतः लक्ष घालत असत. सामान्य लोकांना देशी शेअर्स स्वस्तात घेता यावेत, यासाठी त्यांनी शेअरची किंमत कमी करून जास्तीत जास्त लोकांना शेअर्स घेता येण्याची सोय केली होती. पैसा फंड या चळवळीतून पुढे स्वदेशी काच कारखान्याचा प्रयोग उभारला गेला हे सर्वश्रुत आहेच. स्वदेशी उद्योगधंदे जोर धरावेत यासाठी तरुणांना टिळक उद्युक्त करत, अशा धडपड्या तरुणांच्या पाठीशी उभे राहत, प्रसंगी त्यांना आर्थिक मदतही देत. स्वदेशीविषयी जागृती व्हावी म्हणून टिळक राजकीय आंदोलनातही तरुणांच्या पाठीशी उभे राहत, विनायक दामोदर सावरकरांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेल्या विलायती कपड्यांच्या होळीला टिळक जातीने हजर राहिले होते हे विसरून कसं चालेल ! एकीकडे हरप्रकारे स्वदेशीला प्राधान्य द्यायचे आणि विलायती वस्तूंचा बहिष्कारही घडवून आणायचा असा हा दुहेरी कार्यक्रम होता. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी हा टिळक विचार नेमक्या शब्दात मांडलेला दिसेल. ते लिहितात, एका बाजूला आपल्या उद्योगधंद्यांचा, कारागिरीचा, व्यापाराचा आणि शेतीचा विकास झाला पाहिजे असे टिळक सांगत; आणि या विकसित होणाऱ्या उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी आपण स्वदेशी पुरस्कार आणि परदेशीचा बहिष्कार केला पाहिजे असे दुसऱ्या बाजूने सांगत. औद्योगिक पारतंत्र्य नष्ट करायचे आणि स्वराज्यप्राप्ती करून घ्यायची हा दुहेरी मार्ग टिळकांनी दाखवून दिला होता.

स्वदेशीची चळवळ मूलगामी स्वरूपाची होती. देशी उद्योगधंदे स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या तडाखेबंद योजना टिळकांच्या मनात होत्या. मराठी नाटकासाठी लागणारे रंग तेव्हा भारतात तयार होत नसत, ते जर्मनीहून आणावे लागत. अशावेळी पुण्यात भट नावाच्या गृहस्थाने जर्मनीच्या तोडीस तोड स्वदेशी रंग बनवणे सुरू केल्यावर टिळकांनी स्वतः भटांना हरप्रकारे मदत केली होती. टिळकांच्या पाठिंब्यानेच भारतात नटांच्या चेहऱ्याला लावायच्या रंगांचे उत्पादन सुरू झाले हे अनेकांना ठाऊकही नसेल. त्या काळात भारतात साखरेचे उत्पादन होत नसे. विलायतेत होणाऱ्या साखर उत्पादनाच्या संदर्भात टिळकांनी काही मूलभूत सिद्धांत, आराखडे, केसरीत प्रसिद्ध केलेले दिसतील. मॉरिशस देशात जितकी साखर पिकते त्याच्या तोडीस तोड साखर एकटा महाराष्ट्र अवघ्या भारताला पुरवू शकेल असा टिळकांचा सिद्धांत होता, त्यासाठी महाराष्ट्रात नद्या किती, त्यावर धरणे किती, इथे ऊस किती पिकतो याचे हिशेब टिळकांनी मांडले होते. टिळक लिहितात, ‘हिंदुस्थानात इतका ऊस पिकत असता दूरच्या मोरीशीयस बेटाने आम्हाला साखर पुरवावी हे आम्हास दूषणास्पद आहे. म्हणून मॉरिशसकडे आपले काही तरुण पाठवून तेथील साखर करण्याची क्रिया शिकवून आणल्यास आपल्या उसाचा उपयोग होईल. विलायतेमध्ये विकसित होत असलेले तंत्रज्ञान भारतात आलेच पाहिजे याबद्दल टिळक ठाम होते. त्यांच्या तंत्रज्ञानाच्या बळावर, अत्याधुनिक साधनसामग्रीच्या बळावर नवनवीन यंत्रे भारतीय तरुणांनी शिकून घ्यावी यासाठी टिळक आग्रही असत. साखर तयार करण्याच्या बाबतीतले हे उदाहरण फार बोलके आहे. स्वातंत्र्याच्या कितीतरी पूर्वी टिळकांनी सांगितलेली योजना आहे ही ! गेल्या दोन-तीन वर्षांत देशाला सर्वाधिक साखर पुरवठा करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे असे आकडेवारी सांगते. स्वातंत्र्याच्या कितीतरी वर्षेआधी लोकमान्यांनी सांगितलेला हा स्वदेशी साखर उत्पादनाचा प्रयोग किती अभिनव होता ! साखरेच्या बळावर आज महाराष्ट्राने किती साखर सम्राट तयार केलेत, एकदा बघा!

मध्यंतरी टाळेबंदीच्या काळात दारूच्या विक्रीचा आणि त्यातून राज्याला मिळणाच्या महसूलाचा प्रश्न फार चर्चेत होता. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीसुद्धा दारूच्या विक्रीमुळे इंग्रजांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असे. परिणामी आपला पैसा विलायतेत जाई. टिळकांनी सुरु केलेल्या दारूबंदीच्या चळवळीतील एक मुद्दा हाही होता की दारू पिणे तर आरोग्याच्या दृष्टीने घातकच पण त्याहूनही अधिक ते राष्ट्राच्या सांपत्तिक स्थितीची हानी करणारे आहे. कारण आपला मौल्यवान पैसा आपण केवळ पिण्यामुळे परकीयांच्या घशात घालत आहोत. म्हणूनच टिळकांनी केलेल्या स्वदेशीच्या प्रचाराला एक नवा अर्थ आहे. अनेकांना वाटेल की स्वदेशी वापरा म्हणजे केवळ स्वतःच्याच देशातला माल वापरा आणि परदेशातून येणाऱ्या सगळ्याच वस्तूंचा त्याग करा ! टिळकांना अभिप्रेत स्वदेशी प्रकरण इतके सोपे नाही. ते कसे आहे हे समजून घेण्यासाठी हा प्रसंग पहा:  टिळकांचे स्वदेशीचे आंदोलन जोर धरू लागल्यावर एका वाचकाने पत्र लिहून टिळकांना प्रश्न विचारला, तुम्ही केसरी आणि मराठासाठी जो कागद वापरता तो स्वदेशी असतो का? त्याला टिळकांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, आम्ही मराठासाठी स्वदेशी कागदच वापरतो, केसरीसाठी वापरावा लागणारा कागद मोठ्या प्रमाणात लागत असल्याने तो पुण्याच्या गिरणीत तयार होत नाही. म्हणून तो परदेशातून मागवावा लागतो. तसे न केल्यास वर्गणीदारांना पैशाचा बराच बोजा सहन करावा लागेल म्हणून हा कागद आम्ही परदेशातून मागवतो. परंतु परदेशातून कागद मागवताना आम्ही एक खबरदारी घेतो. आपल्या देशावर राज्य करणारा जो शत्रू इंग्लंड त्यांच्या देशातून कागद न मागवता केसरीसाठी लागणारा कागद जर्मनी, ऑस्ट्रिया, आणि नॉर्व्हे या देशातून मागवला जातो. इंग्लंडव्यतिरिक्त इतर देशातून कागद मागवणे ही गोष्ट स्वदेशीच्या आणि बहिष्काराच्या तत्त्वाच्या अजिबात आड येत नाही. कारण आपले भांडण फक्त इंग्लंडशी आहे. युरोपातील इतर देशांकडून माल घेणे हे एका दृष्टीने इंग्लंडला अडचणीत आणणारे ठरणारे असेल. कारण अशाने त्यांचा माल विकला जाणार नाही.

टिळकांचे हे म्हणणे आजच्या जागतिकीकरण आणि ऑनलाईन बाजारपेठेच्या काळात फार महत्त्वाचे ठरते. केवळ आपल्याच देशातला माल वापरणे म्हणजे स्वदेशी नाही तर आपल्या देशात तयार होणारा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जाणे हेही आमच्या स्वदेशी समोरचे उद्दिष्ट असावे हे टिळकांनीच आपल्याला सांगून ठेवले आहे.

वर्तमानकाळात सध्या आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर जे देश शत्रुत्व पत्कारून आहेत, दुर्दैवाने त्याच देशांनी आपली बाजारपेठ संपूर्णपणे ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे अशा शत्रूंची आपल्या देशातून होणारी व्यापारी कमाई कमी करणे, त्यांच्याकडून कमीत कमी आयात करणे तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानात उत्तम दर्जाचा माल तयार करून जगभर विकणे याला टिळकांच्या कल्पनेतील आधुनिक स्वदेशी म्हणता येईल. एक मात्र सांगतो, टिळकांची स्वदेशी चळवळ सामान्य माणसात लोकप्रिय असली तरी मवाळ पक्षाने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही. उलट विरोधच केला. देशाच्या अर्थकारणाला उभारी आणणारे हे आंदोलन खरे, पण यात आपलीच माणसे पाय मागे ओढू लागली. आजही स्वदेशी म्हटल्यावर नेमका अर्थ समजून न घेताच वृथा आकांडतांडव करणारी माणसे दिसतातच. अशा अर्धवट शहाण्यांपासून वेळीच सावध होऊन स्वदेशीचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा, समजावून सांगायला हवा. देश स्वतंत्र झाल्यावर नवनवीन प्रयोगशाळा स्थापून जागतिक दर्जाची औषधे तयार करण्यात भारताने पुढाकार घ्यावा, अशी टिळकांची इच्छा होती. ते म्हणाले होते, स्वराज्य मिळाल्यावर मी ठिकठिकाणी प्रयोगशाळा उघडेन आणि देशातील औषधी वनस्पतींच्या संशोधनाचे काम हाती घेईन. आर्थिकदृष्ट्या आपण याकडे लक्ष दिले पाहिजे. परदेशी औषधे विकत घेण्याकडे जे लाखो रुपये खर्च होतात ते अशाने वाचतील. औषधांच्या बाबतीत हा स्वदेशीचा विचार कितीतरी महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावरून टिळक गर्जले होते आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच त्यांनी उद्घोष केला होता की, भारताची संरक्षण व्यवस्था सबल करायची तर स्वदेशी शस्त्रे निर्माण करावी लागतील. आजच्या घडीचा मेक इन इंडिया हा प्रयोग टिळकांच्याच संकल्पनेतला! राजकीय स्वराज्याच्या प्रश्नाला देशी व्यापाराची जोड देऊन भारताच्या सर्वांगीण मुक्ततेची योजना बाळ गंगाधर टिळकांनी आखली, देशाला स्वतः च्या पायावर उभे करण्याचे स्वप्न टिळकांनी पाहिले. लोकमान्यांनी आपल्या दूरगामी विचारातून मांडलेल्या देशाच्या सर्वांगीण स्वावलंबनाच्या संकल्पनांना आज तुम्ही आम्ही आत्मनिर्भर भारत अभियान या गोंडस नावाने ओळखतो !

– पार्थ बावस्कर

(लेखक, व्याख्याते, इतिहास अभ्यासक, नाट्यचित्रपट समीक्षक. वीर सावरकर, लो. टिळक, योगी अरविन्द, रामायण, महाभारत, अशा अनेक विषयांवर व्याख्याने. शब्दामृत प्रकाशन संस्थेचे संचालक.)

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..