सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. विषय संपताना मानव सिद्धांतला उद्देशून बोलतो, “यार कसे गेले ते दिवस गेले ते कळलंच नाही. आपण सारखे अभ्यासात नाहीतर प्रयोगशाळेत! साला आयुष्यच जगता आलं नाही. आता मात्र काहीही होऊ दे, पहिले आयुष्य मजेत घालवू आणि मग कामं.” सिद्धांत मानवच्या बोलण्याला दुजोरा देऊन बोलतो, “खरं आहे भावा. आपण एक काम करू, आपण तुझ्या गावाला जाऊ. मस्त महिनाभर तरी राहून येऊ.” मानवसुद्धा त्या विचाराशी सहमत होतो. त्यांचा निघण्याचा दिवस निश्चित करून ते हॉटेलचे बिल भरून निघतात.
ठरल्या दिवशी दोघेही गावाला निघतात. आगगाडीने प्रवास करीत असताना सिद्धांत निसर्ग न्याहाळत मानवाला उद्देशून बोलतो, “काय भारी वाटतंय भावा! मला कधी एकदा गावाला पोहोचतोय असं झालंय.” मानव त्याला उद्देशून बोलतो, “सिद्धांत पोहोचूच आता थोड्यावेळात.” मजल-दरमजल करीत मानव आणि सिद्धांत गावच्या स्टेशनवर उतरतात. संध्याकाळची वेळ असल्याने स्टेशनवरून ते चालत मानवाच्या घराच्या दिशेने निघतात. थोड्याच वेळात त्यांना स्वागत करणारी गावची भव्य कमान दिसते. सिद्धांतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.तो एखाद्या लहान मुलासारखा उड्या मारत असतो. मानव त्याला धरून घराच्या दिशेने पुढे निघतो. वाटेत त्यांना एक बैलगाडी दिसते. मानव त्या माणसाला बैलगाडी कुठल्या दिशेला जातेय ह्याची चौकशी करतो. विचारपूस केल्यावर ती बैलगाडी त्याच्याच घराच्या आसपास जाणार असल्याचे समजते. मानव त्यांना ते जिथपर्यंत जाणार आहेत तिथपर्यंत सोडण्यासाठी विनंती करतो. तो माणूस तयार होतो. मानव आणि सिद्धांत ह्यांचा बैलगाडीतून प्रवास सुरू होतो. सिद्धांतचा आनंद शिगेला पोहोचतो. वाटेत त्यांना शेतं लागतात. गावकऱ्यांचा संध्याकाळचा नित्यक्रम सुरू असतो. कुठे चुलीवर भाकऱ्या बनत असतात तर कुठे घराकडे परतणाऱ्या गाई, बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा कर्णमधुर आवाज गुंजत असतो. कुठे पक्षी किलबिल करीत आपल्या घरट्याकडे परतत असतात तर कुठे मालक आपल्या बैलांची बैलगाडीपासून सुटका करून त्यांना चारापाणी घालत असतात. बैलगाडीवाल्याच्या घराजवळ उतरून मानव आणि सिद्धांत घराच्या दिशेने पायी निघतात. काही पाऊलं पुढे गेल्यावर मानव आणि सिद्धांत घराजवळ येऊन पोहोचतात. मानव अभिमानाने सिद्धांतला आपला दिमाखदार टोलेजंग वाडा दाखवतो. मानव हा गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असतो. संध्याकाळच्या वेळी मानवची आत्या तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावत असते. अचानक तिचं लक्ष दरवाज्याकडे जातं. समोर मानवला पाहून ती खूप खुश होते. मानवला उद्देशून ती बोलते, “अरे मानव तू? कळवलं का नाहीस तू येणार ते?” मानव आत्याला उद्देशून बोलतो, ” आत्या मला तुला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता आणि मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पण पहायचा होता. असो (सिद्धांतकडे बोट दाखवित) हा माझा शहरातला मित्र सिद्धांत! हा पण माझ्यासोबत राहणार आहे.” आत्या हसत “बरं” असं म्हणत त्यांना वरच्या खोलीत जाऊन फ्रेश व्हायला सांगते. मानव आणि सिद्धांत वरच्या खोलीच्या दिशेने निघतात. आत्या घरगड्याला (गणप्याला)आवाज देऊन मानव आणि सिद्धांतला गरमागरम चहा आणि नाश्ता घेऊन जायला सांगते. इकडे मानव आणि सिद्धांत फ्रेश होऊन बसतात तोपर्यंत गणप्या त्यांच्यासाठी गरमागरम चहा आणि कुरकुरीत कांदाभजी घेऊन येतो. मानवाला बघून गणप्या आनंदित होऊन बोलतो, ” मानव बाबा कसं हायसा? घरला समदी ठीक हायत ना वं? मानव गणप्याला बोलतो, “मी एकदम मस्त आहे काका. तुम्ही कसे आहात? गणप्या म्हणतो, “म्या लय झ्याक हाय. बरं बोलत काय बसलायसा? चा अन भजी थंड होतील, बिगिबिगी घ्या बरं! मानव आणि सिद्धांत हसत हसत चहा आणि भजी घेतात. मानव सिद्धांतची गणप्या सोबत ओळख करून देतो. सिद्धांत चहा आणि भजीचे कौतुक करतो. गणप्या धन्यवाद म्हणून चहाचे पेले घेऊन तिथून बाहेर पडायला जाणार इतक्यात सिद्धांत त्याला बोलतो, ” काका! आम्हांला बाहेर फिरायला घेऊन चला. मला गाव पहायचं आहे. गणप्या त्याला उद्देशून बोलतो, ” सांजच्याला बाहेर पडलो तर मालकीन बाई कावतील. आपण उद्या कोंबडं आरवलं की मंग निगू.”
मानव सिद्धांतला समजावून सांगतो की आपण उद्या सकाळी लवकर उठून निघू. सिद्धांत त्या गोष्टीसाठी तयार होतो.
गणप्या निघून गेल्यावर सिद्धांत बॅगेतील पुस्तक काढून वाचायला लागतो. मानव खाली आत्याशी गप्पा मारायला जातो. आत्या आणि मानवला गप्पांच्या ओघात वेळ कधी गेला ह्याचा अंदाज येत नाही. इतक्यात गणप्या आत्याला आवाज देऊन म्हणतो, “मालकीनबाई! रातच्या जेवनाची समदी तयारी झाली हाय. तुम्ही म्हनशीला तर लगोलग ताटं वाढाया घेतु.” आत्या त्याला वाढायला सांगते आणि मानव सिद्धांतला खाली येण्यासाठी आवाज देतो.सिद्धांत खाली येईपर्यंत ताटं तयार असतात. सिद्धांत भिंतीला टेकून बसलेला असतो आणि मानव त्याच्या शेजारी पण थोडा तिरपा बसतो. सगळे जण जेवायला लागतात. गणप्या वाढण्यासाठी थांबतो. सिद्धांत २-३ घास खातो न खातो इतक्यात एक पाल सिद्धांताच्या खांद्यावर येऊन पडते.
ते पाहून गणप्या दचकतो आणि आत्या बोलते , “अपशकुन झाला. तुझ्यावर काहीतरी संकट येणार आहे.” ते ऐकून मानव वैतागून आत्याला बोलतो, “आत्या! काहीही काय बडबडत आहेस?” आत्या बोलते, “हे बघ मानव, तू शहरात नाही, गावात आहेस. इकडचे नियम तुला मानावेच लागतील.” आत्या सिद्धांतला उद्देशून बोलते, “सिद्धांत! जा हात पाय धुवून ये.” सिद्धांत हात पाय धुवायला जातो. तो येई पर्यंत आत्या आणि मानव ह्यांच्यात वाद होऊ नये म्हणून गणप्या बोलतो , “मानवबाबा! घ्या गरम भाकर घ्या.” गणप्या ताटात भाकरी वाढतो इतक्यात सिद्धांत पण येतो. सगळे जण शांत बसून जेवतात. रात्री सिद्धांत मानवला समजावतो आणि दोघेही झोपी जातात. सकाळी लवकर गणप्या त्यांना उठवायला येतो. त्यांना सगळं उरकायला सांगून तो सगळ्यांच्या न्याहारीची तयारी करायला जातो. मानव आणि सिद्धांत तयारी करून खाली येतात. न्याहारी करून मानव , सिद्धांत आणि गणप्या गावात फिरण्यासाठी, सिद्धांतला शेत दाखवण्यासाठी बाहेर पडतात. मानव आणि सिद्धांत ३-४ पाऊलं पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं की गणप्या दिसत नाही आहे, ते मागे वळून बघतात गणप्या त्यांना येताना दिसतो तो त्यांना बोलतो, “मानव बाबा तुमी व्हा म्होरं, म्या तुमच्या मागून येतू.” मानव आणि सिद्धांत त्यांच्याच मस्तीत चालू लागतात. गणप्या खाली वाकून एक दगड उचलतो आणि स्वतःशीच पुटपुटतो, ” उगा तीन तिघडा अन् काम बिगडा व्हाया नग.” असा म्हणून दगड खिशात टाकून मानव आणि सिद्धांत सोबत चालू लागतो. मजल दरमजल करीत ते शेतात पोहोचतात. गणप्या सिद्धांतला बोलतो , “दादा ह्ये आपलं शिवार बगा. दूरदूर पर्यंत पसरलेलं हाय.” सिद्धांत शेत बघू लागतो. तो त्या निसर्गात हरवून जातो. बराच वेळ मजेत घालवल्यावर गणप्या त्याला बोलतो , “दादा चला तुमांस्नी नदी दावतो.” सिद्धांत आनंदित होतो. मानव , सिद्धांत आणि गणप्या नदीवर जातात. नदीवर पोहोचल्यावर सिद्धांत आणि मानव पाण्यात उतरतात. गणप्याला त्याचा एक मित्र आवाज देतो म्हणून तो मानवला आवाज देऊन तो जवळपास असल्याचे सांगतो. थोड्यावेळाने मानव आणि सिद्धांत नदीच्या काठावर येऊन बसतात. सिद्धांत मानवला बोलतो, “किती नशीबवान आहेत ना इथे राहणारे लोक? किती छान निसर्गसुख अनुभवायला मिळतं ह्यांना! किती शांतता आहे इथे आणि कामाच्या वेळाही ठरलेल्या आहेत, नाहीतर शहरात काय ते बर्गर , पिझ्झा , पास्ता , खाण्याची वेळ नाही , पिण्याची वेळ नाही, वेळ मिळाला तर खायचं नाहीतर उशिरा जेवायचं. हे असं निसर्गसौंदर्य शहरात कुठेही शोधून सापडणार नाही. (मानवला बघत) तुझं नशीब चांगलं आहे. इतकं सुंदर गाव आहे तुला! आमच्या नशिबात गावच नाही आहे. मानव (सिद्धांतला बोलतो) अरे माझं गाव म्हणजे तुझंपण गाव! सिद्धांत खुश होतो आणि इतक्यात मागून गणप्या येतो आणि मानवला बोलतो , “मानवबाबा! चला निघू. मालकीनबाई वाट बघत असतील. घरी जाऊन जेवनाचं बी बगाया लागल.” मानव , सिद्धांत आणि गणप्या जंगलाच्या रस्त्याने घराकडे जायला निघतात. जंगलात जाण्यापूर्वी वाटेत ग्रामदेवतेचं देऊळ लागतं. मानव आणि सिद्धांतला गणप्या मंदीर दाखवतो. सिद्धांतला मंदीराचं बांधकाम खूप आवडतं. मंदीर पूर्णतः दगडाने बनलेलं असून खूप छान कोरीव नक्षीने बनलेले हेमाडपंती देऊळ असतं. सिद्धांत खिशातून मोबाईल काढून त्याचे काही फोटो काढून घेतो. पुढे काही अंतर चालल्यावर गणप्या अचानक एका ठिकाणी येऊन थांबतो. मानव आणि सिद्धांतला प्रश्न पडतो की गणप्या अचानक का थांबला? इतक्यात गणप्या दोघांना बोलतो, “(एका वाटेकडे बोट दाखवत) ही वाट येका सिद्धपुरुषाच्या आश्रमापाशी जातीया. जंगलाच्या आक्शी आतल्या बाजूला त्यांचा आश्रम हाय. समदे गावकरी त्यांन्सी खूप मानतात. त्यांन्सी काय बी झालं असल तर त्ये त्यांच्यापाशीच जात्याती.” हे ऐकून मानव आणि सिद्धांतला खूप आश्चर्य वाटतं. मानव म्हणतो, “आम्हांला नाही विश्वास अशा बाबांवर. आम्ही फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतो. आपण निघू चला.” गणप्या बोलतो, “हे माझ्या म्होरं बोल्लात पर गावात कोना म्होरं बोलू नगा.” असं म्हणून ते तिघेही निघतात. घराजवळ पोहोचल्यावर गणप्या खिशातला दगड कोणाच्याही नकळत बाहेर टाकतो. घरी आल्यावर गणप्या जेवण बनवतो आणि सगळे जेवायला बसतात. जेवण झाल्यानंतर मानव आणि सिद्धांत वरच्या खोलीत जाऊन झोपतात. संध्याकाळी आवाजाच्या गडबडीने त्यांना जाग येते. ते तयार होऊन खाली येतात. खाली गावातली बरीचशी प्रतिष्ठित माणसं जमलेली असतात. आत्या आणि त्यांच्यात संवाद सुरू असतो. मानव आणि सिद्धांत खाली पोहोचतात तेव्हां आत्या एक व्यक्तीशी मानवची ओळख करून देते. आत्या त्या व्यक्तीला बोलते, “बरं का सरपंच! हा मानव. विश्वासचा मुलगा. सरपंच बोलतो, ” मानव! तुझा बाप आणि मी खूप चांगले मित्र आहोत.” मानव हलकंसं हसतो आणि आत्याला बोलतो, “आत्या! मी आणि सिद्धांत जवळपास फिरून येतो.” आत्या म्हणते, “तिन्हीसांज होण्यापूर्वी घरी या.” “बरं” असे म्हणत मानव आणि सिद्धांत बाहेर पडतात. ते थेट एका चहाच्या टपरीवर जातात. चहा संपता संपता त्यांना कसलीतरी गलबल ऐकू येते. ते त्या आवाजाच्या दिशेने बघतात. त्यांना एक साधुवेषधारी माणूस काहीही न बोलता सरळ चालत असताना दिसतो. त्याच्या पाठी समान वेश धारण केलेले दोघेजण दिसतात. त्यांनी कोणाला तरी बांधलेले असते आणि ते दोघे हातात दोरी धरुन चाललेले असतात. त्यांच्या पाठोपाठ काही गावकरी त्यांना दिसतात. सिद्धांत पटापट उरलेला चहा पिऊन त्या गर्दीच्या जवळ जातो आणि गर्दीतील एका व्यक्तीला सगळं काय चालू आहे असे विचारतो. तो माणूस बोलतो, “ज्याला दोरीने बांधून, ” घेऊन जात आहेत, त्याला भूताने झपाटलेले आहे. पुढे जे बाबा चालले आहेत ते खूप मोठे सिद्धपुरुष आहेत. ते त्याचे भूत उतरवण्यासाठी त्याला घेऊन जात आहेत.” इतक्यात मानव पण तिथे पोहोचतो. सिद्धांतला त्या माणसाची प्रचंड चीड येते. तो रागाच्या भरात त्यांना थांबवायला निघणार इतक्यात मानव त्याला थांबवतो आणि बोलतो ह्यांना आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. आपण आज रात्री उशीरा ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लावू. आता लगेच घरी जाऊ आणि सगळे गाव शांत झाले की मग आपण निघू.” सिद्धांतलाही मानवचे बोलणे पटते. दोघेही घरी जातात. थोड्यावेळात त्यांची जेवणं उरकतात आणि वरच्या खोलीत जाऊन झोपण्याचे सोंग करतात. सर्वत्र शांतता पसरते. हळूहळू संपूर्ण गाव निद्रेच्या आधीन होते. मानव आणि सिद्धांत कशाचीही चाहूल लागू न देता उठतात आणि वाड्या बाहेर येतात. बाहेर येऊन ते एक अंदाज लावतात की तो बुवा बहुदा गणप्याने सांगितलेला, जंगलात आश्रम असलेलाच असेल. त्याप्रमाणे ते दोघेही जंगलाची वाट धरतात आणि गणप्याने दाखवलेल्या मार्गाने जंगलाच्या आत जायला सुरुवात करतात. मिट्ट काळोख, रातकिड्यांची किरकिर, हवेच्या झुळुकेचा आवाज आणि मध्ये मध्ये पानांची सळसळ आशा भयाण वातावरणातून मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने दोघेही सावधपणे वाट चालत आश्रम काही अंतरावरून दिसेल अशा ठिकाणी येऊन पोहोचतात. समोर दोन झाडांच्या मध्ये त्या माणसाला बांधलेलं आहे असं त्यांना दिसते. त्या माणसाच्या आसपास बाबाचे दोन अनुयायी(जे त्याला धरून येत असतात) मशालीच्या उजेडात दिसतात. मानव आणि सिद्धांत आणखी सावध होतात. काहीच हालचाल करीत नाही. थोड्यावेळाने अनुयायी आश्रमात घुसतात. सिद्धांत आणि मानव ह्याच क्षणाची वाट पहात असतात. ते पुढे निघणार इतक्यात त्यांना आश्रमात कंदिलाच्या प्रकाशात काहीतरी हालचाल होताना दिसते. दोघेही नजर रोखून त्या दिशेने बघतात. त्यांना तीन सावल्या दिसतात. त्यांच्यात काहीतरी देवाणघेवाण होताना त्यांना दिसते. थोड्या वेळाने कंदीलाचा प्रकाश मंद होतो आणि सगळ्या आश्रमात शांतता पसरते. मानव आणि सिद्धांत कसलीही चाहूल लागू न देता बांधलेल्या माणसाजवळ पोहोचतात. तो माणूस डोळे मिटून उभा असतो. मानव आणि सिद्धांत त्याला अलगद हलवतात. त्याने डोळे उघडल्यावर मानव त्याला हळू आवाजात विचारतो, “तुम्ही कोण आहात? तुम्हांला असं बांधून का ठेवले आहे?” तो माणूस हळू आवाजात बोलायला सुरुवात करतो. ” म्या भाल्या. म्या एकेकाळी सराईत गुन्हेगार होतु. हे जे आतमंदी हायत ना वं! ते कोनी बाबा वगैरे न्हाय. येगयेगळ्या गावात फिरून समद्यांस्नी लुटण्याचा ह्यांचा धंदा हाय आणि ह्यांच्याबद्दल कोनाला कळलं तर त्यांचा मुडदा पाडून दुसऱ्या गावात येऊन त्येच ढोंग रचायचं. मी त्यांचा साथीदार होतु. येकदा माजा काय बी गुन्हा नसताना ह्यांनी मला फशिवलं. त्यात मला शिक्षा झाली. मंग म्या बी मनाशी पक्कं केला की ह्या समद्यांस्नी धडा शिकवायचा. म्या समदे पुरावे गोळा केले. पण कस काय माहीत पन ह्यांस्नी म्या बाहेर आलू अन् ह्यांच्या इरोधात पुरावे गोळा करत हाय ते समजलं. म्हणून ते मला शोधाया लागले. त्यात मी त्यांन्सी गावलो. त्यांनी गावकऱ्यां म्होरं म्यां चेटूक करतु असं सिद्ध केले आन मला भूतानं पछाडलं असं सांगून मला हिथ घेऊन आलेसा. आता ह्ये मला जिंदा सोडत न्हाय.” हे सगळं ऐकून सिद्धांत म्हणतो, “तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुम्हांला नक्की वाचवू. आम्हांला तुमचं घर कुठे आहे ते सांगा, आसपासची एखादी खूण सांगा म्हणजे आम्ही तुमच्या घरातले पुरावे शोधू शकू.” भाल्याने सगळं काही सांगितल्यावर मानव आणि सिद्धांत तडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला जातात. तिकडे जाऊन पोलीस निरीक्षक देशमुखांना ते सगळी हकीकत सांगतात. ते ऐकून देशमुख बोलतात, “साले इथेच लपलेत काय? त्यांना मी बऱ्याच दिवसांपासून शोधतोय. तुम्हांला माहितेय? सरकारने ह्यांच्यावर मोठी रक्कम इनामात ठेवलेली आहे. आता आपण एक काम करू (सिद्धांतला बोलत) “तू गावात जाऊन सरपंच , आत्या आणि गावकऱ्यांना घेऊन आश्रमाजवळ पोहोच. मी आणि मानव जाऊन त्यांच्या विरोधात असलेले पुरावे घेऊन तिथेच भेटू.” सगळे निघतात. पोलीस निरीक्षक देशमुख , त्यांचे कर्मचारी आणि मानव आश्रमाजवळ पोहोचतात. इतक्यात सिद्धांत पण सरपंच, आत्या आणि गावकऱ्यांना घेऊन पोहोचतो. देशमुख पुराव्यानिशी ढोंगी बाबाला आणि त्याच्या साथीदारांना पकडतात आणि भाल्याची सुटका करतात.
काही दिवसांनी गावात मानव आणि सिद्धांत ह्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात येतो. सत्कार समारंभात मानव बोलतो, “आज जर तुम्ही शिकलेले असता तर तुम्ही असल्या बाबांच्या नादी लागण्यापूर्वी विचार केला असता. आज जग कुठे चाललंय आणि आपण अजून कुठे आहोत ह्याचा विचार करावा. माणसाकडे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा कधीच नसावी. श्रद्धा कोणावर आणि कधी दाखवायची ह्याच ज्ञान तुम्हांला शिक्षण घेतल्यावरच येईल. म्हणून माझी सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या मुलांना शिकू द्या. आमची पिढीच उद्याचं भविष्य आहे.” टाळ्यांचा कडकडाट होतो. सरपंच उभे राहून मानव आणि सिद्धांतचे कौतुक करतात. पोलीस निरीक्षक देशमुख सरकारने दिलेले २०,००,०००₹ इनाम घेऊन सरपंचाच्या हवाली करून ती रक्कम मानव आणि सिद्धांतला देण्याची विनंती करतात. सरपंच रक्कम देतात तेव्हां सिद्धांत उभा राहतो आणि बोलतो, “ही रक्कम जरी आम्हांला इनामात मिळालेली असली तरी आम्ही दोघे ही रक्कम परत सरपंचांकडे सुपूर्द करीत आहोत आणि त्यांना विनंती करीत आहोत की त्यांनी ह्या रकमेचा गावात पुढील शिक्षणसाठी महाविद्यालय आणि शाळा बांधण्यासाठी उपयोग करावा. (सगळ्यांकडे बघत) चला तर अंधश्रद्धेच्या अंधारातून शिक्षणाच्या प्रकाशात जाऊन भविष्यात देशासाठी ज्ञान वाटण्याची सेवा करु.”
टाळ्यांचा कडकडाटात समारंभ संपन्न होतो. त्या रकमेने गावात महाविद्यालय बांधले जाते.
(क्रमशः)
आदित्य दि. संभूस
Leave a Reply