१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री मोहन वाघ यांनी लिहिलेला लेख
सर्व प्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं.
१९६४ किंवा ६५ साली नाटकांच्या निमित्तानं माझी व त्यांची ओळख झाली आणि गेली वीस बावीस वर्षे मी त्यांना जवळून पाहिलय. वसन्तराव म्हणजे नाट्य विषयांनी बहरलेल्या कानेटकर वृक्षाचं गोड फळ आहे अस मी म्हणेन. खऱ्या अर्थानं ते आपलं नाव आज सार्थ करीत आहेत.
त्यांच्या घरातल्या मंडळींनादेखील त्यांच्याबद्दल किती आदर आहे हे मी अनुभवलय. सांगलीचे त्यांचे बंधू मधुकरराव व त्यांच्या पत्नी, तसेच पुण्यातला त्यांचा पुतण्या अरुण कानेटकर, सौ. सिंधूवहिनीदेखील नाट्य लिखाणात त्यांना किती मदत करतात हे देखील मी अनुभवलेय. हा कानेटकर नावाचा नाट्यवृक्ष बहरून ह्यास गोड फळ लागण्यास ह्या सर्वांचा फार मोठा वाटा आहे. आम्ही सारी मंडळी नाही म्हटल तरी व्यवसायाचा थोडा स्वार्थ मनात ठेऊनच त्यांच्याभोवती जमणारी माणसं. वसन्तराव हे निःसंशय एक थोर नाटककार आहेत ह्याबद्दल कुणाचच दुमत असायच काहीच कारण नाही. एका नाटककाराच्या अनेक नाटकांचे वीस पंचवीस वर्षात पाच हजाराहून अधीक प्रयोग हेच त्याचं चोख उत्तर आहे.
मी काही मोठा तर सोडाच परंतु लहान देखील साहित्यिक नाही हे मला माहित आहेच. परंतु नाटक म्हणजे साहित्यच नव्हे म्हणणाऱ्या मंडळींना मला एकच विचारावा असा वाटतो तो असा की, गुपचुपपणे एखाद्या पुस्तकातली कल्पना चोरून त्याची मराठी कादंबरी ही की ते साहित्य होत, आणि त्याच विषयावर नाटक लिहील की ते मात्र साहित्यात जमा होत नाही ह्याचं मला उत्तर सापडलेल नाही. कदाचित माझी अक्कल कमी पडत असेल.
वसन्तरावांनी आजपर्यंत माझ्या कल्पनेप्रमाणे तीसापेक्षादेखील जास्ती नाटकं लिहीली असतील. लाखो रसिकांना त्यांच्या नाटकांनी समाधान दिलं असेल. अशा थोर नाटककाराला आज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळालेलं पाहून त्यांच्या वडीलांच अपुरं राहिलेलं स्वप्न पुरं झाल्याचं समाधान त्यांच्या सर्व मंडळींना निश्चितपणे लाभलं असेल. वसंतरावांनी खऱ्या अर्थाने नाट्य व्यवसायातला रायगड सर केलाय हे म्हणायला आता काहीच हरकत नाही. आणि हे अध्यक्षपद म्हणजेच राज्यारोहण समारंभ असच मी म्हणेन. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटली ती ही की, हे साहित्यातलं राज्यपद मिळवितांना त्यांच्या वाट्याला जो मनःस्ताप आला तो यायला नको होता. नाहीतरी एखाद्याला सुखासुखी यश, मान मिळू देतील तर मग ती मराठी माणस कसली? साऱ्याच व्यवसायात हे चाललेल आहे.
काही वेळा वसंतरावांच यश ही दुसरी मंडळी हिसकावू पहातात, हा अधमपणा आहे. त्यांच्या यशस्वी झालेल्या काही नाटकांचा तिसरा अंकच आपण लिहिला असा काही दावा करतात. परंतु गंमत अशी की, अशी मिजास करणाऱ्या मंडळींना देखील माझा सवाल आहे की, वसंतरावांच्या नाटकाचा दुसरा म्हणा किंवा तिसरा अंक संपूर्ण लिहिणारी ही स्वत:ला विद्वान समजणारी मंडळी तीन अंकी स्वतःचीच नाटकं का नाही लिहीत? एखाद्याचं नाटक पडलं की ह्या अंक लिखाणाबद्दल मात्र कुणीच कधी बोलत नाही. परंतु एखादं नाटक यशस्वी झालं की मानकरी खूप गोळा होतात.
माझ्या मते आता कुठे वसंतरावांच्या नाट्य लिखाणाचे दोन अंक लिहून पुरे झालेत, आता ह्यापुढे जी नवीन नाटके ते लिहितील तोच माझ्या मते त्यांच्या नाट्य आयुष्यातला तिसरा आणि महत्वाचा अंक ठरणार आहे. वसंतरावाचा हा तिसरा अंक अतिशय गाजेल ह्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. कारण ते खऱ्या अर्थाने संपूर्ण नाटककार आहेत.
मी तर अभिमानानं म्हणू शकतो की, आज त्यांच्या नाटकांमुळेच केवळ काही नामवंत निर्माते व कंपन्या टिकून आहेत. मी देखील ह्यापैकी एक आहे. वसन्तरावांच्यामुळे ‘चंद्रलेखा’ उभी राहिली हैं तर सोडाच त्यांच्या व सौ. सिंधू-वहिनींच्या आशीर्वादामुळेच चंद्रलेखाची स्थापना झाली. चंद्रलेखा हे त्यांच्या कन्येचच नांव. हे यशस्वी नाव त्यांनी मोठ्या प्रेमाने आम्हाला दिलं. देताना सांगितलं ‘मोहन आम्हाला चंदा झाली ना तेव्हांपासून आमचे सुगीचे दिवस सुरू झाले. हे नाव तू तुझ्या संस्थेला वाटल्यास दे.’ हाच त्या दोघांचा आशीर्वाद समजून मी २३ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांच्या शिवाई गडावरच चंद्रलेखाची स्थापना केली. आज खरोखरच चंद्रलेखा नाव यशस्वी झालं. ह्या संमेलना-मुळे बाकी १९८७ साली मला ते डिसेंबरची मध्यरात्र गाज-नाटक देऊ शकले नाहीत. परंतु १९८८ साली ३१ डिसेंबरसाठी तीन नवीन नाटके देण्याच त्यांनी कबूल केलय. त्यामुळे १९८८ सालच्या ३१ डिसेंबरला वसन्तशवांची तीन वेगवेगळ्या प्रकारची नाटक एकाच दिवशी रंगभूमीवर आणून आणखीन एक नवा विक्रम करण्याचा माझा बेत आहेच. परंतु ह्या ३१ तारखेचे खऱ्या अर्थानं जर विक्रमवीर कोण असतील तर ते वसन्तराव कानेटकर, कारण आता खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचा तिसरा अंक लिहायचा आहे. आज-वर त्यांच्या सगळ्या नाटकांचे सगळे अंक त्यांनीच लिहीलेत हे नि:संशय तर मला माहितच आहे. नटराजाच्या व माझ्या आईच्या आशीर्वादानं हा ३१ डिसेंबर १९८८ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित गाजेल. ह्याबद्दल मला खात्री आहे. वसन्तराव मला संपूर्ण साथ देतील ह्याचीही खात्री आहे. कारण त्यांना देखील मनापासून वाटत असेल हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे !”
– मोहन वाघ
१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री मोहन वाघ यांनी लिहिलेला लेख
Leave a Reply