माझा बालपणीचा मित्र प्रदीप खूप वर्षांनंतर, उतारवयात मला फेसबुकवर अचानक भेटला. आम्ही एकाच वाड्यात रहात होतो. शाळाही आमची एकच होती. पुढे काॅलेजमुळे आमची ताटातूट झाली. त्यानंतर तो महानगरपालिकेत नोकरीला लागला व मी मुंबईला गेलो.
आमचं लग्न थोड्याफार फरकाने एकाच वर्षी झालं. हळूहळू संपर्क कमी होत गेला. मी माझ्या संसारात रमलो. यथावकाश नोकरीतून निवृत्त होऊन ज्येष्ठ नागरिकाचे ‘लेबल’ लावून समवयस्क मित्रमंडळीत रमू लागलो.
वर्षापूर्वी फेसबुकवर मला प्रदीप भेटला. आम्ही व्हाॅटसअपवरुन संपर्कात राहू लागलो. महिन्यापूर्वी त्याची पत्नी गेल्याचं, त्यानं मला मेसेज करुन कळवलं. मला फार वाईट वाटलं. मी त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला भेटायचं ठरवलं.
एका रविवारी सकाळीच मी प्रदीपकडे निघालो. प्रवासात मला त्याच्यासोबत घालवलेले बालपणीचे दिवस आठवत होते. अकराच्या सुमारास मी त्याच्या घरी पोहोचलो.
मला पाहताच त्याने घट्ट मिठी मारली व आपल्या अश्रूंना वाट करुन दिली. मी त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. त्याच्या सुनेनं, आम्हा दोघांना चहा आणून दिला. त्याचा मुलगा कामासाठी बाहेरगावी गेला होता. शहराच्या उपनगरात प्रदीपच्या मुलाने प्रशस्त फ्लॅट घेतला होता. आमचं दुपारचं जेवण झालं. प्रदीपची सून, दिपानं घर आवरुन आम्हाला निवांतपणा मिळावा म्हणून, ती मैत्रिणीकडे निघून गेली. आम्ही दोघं, एकमेकांच्या आयुष्यातील कडू-गोड आठवणींची उजळणी करीत बसलो होतो. बोलता बोलता मधेच प्रदीप, वहिनींच्या हार घातलेल्या फोटोकडे पहायचा व भूतकाळात जायचा.
प्रदीप म्हणाला, ‘सुनील, मला तुला ‘तिसरी पोळी’ बद्दल सांगायचं आहे.’ मला काही समजेना. मी विचारलं, ‘हा काय प्रकार आहे?’ तो म्हणाला, ‘सांगतो. नीट ऐकून घे. लहानपणी आपल्याला, आई जी पोळी करुन खाऊ घालते ती पहिली पोळी! तिची सुरुवात होते ती दूधभातानंतर. जेव्हा बाळाला पहिल्यांदा दात येतात. ती पोळी चालू रहाते, ते आपण मोठे होईपर्यंत. त्या पोळीमध्ये आईची ‘ममता’ व ‘वात्सल्य’ पुरेपूर भरलेलं असतं. ती पोळी खाल्ल्यावर, पोट भरतं मात्र मन कधीच भरत नाही. तिची गोडी, ही वेगळीच असते.
जेव्हा मुलाचं लग्न होतं, तेव्हा त्याला दुसरी पोळी मिळू लागते. जी त्याच्या पत्नीने केलेली असते. ती पोळी करताना पत्नीची ‘समर्पण’ व ‘आपुलकी’ची भावना त्यात उतरलेली असते. ती पोळी खाल्ल्यावर पोट आणि मन दोन्हीही भरतं. ही पोळी त्याला मुलांचं लग्न होऊन, सूनबाई येईपर्यंत मिळत रहाते.
सूनबाई करुन घालते, ती ‘तिसरी पोळी’! जी पोळी करताना, तिची ‘कर्तव्या’ची भावना तिच्यात उतरलेली असते. या पोळीला चवही असते व तिने पोटही भरते. आपण मुलगा आणि सुनेशी, मिळतं जुळतं घेतलं तर ती आपल्याला, वृद्धाश्रमातील नीरस जीवनापासून वाचवते.
आता शेवटची ‘चौथी पोळी’! ही पोळी खाण्याची वेळ कुणावरही येवू नये, असं माझं मत आहे. ज्याच्या घरात बाईमाणूस नसतं. त्या घरी, कामवाली बाई पोळी करुन देते. त्या पोळीला चवही नसते आणि ती खाऊन पोटच काय, मनही कधी भरत नाही. तिचं पोळी करणं, हा एक शुद्ध ‘व्यवहार’ असतो. प्रेम, आपुलकी, ममता, समर्पण, कर्तव्य अशी कोणतीही भावना त्यात सामावलेली नसते.’
प्रदीपचं इतकं सगळं ऐकून मी त्याच्या विचारांशी सहमत झालो होतो. मी त्याला विचारलं, ‘आत्ता तुझं कसं चाललंय?’ तो म्हणाला, ‘मी आता ‘तिसरी पोळी’ सुखानं खातो आहे. सुनेला मी माझी मुलगीच मानलेलं आहे. तिच्या बारीक सारीक चुकांकडे मी दुर्लक्ष करतो. ती जर आनंदी असेल तर मुलगा, नक्कीच माझी काळजी घेईल.
जर परिस्थितीने आपल्याला या तिसऱ्या पोळीपर्यंत आणून ठेवले आहे तर त्या देवाचे आभार मानायलाच हवेत. आता चवीकडे लक्ष द्यायचं नाही, जगण्यासाठी थोडंसं खायचं व आरामात रहायचं.’
प्रदीपचे विचार ऐकून, मला नवी दिशा मिळाली होती. कारण मी देखील, त्याच वाटेवरचा एक वाटसरु होतो.
(सदर आशयाची ‘अनामिक’ लेखकाची पोस्ट मला व्हाॅटसअपवर वाचायला मिळाली. त्यावरुन मी हा स्वतंत्र कथाविस्तार केला आहे.)
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२८-१-२२.
Leave a Reply