वेळ रात्रीची अकरा साडेकराची होती.
मी माझ्या मित्राबरोबर जीपने त्याच्या घरी निघालो होतो,
मला फक्त त्याचे घर बघावयाचे होते,
तो खूप मोठा माणूस, मोठा कलाकार.
आम्ही तेथे गेलो कोणीही नव्हते, दोघेही नव्हते.
आम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो, मागे झाडी होती,
एक फाटक होते, जुनच,
हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता,
त्याचा प्रकाश समोर पडला होता.
इतक्यात तो म्हणाला रात्री ती
त्याला फाटकाजवळ भेटण्यास येत असे
खरे खोटे कोण जाणे,
परंतु त्या शीतल चंद्रप्रकाशात
अंगावर वेगळाच शहारा आला,
ती तशीच सौंदर्यवती होती
आजही तिच्याशी कुणाची तुलना होणे शक्य नाही.
घरी परत येताना तो चंद्रप्रकाश, ती शितलता
तिचे सौंदर्य आणि त्यांचे प्रेम.
पुढे त्यांच्यात अबोला झाला
तो कायमचाच
चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वी ती गेली
त्यांच्या कथा रंगतच होत्या.
कालपरवा तो गेला
तिच्याच शेजारी त्याने चिरनिद्रा घेतली
माझ्या डोळ्यासमोर येत होते ते
त्याच्या घराच्या मागचे फाटक,
तो चंद्रप्रकाश
कधीची सफल न झालेले त्यांचे उत्कट प्रेम.
एक अनामिक मानसिक अवस्था मला
आजही अस्वस्थ करत असते
हे प्रेम आहे का शाप.
जो दोघांनीही भोगला.
शांतपणेकी?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply