तो एकमेव ढग काळा, जग सारे तहानलेले
ही एक भाकरी अवघी, जग सारे भुकेजलेले
मी ऐल तिरावर आहे, अन् पैलतिरावरती तू
अन् मधे एवढा सागर वर वादळ उधाणलेले
अंगात त्राण या नाही, कंठात प्राण आलेले
ऐकाया कैसे जावे कोणाला पुकारलेले
हृदयाचे माझ्या पुस्तक मी सहसा उघडत नाही
प्रत्येक पान जखमांचे रक्ताने चितारलेले
दिनरात चालतो आहे पण गाव लागले नाही
हे पाय पांगळे माझे ना अजुनी विसावलेले
मज तहान ज्या क्षितिजाची, ते अजुनी आले नाही
वाटेत व्योमही आले जे स्मरते झुगारलेले
एकेक शब्द या हृदयी मी तुझा गोंदला आहे
होकार फार थोडेसे पण जास्ती नकारलेले
मी फक्त वेंधळा होतो,ते लोक शहाणे होते
मागास एकटा मी अन् बाकीचे पुढारलेले
जमणार कसे माझे त्या लोकांशी किंचित देखिल
जे मला भेटले होते ते सारे फुशारलेले
तो शिशिर आजही स्मरतो संगती तुझ्या मी होतो
स्मरतात आज देखिल ते दिन मजला दवारलेले
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
Leave a Reply