अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये अनिकेत आनंद नाचणीकर यांनी लिहिलेली ही कथा.
‘नम्रता, जरा ऐकतेस का? आज खूप झोप आलेय. तृ असं कर, मला थोडेसे वाढ आणि तूही आवरून घे.’ मी दमलेल्या स्थितीत म्हणालो. ‘बरेच काम होते का ऑफिसमध्ये?’ ती जेवण वाढत म्हणाली. ‘हो ना!’ मी म्हणालो. नम्रता म्हणजे माझी जीवनसाथी. माझी सखी आणि माझी अर्धागिनी. मी तिला लाडात ‘नमू!’ म्हणतो.
कामाच्या व्यापाने मी बेडवर निपचित पडलो होतो. ती पदराला हात पुसत माझ्या शेजारी आली अन् म्हणाली की ‘अहो, जरा ऐकता का?’ ‘का? काय? उद्या रविवार आहे, आरामात उठेन म्हणतोय! झोपू दे मला.’ मी थोडा अडखळत म्हणालो. ‘अहो, आपल्या लग्नाला पाऊण महिना झाला. पण बाहेर कुटे फिरायला गेलो नाही, उद्या जायचे का बाहेर फिरायला?’ ती नजर खाली ठेवत लाजून बोलत होती. मी फक्त ‘हममम…’ म्हटलं, तेही झोपेत असताना. पण तिला वाटले की मी हो म्हटले आहे.
सकाळी लवकर उठून तिने सारे आवरले होते अन मलासुद्धा उठवले, मी माझेही आवरून हॉलमध्ये बसलो होतो, फिरायला कुठे जायचे? याचा बेत आखत होतो. पण तितक्यात ती म्हणाली, ‘आपण या जवळच्या घाटात जायचे का?’ मी म्हणालो, ‘का?’ तेव्हा ती लगेच उद्गारली, ‘पाऊसही आताच सुरू झाला आहे आणि रानही हिरवेगार आहे आणि त्या जवळच्या घाटात छान धबधबा वाहतो.’
मी थोडा बुचकळ्यात पडलो कारण याबद्दल हिला कसे ठाऊक! मी विचारायच्या अगोदरच तिने सांगितले की, हे सर्व मी तुमच्या मोबाईलमध्ये पाहिले आहे. तुम्ही आणि तुमचे मित्र फिरायला गेला होतात ना? तेव्हाचे फोटोज् पाहिलेत. त्याचबरोबर आता तिकडे जायचे म्हटल्यावर, थोडी माहिती मिळवली. मी थोडा विचार केला अन् होकारार्थी मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. अखेर आम्ही दोघे कपड्यांची बॅग घेऊन बाहेर पडलो.
मोटारसायकलला कीक मारणार तोच ती म्हणाली की, ‘अहो, थांबा मी गाडी चालवते.’ मी मनातल्या मनात जरा हसलो आणि म्हणालो की, ‘नको, नको. मला ऑकवर्ड फिल होईल. तू मागेच बैस.’ अशाप्रकारे आमची स्वारी निघाली. थोडा रिमझिम पाऊस पडत होता म्हणून आम्ही दोघांनी गॉगल्स घातले होते. मी तिला आरश्यात पाहत होतो. ती हळूच माझ्याकडे पाहायची. मी पाहतोय हे कळल्यावर, ती लगेच मान वळवायची, पण तिने माझ्या खांद्यावर हातही ठेवला नव्हता. तिच्या आणि माझ्यात जवळजवळ दहा सेंटीमीटर इतके अंतर होते. ती बोलायला कितीही बडबडी असली तरी माझ्यापासून दूर राहत होती. ऑफकोर्स मीही. आमचे अरेंज मॅरेज झाले असल्याने दोघांनाही कम्फर्टेबल फील वाटत नव्हते. तो स्पर्श नवा, ती ओळख नवी अन् तो अनुभव पहिलाच होता. त्यामुळे कदाचित दोघेही दूरच राहायचो.
एकही शब्द न बोलता, शेवटी आम्ही तिथे पोहोचलो. मोटारसायकल स्टँडवर लावली. ती माझ्याशी काहीएक न बोलता सरळ धबधब्याच्या इथे गेली. तिच्या अनाम ओढीने मीसुद्धा तिथे गेलो. तिकडे आधीच खूप गर्दी होती. त्या गर्दीत आम्ही दोघे घुसलो अन् धबधब्याचा आनंद लुटत होतो. ती माझ्यावर अन् मी तिच्यावर पाण्याचा वर्षाव करीत होतो. त्या ठिकाणाला ‘लव्ह पॉइंट’ असे म्हणत.
ती वारा होऊन बेभान भिजत होती. पण तिचे इतके कौतुक करणे, कमीच पण या वाऱ्यापेक्षा तिचा चुकून स्पर्श व्हायचा अन अंगावर काटे उभे राहायचे. ती भिजून चिंबचिंब झाली होती. पण त्यातही तितकीच सुंदर आणि तेजस्वी दिसत होती. जणू ‘स्वर्गातली रंभाच’. तिच्या नावाप्रमाणेच ती सौंदर्यातही नम होती. पण तिचे इतके कौतुक करणे कमीच आहे. ती इतकी सुंदर दिसत होती. असे वाटायचे की जवळ जाऊन मिठी मारावी. पण काय करणार मी आधीच अबोल होतो अन् तेवढी हिंमतच होत नव्हती. पण तो दिवस कधी येईल ती माझ्या मिठीत असेल याच्याच भ्रमात होतो.
नजरेने बोलता बोलता, तिने माझ्या चेहऱ्यावर ओंजळीने पाणी फेकले. अचानक मी त्या विचारातून बाहेर आलो. ‘तू थांब इथे. मी काहीतरी गरमागरम घेऊन येतो,’ असे म्हणून मी तेथून निघून गेलो. डोळ्यांवर हात ठेऊन धावत धावत जवळच्या टपरीकडे आलो. दोन कटींग आणि दोन मक्याची ऑर्डर दिली. तोपर्यंत मी तिच्याकडे नकळत पाहत का होतो. मात्र काही वेळा ती नजर चुकवायची अन् गालातल्या गालात हसायची. नमू लाजून इतकी लालसर झाली होती की, ‘अत्तरातले जणू गुलाबच.’
तिला पाहिल्यावर असे वाटायचे की, आमचे नाते हे आधीपासूनच आहे. आमच्या लग्नाला पंधराच दिवस झालेत पण ती माझ्यात विरघळून जावे अन् मी तिच्या विचारात हे काही वेगळे वाटत होते. नमूच्या विचारात इतका गुंग झालो होतो की, माझेच भान राहिले नाही.
पण नमूही माझ्यावर तेवढीच प्रेम करत असेल. फक्त व्यक्त करण्याची वाट पाहत असावी. कदाचित! इतक्यात तो टपरीवाला म्हणाला की, साहेब, दोन कटींग आणि मके. घेताय ना. मी त्याच्याकडे पाहिले अन् ते घेतले आणि जेवढे पैसे झाले होते तेवढे देऊन टाकले. पण या सर्व क्रियेत माझे नमूकडे जराही लक्ष नव्हते. या वेळेस आनंदावर विरजण पडले. मातीने भुसभुशीत झालेले काही दगड डोंगरावरून तीव्र वेगाने खाली आले. यामधून कर्कश आवाज करीत ते सरळ खाली येऊन दरीत कोसळले. मी इकडे तिकडे पाहू लागलो. सगळेजण नुसते सैरावैरा पळत होते. मी हातातले मके तेथेच ठेवून नमूच्या दिशेने धाव घेतली. पहातोय तर काय? नमू तिथे नव्हतीच. मी तिला वेड्यागत शोधू लागलो. माझे चलबिचल झालेले डोळे तिला पाहण्यासाठी आतूर झाले होते. हृदय मात्र तीव्रतेने धडधडू लागले. पण ती कुठेच सापडेनाशी झाली. एकीकडे जखमी झालेले, दुसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, अन् तिसरीकडे तर घसा फोडून आसवे गाळत एकमेकांना शोधत असलेले जोडपे दिसत होते.
पण मनात मात्र विचित्र काही सळसळले असे जाणवले. आता मात्र डोळ्यातले अश्रू आवरेनात. या मनाचा पुरेपूर कोंडमारा झाला होता. आसपासच्या व्यक्तींना विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणीच प्रतिसाद देईना. माझी हताश झालेली नजर तिला सगळीकडे शोधीत होती. पण ती काही सापडत नव्हती. नमूला शोधण्यासाठी मी तनमन झोकून दिले होते पण त्याचा काही फायदा होत नव्हता. आजूबाजूला रक्ताळलेले प्रेमी पाहून मी भारावून गेलो होतो. अखेर गुडघ्यावर बसून तिच्या विचारात रडत होतो. पुन्हा कुठूनसा आशेचा किरण काळजात शिरून आरपार जायचा. असे काही वेगळे होणार नाही हे मात्र हृदय सारखे सारखे सांगत होते. कारण ‘प्रेम हे मेंदूतून नाही तर हृदयापासून केले जाते.
अचानक या थरथरत्या देहावरती कोमल हात स्पर्शिल्याचा भास झाला. मी ताडदिशी उठून मागे पाहिले अन् पाहता क्षणीच मगरमिठी मारली. कारण ती माझी नम्रताच होती. दोघेही ढसढसा रडत होतो. रडत रडत तिला विचारले की, तू आता इथे होतीस, लगेच कुठे गायब झालीस?’ त्यावर ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, ‘अहो, आपण आपली गाडी रस्त्यातच लावली होती त्यामुळे बाकीच्या गाड्यांना अडचण होत होती. म्हणून मी ती बाजूला लावत असताना तितक्यात हा प्रकार घडला. हे सर्व बोलत बोलत ती कापत होती अन् तिने मिठी आणखीन घट्ट केली. मी तिला हृदयाशी घेतले अन् समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही दोघे या षयावर काहीच बोललो नाही. एकमेकांवरचे प्रेम मिठीतून व्यक्त केले. आमच्या डोळ्यातले अश्रू काही थांबेनात कारण ते दुःखाचे नसून आनंदाचे अश्रू होते.
तो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत, असे रविवार तुमच्या आयुष्यात न येवोत, पण नशीब कधी धोका देईल काही सांगता येत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, कुठेही फिरायला जा, पण जपून जा. कारण तो क्रूर काळ टपून बसलेला असतो. कारण त्याला आपले चांगले झालेले पाहवत नाही. पण अशा वेळेस एकजुटीने, विश्वासाने आणि प्रेमाने त्यावर पलटवार करा.
असे दिवस येत राहतील पण त्यास तुमच्या खऱ्या प्रेमाने लढा द्या. मग संकटे काय, नशीबही गुडघे टेकेल. म्हणतात ना, ‘प्रेमाने जग जिंकता येते!’
-अनिकेत आनंद नाचणीकर
मो. ७०५७३८८३२०
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply