क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता. रस्त्यावर झालेल्या मोटर अपघाताच्या क्षुल्लक वादावादीतून प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात बॅट घालणारा गरम डोक्याचा नवज्योतसिंग सिद्धू नुकतीच वर्षभराची तुरुंगवारी करुन आला. तर आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ एक शतक काढणाऱ्या अब्बास अली बेग व ब्रिजेश पटेलला भर मैदानात अचानक तरुण सुंदरीकडून रसीला ओष्ठलाभ झाला होता. (बाबासाहेब भोसल्यांना ध्यानीमनी नसताना जसा अचानक सत्तासुंदरीलाभ झाला होता जवळजवळ तसाच.) संघाला विजय मिळवून देणाऱ्या एखाद्या महान एकहाती कसोटी खेळीपेक्षा आमचा रवी शास्त्री ऑडी आणि अमृतामुळेच जास्त चर्चिला गेला. पण सुधीर नाईक अब्बास अली बेग अथवा ब्रिजेशइतका नशीबवान नव्हता. १९७४च्या इंग्लंड दौऱ्यावर त्याची आघाडीचा राखीव फलंदाज म्हणून निवड झाली. ओल्ड ट्रॅफर्ड आणि लॉर्ड्सवरील पहिल्या दोन कसोटीत भारताने सपाटून मार खाल्ला. लॉर्ड्सवर दुसऱ्या डावातील ४२ ही धावसंख्या भारताची (तेव्हाची) सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
मालिका तर भारताने गमावली होतीच पण लागोपाठच्या दोन लाजिरवाण्या पराभवांमुळे भारतीय क्रिकेटरसिकांत संतापाची लाट उसळली होती. तिसऱ्या ऐजबॅस्टन कसोटीत सुधीरचा समावेश निश्चित होता. नेमकी त्याच वेळेस एक दुर्देवी घटना घडली. लंडनला सुपरमार्केटमधे खरेदीला गेला असताना त्याच्यावर पायमोजे चोरीचा आळ घेतला गेला. अरे,मुंबईच्या सुसंस्कृत वातावरणात वाढलेला,त्याकाळचा रुपारेल कॉलेजचा द्विपदवीधर आणि त्याच्या सरळ बॅटप्रमाणेच नाकासमोर बघून चालणारा सरळ स्वभावाचा सुधीर काय १०/१२ पाउंडाचे मोजे चोरेल ? सुपरमार्केट अथवा मॉल ही संकल्पना तेव्हा भारतात उगवली नव्हती. बाकी विभागातून इतर वस्तूंची खरेदी केल्यानंतर तो कदाचित काऊंटरला मोजे दाखवायला विसरला असावा. पण त्याने ते चोरले नव्हते हे निश्चित. १९७१ साली इंग्लंडमधे आणि १९७२-७३ साली भारतात अशा लागोपाठ दोन मालिका हरल्यामुळे ब्रिटिश माध्यमांचा भारतावर डूख होताच. ब्रिटिश पत्रकारांना ही इष्टापत्तीच वाटली व पराचा कावळा करायला त्यांना आयतेच कोलित मिळाले. खरं तर भारतीय वकीलातीने व क्रिकेट कंट्रोल बोर्डाने हा प्रतिष्ठेचा मुद्दा करायला हवा होता. पण भारतीय प्रशासनाच्या मानगुटीवर बसलेले दीडशे वर्षांच्या ब्रिटिश गुलामगिरीचे भूत तोपर्यंत पुरते उतरले नसावे.त्यातून सुधीर हा काही संघाचा Blue eyed boy नव्हता. कोणाकडून माहीत नाही पण त्याला चुकीचा सल्ला दिला गेला.
गुन्हा कबूल केल्यास प्रकरण फार ताणले जाणार नाही व मामुली दंडावर त्याची सुटका होईल असे त्याला सांगण्यात आले.
आज या घटनेला ४९ वर्षे झाल्यानंतरही त्याला हा सल्ला कोणी दिला होता हे जाणून घ्यायची माझी तीव्र इच्छा आहे.
आणि त्या सदगृहस्थाच्या ***वर शिवाजीपार्क मैदानात अण्णा वैद्यांच्या बॅटने वर्षाला एक या हिशेबाने ४९ फटके मारायची मनीषा मी मनी बाळगून आहे. तरीही तो अस्सल मुंबईकराच्या जिद्दीने तिसरी कसोटी खेळला. भारताच्या दुसऱ्या डावात गावस्कर,वाडेकर,विश्वनाथ, सोलकर,मंकड आणि फारुख इंजिनियरसारखे अनुभवी महारथी गारद होत असताना त्याने एका बाजूने १६५ चेंडूंचा मुकाबला करत ९ चौकारांसह ७७ धावांची जिगरबाज खेळी केली.
हीच खेळी जर त्याने भारताचा विजय साकारणाऱ्या आणि मंदगती गोलंदाजांचा वरचष्मा असणाऱ्या भारतीय खेळपट्टीवर केली असती तर पुढची किमान दोन वर्ष तो भारतीय संघाकडून खेळला असता. दुर्दैवाने त्याची लढाऊ खेळी भारताचा डावाने झालेला पराभव टाळू शकली नाही. त्याच्याजागी दुसरा कोणी असता तर चोरीचा खोटा आरोप झाल्यानंतर एकतर क्रिकेटला कायमचा रामराम ठोकता झाला असता अथवा बाटलीला कवटाळून बसला असता. पण सुधीरचे क्रिकेटवरील प्रेम आणि निष्ठा अविचल होती. त्याने हलवायावरचा राग मिठाईवर काढला नाही. उलट भारतीय फलंदाजी जशी आपल्या दुसऱ्या डावातील खेळीकरता सुप्रसिद्ध आहे तसा आपल्या आयुष्याचा दुसरा डाव खेळण्यासाठी तो मोठ्या असोशीने मैदानात उतरला. त्याच्या झुंजार बाण्याची त्याने १९७१ साली चुणूक दाखविली होतीच. कर्णधार वाडेकर,गावस्कर,सरदेसाई, सोलकर आणि मंकड सारखे दिग्गज खेळाडू वेस्टइंडीज दौऱ्यावर गेले असताना नवख्या खेळाडूंना हाताशी घेऊन त्याने चंदू बोर्डेंच्या नेतृत्वाखालील बलाढ्य महाराष्ट्र संघाला धूळ चारत मुंबईला रणजी करंडक मिळवून दिला होता. निवृत्तीनंतर अनेक वर्ष तो मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारीणीचा सदस्य होता. नंतर तो मुंबई क्रिकेट संघाचा व कालांतराने राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य झाला. दोन दिवसांत कसोटी सामना संपवणारी वानखेडेची खेळपट्टी काळ्या यादीत जाण्याची भिती असताना २००५ साली त्याच्याकडे खेळपट्टीची व मैदानाची निगा राखण्याची जबाबदारी आली. फलंदाज व गोलंदाजाला समान न्याय देणारी आणि चार ते पाच दिवस रंगणाऱ्या कसोटीसाठी आदर्श गणली जाणारी खेळपट्टी बनविणे ही त्याची खासियत ठरली.
२०११ सालच्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यासाठी अत्यंत विक्रमी वेळात त्याने बनविलेली वानखेडेची उत्कृष्ट खेळपट्टी व तयार केलेले मैदान हा त्याच्या आयुष्यातील दुसऱ्या डावाचा परमोच्च बिंदू होता.भारतीय विजयानंतर या सामन्यात धोनीने मारलेल्या विजयी षटकाराचे तितके कौतुक झाले तितके कौतुक सुधीरचेच फाईंड असलेल्या झहीरखानने पहिल्या पाच षटकांत दिलेल्या फक्त १३ धावांचे आणि सुधीरने बनविलेल्या खेळपट्टीचे झाले नाही. श्रीरामपूरहून आपल्या वडिलांसह मुंबईत आलेल्या कोवळ्या झहीरखानमधील सुप्त गुण सुधीरनेच आधी ओळखले आणि त्याच्या काटेकोर मार्गदर्शनामुळे भारताला कसोटी सामन्यांत ३११ आणि एकदिवसीय सामन्यांत २८२ बळी मिळवून देणारा डावखुरा जलदगती गोलंदाज मिळाला. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे हल्ली ७८ हे काही नैसर्गिक मृत्यूचे वय मानले जात नाही. पण सुधीरच्या बाबतीत नेमकं काय झाले असणार ते मी तुम्हाला सांगतो.भारतात IPL ला मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघून देवांनाही SPL(अर्थात स्वर्गीय प्रिमियर लीग) भरावायची उबळ आली असणार. गेल्या काही वर्षात अजित वाडेकरसारखे कल्पक कर्णधार,वासू परांजपेसारखे बुद्धिमान प्रशिक्षक आणि सलिम दुराणीसारखे उपयुक्त खेळाडू यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी SPL( Season-1) ची जोरदार तयारी सुरु केली असणार.
इतक्यात कोणाच्यातरी डोक्यात विनोदवीर आगासारखी उशीरा ट्यूब पेटली असणार….’आपल्याकडे इतकी मोठी स्पर्धा घेण्यासाठी आदर्श खेळपट्टी आणि अद्ययावत मैदान कुठे आहे ?’ मग देवाधिकांनी यमराजाला भरीला घातले असावे. यमाला कदाचित पाकिस्तानी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या संघाचे मालकत्वदेखील देण्याचे देवांनी कबूल केले असण्याची दाट शक्यता आहे. मध्यरात्री स्वप्नात येऊन यमराजाने खचितच सुधीरच्या नाकदुऱ्या काढून गयावया केली असणार. आपल्या आवडीचे काम मिळते आहे हे पाहून भिडस्त स्वभावाच्या सुधीरने बुधवारी ( ५ एप्रिल ) संध्याकाळी यमराजाला आपला होकार कळविला असणार. आणि सहसा कोणाच्या भाग्यात नसणारी आपली दमदार तिसरी इनिंग खेळण्यासाठी तो ताठ मानेने स्वर्गात दाखल झाला असणार.
इथे आपण त्याच्या निधनाचा शोक करीत असताना,वानखेडेवर जमविले होते तसे काळ,काम,वेगाचे गणित जुळविण्यासाठी एव्हाना इंद्रप्रस्थ स्टेडीयमची खेळपट्टी सुधीरने खणायलादेखील घेतली असेल.
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
९ एप्रिल २०२३
Leave a Reply