” स्ट्रे बर्डस ” या पुरुषोत्तम विजेत्या एकांकिकेच्या मार्गाने सी ओ इ पी चा बलदंड अभियंता – रवींद्र मंकणी, गोनीदांची नात ( वीणाताई देवांची कन्या- १९८७ साली पालक-शिक्षक संघाच्या कामानिमित्त वीणाताईंच्या सहकारनगर मधील घरी गेलो असताना ओझरती भेटलेली)- मृणाल देव, आणि ” एकसे एक ” कलावंत ( दया डोंगरे, श्रीकांत मोघे , चारुशीला पटवर्धन, सुधीर दळवी, बाळ कर्वे आणि ——- ) घेऊन त्यांचेही कर्तृत्ववान दिग्दर्शक गजानन जहागीरदार , रणजित देसाईंची भरजरी कलाकृती “स्वामी” घेऊन छोट्या पडद्यावर आले आणि तेव्हापासून तो पडदा आजतागायत “श्रीमंत” झालेला आहे. दूरचित्रवाणीला (मराठीत तरी ) अभिमान वाटाव्या अशा मोजून ४-५ मालिका प्रेक्षकांच्या ओंजळीत घालत्या आल्या, त्याची सुरुवात “स्वामी” मालिकेने केली. (यथावकाश त्यात – गोट्या, ऊंच माझा झोका, गंगाधर टिपरे अशा दर्जेदार कलाकृती समाविष्ट झाल्या.)
” ऐतिहासिक ललित साहित्यात कल्पनेचे स्थान ” या बोजड विषयावर बार्शीच्या पाणिनी वक्तृत्व स्पर्धेसाठी मी तयारी करीत असताना, रणजित देसाईंच्या या कादंबरीचा मी आधार घेतला होता, पण ती खऱ्या अर्थाने पेलली ती स्वामी मालिकेने !
कादंबरीतील भव्य दिव्य दृश्ये जशी मालिकेने यथास्थित रचली त्याहीपेक्षा रमा- माधवांच्या नात्यातील तरलता अधिक उत्कटतेने साकारली. दोघा प्रमुख कलावंतांनी भूमिकांचे पैस ताकतीने पेलले, विशेषतः मृणाल देव यांची रमा ” माईलस्टोन ” झाली. नंतर या कथानकावर चिरखडलेली काही कामे समोर आली पण मूळ मौलिकता त्यामुळे अधिक झळाळून निघाली. वरील दैदीप्यमान यादीतील काही नांवे (दीनानाथ टाकळकरांसारखी) काळाच्या पडद्याआड गेली, काही चित्रपट/ दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दिसत नसली तरी रवी पटवर्धन आजही त्यांच्या अभिनयाचे इंद्रधुनी रंग प्रेक्षकांसमोर उधळत आहेत. रवींद्र मंकणीने खूप पडदा व्यापला नसला आणि नाव – बंधू (रवींद्र महाजनी ) मुळे तो काहीसा झाकोळला गेला असला तरी त्याची निवडक कामे सगळ्यांनी पसंत केली आहेत. मृणाल देव-कुलकर्णी आता प्रगल्भ रूपात दिसतात.
” तू-नळी ” ने गेल्या पंधरा दिवसात ही मेजवानी पुढे आणली आणि काल रात्री २५ वा शेवटचा भाग बघून मी सुखाने झोपलो. त्याकाळी मालिकांचे दैनिक दळण नसल्याने, आठवड्यातून एका ठराविक दिवशी एका ठराविक वेळी एकाच भागाचे प्रक्षेपण व्हायचे. काही भाग बघायला मिळाले नव्हते, पण आता सलगपणा मिळाला आणि त्याचा मनावर खूप प्रभावही पडला. गेली काही वर्षे पाटी -टाकू मालिकांमुळे मनावर जो कचरा साठला होता, तो धुवून निघाल्याने शुचिर्भूत झाल्यासारखे वाटले.
काही वर्षांपूर्वी विभावरी जोशी यांनी झी टीव्ही वर, हृदयनाथ आणि सुरेश वाडकर यांना थक्क करणारी ” माझे मन तुझे झाले ” ही सुधीर मोघ्यांची रचना, ज्या ताकदीने पेश केली होती त्यावेळी जूने आठवणींचे थरार अंगावर आले होते. मालिकेतील रमा- माधवांचा नर्म शृंगार आणि नंतरचे एकत्व मोघ्यांनी या गीतात जे मांडले आहे ते फक्त केवळ ! पती-पत्नींमधील उत्कट भावना यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे व्यक्तच होऊ शकत नाही.
काही वर्षांपूर्वी एका पुस्तकाला प्रस्तावना देताना मोघ्यांनी जी दिरंगाई केली होती, त्यामुळे आमच्यात तात्कालिक FRICTION झाले होते, तो ओरखडा या रचनेने मिटला. सती जाताना तो आगीन डाग कदाचित रमा या सुमधुर शब्दांनीच विझवू शकली असावी. थेऊरला जेव्हा जाणे होते, तेव्हा जन्मभर आगीचे भागधेय सोसलेले माधवराव आणि त्यावर सावली ओतणाऱ्या रमाबाई अजूनही दिसतात आणि चितेवरचा शेवटचा अग्निदाह रमेच्या समाधीला आजही भाजून काढतो.
माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही !
कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply