“अनघा दिवाळी अंक 2021” मध्ये डॉ. गीता मांजरेकर यांनी लिहिलेला लेख
महाराष्ट्रातील साधारण गेल्या दशकभरातील लिहित्या असणाऱ्या आणि कविताच नव्हे तर अन्य साहित्यप्रकारही हाताळणाऱ्या दहा कवयित्रींच्या प्रत्येकी दोन कविता ‘अनघा’ दिवाळी अंकाने मागविल्या होत्या. या एकूण 20 कवितांच्या आधारे आजच्या कवयित्रींच्या काव्यलेखनातून दिसणाऱ्या वाड्.मयीन प्रवृत्तींचा आणि व्यक्त होणाऱ्या जीवनजाणिवांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करायचा आहे.
या दहा कवयित्री तशा एका पिढीतील म्हणता येणार नाहीत.तसेच साधारण 40 ते 60 या वयोगटातल्या या कवयित्रींना नवोदित म्हणता येणार नाही.त्या प्रथितयश म्हणाव्यात अशा कवयित्री आहेत. बहुतेकींचा किमान एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे किंवा प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांनीच काव्यलेखनासाठी मान्यवर पुरस्कार मिळवले आहेत. काहीजणींचे भाषांतरावर प्रभूत्व आहे तर काही प्रसार माध्यमांतून कार्यरत आहेत, काहींनी सामाजिक चळवळीत पुरस्कार मिळवले आहेत. शिक्षण, न्याय, आरोग्य, साहित्यसंस्था, ग्रंथालय अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या या स्त्रिया आहेत.
एकूण या दहा कवयित्रींची वये, प्रदेश, अनुभव क्षेत्रे, आवडीनिवडी, जीवनदृष्टी वेगळी आहे अर्थातच त्यांच्या कवितांच्या आशयातून ते जाणवते. नवथरता आणि प्रगल्भता, संकोच आणि निडरपण असे विरोधाभास या कवयित्रींच्या अभिव्यक्तीतून जाणवतात. त्यामुळे प्रत्येकीची भाषाशैली, प्रत्येकीने निवडलेले कवितेचे रूपबंधही वेगळे आहेत.
या दहा कवयित्रींच्या काव्याची वैशिष्ट्ये, साम्यस्थळे त्यांच्या दोन प्रातिनिधिक कवितांआधारे टिपताना आजच्या मराठी स्त्रीलिखित कवितांतील बदलत्या वाङ्मयीन प्रवृत्ती आणि जीवनजाणिवांचा मागोवा या लेखात अनुषंगाने घेतला जाईल.
मराठी कवितेत कवयित्रींची समृद्ध परंपरा आहे. मध्ययुगातील मुक्ताबाई, जनाबाईंपासून ते आधुनिक कालखंडातील बोली भाषेत लिहिणाऱ्या बहिणाबाई, चिरविरहाची कविता लिहिणाऱ्या इंदिराबाई, ‘आईपणाची भीती’, ‘चाफ्याच्या झाडा’ सारख्या चिंतनपर कविता लिहिणाऱ्या पद्मा गोळे, भावगीतकार शांताबाई शेळके, अनुराधा पोतदार, अनुराधा पाटील, शिरीष पै, अरूणा ढेरे साठोत्तरी साहित्यप्रवाहांतील दलित, स्त्रीवादी, महानगरी, ग्रामीण जाणिवा व्यक्त करणाऱ्या हीरा बनसोडे, ज्योती लांजेवार, प्रतिमा इंगोले, उर्मिला पवार, सुरेखा भगत, उषाकिरण अत्राम, रजनी परूळेकर, मलिका अमरशेख, प्रज्ञा पवार, नीरजा, कल्पना दुधाळ अशा अनेक कवयित्रींच्या कवितांनी ही परंपरा समृद्ध झाली आहे. म्हणूनच आता त्यापुढील साधारण दहा वर्षांतील मराठी कवयित्रींची कवितांवर पूर्वसूरींचे कोणते प्रभाव आहेत आणि कोणत्या नव्या वाटा वळणाने ती जाते आहे हे शोधणे उद्बोधक ठरणार आहे.
प्रस्तुत लेखासाठी निवड झालेल्या दहा कवयित्रींपैकी राधा भावे, जयश्री जोशी, सुनंदा शेळके, नीती मेहेंदळे (मेगमेहन), संजिवनी तडेगांवकर यांच्या कवितांवर पूर्वसूरींच्या कवितांचा प्रभाव जाणवतो. हा प्रभाव त्यांच्या आधीच्या अरूणा ढेरेंसारख्या कवयित्रीचा आहे तसेच आरती प्रभू, ग्रेस, महानोरांसारख्या कवींचाही आहे. या कवयित्रींच्या कवितांतून स्वच्छंदतावादी वाड्.मयीन प्रवृत्तीची वैशिष्ट्ये प्रामुख्याने जाणवतात. निसर्गातील रंग, गंध नादाची आसक्ती, मानवी प्रेम, श्रद्धा, विरहादी भावना व्यक्त करणाऱ्या या कविता आहेत. स्वाभाविकच प्रतिमा, रूपकांचा वापर या कवितांतील भाषेत विपुल प्रमाणात झाला आहे.
उदा.
1. राधा भावे यांच्या ‘निळी सावली’ या कवितेच्या शीर्षकातच रूपक आहे. स्वप्नपक्षी, चांदण्याचे तळे, रंगव्याकूळ, निळी शांतताफुले अशी रूपके त्यांच्या कवितेत सहजी येतात आणि ती काव्यसौंदर्यात भरच घालतात. ‘मोह’ या त्यांच्या दुसऱ्या कवितेतदेखील मोहाची फुंकर, अंथरलेले मन, चलनी इच्छा, निनावी ठिणगी अशी रूपके येतात. निळी सावली, निळी फुले, मृदुल सुगंध, सुगंधी मळे, धगधगता आगडोंब अशा प्रतिमाही भावे यांच्या कवितेतील आशयाला दृक, गंध परिमाण देतात.
2.सुनंदा शेळके यांच्या ‘त्याचेच ऋतू’ या कवितेत धुक्यात हरवलेले गाव, धुरकट मेघ, ओली माती, आनंदफुले अशा प्रतिमा-रूपकांचा वापर दिसतो. तर ‘सहज म्हणाले’ या कवितेत चांदण्याचा तराणा सारखी दृक-श्राव्य प्रतिमा त्या सहज वापरतात.
3.जयश्री जोशी आपल्या ‘प्रेयस’ आणि ‘निर्वाणी’ या दोन कवितांतून संमोहाचे काटे, शब्दांच्या छाया, अक्षरपैंजण, अधांतराचे अर्थ, नाचखुरी पावले, जीवाची मेंदी अशी रूपके वापरतात आणि हिरण्मय, सोनेरी केसांची संध्याकाळ, हळदिवा कंदिल, कुसुंबी मेघ, काजळी प्रकाश अशा प्रतिमांचा स्वैर वापर करतात.
4. नीती मेहंदळे ‘मेगमेहन’ या टोपणनावाने काव्यलेखन करतात. त्यांच्याही कवितेत निळे डोंगर, निळे गुज, निळ्या वाटा, सुगंधी पताका, गुलाबी ऊन, मुके पान, खुळ्या वल्लरी वादळी फौजा, अशा रूपक प्रतिमांची खैरात झालेली दिसते. चंद्राहून शीतल ज्वाळा, सुखाचे कोसळणारे कडे अशा विरोधाभासी प्रतिमाही त्या वापरतात. मात्र या सर्वाने काव्यसौंदर्यात भर पडते कीआशयाबद्दल संभ्रम निर्माण होतो हा प्रश्न आहे.
5. संजिवनी तडेगावकर यांच्या ‘भर दुपार’ या कवितेत फुलणारा पळस, कर्डईच्या बोंडातील हळदी कुंकवाची कात, पिवळी मोहरी या दृक प्रतिमा येतात आणि मिशीला पीळ देत हसणारा गहू, एकांताची फांदी, कुजबुजणारा पाचोळा अशी रूपकेही सराईतपणे येतात.त्यांच्या ‘चहाडी’ या कवितेतही वांझोटे हात, स्पर्शाची चहाडी, व्याकुळ मनाचा कोलदांडा अशी रूपके त्या सफाईदारपणे वापरतात.
रूपक -प्रतिमांचा स्वैर वापर करणाऱ्या राधा भावे, सुनंदा शेळके, जयश्री जोशी, नीती मेहेंदळे, संजिवनी तडेगावकर यांच्या कविता प्रामुख्याने यमकादी अलंकार वापरणाऱ्याही आहेत. या साऱ्या गोष्टी आपल्या काव्यातील अभिव्यक्तीला अधिक सुंदर करण्यासाठी या कवयित्री वापरत असाव्यात पण काहीवेळा हा सुंदर अभिव्यक्तीचा सोस आशयाच्या सौंदर्यात काहीच भर घालू शकत नाही.असे असले तरी यातील बऱ्याच स्वच्छंदतावादी प्रवृत्तीच्या कवितांतून आशयाबद्दलचे वैविध्य आणि वैचित्र्य मात्र जाणवते.
उदा.
1.राधा भावे त्यांच्या दोन्ही कवितांतून शारीर तृष्णेबद्दल, तिच्या क्षणभंगुरतेबद्दल, व्यर्थतेबद्दल, क्षणिक मोहाबद्दल सांगतात आणि या साऱ्या अभिलाषेपलीकडे असणारे शाश्वत प्रेम जेव्हा कळते तेव्हा ही अभिलाषा संपून मन तृप्त, समाधानी बनते असे त्यांना सुचवायचे आहे.
2.सुनंदा शेळके त्यांच्या एका कवितेत निसर्गातले ऋतू आणि मनातले ऋतू हे सगळे शेवटी एकाच जगन्नियंत्यांची देणगी आहेत हे सूत्र मांडतात.आणि सहज म्हणाले या कवितेत उत्कट प्रेमाची आर्जवी विनंती करतात.
3. I) जयश्री जोशी यांच्या कविता प्रामुख्याने प्रेमाची हळवी आठवण जागवणाऱ्या आहेत.
II) नीती मेहंदळे (मेगमेहेन) यांच्या कवितेतील प्रेम भावनेला सुखाबरोबर दुःखाचीही किनार जाणवते.
4.संजिवनी कडेगावकर यांच्या चहाडी कवितेचा रूपबंध अभंगासारखा आहे. पण हा भक्तीभावना व्यक्त करणारा अभंग नसावा.सामाजिक संकेतात अडकलेल्या प्रेमातूर स्त्रीची व्याकुळता आणि कुचंबणा व्यक्त करणारा हा अभंग असावा.भर दुपार ही कडेगावकर यांची कविता निसर्गाच्या पार्श्वभूमीवरचे थोडे संकोची आणि थोडेसे धीट प्रेम व्यक्त करते.
प्रस्तुत लेखासाठी निवडलेल्या अन्य कविता मीनाक्षी पाटील, मंदाकिनी पाटील, अलका गांधी- असेरकर, आरती कुळकर्णी आणि ऊर्मिला चाकुरकर या पाच कवयित्रींच्या आहेत.या कविता स्वच्छंदतावादी प्रवृत्तीच्या नाहीत पण तरीही त्यांना सरसकट वास्तववादी हे लेबल लावणेही योग्य ठरणार नाही.या कवितांतून व्यक्त होणाऱ्या वाड्मयीन प्रवृत्ती आणि जीवनजाणिवा वेगळ्या आहेत हे मात्र निश्चित.
उदा.
1. मीनाक्षी पाटील ‘निराधार’ या कवितेत निराधार या शब्दाशी खेळतात आणि निराधार हे विशेषण श्रीमंतांवरील आरोपांना लावले जाते आणि गरीब माणसामागेही लावले जाते तेव्हा व्यक्त होणारी विसंगती शब्दाला किती वेदनादायक वाटत असेल अशी कल्पना करतात. त्यांची ‘पूर’ ही कविताही भाषेच्या खेळाकडेच लक्ष वेधते. राजकीय लोकांच्या पोकळ आश्वासक शब्दांनी निर्माण केलेल्या भ्रामक आशावादाने ग्रामीण माणसांचा कसा पूर, पाऊस येण्यापूर्वीच घात केला आहे. राजकीय लोक मात्र या भकास ग्रामीण वास्तवाचे खापर निसर्गावर फोडण्याचा ढोंगीपणा करत आहेत हे मीनाक्षी पाटील सूचकतेने मांडतात. भाषा ही एक संरचना आणि समाजातील अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था या अन्य संरचना यांचे परस्पर संबंध सर्वच व्यवस्थांचे पोकळपण उघड करतात. त्यामुळे मीनाक्षी पाटील यांची कविता आधुनिकवादी ठरते.
2. ‘इवला थेंब’ ही कविता लिहिणाऱ्या मंदाकिनी पाटील या मानवी अस्तित्वाच्या क्षुद्रत्वाचे त्यांना आलेले भान आणि जीवनाच्या चिरंतनत्वाची झालेली प्रगल्भ जाणीव काहीशा मिश्किल, उपरोधिक शैलीत व्यक्त करतात. बोली भाषेतील शब्द, वाकप्रचार, विशेषणे यांचा चपखल वापर करणारी त्यांची भाषाशैली अर्थवाही आहे असेच म्हणावे लागेल.मंदाकिनी पाटील यांचीच ‘भाषा’ ही कविता देखील चिंतनशील आहे. सामाजिक व्यवस्था माणसाची निरागसता, नैसर्गिकता संपवून टाकतात, त्याला संवेदनशून्य, चाकोरीबद्ध, ढोंगी बनवतात आणि त्यामुळे त्याची भाषाही कशी विसंगतीने भरलेली, विरूप असते हे मंदाकिनी पाटील सूचकतेने मांडतात. नैसर्गिक भाषा आणि निसर्ग यापासून आधुनिक जगातील माणूस पारखा झाला आहे ही मंदाकिनी पाटील यांच्या कवितेतील जाणीव आधुनिकवादी म्हणावी लागेल.
3. अलका गांधी-असेरकर, आरती कुळकर्णी आणि ऊर्मिला चाकुरकर यांच्या काही कविता दीर्घ आहेत पण त्यांची आशयसूत्रे अगदी वेगळी आहेत.
अलका गांधी यांना स्त्रीच्या देवीपणाऐवजी तिच्या माणूसपणाचा स्वीकार करणे पुरूषप्रधान व्यवस्थेला आजही जड जाते आहे असे आशयसूत्र व्यक्त करायचे आहे.स्त्रीच्या मानवी अस्तित्वावर , गुणधर्मांवर, सामर्थ्यावर पूर्ण विश्वास अलका गांधी आता या कवितेत व्यक्त करतात.कवितेला नाव नाही या त्यांच्या कवितेत त्या तथाकथित विकास आपल्या जगण्यावागण्याला कोणत्या विसंगतीकडे, मूल्यऱहासाकडे नेत आहे हे त्या सूचक उपरोधिकतेने मांडतात.
4.आरती कुळकर्णी यांचे नाव पर्यावरण रक्षण कार्यकर्त्या आणि माहितीपट निर्माण करणाऱ्या पत्रकरितेच्या क्षेत्रातला मानाचा रामनाथ गोएंका पुरस्कार मिळवणाऱ्या महिला म्हणून सुपरिचत आहे. त्यांच्या कवितांतील आशयातून त्यांचे पर्यावरण प्रेम जाणवतेच पण या कविता काही अस्वस्थ करणारे प्रश्नही निर्माण करतात.घरात राहणारं झाड या कवितेत त्यांना घरातील झाडांचे निश्वास गाण्यासारखे वाटतात, हे झाड त्यांना जणू चैतन्य देते, हिरवी स्वप्न दाखवते आहे असे त्यांना वाटते. फुलांची शेती या त्यांच्या कवितेतील बातम्यांचे निवेदन करणाऱ्या स्त्रीला दैनंदिन बातम्या सांगताना क्रौर्याच्या, हिंसेच्या, अपघाताच्या बातम्या सुन्न करत नाहीत. उलट त्यानंतर येणारी गुलाबाच्या ‘फुलांची शेती’ करणाऱ्या शेतकऱ्याची बातमी तिला गुलाबी, लव्हेंडर स्वप्न देते, कोपऱ्यावरील फुलवाल्याकडील फुलेही तिला पिवळा शेंदरी गंध देतात आणि त्या आशेवर ती जगत राहते असे वर्णन कवितेत येते.आरती कुळकर्णी यांच्या कवितेने महानगरी मध्यमवर्गीय आत्मनिष्ठ माणसांचा स्वप्नाळू आशावाद व्यक्त केला आहे असे म्हणावेसे वाटते.
5. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या ऊर्मिला चाकुरकर यांच्या ‘सारीपाट’ या कवितेत स्त्री-पुरूष समागमाची, शृंगाराचे धीट चित्रण येते.जणूकाही युगानुयुगे स्त्री-पुरूषांचे होणारे मीलन म्हणजे शिव-पार्वतीने मांडलेला सारीपाटाचा खेळच आहे असे कवयित्री सुचवते. शिवशक्तीचे एकरूपत्व हेच सनातन, आदिम सत्य आहे. संपूर्ण विश्व याच एका सत्याचा आविष्कार आहे असे जणू कवयित्रीला सुचवायचे आहे. त्यांच्या ‘अॅमेझॉनच्या जंगलात’ या कवितेत त्या भौतिक प्रगतीच्या नावाखाली बलाढ्य अर्थसत्ता असलेले देश अन्य गरीब पण नैसर्गिक साधनसामुग्रीने समृद्ध असणाऱ्या देशांची कशी हानी करत आहेत हे दाखवतात. सर्व जग तथाकथित प्रगतीच्या हव्यासाने आंधळे झाले आहे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश कोणालाच जाणवत नाही याबद्दलची हळहळ या कवितेतून ऊर्मिला चाकूरकर यांनी व्यक्त केली आहे.
मीनाक्षी पाटील, मंदाकिनी पाटील, अलका गांधी, आरती कुळकर्णी, ऊर्मिला चाकुरकर यांच्या कविता आशयदृष्ट्या वेगळ्या आहेत. रूपके-प्रतिमांमध्ये या कविता फार अडकत नाहीत पण आवश्यक तेथे समर्पक रूपके -प्रतिमा- प्रतीकांचा वापर या कवितांचे आशयसौंदर्य वाढवणारा ठरतो.उदा. मीनाक्षी पाटील यांच्या ‘पूर’ या कवितेत वाहणारी गावे, हिरमुसलेली वाटावळणे, केविलवाणे पुल अशी रूपके यथार्थ ठरतात. तर मंदाकिनी पाटील यांच्या ‘भाषा’ या कवितेच्या भावसौंदर्यात आभाळाचे मन, समुद्राचे हृदय, उसने चंद्र, पृथ्वीचे फुल अशी रूपके भरच घालतात.अलका गांधी यांच्या कवितेत येणारे ओरिजिनल, झूमची लिंक, आय टेन, शॉपिंग कॉम्पलेक्स यासारखे इंग्रजी शब्द हेतूत येतात आणि ते कवितेच्या आशयाला पूरक ठरतात.आरती कुळकर्णी यांच्या कवितेतील हिरवे निश्वास, पानांवर चढणारी प्रेमाची साय, हिरवी स्वप्न, पिवळा-शेंदरी घमघमाट, फुलांच्या रंगछटेचे जॅकेट, लव्हेंडर-गुलाबी पाकळ्या, चांदण्यात उजळणारा निशिगंध हे शब्द महानगरातील व्यक्तीवादी जाणिवा जपणाऱ्या मध्यमवर्गीय स्वप्नाळू मनासाठी समर्पक वाटतात. मध्यमवर्गीय आत्मकेंद्रिततेला वास्तव पचवताना अपरिहार्यपणे कल्पनारम्य स्वप्नांचा आधार घ्यावासा वाटणे हेही एक वास्तवच जे अशा शब्दांतून अभिव्यक्त होते.
अशाप्रकारे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून साहित्यक्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महाराष्ट्रातील या दहा कवयित्रींच्या प्रत्येकी दोन प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणातून त्यांच्यातील स्वच्छंदतावादी, वास्तववादी, आधुनिकवादी साहित्यप्रवृत्ती स्पष्ट झाल्या. या कविता स्त्रीच्या आत्मनिष्ठ मनोकायिक अनुभवांपासून पूर्णत बाहेर पडल्या नसल्या तरी त्यातील काही विश्व सत्य शोधण्याच्या प्रयत्नांत प्रगल्भ होत चालल्या आहेत असे जाणवले. सामाजिक व्यवस्थांचे विशेषत भाषेच्या वापरातून जाणवणारे फोलपण या कविता व्यक्त करू पाहत आहेत हे विशेष वाटले. भौतिकवादाच्या आहारी चाललेले जग, पर्यावरणाचा ऱहास हे जागतिक प्रश्नही या कवितांमधून मांडले गेले आहेत पण ते अधिक वास्तववादी दृष्टीने मांडले जावेत असे मात्र वाटले. स्त्रीसामर्थ्यावरचा विश्वास या कवितेतून व्यक्त झालाच आहे तो या कवयित्रींनी सार्थ ठरवावा असे म्हणून या लेखाचा समारोप करते.
— डॉ. गीता मांजरेकर.
Leave a Reply