MENU
नवीन लेखन...

डॉमिनोज पिझाचा जनक टॉम मोनॅगम

डॉमिनोज पिझाचा जनक टॉम मोनॅगम यांचा जन्म २५ मार्च १९३७ रोजी झाला.

डॉमिनोज हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा दुसरा सर्वात मोठा पिझ्झा ब्रॅण्ड. ‘ऑर्डर केल्यानंतर ३० मिनिटांत घरपोच पिझ्झा आणि उशीर झाल्यास तो मोफत’ अशी आकर्षक जाहिरातबाजी करणारं ‘डॉमिनोज’ हे नाव आपल्याला चांगलंच परिचयाचं झालं आहे. पिझ्झाची सामान्य भारतीयांना ओळख करून दिली ती डॉमिनोजने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पिझ्झा बनवणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ब्रँड आहे. आज जगभरात डॉमिनोजची १३ हजारांहून अधिक आउटलेट्स आहेत.

पिझ्झेरियात जाऊन पिझ्झा खाणारे आणि घरच्या घरी पिझ्झा मागवून सगळ्यांसोबत एन्जॉय करणारे असे दोन वर्ग मानले तर दुसऱ्या वर्गासाठी डॉमिनोज ही ट्रीट आहे.

या चवदार प्रवासाची सुरुवात १९६० मध्ये झाली. टॉम मोनॅगन आणि जेम्स मोनॅगन. या दोन भावांना व्यवसायात उतरावंसं वाटलं. त्यातही खवय्येगिरी आणि अमेरिकन मंडळींमध्ये वाढती पिझ्झाक्रेझ लक्षात घेऊन त्यांनी एक पिझ्झेरिया चालवायला घेतला. डोमिनिक्स या नावाने चालवायला घेतलेलं हे पिझ्झा शॉप अगदी थोडय़ा कालावधीत अमेरिकेतील मिशिगन सिटीत लोकप्रिय झालं. फक्त १०० डॉलर्सला विकत घेतलेलं हे दुकान भविष्यातील एवढ्या मोठ्या साम्राज्याचा पाया असेल याचा विचारही दोघा बंधूंनी केला नसेल. कुठलाही व्यवसाय घ्या, सुरुवातीला उत्साहाने एकत्र येणारे भागीदार शेवटपर्यंत टिकून राहिलेत असं दृश्य फार मोजक्या ब्रॅण्डच्या बाबतीत दिसून येतं. टॉम आणि जेम्सपकी जेम्सला कार विकत घ्यायची प्रबळ इच्छा होती. त्या महागड्या कारसाठी त्याने आपले डॉमिनिक्समधले हक्क टॉमला विकले आणि तो व्यवसायातून बाहेर पडला. टॉम या पिझ्झेरियाचा एकल मालक झाला. नशिबाच्या पाऊलखुणा आपल्याला ओळखता येत नाहीत हे खरंच दुर्दैव! अन्यथा भविष्यात वटवृक्षाप्रमाणे विस्तारल्या गेलेल्या व्यवसायातून एका कारखरेदीसाठी बाहेर पडण्याची बुद्धी जेम्सला झाली नसती. टॉम त्याच्या मेहनतीने पिझ्झेरिया कुशलपणे हाताळत होता आणि थोडय़ाच काळात एका दुकानाची तीन दुकाने झाली. मात्र मूळ मालकाने डॉमिनिक्स हे नाव अन्य दुकानांना वापरण्यास मनाई केली आणि इथे एक नवं वळण नाइलाजाने टॉमला घ्यावं लागलं. डॉमिनिक्स हे नाव बदलताना पुन्हा नव्या नावासह लोक स्वीकारतील का? ही धाकधूक त्याच्या मनात असावी आणि त्यामुळे जुन्या नावाच्या जवळ जाणारं पण तांत्रिकदृष्टय़ा वेगळं ठरेल असं नाव त्याने स्वीकारलं. तेच हे डॉमिनोज; पण या नामबदलाने उलट टॉमला फायदा करून दिला. काही नावं यशस्वी होण्यासाठीच जन्माला येतात हा दिलासाही दिला.

डॉमिनोज पिझ्झाने फार कमी काळात आपल्या खुणा निर्माण केल्या. १९८३ पर्यंत १००० डॉमिनोज पिझ्झा पार्लर्स सर्वदूर पसरली होती. या दुकानांना एका धाग्यात बांधेल अशा लोगोचा विचार टॉमने फार आधी केला. पहिला पिझ्झेरिया हे भावासोबतचं व्यावसायिक पाऊल होतं, मात्र एकाची तीन पिझ्झा पार्लर्सही टॉमसाठी खूपच महत्त्वाची गोष्ट होती आणि ती लक्षात ठेवून त्या तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली. कशी गंमत आहे बघा. आज डॉमिनोजने १३२०० दुकानांचा पल्ला गाठला आहे; पण एकाचे तीन होतानाचा अनुभव टॉमसाठी नेहमीच खास राहिला. काही वेळा व्यवसायात मोठय़ा मोठय़ा भराऱ्यांपेक्षा हे छोटे छोटे टप्पेच जास्त जिव्हाळ्याचे असतात याचं हे उत्तम उदाहरण. डॉमिनोज पिझ्झाचं २०१२ मध्ये केवळ डॉमिनोज असं नामांतर झालं, कारण डॉमिनोज म्हटलं की पिझ्झा हे समीकरण तर जुळलंच होतं, पण पिझ्झ्यासोबत इतर अनेक खाद्यपदार्थही मिळू लागले होते, त्यामुळे पिझ्झा हा शब्द गाळून केवळ डॉमिनोज ठेवण्यात आलं. या इतक्या वर्षांमध्ये सातत्याने काही नावीन्यपूर्ण देण्याचा डॉमिनोजने प्रयत्न केला.

२००८ मध्ये त्यांनी पिझ्झा ट्रॅकर आणला, ज्यामुळे आपल्या पिझ्झा डिलिव्हरीची नेमकी स्थिती आपल्याला ट्रॅक करता येऊ लागली. २००९ मध्ये तर डॉमिनोजने आपल्यावर टीका करणाऱ्या ग्राहकांना चित्रित करण्याचं धाडसी पाऊल उचललं. म्हणजे टीका करणारे ग्राहक आणि त्यांची टीका लक्षात घेऊन ताबडतोब आपल्या पिझ्झामध्ये नवे बदल आणणारे शेफ अशी ती मालिका गाजली, कारण आपल्याच ब्रॅण्डवर होणाऱ्या टीकेला जगासमोर आणण्याचं धाडस अनोखं होतं. या वर्षी डॉमिनोजने आपल्या पिझ्झामध्ये आमूलाग्र बदल केले. २०१६ मध्ये डॉमिनोजने ड्रोनच्या मदतीने मानवरहित पिझ्झा डिलिव्हरी न्यूझीलंडमध्ये केली. कोणत्याही ब्रॅण्डचं सर्वात मोठं यश तेच असतं जेव्हा त्या ब्रॅण्डचं नाव उच्चारताच त्या उत्पादनाखेरीज अन्य कोणतेही उत्पादन डोळ्यांसमोर येत नाही. डॉमिनोज या नावाने ते साध्य केलं आहे.

हे नाव अपरिहार्यतेतून टॉमने स्वीकारलं आणि त्याच नावाने इतिहास घडवला. हा इतिहास जिद्दीने, कौशल्याने, हुशारीने, मेहनतीने घडतो. एवढय़ा मोठय़ा फापटपसाऱ्यात स्वत:च्या अस्तित्वाचा बिंदू तयार करणं सोपं नसतं. डॉमिनोजच्या तीन ठिपक्यांनी आपलं अस्तित्व केवळ निर्माण केलं नाही तर पसरवलं.

— रश्मि वारंग.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..