
पळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार ? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय ? तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपलं. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपलं.
पहा मित्रांना विचारुन, वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचून त्यानं शेवटी ठरवल. मुंबई शहरात किंवा उपनगरात जागा घेण आपल्याला परवडणार नाही. आपला पगार आणि त्यावर मिळणारं कर्ज विचारात घेतल तर एक रुम किचनसुध्दा घेता येणार नाही आणि एक -रुमचे फ्लॅट कुणी बांधत नाही. मग ओढाताण करुन जमण्यासारखं एकच मुंबई शहरापासून दोन तास रेल्वे प्रवासात घालवून मिळणारी जागा घेण.
चार-पाच महिने पश्चिम रेल्वेवरील विस्तारीत उपनगर पालथी घातली. त्यानंतर मध्य रेल्वेवर लांबवर फेरी मारली. काही ठिकाणी जागा पसंत होती. पण भाव परवडणारे नव्हते, काही ठिकाणी भाव परवडणारे होते, पण जागा चांगली नव्हती. रस्ते नव्हते, पाणी -वीजपुरवठा बरोबर नव्हता, अशी परवड चालू होती.
शेवटी एकदाची जागा पसंत पडली. शंभर इमारतींची भव्य वसाहत. मोठमोठया जाहिराती. पॉश ऑफिस, गोड बोलून माहिती सांगणारे एक्स्क्यिुटिव्ह, स्टेशनपासून प्रत्यक्ष साईटपर्यंत खास बस. रविवार फ्लॅट बघायला येणा-यांची तुफान गर्दी. भाव वाजवी. जागा स्टेशनजवळ. एक इमारत बांधून तयार. तशाच इमारतींचे आराखडे तयार. उरलेल्या सर्वच इमारतींच्या पायांच खोदकाम पूर्ण. म्हणजे कोणत्या इमारतीत आपण कोणता फ्लॅट घेत आहोत याची कल्पना घर खरेदी करणाऱ्याला यावी.
त्या भागात फारच पाणी टंचाई आहे. त्यामुळे नवीन इमारती बांधायला परवानगी कशी दिली. अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊन गेलेल्या होत्या. त्यामुळे तो जरा सावधच होता. कारण इतका पैसा खर्च करुन घर घ्यायच आणि पाण्याचा पत्ता नाही म्हणजे घर घेण्यात अर्थ तरी काय? त्याच्या बरोबर इतर दहा-बारा लोक घर पाहायला आलेले. बांधकाम झालेली इमारत बघितली. सगळयांना आवडली. पाणी पुरवठयाच काय? त्यांन पाचव्या मजल्यावरुन पाहणी केल्यानंतर विचारल. घर दाखवणारा हसला. आमच्या विरोधी लोक कसा प्रचार करतात. चला तुम्हाला दाखवतो. सगळयांना त्यान पाच मजले खाली उतरवल. बाहेर बोलावून इमारतीच्यावर बांधलेली टाकी दाखवली. अशी मोठी टाकी प्रत्येक इमारतीवर बांधण्यात येईल. सर्व संकुलासाठी एक मोठी टाकी मध्यभागी उंचावर बांधण्यात येईल. त्या बाजूला बगीचा, तरण तलाव, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा, मंदिर बांधण्यात येईल. त्यामुळे पाणी मिळत नाही, या अपप्रचाराला बळी पडू नका. इतका मोठा प्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावा म्हणून किंमत वाजवी ठेवली आहे. एकदा काम सुरु झाल की किंमत दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही.
“चला पाणी येतय की नाही बघू या”, अस म्हणून त्याने सर्वाना परत तळमजल्याच्या फ्लॅटमध्ये नेल. बाथरुमध्ये नळ सोडून पाणी पाहा, किचनमध्ये पाणी पाहा आणि शेवटी शॉवर सुरु करुन दाखवला. तळमजल्यावरच्या तीनही फ्लॅटमध्ये फिरवल, कुणी तरी विचारल, पण वरच्या मजल्यावर पाणी येत कां? चला जाऊन बघू या, अस म्हणून त्यान पहिल्या मजल्यावर नेल. तिथून दुसऱ्या मजल्यावर नेल. तोपर्यंत सगळयांचा उत्साह संपलेला होता. परत पाचव्या मजल्यापर्यंत चढून जायची कुणाची इच्छा नव्हती. काही चौकस उत्साही मंडळी वर जायला तयार होती. पण बाकीच्या लोकांनी त्यांना परावृत्त केल. दुसऱ्या मजल्यावरुनच मंडळी परत आली.
परत नकाशे बघून झाले. इमारतीच्या जागा बघून झाल्या. मग निर्णय पक्का झाला. सहा महिन्यांत इमारत तयार होणार याबद्दल खात्री देण्यात आली. सहा महिन्यांत नाहीत तर वर्षांत तरी तयार होईल, असा विचार करुन त्यानं एक फ्लॅट बुक केला. त्यासाठी नरिमन पॉईंटवरील ऑफिसमध्ये जाऊन पस्तीस हजार रुपयांचा चेक भरला.
संथगतीन काम सुरु होतं. सर्वच फ्लॅट बुक झाले असावेत, कारण बुकिंग बंद झाल असा बोर्ड लागलं. तर तीन महिन्यांनी पैशाची मागणी सुरु झाली. त्यामानान कामाचा वेग मंदच होता. कसेबसे वर्षानंतर पहिल्या तीन इमारतींचे सांगाडे उभे राहिले. काम पूर्ण होत आल. महिन्या-दोन महिन्यातून तो जात राहिला. बाथरुममध्ये पाण्याचा नळ बसवलेला बघितल्यावर त्यांन आधी तोटी फिरवून बघितली. पाणी आलं नाही. मनात दचकला. साईट मॅनेजरला जाऊन भेटला. पाणी नाही. पाणी असणार कसं? अजून लाईन कनेक्ट केलेली नाही.
बघता बघता सुरुवातीच्या तीन इमारती तयार झाल्या. पहिल्याच इमारतीत फ्लॅट बुक केल्याच समाधान लाभलं. ओढाताण करुन एकदाचे सर्व पैसे भरले. त्याच्या बरोबर आणखी दहा-बारा कुटुंब राहायला आली. सामान टाकल्यावर पाण्याची तोटी फिरवली. पाणी नाही. त्याच्या तोंडचं पाणी पळालं. पळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय? तोपर्यंत टँकरन पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपल. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपल.
वर्ष-सहा महिने असे गेले. सर्व इमारती पूर्ण झाल्या.लोक राहायला आले. पाण्याचा पत्ता नाही. तोपर्यंत सर्वांचे पैसे वसूल झालेले होते. घर बांधणारा गायब झाला. टॅंकर बंद झाले. पाणीपुरवठा करणार कुठून? पाण्याचा साठा नाही. पाणी पुरवठयाची लाईन नाही. खर्च करणार कोण? प्रत्येक इमारतीतील लोकांनी भरमसाट खर्च करुन टँकरची सोय केली. जेमतेम एकेकाला एक बादली पाणी आंघोळीला मिळेल या हिशोबानं.
त्याला प्रश्न पडला. जी इमारत दाखवण्यात आली तिच्यात पाणी कसं होत? टँकरवाल्यानं उत्तर दिल. रोज रात्री त्या इमारतीवरची टाकी फूल करण्याच काम त्याच्याकडे होतं. त्यातून मिळालेल्या पैशावरच त्यानं इतर टॅंकर्स खरेदी केले होते. घर मिळाल. पण तोंडच पाणी पळालं. घर घेताना माणूस कोणत्या ना कोणत्या बाबतीत फसला नाही अशी केस सापडणं मुंबईत कठीण. संगळ मिळेल, पण मनासारखं घर मिळणारं नाही.
——————————————————–
— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 28 एप्रिल 1994
Leave a Reply