काव्यमय भाषेमुळे तिचे गद्य लेखनही पद्यमय झाले. तिची कादंबरी हीच एक कविता बनली. त्यामुळे साहजिकच तिला १९९३ मध्ये साहित्यविषयक नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टोनी मारिसन हे तिचे नाव. अमेरिकेतील मध्यमवर्गीय कुटुंबात १८ फेब्रुवारी १९३१ रोजी तिचा जन्म झाला. वडील जॉर्ज वाफोर्ड हे एक साधे कामगार तर आई समाजसेविका होती. त्यांना एकूण चार मुले होती. त्यामध्ये मारिसन ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. मारिसन ही विविधधर्मीय व विविधपंथीय मुलांच्या शाळेत शिकली असली तरी घरातील वातावरणामुळे तिला लहानपणापासूनच वर्णभेदाची जाणीव झाली होती. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी तिने हावर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्या वेळी ती नाटकातही कामे करायची. तिच्या नाटकाच्या ग्रुपने अमेरिकेच्या द. भागाचा दौरा करून ठिकठिकाणी नाटके सादर केली होती.
१९९५ मध्ये ती एमए. झाली व टेक्सास विद्यापीठात तिने अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्यानंतर हावर्ड विद्यापीठातही इंग्रजी विषयाची अध्यापिका झाली.
त्यानंतर तिचा विवाह झाला. दुर्दैवाने तिला वैवाहिक सौख्य मिळाले नाही. त्यामुळे ती लेखनाकडे वळली. कवी व लेखकांच्या मंडळात ती सामील झाली व साहित्यिक कलाकृतींच्या वैचारिक देवाण-घेवाणीत रमली. अशाच एका बैठकीत तिने ऐनवेळी कवितेऐवजी आपली एक कथा ऐकविली. आपले डोळे निळे असावेत अशी तीव्र इच्छा बाळगून जगणाऱ्या एका काळ्या मुलीची ती कथा होती. तिचेच रुपांतर पुढे ‘ द ब्ल्यूएस्ट आय’ चा कादंबरीत झाले. ही कादंबरी काव्यमय असल्यामुळे ती खूपच गाजली व मारिसनचे नाव एकदम प्रकाशात आले केवळ बाह्य सौदर्यामुळे मानवी जीवनाचा ऱ्हास होत चालला आहे हे तिने त्या कादंबरीत अतिशय रसाळ भाषेत पटवून दिले होते.
त्यानंतर ‘मुला’, ‘साँग ऑफ सोलोमन’,’बिलवेड आदी कादंबऱ्या लिहिल्या. ‘साँग ऑफ सोलोमन’ची तुलना तर प्रख्यात साहित्यिकांच्या कादंबरीशी झाली, मात्र नोबेल पुरस्कार तिला ‘बिलवेड कादंबरीबद्दल मिळाला, ज्यामध्ये गुलाम असलेल्या एका असहाय महिलेची कथा आहे. नोबेल स्वीकारताना मारिसनने केलेले भाषण हृदयाला पीळ पाडणारे होते. हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याची सर्वांचीच यथार्थ भावना होती.
Leave a Reply