नवीन लेखन...

तोतयाचे कांड

मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता.
शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
अंडरवर्ल्डमध्ये नवे नवे गुंड जम बसवत असतात.
“जिसके हाथ लाठी, उसकी भेंस” ह्या न्यायाने सर्व छोटेमोठे गुंड एकाद्या दादा किंवा भाईच्या नांवाला घाबरू लागतात.
शेवटी तो पूर्ण अंडरवर्ल्ड काबीज करतो.
पोलिस दफ्तरांत त्याच्या नांवे अनेक गुन्हे जमा होतात पण पुरावा फार कमी असतो.
शिवाय तो सहजासहजी हाती येणार नसतो.
डावऱ्यादादा असाच प्रथम एका भागांत दादागिरी करू लागला आणि बघतां बघतां पोलिसांना डोकेदुखी होऊन बसला.
हाताशी बरीच पोरं आली, इतर गुंड आले की मग त्याला स्वत:ला कांही करावं लागत नाही.
त्याचं नांव चालतं.
दुकानदार, व्यावसायीक कटकट नको म्हणून त्यांना खंडणी देऊ लागतात.
त्याच्या दहशतीचे किस्से सर्वत्र ऐकू येतात.
एखाद्याला धडा शिकवल्याची बातमी येते.
डावऱ्या दादाच्या नुसत्या नांवानेच कामं होऊ लागली.
काही पोलिसही त्याला माहिती पुरवतात.
त्यामुळे तो सांपडत नाही, अशी चर्चाही असते.
मग एखादा धीट सिनियर पोलिस अधिकारी त्याच्या मागेच लागतो.
डावऱ्या दादाला तत्कालीन डीसीपींनी हैराण करून शेवटी एका एनकाउंटरमध्ये मारून टाकला.
अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
मग आता कां त्याची आठवण झाली ?
यशवंतांच्या समोर पडलेल्या पेपरांत मथळा होता, “डावऱ्या दादाचे पुनरागमन”.
गेले दहा-बारा दिवस पुन्हा लोकांना खंडणीसाठी डावऱ्या दादाच्या नांवाने धमक्यांचे फोन येऊ लागले होते.
प्रथम सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं पण नंतर एक मोठे स्टोअर रात्री बंद करत असतांना अचानक तिथे डावऱ्या दादा आपल्या चार साथीदारांनीशी येऊन उभा राहिला.
त्याने दम भरला की तुला फोनवर मागितलेली रक्कम आताच्या आत्ता दे.
स्टोअरमधली सर्व रोकड घेऊन व बाकीचे घ्यायला माझी माणसे लवकरच येतील असे सांगून तो गेला होता.
स्टोअरच्या एका सीसीटीव्हीवर डाव्या हातात पिस्तुल धरलेला डावऱ्या दादा कांही क्षण स्पष्ट दिसला होता.
सहा-सात वर्षा पूर्वीचीच गोष्ट असल्याने डावऱ्या दादा अजून लोकांच्या स्मरणात होता.
नंतर बातम्यांना उत आला होता.
आज अमक्याला मारला, तमक्याला पळवून खंडणी मागितली, अशा बातम्या येऊ लागल्या.
पत्रकारांनी माहितीसाठी पोलिस कमिशनरना प्रश्न विचारायला सुरूवात केली.
पोलिसांकडे अजून नवीन तक्रारी यायच्या होत्या.
खूनाच्या केसेसमध्ये डावऱ्या दादाचा हात आहे असं पोलिस म्हणू शकत नव्हते.
ते तसं म्हणाले असते तर त्यांच्या रेकॅार्डप्रमाणे तो तर कांही वर्षांपूर्वीच एनकाऊंटरमध्ये मारला गेला होता, ते रेकॅार्ड बदलणं आता शक्य नव्हतं.
डावऱ्या दादा तेव्हाच मारला गेला ह्यावर पोलिस ठाम होते.
ह्याच वेळी डावऱ्याने एका खाजगी बँकेच्या शाखेच्या कॅशियरला मारून त्याने नुकतीच स्टेट बँकेतून काढलेली पंचवीस लाखाची रोकड पळवली.
त्या खाजगी बँकेचे एक जनरल मॅनेजर आणि इन्सपेक्टर हिरवे यशवंताना भेटायला आले.
इन्सपेक्टर हिरवेंनी थेट विषयालाच हात घातला, “धुरंधर साहेब, हे त्या बँकेचे जनरल मॅनेजर.
त्यांनी एफआयआरची नोंद केली आहे.
बँकेलाही डावऱ्या दादाची धमकी आली होती.
कारण नसतांना केलेला खून लक्षांत घेता, एकाच गुन्हेगाराचे नांव त्यांना आठवतय ते म्हणजे डावऱ्या दादा.
ऐका त्यांच्याकडूनच.”
यशवंत त्यांना म्हणाले, “जेवढ्या तपशिलांसह सांगता येईल तेवढ्या सर्वांसह सांगा.”
जनरल मॅनेजर म्हणाले, “बँकेच्या दृष्टीने २५ लाख ही रक्कम मोठी नसते.
शिवाय तिचा विमाही काढलेला असतो.
त्यामुळे बँकेला चोरीचं इतकं वाटत नाही.
पण एक कॅशियर मारला गेला आहे.
बँकेच्या नियमाप्रमाणे एक बंदुकधारी रक्षक बरोबर घेऊन कॅशियर स्टेट बँकेतून परत येत होता.
रक्षकाला नि:शस्त्र करून त्याला पिस्तुल रोखून बाजूला नेला.
कॅशियरला बँकेच्या सूचना असतात की अशा प्रसंगी विरोध करायचा नाही.
तसा कॅशिअरने विरोध केला नाही.
तरीही त्यांनी त्याला मारलं.
हे दहशत बसवण्याचं कृत्य केवळ डावऱ्या दादाचं करू जाणे.
दहा वर्षांपूर्वी अगदी असाच प्रकार दुसऱ्या बँकेच्या कॅशियरबरोबर झाला होता.
तेव्हां डावऱ्या दादानेच ते केलं होतं.
त्यामुळे आताही हा डावऱ्या दादाचाच डाव असणार हे नक्की.”
इन्सपेक्टर हिरवे म्हणाले, “इथेच आमचं घोडं अडलंय.
ह्या सर्व नव्या केसेस ‘अननोन’ गु्न्हेगारावर होतात आणि आम्हाला कांही करता येत नाही.
ह्या केसमध्ये तो स्वत: पिस्तुल वापरत होता.”
यशवंत म्हणाले, “हा गुन्हा भर रस्त्यावर साडेदहाला झालाय, कुणी ना कुणी व्हीडीओ घेतला असेल.
येईल तो वाट पहा.
तोपर्यंत पहिल्या डावऱ्याच्या फाईलमध्ये काय काय आहे, ते नजरेखालून घालायचय मला.
मी तुमच्या ॲाफीसमध्ये येईन.”
ठरवल्याप्रमाणे यशवंत साडेदहाला क्राईम ब्रॅंचमध्ये पोहोचले व लगेच डावऱ्याची रेकॅार्डवरील माहिती वाचू लागले.
डावऱ्याचा जन्माबद्दल कांहीच माहिती नव्हती.
सात वर्षांचा असतांना मुंबईत मामाकडे आला, तिथपासून माहिती होती.
मामाने त्याला शाळेतही घातला नाही.
अकरा-बारा वर्षांचा असतांना तो मामीच्या त्रासाला कंटाळून पळाला.
तो थेट अंडर वर्ल्डमधील एका दारूचे गुत्ते चालवणाऱ्या दादाकडे पोहोंचला.
तिथून त्याची करीयर चालू झाली.
मामाने कांही तो पळून गेल्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती.
पण पोलिस कांही वर्षांनी चौकशी करता गेले, तेव्हा त्याने आपला भाचा आपल्या घरांतून पळाल्याचे नाकारले.
तो म्हणाला होता, “कुणाही शेजाऱ्याला विचारा. माझा भाचा सतरा वर्षांचा होईपर्यंत माझ्याकडे होता.”
पोलिसांनी ते गंभीरपणे घेतलं नाही.
सोळाव्या वर्षीच डावऱ्याचं नांव पोलिस रेकॅार्डवर आलं होतं आणि मग एनकाउंरपर्यंत सतत नवे गुन्हे नांवावर नोंदले जात होते.
यशवंत त्याचे रेकॅार्डवरचे फोटो पहात होते.
तेवढ्यात एका ॲाफीसरच्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून एक मेसेज आणि एक व्हीडीओ आला.
तो व्हीडीओ होता डावऱ्या दादा बँक कॕशियरला शूट करत असतांनाचा.
मेसेज डावऱ्या दादाचाच होता. “मी आलोय, घ्या खात्री करून.”
यशवंतानी व्हीडीओतील चेहरा रेकॅार्डवरील चेहऱ्याशी जुळवून पाहिला.
रेकॅार्डवरील चेहराच आठ-दहा वर्षांनी मोठा झालेला वाटत होता.
एका प्रचलित समजुतीप्रमाणे जगात प्रत्येकाचे सहा डुप्लिकेट असतात.
हा तसाच एक तोतया असला तर !
पण साम्य असणारा माणूस इतका धोका कां पत्करेल ?
ते कांही राजाचे सिंहासन नव्हतं.
यशवंतानी हिरवेंना मामा मामींबद्दल विचारलं.
इन्सपेक्टर हिरवे म्हणाले, “मामा आता हयात नाहीत.
मामी कुठेतरी गांवाला निघून गेलीय.
इथे कुणीच नाही आतां.
ती चाळही राहिली नाही.”
यशवंताना मामा मामीच्या स्टेटमेंटची आठवण झाली.
सतराव्या वर्षापर्यंत डावऱ्या त्यांच्याकडेच होता.
शेजाऱ्यांना विचारा, असंही ते म्हणाले होते.
पोलिसांनी तेव्हा त्या स्टेटमेंटची दखल घेतली नव्हती.
यशवंतांनी लागलीच चंदूला फोन केला.
त्याला थोडक्यात माहिती देत त्यांनी सांगितलं, “चंदू, कसंही करून मामींकडून ह्या बद्दल माहिती मिळव.
मला वाटतंय, डावऱ्याला जुळा भाऊ होता की काय ?”
यशवंतांची तोपर्यंत खात्रीच झाली होती की डावऱ्याला जुळा भाऊ होता असावा आणि तोच आतां ‘डावऱ्या’ होऊन कांड रचत होता.
यशवंतानी पोलिसांना मात्र त्याबद्दल एवढ्यांत कल्पना दिली नाही.
यशवंतानी त्यांना एवढचं सुचवलं, “सध्या ह्या गुंडाला “तोतया डावऱ्या” संबोधून सगळ्या केसेस एकत्र करून त्याच्यावर चार्जेस लावा.
मिडीयांत त्याला डावऱ्याचा तोतया म्हणून संबोधित करा आणि त्याच्या कारवायांचा आम्ही लवकरच कायमचा बंदोबस्त करू असंही सांगा.”
इन्सपेक्टर हिरवेंनी तशा सूचना दिल्या व तांतडीने त्यांची अंमलबजावणी करायला सांगितले.
संध्याकाळच्या बातम्यांमध्ये “तोतया डावऱ्या” हे नांव मिडियाने उचललं आणि पसरवलं.
डावऱ्याच्या कानांवर ही बातमी पोहोचताच त्याने आपणच तो आहोत, हे सिध्द करण्यासाठी खंडणी नाकारणाऱ्या एका मोठ्या उद्योगपतीचा खून करणार, असल्याचे जाहिर केले.
उद्योगपतींच्या खाजगी तसेच सरकारी सुरक्षेंत वाढ करण्यांत आली.
डावऱ्याने उद्योगपतींच्या दैनंदिन व्यवहाराची पूर्ण माहिती काढली.
सुरक्षेत कुठे कच्चे दुवे आहेत, ते तो पाहू लागला.
दर आठवड्याला एक दिवस ते एका ठराविक घरी जात असत.
तेव्हा केवळ दोनच सुरक्षा रक्षक त्यांच्याबरोबर असत.
जेव्हा ते त्या घरांत जात, तेव्हा ते रक्षक आपल्या गन्स घेऊन बाहेरच थांबत.
ह्या दिवशीच कांही तरी करता येईल, असा त्याने विचार केला.
त्याने फक्त त्याच्या दोन खास शूटरनां त्याचा बेत सांगितला आणि त्या दोन रक्षकांना संपवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.
कोणालाही हे कळणार नाही, ह्याची खबरदारी घ्या, म्हणून ताकीद दिली.
“भींतीला कान असतात” ह्या म्हणीतून अंडरवर्ल्डही सुटलेले नाही.
एका खबऱ्याकडून ही बातमी इन्सपेक्टर हिरवेंना कळली.
त्यानी तोतया डावऱ्याला तिथेच पकडायचा बेत केला.
त्यांना कल्पना होती की त्याचे साथीदार सुसज्ज असणार व वेळ पडली तर एन्काऊंटर करावा लागणार.
त्यांनी आपला बेत यशवंताना सांगितला.
यशवंत म्हणाले, “आपण ह्या तोतयाला जिवंत पकडला पाहिजे.
एन्काऊंटर करून तो मेला तर सत्य बाहेर येणार नाही.
असं वाटेल की आता मारला गेला तोच खरा असेल.
तोतयाचं खरं रूप उघडं पाडलं पाहिजे.”
यशवंत विचार करत असतांनाच चंदूचा फोन आला.
चंदूने सांगितलं मामी थोडी भ्रमिष्ट झालीय ती ह्या म्हणण्यावर ठाम आहे की सतराव्या वर्षापर्यंत एक भाचा तिच्याकडे होता आणि असंही म्हणते की तिच्या नवऱ्याने आठ वर्षांचा आणलेला भाचा बाराव्या वर्षी पळून गेला.
तिला नीट कांही सांगता येत नाहीय.
केव्हा केव्हा डावऱ्या न म्हणतां ती त्याला सावळ्या म्हणते.”
यशवंत म्हणाले, “एवढी माहिती पुरे आहे, तू लवकर परत ये.”
यशवंतनी मामीच्या बोलण्यावरून ते जुळे भाऊ होते, हे नक्कीच ठरवलं.
त्यातला एक आठव्या वर्षी तिच्याकडे आला असावा पण तिच्या जांचाला कंटाळून बाराव्या वर्षी पळाला असावा.
तेव्हा मामाने दुसऱ्याला गांवाहून तिथे आणला आणि तो दुसरा सतराव्या वर्षी घराबाहेर पडला असावा.
तोच हा तोतया असावा.
हे जरी खरं असलं तरी हा तोतया एवढी वर्षे कुठे होता ?
कुणालाच कसा माहित नव्हता ?
त्या जगांतल्या खांचाखोचा ह्याला कशा माहिती आहेत ?
यशवंताना वाटत होतं की तो डावऱ्याबरोबरच रहात होता असावा पण तेव्हा गुन्हेगारी करत नसावा.
भावाच्या मृत्यूनंतर त्याला दुसरा मार्ग न राहिल्यामुळे त्याने हळहळू परत भावाच्या नांवानेच जम बसवला असावा.
हे खरं आहे की नाही हे तोच सांगू शकला असता पण त्यासाठी त्याला मारतां कामा नये तर जिवंत पकडले पाहिजे.
त्यासाठी आपल्यालाही एक तोतया बनवायला पाहिजे.
शेटजींऐवजी शेटजींचा तोतया तिथे गेला पाहिजे.
त्याला वेळेवर पिस्तुल वापरतां आलं पाहिजे.
ह्या तोतयाचा कांटा तोतयानेच काढला पाहिजे.
नेहमीप्रमाणे उद्योगपतींची गाडी ठराविक वेळेला त्यांच्या प्रशस्त बंगल्याच्या गेटमधून निघाली.
आत ड्रायव्हर आणि उद्योगपती बसलेले होते.
डावऱ्याच्या माणसाने डावऱ्याला ती बातमी कळवली.
दहा मिनिटांच्या अंतरावरच तो होता.
तो तडक उद्योगपती जिथे जात असत, तिकडे निघाला.
तिथे पोलिस दबा धरून बसले होते पण त्यांना हत्त्यार न वापरण्याची सक्त ताकीद होती.
उद्योगपतींच्या गाडीच्या मागे तोतयाची गाडी आली व तिचा ड्रायव्हर ओव्हरटेक करू लागला पण उद्योगपतींच्या ड्रायव्हरने गाडी मध्येच आडवी घालून अपघातच घडवला.
गाड्या जोरांत आदळल्या.
डावऱ्या धक्क्यातून सावरून पडलेले हत्यार शोधत असतांनाच कानशीलावर टेकलेल्या पिस्तूलाचा थंडगार स्पर्श त्याला जाणवला.
अधिकारवाणीने कोणीतरी त्याला म्हणालं, “सावळ्या, तुझा खेळ संपलाय.”
त्याच क्षणी त्यांच्या पाठी आलेल्या ड्रायव्हरने सावळ्याची कारमध्येच पडलेली गन हस्तगत केली होती.
लगेचच इन्सपेक्टर हिरवे व त्यांच्या साथीदारांनी येऊन त्याला अटक केली.
इन्सपेक्टर हिरवे उद्योगपतींच्या तोतयाला म्हणाले, “धुरंधरसाहेब, तुम्ही स्वत: तोतया उद्योगपती बनून आणि चंदूला ड्रायव्हर घेऊन खूपच मोठी जोखीम घेतलीत.
अजून अनेक गुन्ह्यांची उकल करायला तुम्ही दोघे आम्हाला हवे आहात.”

– अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..