स्वतःही युरोपला प्रथमच जाणाऱ्या गोमुवर ४९ प्रवाशांची जबाबदारी अचानक येऊन पडली होती.
त्यांना घेऊन तो विमानांत बसला व विमान आकाशांत झेपावताना काय झाले, हे गोमुने आपल्याला सांगितले.
आतां पुढे काय झाले, हे ही त्याच्याच शब्दांत ऐका.
“पक्या, तुला सांगतो, ह्या सगळ्यांच्या लहरी सांभाळतांना मला सात तासांच्या फ्लाईटमध्ये जेमतेम एक तास झोंप मिळाली.
सकाळी आम्ही मिलानहून रोमला गेलो.
तिथे सव्वासात फूट उंचीचा एक महाकाय आणि ओबडधोबड गोरा माणूस आमच्यासाठी बस घेऊन उभा होता.
ड्रायव्हरच्या सीटमध्ये तो मावत होता हेच विशेष.
त्याचा आवाज एकदम पातळ आणि हळू.
शरीराच्या अगदी विरूध्द.
एक बरं होतं की त्यालाही फारसं इंग्रजी समजत नव्हतं.
तो जर्मन होता.
कामचलाऊ इंग्रजी बोलत होता.
त्यामुळे मला बरं झालं.
शहराबाहेरच्या एका हाॅटेलमध्ये आमची ब्रेकफास्टची सोय केली होती.
रात्री विमानांत मळमळतय असं म्हणणारी सगळी मंडळी आता उत्साहाने वेगवेगळ्या खायच्या वस्तू जमा करत होती.
त्यांतच तो अनलिमिटेड असल्यामुळे काय घेऊ आणि काय नको असं प्रत्येकाला झालं होतं.
मी आपले दोन बटर टोस्ट.
दोन अॉम्लेट, दूधांत सिरीयल्सचे दोन बाऊल्स मध घालून, तीन चार केक आणि इंडीयन डिश म्हणून ठेवलेला पराठा असा हलका आहार घेतला.
सर्व जबाबदारी माझ्यावर होती ना ?
जास्त खाल्ल्यास झोप आली असती.
▪
तिथून आम्ही बसने रोम पहायला जाणार होतो.
एक लोकल गाईड आमच्याबरोबर येणार होता.
तो वाटेत कुठे भेटणार हे ड्रायव्हरला ठाऊक होते.
बराच वेळ स्टाॅप नव्हता आणि खड्डे नसल्यामुळे बस वेगांत होती.
माझा जरा डोळा लागला.
जागा झालो तेव्हां
गाडी थांबली होती.
ती रोम शहराच्या बाहेर दुपारी अडीच वाजतां.
म्हणजे रोम पाहूनही झालं होतं ?
पुढच्याच सीटवर बसलेले जोशी मला म्हणाले, “रोममधला एक लोकल गाईड वाटेत बसमध्ये चढला.”
मला आठवलं की लोकल गाईडला ड्रायव्हर पिक अप करणार होता.
जोशी पुढे म्हणाले, “आपली बस फिरत होती.
गाडीतूनच गाईड आम्हांला एक एक ठिकाण दाखवत होता.
कलोझियम, रोमन फोरम, ट्रेविस फाऊंटन सर्व त्याने ह्या राउंडमध्ये छान दाखवलं व आता व्हॕटीकनला नेतोय.”
म्हणजे माझं रोम बघणं राह्यलचं.
जोशी म्हणाले, “तुमचा डोळा लागला होता. पण तुम्हांस उठवले नाही. तुम्ही हे सर्व अनेकदां पाहून कंटाळलेले असणार.”
मी मनांत थोडा चरफडलो.
पण “रोमन हॉलिडे” हा पिक्चर तीनदां पाहिलं होतं, तेव्हां त्यात काय नवीन असणार असा विचार करून जोशीना म्हणालो, “अहो, फार नाही पण तीनदां पाहिलाय.”
“वाटलेंच मला, ह्यः ह्यः!” जोशी. मी त्या गाईडला माझी “टूर लिडर” ही ओळख दिली.
तो थोडा मिष्कीलपणे हंसतोय असा भास झाला.
दुपारी जेवण हॉटेलमध्ये नव्हतं.
तर सर्वांना पॕकेटस देण्यांत आली.
त्यांत प्रत्येकी दोन सँडविचेस होती.
बरं झालं की सर्वांनी आधी भरपूर ब्रेकफास्ट घेतला होता.
▪
व्हॕटीकनला आम्ही खाली उतरलो.
जाण्यापूर्वी मी व्हॕटीकनविषयी काय काय सांगायचं ते मनाशी ठरवलं होतं.
पण आता कांहीच आठवेना.
बरं झालं की तो लोकल गाईड होता.
तो आता सर्व माहिती देईल असं अनाउन्स करून मी माझी जबाबदारी निभावली.
त्याने अगदी आस्थेने सर्व दाखवले.
सुदैवाने त्याचे उच्चार सर्वांना समजण्यासारखे होते.
कांही आज्यांना इंग्रजी समजत नव्हते.
त्यांचे नवरे त्यांना आपण सर्व पूर्वीच पाहिल्याच्या रूबाबांत तो बोलेल त्याचं भाषांतर करून सांगत होते.
आणि आजींचे डोळे विस्फारत होते.
पक्या, सेंट पीटर्स चर्चच्या सिलींगवरची मायकेलेंजोलोची चित्रे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले रे !
उताणं झोंपून आढ्यावर ब्रशने पेंटींग करायचं म्हणजेच केवढी कसरत आहे.
मी तर भारावून गेलो.
तू बिछान्यावर तास अन् तास उताणं झोपायचा विक्रम करू शकशील पण उताणं झोपून हाताच्या अंतरावर असलेल्या सिलिंगवर सुंदर चित्रे सोड, फराटा पण मारू शकणार नाहीस.
(इथे मी त्याला थांबवून विचारणार होतो की तो स्वत: इतक्या उंचावर चढू तरी शकला असता कां ? पण म्हटलं, चालू दे त्याचं.)
गाईडने आम्हाला पोप ज्या खिडकीशी उभा राहून सर्वांना हात करतो, ती खिडकी, हे सुध्दा एक प्रेक्षणीय स्थळ, म्हणून दाखवली.
▪
व्हॕटीकन दाखवून झाल्यावर गाईडने एका मेमोवर माझी सही घेतली.
वाटेंत तो उतरून गेला.
आम्ही एका इंडीयन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो.
तिथले पदार्थ सर्वांच्या परिचयाचे, कोणत्याही पंजाबी हॉटेलमध्ये असणारे होते.
सर्वांना हवा तो डाळ भात, फिश करीही होती.
सर्वांनी जेवणावर ताव मारला.
नंतर बस आमच्या मुक्कामाच्या हॉटेलला आली.
सर्वांच्याकडे भरपूर सामान होतं.
एका रात्रीच्या मुक्कामाला त्याची गरज नव्हती.
मला सांगितले होते की प्रवाशांसाठी सूचना द्या की एका रात्रीच्या मुक्कामाला आवश्यक तेंच सामान बरोबर घ्या.
बाकी बॕगा बसमध्येच ठेवा.
ही सूचना द्यायला मी विसरलो.
सुदैवाने सगळे सामानासाठी गर्दी करू लागले तेव्हा ड्रायव्हरनेच मला या सूचनेची आठवण करून दिली.
त्याचं इंग्रजी कळायला मला वेळ लागला.
पण लक्षांत येतांच मी सर्वांना अधिकारवाणीने शांत केलं आणि जरूरी सूचना दिली.
तरी आवश्यक आणि अनावश्यक या सॉर्टींगचा गोंधळ तासभर तरी चाललाच.
मी तोपर्यंत आत गेलो आणि माझ्याकडचे बुकींगचे कंपनीने दिलेले मेसेज दाखवले.
▪
मी रिसेप्शन काऊंटरवर बुकींगचे मेसेज दाखवत असतांना आमच्या सहलीचे किमान पंधरा सदस्य माझ्याभोवती चिकटून कोंडाळं करून उभे होते.
रिसेप्शन क्लार्कने मला सांगितले की फक्त एकालाच इथे चौकशी करतां येईल.
मला हात जोडून सगळ्यांना सोफ्यांवर बसायला सांगण भाग पडलं.
बरेच जण गेले तरी दोघे तिघे जवळ उभे राहिलेच.
रिसेप्शन क्लार्कने माझे मेसेज पाहिले, रेकॉर्ड पाहिले.
त्या कंपनीच्या प्रवाशांचा मुक्काम नेहमीच त्या हाॅटेलमध्ये होत असल्यामुळे कांही अडचण आली नाही.
आवश्यक माहिती रजिस्टरमध्ये लिहून मला सव्वीस खोल्यांच्या चाव्या दिल्या.
हॉटेलच्या खोल्या आंतून सारख्याच असल्या तरी त्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात.
दुसरा मजला, तिसरा मजला, कोपऱ्यांतली खोली.
बाहेरचा व्ह्यू दाखवणारी खोली, स्विमींग पूल दाखवणारी खोली, इ. इ. त्यामुळे अशी खोली द्या, तशी खोली द्या अशा मागण्या येऊ लागल्या.
कांही नवराबायकोंत कुठली खोली घ्यावी ह्या बाबतींत एकमत होत नव्हतं तर कांही जणांना त्यांच्या मित्राच्या शेजारचीच रूम हवी होती.
पक्या, तुला वाटले असेल की मित्र म्हणजे ते आपल्यासारखे शाळेपासूनचे मित्र असतील.
तर नाही.
अरे, त्यांची त्याच दिवशी बसमध्ये सीटस जवळ होत्या म्हणून मैत्री झाली होती.
ह्या मागण्या पुरवतां पुरवतां खोली वाटपाला एक तासाहून अधिक वेळ लागला.
पुढे टूरमध्ये जिथे जिथे मुक्काम झाला तिथे तिथे हाच प्रोग्राम राहिला.
▪
दुसऱ्या दिवशी सकाळी मला देण्यांत आलेल्या मोबाईलचा उपयोग करून मी आदल्या दिवसाचा रिपोर्ट आमची टूर हँडल करणाऱ्या मुंबईतील मॅनेजरला दिला.
अर्थात रोम पहातांना मी झोपलो होतो हा भाग वगळून सर्व सांगितलं.
नंतर त्याच हाॅटेलमध्ये ब्रेकफास्टचा दिवसांतला सर्वांत महत्त्वाचा भाग पार पडला.
मग पुन्हां बस निघाली.
आम्ही आल्पस् पर्वताच्या शिखरावर जाणार होतो.
पुढचा प्रवास तिथे खास बनवलेल्या रेल्वेवरून होता.
नंतर रोपवेवर मध्ये मोठे मोठे पाळणे (Capsule) होते.
एकांत ४०-५० माणसे भरलेला पाळणा दोरीला लोंबकळत जातो, हे बघूनच भीती वाटली.
पण सर्व सुरक्षित होतं.
पुढे पुन्हा रोपवेच होता पण चार चार जणांच्या खुर्च्यांच्या पेट्या होत्या.
आम्ही अगदी दरीवरून फेरी मारून दुसऱ्या बाजूला बर्फांत खेळून परत आलो.
ह्या प्रवासात माझी खरी परीक्षा झाली.
प्रत्येक वाहन बदलतांना माझ्या मेंढ्यांचा कळप सांभाळायचा, ही मोठीच कठीण गोष्ट होती.
मध्ये वेळ जास्त नसे.
एखादं मेंढरू इकडे तिकडे जाऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागली.
दोन दिवसांत कांही मला नांव पाठ झाली नव्हती.
पण कोणी चुकू नये म्हणून सर्वांना कंपनीने दिलेली टोपी सतत डोक्यावर घालायची मी ताकीद दिली होती.
माझ्या नशीबाने तिथे कोणी चुकले नाही.
आम्ही आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन आलो.
उतरल्यावर पुन्हा बसमधून ल्युसेर्नला गेलो.
तिथे मोठाले तलाव पाहिले.
सर्व कसं ठरल्यासारखं होत होतं.
मला जास्त कांही करायला लागत नव्हतं.
सर्व सदस्यही युरोपचं काश्मीर पाहिल्याच्या समाधानांत होते.
तिसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दिवसाचा रिपोर्ट दिला आणि सिनीयर टूर लिडर कधी येणार म्हणून विचारलं.
तर मॅनेजर म्हणाला, “अजून कोणी मिळाला नाही आणि तुमचं बरं चाललेलं दिसतंय. तेव्हा आणखी दोन तीन दिवस सांभाळा ही सर्कस.”
मीही म्हटलं, “चालतय की.”
▪
स्वित्झर्लंडला आपल्या हिंदी सिनेमांच खूप शूटींग होत असतं.
ते पाहिलेली प्रवासी जोडपी तिथल्या रोमँटीक हवेमुळे रंगात आली होती.
त्याचबरोबर एक नवं प्रेमप्रकरणही आमच्या बसमध्ये रंगू लागलं.
आईबाबांबरोबर आलेली एक वीस वर्षाची मुलगी एकट्याच आलेल्या एका तरूणाच्या प्रेमांत पडल्याची लक्षणे मला दिसू लागली.
तिच्या आईबाबांच लक्ष तिच्याकडे नव्हतं.
ते आपापसांतच मग्न होते.
पण स्वित्झर्लंडला सर्वजण जेव्हां केबल कारच्या रांगेत उभे होते, तेव्हां मी त्या दोघांना मागे मागेच घुटमळतांना पाहिलं.
केबल कारची पुढली राईडही चूकवून दोघं बहुदा हिंदी सिनेमातील नायक-नायिकेप्रमाणे नाच करायला मागेच राहिली.
पुढे संपूर्ण प्रवासांत हे प्रकरण बहरतांना माझ्याच काय पण तिचे आईवडील सोडून सर्वांच्या लक्षांत आले होते.
शेवट गोड झाला की काय ते मला माहित नाही.
एक रात्र आम्ही संध्याकाळी नेहमीप्रमाणे बेल्जीयममधील इंडीयन हॉटेलमधे जेवलो आणि तिथल्या मुक्कामाच्या हॉटेलकडे निघालो.
ते हॉटेल बरंच लांब होतं.
कारण एक तासानंतर आमची बस एका हॉटेलसमोर उभी राहिली.
मी रिसेप्शनकडे वळलो.
नेहमीचे दोन तीन प्रवासी माझे बॉडीगार्ड असल्यासारखे माझ्याबरोबर आले.
मी मेसेज दाखवला.
तो रिसेप्शनचा माणूस काय बोलत होता मला कळत नव्हतं.
बराच वेळ असं न कळणारं संभाषण झाल्यावर त्याने मला कागदावर लिहून दाखवलं.
त्याचे इंग्लिश लिखाणही अगम्यच वाटलं.
पण माझ्यासोबत असणाऱ्या बॉडीगार्डस्च्या मदतीने मी ते वाचलं.
त्यांत म्हटलं होतं की इथे तुमचं बुकींग नाही.
तुमच्या मेसेजमधले हाॕटेल वेगळे आहे.
मग तिकडच्या रात्री अकरा वाजता आणि इकडच्या पहाटेच्या तीन वाजतां आमच्या हॉटेलचा पत्ता मिळवायसाठी कंपनीच्या माणसाला फोन केला.
पत्ता अॉफीसच्या फायलीत होता.
तो काय सांगणार !
तेवढ्यात एका प्रवाशाने मला मुक्कामातील सर्व हॉटेल्सचे पत्ते कळवणारा त्याला आलेला मेसेज दाखवला.
तो पत्ता पाहून ड्रायव्हरने बस परत फिरवली आणि आम्ही ज्या हॉटेलात जेवलो होतो त्याच्या बाजूच्याच हॉटेलात मुक्कामाला आणून सोडलं.
चक्क कांखेत कळसा आणि गांवाला दोन तासांचा वळसा अशी अवस्था.
पण ती माझी चूक नव्हती.
ड्रायव्हरचीही नव्हती.
त्या मुंबईच्या मॅनेजरची चूक होती.
त्याने कांही कारणाने हाॕटेल बदलले होते पण पत्ता मला कळवला नव्हता.
▪
सहल टाईम टेबल प्रमाणे चालू राहिली.
सिनीयर टूर लिडर कांही आला नाही.
पण त्याने फारसं बिघडले नाही.
सगळा प्रवास आंखीव होता.
बहुतेक ठिकाणे ड्रायव्हरच्या परिचयाची होती.
अॉस्ट्रीया, हॉलंड, बेल्जियमचं सौंदर्य बघून झालं.
बरेचदां दोन शहरांतले अंतर जास्त असे.
दोन तीन तासाच्या प्रवासात बाहेरही कांही पहाण्यासारखं नसे.
अशा वेळी जोक्स सांगून, नकला करून मी सर्वांच मनोरंजन करायला सुरूवात केली.
हळूहळू प्रवाशांतले हौशी कलाकार पुढे येऊ लागले आणि आपले आयटम सादर करू लागले.
सर्वांनी मस्त एंजाॅय केलं.
पण मग मला विसरून गेले.
एक हौशी आजोबा अँकर झाले.
पु.ल. देशपांडेंच्या नांवावर आपलेच विनोद खपवू लागले.
एका बाईंना भजन प्रिय होते.
खूप भजनं पाठ होती.
पण गाण्याची बोंब होती.
त्या किरट्या आवाजांत भजन म्हणायला लागल्या की झोंपही घेतां येणं कठीण होई.
प्रत्येक एका आयटमनंतर त्यांना भजन म्हणायचं असे.
शेवटी परमेश्वरच धावला.
आईस्क्रीमने बाईंचा घसा धरला.
▪
कंपनीने सांगितल्याप्रमाणे मी पुन्हां पुन्हां सर्वांना गृपबरोबर रहायला सांगत होतो.
कोणी चुकला तर पंचाईत व्हायची.
कारण आधीच सर्वांचे इंग्रजी फक्त तर्खडकरांच नांव ऐकल्यापुरतं.
त्यांत इंग्लंडशिवाय इतर युरोपीय देशांतील सामान्य लोकांना इंग्रजी अजिबात समजत नाही.
हाॅटेलमधल्या कांही स्टाफला थोडं फार समजतो.
हरवलेल्याला पत्ता वाचू शकणाराही सांपडण मुष्कील होतं.
म्हणून ही काळजी.
आमची सहल पॕरीसला पोहोंचली आणि दिवसा पॕरीस फिरूनही झालं.
रात्री पॕरीसची रंगीन रात्र बघण्याची इच्छा बहुतेकांना होती.
दोन आज्या मात्र म्हणाल्या, “आम्ही नाही येणार असल्या ठिकाणी.”
मग त्या दोघींना हॉटेलवर सोडून आम्ही सर्व, त्यांत दोघींचे रिस्पेक्टीव्ह आजोबा म्हणजे नवरे आलेच, लिडोमधला शो बघायला गेलो.
तीन तास कसे गेले कळलंच नाही.
पक्या, आयुष्यांत एकदा तरी पॕरीसची रंगीन रात्र अनुभवलीच पाहिजे रे.
मी तर सर्वांना हाॅटेलवर सोडून परत जायचा बेत केला.
आम्ही सर्व खुशीत हॉटेलवर परतलो.
ज्यांच्या बायकांना हॉटेलात सोडून गेलो होतो, त्यांच्या चाव्याही रिसेप्शनने माझ्याकडे दिल्या.
मी म्हटले, “त्या कुठे गेल्या ?”
रिसेप्शनिस्ट म्हणाला की त्याची ड्यूटी आताच सुरू झाली, त्याला ते माहित नाही.
आम्ही सर्व हॉटेल शोधलं.
त्या हॉटेलात नव्हत्या.
पण एका हाउसकीपींग बॉयने सांगितलं की आम्ही गेल्यावर अर्ध्या तासाने त्या दोघीही हॉटेलातून बाहेर गेलेल्या त्याने पाहिलं होतं.
▪
आता रात्री साडेबारानंतर पॕरीसमध्ये यांना कुठे शोधायचं ?
मोठं संकटच वाटलं ते.
त्यांचे नवरे तर तणतणत होतेच.
“हे काय पुणं वाटलं कां ?” एक नवरा.
“पुण्याला तरी कोण मरायला रात्री बाहेर पडतोय !” दुसरा नवरा.
दोघी पुणेकर होत्या.
“ह्या वयांत ह्या दोघी आपल्या सगळ्यांना चुकवून पॕरीसमधे मजा करायला गेल्या की काय ?” तिसरा माझ्या कानांत बोलला.
मी दोघा नवऱ्यांखेरीज सर्वांना त्यांच्या रूमवर पाठवले.
मग त्या दोघांना घेऊन बाहेर पडलो.
आम्ही दोन तीन फर्लांग गेलो असू, एवढ्यांत आम्हाला एक पोलिसांची गाडी दिसली.
आम्ही हात दाखवल्यावर ते जवळ आले.
पण त्यांची भाषा आम्हाला कळेना आणि आमची त्यांना कळेना.
दोघींचेही नवरे फाडफाड इंग्रजी झाडत होते.
पण फ्रेंच पोलिसांच्या डोक्यांत प्रकाश पडत नव्हता.
शेवटी एका पोलिसाने कुणालातरी फोन केला व कांहीतरी त्याच्याशी बोलून आमच्याकडे दिला.
आम्ही आमचा प्रॉब्लेम सांगताच तो म्हणाला, “तुम्ही आता हॉटेलवर परत जा. आम्ही अर्ध्या तासांत त्यांना हजर करूं. त्यांची व्यवस्था कार्यरत झाली आणि खरंच अर्ध्या तासांत दोघींना हॉटेलवर आणून सोडलं त्यांनी.
मग त्यांची सगळ्यांनी क्रॉस एक्झामिनेशन सुरू केली.
दोघी रडायलाच लागल्यामुळे मी सर्वांना परत रूमवर पाठवून दिलं.
साडेतीन वाजतां बिछान्याला पाठ टेकतांना मनांत विचार आला, “माझ्याच नशीबी पॕरीसची रंगीन रात्र अशी कां ?”
▪
पॅरीसपर्यंत बस होती.
पॅरीसला त्या ओबडधोबड पण प्रेमळ ड्रायव्हरला निरोप दिला.
दुसऱ्या दिवशी ट्रेनने लंडनला आलो.
ट्रेन सुटेपर्यंत जेमतेम सर्वांना अक्षरश: सामानासकट आंत ढकलले.
लंडनच्या अडीच दिवसाच्या मुक्कामांत एक दिवस लंडन पहाण्यात गेला.
एक दिवस शेक्सपीअरचं गांव बघून आलो.
संध्याकाळी सर्वांना खरेदीसाठी घेऊन गेलो.
आता बस नव्हती.
हॉटेलचा पत्ता देऊन ठेवला.
ज्यांना हवं त्यांनी हवी तशी खरेदी करावी, फिरावं आणि सरळ हॉटेलवर यावं.
ज्यांना हे जमणार नाही असं वाटत असेल त्यांनी सहा वाजतां जवळच एका ठराविक ठिकाणी जमायचं होतं.
अर्थात ह्यांत गोंधळ झालाच.
कांहीजण चुकलेच.
पण शेवटी रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व आले.
मोडकंतोडकं इंग्लिश इथे चालत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला बस आम्हाला एअरपोर्टला घेऊन जाणार होती.
सर्वांना बजावून सांगितले होते की बस सहाला सुटेल.
कुणाला उशीर झाला तरी बस निघून जाईल मग स्वत:च एअरपोर्टवर यावं लागेल.
पण हे मलाच भोवेल हे माहित नव्हतं.
टूर पार पडली होती.
त्या आनंदात मी झोंपलो तो सकाळी सातला उठलो.
बस निघून गेली होती.
वीस दिवस माझ्याबरोबर फिरणाऱ्या मंडळीना माझी अजिबात काळजी वाटली नाही.
मी कां बसमध्ये आलो नाही, याची कुणी चौकशीही केली नसावी.
कदाचित मला खूप अनुभव असणार हे ते गृहीत धरत होते.
मी घाइघाईने तयार होऊन बाहेर पडलो आणि टॕक्सी पकडून एअरपोर्टला पोहोचलो.
तिथे सर्व भेटले.
पण पक्या, कुणी माझे आभारही मानले नाहीत रे.
कंपनीने मात्र नोकरी कायम करणार म्हणून सांगितलं.
पण मी कधी टूर लिडरचं काम पुन्हां करणार नाही.
अगदी रटाळ काम.
एखाद्या रोबोसारखं.
दर वेळी तीच प्रेक्षणीय स्थळ तरी कितींदा पहाणार ?
मी दिली नोकरी सोडून.”
असं म्हणून गोमुने आपलं प्रवासवर्णन संपवलं.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply