“एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” हे गाणे लहानपणापासून फार आवडे. डोळ्यासमोर आजही लहानपणचे अलिबाग रामनाथ येथील आजोळच्या घराजवळचे शांत पहुडलेले तळे आठवते. दिवसाच्या कोणत्याही वेळी गेले तरी ते पाहून मला मनापासून आनंद मिळे. तासन् तास मी काठावर बसून तेथील निश्चलतेचा शांत अनुभव लुटत असे.
फार पुरातन काळापासून राजे लोकांनी अनेक तळी, तलाव प्रजेच्या पाण्याच्या सोयीकरता बांधली. निसर्ग निर्मित सरोवरे, धरणे बांधून तयार झालेले तलाव, समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या आत अडून त्यातून तयार झालेली सरोवरे, देवस्थानांच्या बाजूस पवित्र स्नानाकरिता असलेले तलाव या सर्व जागा मनाला वर्णनातीत आनंद देतात.
रामायण काळात पंपा सरोवराचा उल्लेख असून विजयनगर हंपी, होस्पेट येथे तुंगभद्रा नदीच्या काठावरील या सरोवराची प्रसिद्धी काळ्या कमळाकरिता आहे. कालीदासाने सरोवरांवर अनेक काव्ये लिहिल्याचा उल्लेख आहे. मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व भंडारा जिल्हा, जेथे कालिदासाचे वास्तव्य होते त्या भागात ३६४८ लहान मोठी सरोवरे आहेत.
गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा, नागपूरचा शुक्रवार, हैदराबादचा हुसेनसागर, नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. छोटे तळे असो नाहीतर विशाल सागरासारखे वा बर्फाचे सरोवर असो, ही निसर्गाची अनमोल लेणी आहेत.
काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे. पर्यटनावरील ही लेखमाला म्हणजे माझ्या गेल्या २५ एक वर्षातील प्रवासाचा अनुभव आहे.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply