साधारणत: सुट्ट्यांचे दिवस जवळ यायला लागले की टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये गर्दी वाढू लागते. आणि अर्थातच सुनियोजित ट्रॅव्हल ऑपरेटरकडे आपला कल जातो. पण हे सुनियोजन कसं करतात किंवा त्याच्या व्यवस्थापनाचं काय गणित आहे हे सामान्य माणसाला पडलेलं कोडं आहे.
या लेखात आपण त्याची उकल करणार आहोत. ज्यांना मनसोक्त भटकायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात करिअर करणे सहज शक्य झाले आहे. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने भटकंती आता अधिकच सोपी झाली आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश प्रवास करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागलेला आपल्याला दिसतो. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत.
ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत पण हे उमेदवाराच्या योग्यतेवर अवलंबून असते. सुरवातीस पंधरा ते वीस हजारापर्यंत मिळणारे वेतन अनुभवानंतर आणखीन आकर्षक असू शकते.
काही प्रमुख उपलब्ध अभ्यासक्रम
( सध्या प्रचलित असलेले)
- Dilpoma In Travel & Tourism आणि IATA .
- बॅचलर ऑफ टुरिझम अॅडमिनीस्ट्रेशन
- बॅचलर ऑफ टुरिझम स्टडीज
- मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन इन
टुरिझम अँड हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट
एम.ए. इन टुरिझम मॅनेजमेंट
काही पदविका अभ्यासक्रम
- एअरलाईन टीकीटिंग
- एअरलाईन ग्राउंड ऑपरेशन्स
- ग्राउंड सपोर्ट अँड एअरपोर्ट मॅनेजमेंट
- गाईडिंग अँड एस्कॉर्डींग
- कार्गो मॅनेजमेंट
- एअरपोर्ट लॉजिस्टिक मॅनेजमेंट
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी. तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि स्वभाषेसोबतच काही परदेशी भाषांचे ज्ञान असल्यास खूप फायद्याचे ठरतात. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण, सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य हे गुण नक्कीच फायद्याचे ठरते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. तसेच आजच्या भाषेत सांगायचं तर Update आणि Technosavy असणंही गरजेचं.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते.
पर्यटन मंत्रालय गाईडला मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. ह्या परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे कारण तो स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्त्वाचा दुवा असतो.
टूर ऑपरेटर्स हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. तर ट्रॅव्हल एजन्सीजचे काम म्हणजे अनेक ग्राहकांना एजन्सीशी जोडणे. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात.प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम हॉटेल्स आणि टूर कंपन्या एकमेकांच्या सहाय्याने करतात.
विमान कंपन्यासाठी काम करण्यासाठी तुम्हाला पदवी प्राप्त असल्यास व इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.
पर्यटन व्यवसायाला वाहतूक सेवा मोठा हातभार लावत असते. अनेक खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्या बसेस, गाड्या यांचे आरक्षण आणि आकर्षक सवलती तसेच पॅकेज देण्याचे काम करीत असतात. प्रवासासाठी वाहनांची उपलब्धताही मागणीनुसार करून दिली जाते.
वाचक हो, पर्यटन क्षेत्रात अनेकोत्तम संधी उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती सकारात्मक शिक्षणाची. मला काही चांगलं करायचंय. माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे असं वाटत असल्यास या विषयाचा नक्की विचार करा.
या शिका आणि जग पहा.
–वृंदा दाभोळकर
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply