सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर, आजच्या मध्य अमेरिकेतील चिक्क्षुलूब येथे एक प्रचंड अशनी आदळला. या अशनीनं दिलेल्या दणक्यात पृथ्वीवरची पंचाहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट झाली. पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत. मोनिका कार्व्हॅलो यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, अशनीच्या आघातानंतर जसं पृथ्वीवरच्या प्राणिसृष्टीचं स्वरूप बदललं, तसंच वनस्पतिसृष्टीचंही स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलल्याचं दिसून आलं आहे. आज अस्तित्वात असलेली अॅमेझॉनसारखी घनदाट उष्णकटिबंधीय वर्षावनं ही या आघातानंतरच निर्माण झाली असल्याचं हे संशोधन दर्शवतं.
मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपलं हे संशोधन दक्षिण अमेरिकेतील कोलंबिआ या देशातल्या अॅमेझॉनच्या जंगलाच्या परिसरात केलं आहे. यासाठी या संशोधकांनी, कोलंबिआतील एकूण एकोणचाळीस ठिकाणांहून गोळा केलेले, पन्नास हजारांहून अधिक प्रकारचे बीजाणूंचे, परागकणांचे अवशेष आणि सहा हजारांहून अधिक पानांचे अवशेष अभ्यासले. खडकांतून वेगळे केलेले हे अवशेष सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी ते साडेपाच कोटी वर्षांपूर्वी, या दरम्यानच्या – म्हणजे अशनीच्या आघाताच्या अगोदरच्या तसंच नंतरच्या – काळातले होते. हे अवशेष नक्की कोणत्या काळातल्या वनस्पतींचे आहेत हे शोधून, त्यावरून या संशोधकांनी आघातानंतर वनस्पतींच्या विविधतेत झालेले बदल अभ्यासले. या अभ्यासावरून या संशोधकांना, अशनीच्या आघातामुळे जंगलाच्या स्वरूपात झालेल्या बदलांचं चित्र उभं करता आलं.
मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा महाविनाश घडून येण्याअगोदरही उष्णकटिबंधीय वर्षावनं अस्तित्वात असल्याचं दर्शवतं. परंतु, त्या जंगलांचं स्वरूप आजच्या उष्णकटिबंधीय वर्षावनांसारखं नव्हतं. ती जंगलं जमीन आच्छादणाऱ्या दाट वृक्षांनी व्यापलेली जंगलं नव्हती. त्या जंगलातली झाडं ही विरळ स्वरूपात विखुरली होती. तसंच ती जंगलं मोठ्या प्रमाणात सूचिपर्णी वृक्ष आणि नेच्यांनी व्यापली होती. जंगलातील सुमारे पन्नास टक्के वनस्पती या पुष्पविरहित प्रकारच्या होत्या. अशनीच्या आघातानंतरच्या काळात, वनस्पतिवर्गातील विविधता पंचेचाळीस टक्क्यांनी घटली असल्याचं या संशोधकांना दिसून आलं. आघातानंतर या जंगलातले सूचिपर्णी वृक्ष पूर्णपणे नष्ट झाले. त्यानंतर काही काळातच नव्या वनस्पती अस्तित्वात आल्या असल्या तरी, वनस्पतींची विविधता पुनः निर्माण होण्यासाठी किमान साठ लाख वर्षांचा काळ जावा लागला. विनाशपूर्व जंगलांतील वनस्पतींची जागा आता सपुष्प वनस्पतींनी आणि जमीन झाकणाऱ्या घनदाट जंगलांनी घेतली. आघाताच्या अगोदर या जंगलांत सपुष्प वनस्पतींचं प्रमाण सुमारे निम्मं होतं. नव्यानं निर्माण झालेल्या जंगलात मात्र या सपुष्प वनस्पतींचं प्रमाण नव्वद टक्क्यांवर पोचलं. पूर्वीच्या जंगलात मूळांवरील गाठींद्वारे नायट्रोजन शोषू शकणाऱ्या वनस्पती अस्तित्वात नव्हत्या. या नव्या जंगलात मात्र त्या निर्माण झाल्या होत्या. आजच्या उष्णकटिबंधीय जंगलांत अशा वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगलांना आता आजचं स्वरूप प्राप्त झालं होतं!
आघातापूर्वीच्या काळात जंगलांत घनदाट वृक्षराजी का नव्हती, याचं निश्चित कारण संशोधकांना अजून तरी उमगलेलं नाही. काही संशोधकांच्या मते, याला कारणीभूत असावेत ते तेव्हा अस्तित्वात असलेले, वनस्पती खाऊन जगणारे, लांब मानेचे प्रचंड डायनोसॉर. अशनीच्या आघातानंतरच्या महाविनाशात हे डायनोसॉर नष्ट झाले आणि त्यामुळे वृक्षवाढीला चालना मिळाली असावी. दुसरी शक्यता म्हणजे जमिनीतला पोषणद्रव्यांचा अभाव. महाविनाशाच्या अगोदर, या जंगलांतलं हवामान हे कोट्यवधी वर्षं अतिशय उष्ण आणि दमट होतं. त्याकाळी मुबलकपणे पडत असलेल्या पावसामुळे, इथल्या जमिनीतील पोषक द्रव्यं वाहून गेली असावीत. पोषणमूल्य कमी असलेल्या अशा जमिनीत सूचिपर्णी वृक्ष मात्र वाढू शकतात. त्यामुळे या जंगलात दाट वृक्ष निर्माण न होता, ही जंगलं सूचिपर्णी वृक्षांनी व्यापली होती. अशनीच्या आघातानंतर उडालेल्या धूळीमुळे व राखेमुळे पुनः या जमिनीला फॉस्फोरसयुक्त पोषणद्रव्यं मोठ्या प्रमाणात मिळाली असावी आणि कालांतरानं या सूचिपर्णी वृक्षांची जागा मुबलक पालवी असणाऱ्या दाट वृक्षांनी घेतली असावी. तिसरी शक्यता ही थेट नैसर्गिक उत्क्रांतीशी संबंधित आहे. जी झाडे महाविनाशाला तोंड देऊ शकली नाहीत, ती कायमची नष्ट झाली. यात इथल्या सूचिपर्णी वृक्षांसारख्या वनस्पती नष्ट झाल्या व पुढे नव्या उत्क्रांतीद्वारे जंगलाचा कायापालट झाला.
चिक्क्षुलूबच्या आघातामुळे झालेले प्राणिसृष्टीतले बदल पूर्वीपासून अभ्यासले जात आहेत. मात्र या आघातामुळे झालेले संपूर्ण परिसंस्थेतील बदल कळण्यासाठी, त्या अभ्यासाला वनस्पतिसृष्टीत झालेल्या बदलांची जोड अत्यावश्यक होती. आतापर्यंत या विषयावर केलं गेलेलं संशोधन हे अत्यंत मर्यादित होतं. मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनाला विस्तृत स्वरूप दिलं आहे. या तपशीलवार संशोधनातूनच, अशनीच्या आघातापूर्वीच्या व नंतरच्या परिसंस्थेचं सर्वांगीण चित्र उभं राहण्यास मदत झाली आहे. हे संशोधन जरी कोलंबिआच्या परिसरातील जंगलासंबंधी असलं तरी, चिक्क्षुलूब इथल्या अशनीच्या आघातानंतर, इतर उष्णकंटिबंधीय वर्षावनांच्या बाबतीतही हेच घडून आलं असण्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात. या संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली आहे. महाविनाशानंतरही पृथ्वीवरची जीवसृष्टी उभारी घेऊ शकते. मात्र, त्याला लागणारा वेळ हा अत्यंत दीर्घ असतो. आणि या नव्या जीवसृष्टीचं स्वरूप अगोदरच्या जीवसृष्टीपेक्षा संपूर्ण वेगळं असू शकतं!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: British Antarctic Survey – NERC
Leave a Reply