जगातील विविध देशांतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी फिरणे हा एक वेगळाच आनंद देणारा अनुभव असतो. हा आनंद निखळ असावा यासाठी आपण व्हिसा फॉर्मेलिटीपासून आपल्या टूर पॅकेज मधील सर्व सुविधा बाबतीत पुन्हा पुन्हा खात्री करून घेत असतो.
यात आपला उद्देश, आपली टूर, सर्व दृष्टीने जास्तीत जास्त परिपूर्ण आणि आनंददायी व्हावी हा असतो. परंतु हे सगळे जरी असेल तरी प्रवासात येणारी सगळ्यात मोठी अवघड परिस्थिती म्हणजे अचानक उद्भवू शकणारे आजारपण. भारतात येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची तुलना परदेशात होणाऱ्या खर्चाशी होऊच शकत नाही कारण तिकडे वैद्यकीय खर्च खूपच महाग आहेत. त्यासाठी परदेशी जाताना बाकी सर्व तयारी बरोबरच प्रवासी विमा (ट्रॅव्हल इन्शुरन्स) ही एक महत्त्वाची गरज आहे.
या पॉलिसीमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी असलेल्या सोईसोबत अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात. जसे काही कारणामुळे ट्रिप रद्द होणे, सामान हरवणे वगैरे. यासाठी आपण योग्य प्रॉडक्ट निवडून विमा घेणे आवश्यक आहे. म्हणजे ट्रिपहून परत येताना आपल्या सोबत ट्रिपची आनंददायी आठवणच असेल.
ढोबळमानाने आपण प्रवास विमा कंपन्या आपल्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध करून देतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
१. सर्वसमावेशक प्रवास विमा
(कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्स )
या पॉलिसीमध्ये जगातील विविध देशांतील पर्यटन क्षेत्रातील सर्व प्रभाग अंतर्भूत केलेले असतात त्यामुळे हा तौलनिक विचार केल्यास महाग असतो. परंतु आपण एकाच वेळी विविध खंडांत आणि विविध देशांतील पर्यटन करणार असू तर हा विमा गरजेचा ठरतो.
२. क्षेत्रविशेष प्रवास विमा
(रिजन स्पेसिफिक प्लॅन्स )
आपण ज्या खंडात आणि देशात प्रवास करणार असू त्या प्रमाणे ही पॉलिसी घेतली जाते. उदा. जर आपण आशिया खंडातील एखाद्या देशात प्रवास करणार असू तर हा विमा फक्त आशिया खंडातील वैद्यकीय व अन्य सेवांसाठी उपलब्ध असतो. यामध्ये साधारणपणे युरोप, आफ्रिका, अमेरिका, अमेरिका आणि कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संपूर्ण जग, अमेरिका सोडून सर्व जग असे पर्याय असतात. यापैकी योग्य पर्याय आपल्या सोईप्रमाणे आपण निवडू शकतो. त्यामुळे त्यासाठी येणारा खर्च देखील मर्यादित असतो.
३. शेंजेनद्वारा मान्य प्रवास विमा
(शेंजेन अॅप्रुव्हड ट्रॅव्हल इन्शुरन्स )
हा विमा युरोपात फक्त युनायटेड किंगडम सोडून बाकी सर्व देशात प्रवास करणार असू तर उपयोगी पडतो. हे महत्त्वाचे फरक सोडून वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी आता आपल्या पॉलिसींमध्ये अनेक ग्राहकांना सोईचे प्रकार आणले आहेत. साधारणपणे या विमा पॉलिसीमधून काय काय सेवा आणि सवलती मिळतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
महत्त्वाची वैद्यकीय गरज
१. हॉस्पिटलायझेशन सुविधा. इन पेशंट आणि आऊट पेशंट
२. सध्या असलेल्या आजारपणाची अचानक
जीवनमरणाची अडचण उद्भवू शकणाऱ्या
परिस्थितीमध्ये पूर्ण सोय ( प्री – एक्झिस्टिंग डिसीज कव्हरेज)
३.अपघातात जखमी झालेल्या हॉस्पिटलायझेशनसाठी विमा रकमेच्या दुप्पट तरतूद.
४. विमा पॉलिसी अंतर्गत भारतात देखील हॉस्पिटलायझेशन सुविधा.
५. पेशंट हलवण्यात येणार असलेल्या खर्चाची देखील सोय यामध्ये असते. जसे सामान्यपणे भारतात आपण अॅम्ब्युलन्सने पेशंट हलवतो. परंतु बऱ्याच वेळा परदेशात हेच विमानाने देखील करणे गरजेचे ठरते. हा खर्च देखील मिळतो.
६. सार्वजनिक वाहनातून जात असताना अपघातामध्ये मृत्यू झाल्यावर येणाऱ्या खर्चाची तरतूद या पॉलिसी मध्ये असते. कारण हा खर्च परदेशात कल्पनाही करता येणार नाही इतका जास्त असतो.
७. परदेशात दंतवैद्याची भेट ही तुमचा खिसा रिकामा करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे या पॉलिसीमध्ये त्याची देखील सोय केलेली असते.
८. हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाबरोबर अन्य होणाऱ्या खर्चाची आर्थिक तरतूद म्हणून पेशंटला दैनंदिन भत्ता मिळण्याची सोय यामध्ये असते.
९.आणीबाणीच्या प्रसंगात जवळच्या नातेवाईकांना येण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद असतेच, पण पेशंट भारतात आणताना त्याचे तिकीट वरच्या श्रेणीत बदलून देखील मिळते.
१०. अपघाती मृत्यू आल्यावर किंवा कायमचे अपंगत्व आल्यावर त्याच्या भरपाईची सोयही त्यात केलेली असते.
वैद्यकीय खर्चाशिवाय अन्य गरजांची तरतूद खालील प्रमाणे असते.
१. ट्रिपमध्ये विलंब झाला तर किंवा काही कारणामुळे ट्रिप रद्द होणे वा व्यत्यय येणे.
२. प्रवासात सामान उशिरा येणे किंवा हरवणे.
३. परदेशात पासपोर्ट हरवणे हे सगळ्यात जास्त त्रासदायक असते. यात येणाऱ्या खर्चाची तरतूद या पॉलिसीमध्ये असते.
४. आपल्या अनावधानाने काही वस्तू तुटली तर ती रक्कम काही वेळा बरीच मोठी असू शकते हे लक्षात घेऊन त्याची सोयही या पॉलिसीमध्ये केलेली असते.
५. काही वेळा कोणत्याही अपरिहार्य कारणांमुळे सोबत असलेल्या अज्ञान बालकांना भारतात पाठवण्याच्या खर्चाची आर्थिक तरतूद यात असते.
६.आपण करत असलेल्या श्रेणीत प्रवास करणे कोणत्याही अपरिहार्य कारणांमुळे अशक्य असेल तर वरच्या श्रेणीत बदलून देखील मिळेल.
आपण आता वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी मिळू शकणाऱ्या खर्चाची तरतूद समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
१. जर प्रवासात काही आजारपण आल्यावर किंवा काही जुन्या आजारपणाने पुन्हा उचल खाल्ली असेल तर संपूर्ण हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाबरोबर अन्य होणाऱ्या खर्चाची आर्थिक तरतूद या पॉलिसीमध्येच असते. त्या बरोबर समजा काही औषधे वा अन्य होणाऱ्या पुढील ३० दिवसांतील खर्चाची आर्थिक तरतूद या पॉलिसीमध्ये असते.
२. जर अचानक उद्भवू शकणाऱ्या वैद्यकीय गरजेनुसार हॉस्पिटलायझेशन सुविधा जवळपास नसेल तर दुसरीकडे नेण्यासाठी येईल त्या सर्व खर्चाची आर्थिक तरतूद विमा कंपनीकडून केली जाते.
३. परदेशात होणाऱ्या वाहन अपघातात दुर्दैवाने मृत्यू आल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यावर त्याच्या भरपाईची सोयही यात असते.
४. प्रवासात विमान अपघातात दुर्दैवाने मृत्यू आल्यास सर्व विमा रक्कम दिली जाते.
५. प्रवासात काही अपघातात दंतवैद्याची शुश्रूषा घेण्याची गरज पडल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची आर्थिक तरतूद असते.
वैद्यकीय खर्चाशिवाय मिळत असलेल्या गोष्टी
१. कोणत्याही नैसर्गिक आपत्ती अथवा मनुष्य निर्मित आपत्तीमुळे ट्रिप रद्द करण्याची वेळ आल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई केली जाते. उदा. जर चक्रीवादळ येऊन मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने आपण भेट देणार असलेल्या ठिकाणी सर्व सुविधा अनिश्चित काळासाठी बंद असतील. किंवा अचानक त्या प्रदेशात युद्ध सुरू झाले तर या तरतूदींचा फायदा होईल.
२. काही विशिष्ट तांत्रिक कारणामुळे ट्रिप १२ तासांपेक्षा जास्त काळासाठी सुरू होण्यास विलंब झाला तर त्यासाठी योग्य भरपाईची सोयही असते.
३. प्रवासात सामान उशिरा येणे अथवा हरवणे या दोन गोष्टी होऊ शकतात. या दोन्ही गोष्टी साठी प्रवास विमा संरक्षण देतो. सामान जर १२ तासांपेक्षा जास्त वेळ मिळाले नाही तर विमा कंपन्या त्या साठी कव्हर देतात.
४. आपल्या अनावधानाने पासपोर्ट हरवणे गहाळ झाल्यास, खूप मनःस्ताप तर होतोच पण खर्च ही होतो. या पैकी नवीन पासपोर्ट काढण्यात येणाऱ्या खर्चाची तरतूद आपल्या प्रवास विम्यामध्ये असते.
५.या शिवाय काही कारणामुळे अनावधानाने समजा एखाद्या वृद्ध स्त्रीच्या पायावर तुमची सुटकेस पडल्यास आणि त्यामुळे तिला वैद्यकीय व अन्य खर्च आल्यास त्यासाठी देखील सोय यात असते. तसेच आपल्याकडून अचानक अनावधानाने एखादी मौल्यवान वस्तू तुटली तर त्याची भरपाई देखील मिळेल. वरील हे सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य फायदे आपण पाहिले.
या शिवाय काही ऐच्छिक गोष्टी आपण थोडे जास्त पैसे देऊन आपण मिळवू शकतो.
१. परदेशात हॉस्पिटलायझेशन सुविधा घेताना जर आपल्या भारतातील जोडीदाराला (स्पाऊस) वारंवार फोन करण्याची गरज असेल काही अटींवर ही सुविधा उपलब्ध आहे.
२. समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहात हे कळल्यावर तुमच्या आईला तुम्हाला भेटायला यायचे असेल तर तिच्या जाण्यायेण्याचा खर्चाची आर्थिक तरतूद यात होऊ शकते.
३. प्रवासात दुर्दैवाने अपघातात मोठी इजा होऊन पाठीचा कणा किंवा अन्य कारणामुळे आपण इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्याच्या परिस्थितीत नसाल तर वरच्या श्रेणीत तिकीट बदलून देखील मिळेल.
सध्या खूप भारतीय जगप्रवासाचे स्वप्न घेऊन योजना आखताना दिसतात. तसेच प्रत्यक्ष हा आनंददायी अनुभव घेताना दिसतात. विविध प्रवास कंपन्यांनी विविध देशांतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खूप प्रकारचे पर्याय उपलब्ध केले आहेत. यामधून योग्य पर्याय निवडून आपण जेव्हा परदेशात प्रवासातला आनंद घ्याल तेव्हा जर योग्य प्रॉडक्ट निवडून प्रवास विमा पॉलिसी घेतली असेल तर कोणतीही काळजी न करता आपण हा आनंद निखळपणे घेऊ शकता.
–प्रमोद कुलकर्णी
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply