नवीन लेखन...

झाड आणि इमारत !

काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया. पोर्तुगीज चर्चची वेगळीच बांधणी अगदी नवख्या माणसाची तर सोडाच, रोज पाहाणाऱ्याची नजर सारखी आकर्षून घेते यांत शंका नाही. श्री. कोरीया हे स्थानिक परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून वास्तू निर्मितीबद्दल विख्यात होते.

इसवी सन १३८६ ते इ.स. २००७ या प्रदीर्घ कालावधीत जगभरात होऊन गेलेल्या जागतीक किर्तीच्या शिल्पकार/वास्तूरचनाकार व जगावर आजतागायत मोहीनी टाकणाऱ्या त्यांच्या कलाकृतींचा आढावा घेणारं ‘प्रतिभावंत शिल्पकार: रेनेसान्स ते विसावे शतक’ हे पुस्तक वाचत होतो. इटलीचा डोनेटीलो ते भारताचे सदानंद बाकरे इथपर्यंतच्या कलाकारांचा यात विचार केला गेला आहे. या पुस्तकात व त्यात मला चार्ल्स कोरीया यांचं ते वाक्य सापडलं आणि मला त्या वाक्याने विचार करायला प्रवृत्त केलं..कोरीयांनी लिहीलंय, “इमारत ही ज्यावर उभी असते त्या मातीत ती रूजलेली असते. त्या पर्यावरणात, तंत्रज्ञानात ज्या समाजाची ती निर्मिती करते, त्या समाजाच्या संस्कृतीत, आकांक्षामधेच ती रुजते”..!!

किती सुरेख विचार सांगीतलाय कोरीयांनी. मला कोरीयांच्या वरील वाक्याने विचार करायला प्रवृत्त केलं. विशेषत: झाडासारखं मातीत रूजून वर वाढलेल्या इमारतींबद्दल..! खरंय, इमारत असते खरी झाडासारखी. मातीत खोल जावून आपली पाळंमुळं घट्ट करत उंचं आभाळाच्या दिशेने जाते. झाडाचं मुळ मातीत रुजतं, पाण्याचा वेध घेत आणखी खोल जातं तर खोड आभाळाच्या दिशेने सुटतं..मुळं त्या झाडाला आवश्यक असणारी पोषक द्रव्य खोडामार्फत फांद्या व पुढे पाना-फुलांना आणि फळांना पुरवतं..प्रत्येक झाडाचे व त्याला लागणाऱ्या फुला-फळांचे अंगभुत नैसर्गिक गुणधर्म सारखेच असले तरी त्याच्या फुला-फळात ते झाड रुजलेल्या जमिनीचे गुणधर्म त्यांच्या दिसण्यात व चवीत फरक करतात. म्हणून तर देवगडच्या किनारपट्टीवरच्या कातळात रुजलेल्या हापूस आंब्याची चव कणकवलीच्या हापूस आंब्यापेक्षा किंतित का होईना पण वेगळी असते..दोन्ही आंबेच, दोन्ही हापूसच्च परॅतू चवीत मात्र वेगळेपण..हे वेगळेपण त्या मातीचं असतं असं मला वाटतं..

इमारतीचंही तसंच असावं हे श्री. चार्लस कोरीयांचं वाक्य वाचल्यापासून मला राहून राहून वाटतं.. मुंबईत तर आताशा आकाशावा गवसणी घालणाऱ्या अनेक इमारती ‘उगवू’ लागल्यात..ह्या इमारती म्हणजे खोड असं मानलं तर त्यात राहायला येणारी माणसं म्हणजे फुलं-फळं मानायला हरकत नसावी..ही माणसं अनेक ठिकाणाहून त्या इमारतीत राहायला आलेली असतात. येताना ती आपापली अंगभूत ‘सांस्कृती’क ‘चव’ घेऊन आलेली असतात. असं असली तरी ती इमारत ज्या मातीतून उगवलेली असते, त्या मातीचे गुणधर्मही हळुहळू त्यांच्या मुळच्या ‘चवी’त भीनू लागतात असं मानता येईल.

आमच्या मुंबईच्या मातीतही विविधता आहे. गिरगांवची उत्साही माती वेगळी तर लालबागची भिडणारी माती वेगळी. कुलाबा, पेडर रोड, वांद्र्याचा पाली हिल रोड वा कार्टर रोडसारख्या इंग्रजी नांवाने मशहूर असलेल्या स्वत:च्याच मस्तीत असणाऱ्या इलाख्यातली माती वेगळी. विलेपार्ल्याच्या मातीला सांस्कृतीक कस तर जोगेश्वरी-भाडूप पट्ट्यातील रांगडी तरीही भोळसट माती..त्या क्या ठिकाणच्या मातीचा कस त्या त्या मातीत उगवणाऱ्या इमारतीतून तीत राहाणाऱ्या माणसांपर्यंत निश्तितच पोचत असला पाहिजे..म्हणून तर नुकत्याच त्या नविन इमारतीत राहायला आलेल्या माणसांत काहीच काळात त्या त्या इलाख्याबद्दल अभिमान डोकावू लागतो..जसं काही त्याचा जन्मच त्या मातीत झाला आहे. त्याची स्वत:ची संस्कृती त्या मातीतल्या संस्कृतीशी मिसळून एक नविनच आणि जास्त समृद्ध अशी ‘कलमी संस्कृती’ची ‘चव’ तयार होते..आणि मग त्या त्या ठिकाणची संस्कृती त्या त्या मातीची म्हणून ओळखली जावू लागते..झाडाच्या फळांप्रमाणेच इमारतीतील माणसंरुपी फळं साधारणत: सारखीच असली तरी त्या माणसांच्या जगण्यात ती इमारत उभी असलेल्या त्या त्या मातीची चव मिसळते असं म्हणता येईल..

मुंबईसारख्या शहराबद्दल लिहीलंय ते केवळ मी जन्मापासून इथला आहे म्हणून. आपण जर नीट विचार केला तर आपल्याकडेही असंच दिसून येईल..जमाना बदलला, माणसं बदलली तरी इथल्या मातीचा मुळ गुणधर्म तोच राहातो मात्र त्या मातीचा कस ज्या फळात मिसळतो त्यामुळे मुळ चवी पेक्षा चवीला निराळंच असणार परंतू त्याच गुणधर्माचं नविनच फळ तयार होतं. मग त्या मातीत पुर्वापार रूजलेली फळं म्हणतात, “आता ती चव राहीली नाही, आमच्या वेळची ‘चवं’च वेगळी होती..!”

– नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
(हे सहज मनात आलेले विचार आहेत.)

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..