श्री गणपती बाप्पांनी यंदा 12 दिवस मुक्काम करुन सर्व सामान्यांच्या उत्साहात बळ आणलं. बाप्पांचं विलोभनीय रुप पाहुन कोणताही सर्वसामान्य क्षणभर का होईना आपलं आतलं दु:ख विसरला अन् या चैतन्यदायी रुपात मग्न झाला. बाप्पांच्या विलोभनीय, चमकदार, अन् सुंदर अशा मूर्तिंचा हा चमत्कारच म्हणायला हवा. बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापावेतो जागोजागी हा उत्साह दिसून येतो नाही म्हणायला ग्लोबल वार्मिंग, वाढती महागाई, दहशतवादाची भिती, अन् कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून जपायचा आनंद, या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार करुन उत्सव प्रिय माणूस या 10-12 दिवसात वेगळ्या आनंददायी मंगलमय वातावरणाने भारावून गेलेला असतो. याला केवळ एकमेव कारण असतं ते श्री गणेशाच मोहक, लोभस् असं सुंदर रुपकं हेच !
आता हे झाले केवळ या 12 दिवसातल्या लाखो लोकांच्या उत्साहाला आलेल्या उधाणाबद्दल! पण हा उत्सव सुरु होण्यापूर्वी या अतिशय सुंदर, मोहक अशा श्रीगणेशाचा रुपात जान, प्राण, ओतणार्या मूर्तिकारांचा उत्साहाबद्दल गेले अनेक वर्षापासून लिहावं वाटत होतं, दरवर्षी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बघायला जायचो अथवा मित्र नातेवाईक, सहकयार्यांच्या घरातले श्री गणपती बाप्पा बघायचे तेव्हा श्री गणपती बाप्पांच्या या सुंदर मूर्त्या बनविणार्या शिल्पकाराचं कौतूक वाटायचं पण दरवर्षी ते तेवढ्या 10-12 दिवसापूरतच असायचं अलिकडच्या काळात तर या मूर्तिकारांनी आपल्या कलेत एवढा जीव ओतलाय की गणपती बाप्पांच्या सभोवतालच्या आरास, डेकोरेशन, अन् अन्य देखाव्यांपेक्षा मूर्तिला स्वयंप्रकाश त्यातलं तेज हे कितीतरी उजळ वाटू लागलं पोर्णिमेच्या रात्री जेव्हा रस्त्यांवरुन लगतचा स्ट्रिट लाईटच्या प्रकाशाची अगदी ‘गोची’ होवून जाते तसच या देखाव्यांच, झाल्याचं जाणवलं. त्यामुळे या मूर्तिकारांच कौतूक केल्याशिवाय राहवत नाही. त्यांचा हा जॉब आजकालच्या कौतुकाच्या भाषेत सांगायचा म्हणजे ट्रिमेंडस्, मार्व्हलस्, फंटास्टिक वगैरे असाच झालेला आहे.
या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !
— अतुल तांदळीकर
Leave a Reply