‘क’ च्या कथानकातली ‘तुलसीभाभी’ तुम्हाला आठवते का? आतासारखी चॅनेल्सची गर्दी तेव्हा नव्हती. त्यामुळे ‘तुलसीभाभीने’ घराघरात घर केलं होतं. त्यातला हँडसम हिरो ‘मिहीर’अॅक्सिडेंटमध्ये गेला हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. सगळीकडे एकच चर्चा. अगदी लोकलच्या लेडीज डब्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. आता सिरीअल न पाहण्याचा निर्णय कित्येकांनी घेतला आणि त्याला पुन्हा अवतरावे लागले. कसा काय ते तुम्हाला आठवत असेलच. आणि हे फक्त सिनेमा आणि सिरीअल मध्ये शक्य आहे हे मी सांगण्याची गरज नाही. नुकतीच पूर्णविराम घेतलेली मालिका, ‘एका सुनेच्या पाच सासूबाई की सासूबाया? आणि त्यांच्यावर एक आई आज्जी फ्री! वाढता वाढता वाढे… जसे हनुमानाचे शेपूट. सोशल मिडियावर चेष्टेचा विषय ठरली आणि ज्या प्रेक्षकांनी स्वागत केले होते त्यांनीच ‘आता पुरे करा’चा नारा दिला. तरीही काहीही हं श्री हा लाडिकपणा टीआरपी वाढवित राहिला. सध्या सुरू असलेला खंडोबाचा गोंधळ बिचाऱ्या प्रेक्षकांचा किती गोंधळ उडवतोय, पहाताय ना? देवांचा देव अशा श्रध्दास्थानी असलेल्या महादेवाचं पर्सनल लाईफ भोळ्या भाबड्या प्रेक्षकांना विचारात पाडतेय. धर्मसंकटात सापडलेल्या देवांची अवस्था सर्वसामान्यांसारखीच होतेय. हा, या सगळ्यामुळे फक्त दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे लोकांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि दुसरा मालिकेचा टीआरपी! तसेच जेजुरीला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी श्रध्देपेक्षा मालिकाच धावून आली हेही एक सत्य आहे.
सम्राट अशोकाचा जीवनपट उलगडून दाखवणारी मालिका पाहताय ना, कौटुंबिक यादवीमध्ये गुरफटून कशी टीआरपी वाढवतेय ती! सध्या ती दूर्वा, ती जान्हवी, ती आदिती, ती स्वानंदी, ती म्हाळसा आणि ती बानू या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आमचे प्रेक्षक जगतात. त्यांच्या फॅशन्स मॉलमधून घरी येतात, तर त्यातले हेवेदावे, कटकारस्थाने जेवणासोबत चघळली जातात. खरंच अपार प्रेम करतात प्रेक्षक या मालिकांवर! सगळ्या धकाधकीतून वेळ काढून टीव्ही समोर बसतात. काही कारणाने शक्य झाले नाही तर ‘उद्या सकाळी बघू’ असे म्हणत मनाला समजावतात. घरी असलेली मंडळी तर दुपारी सुध्दा कालचा भाग रिपीट टेलिकास्ट म्हणून आनंद घेतात. काहीजण तर भराभर कामे आटोपून टिव्ही समोर ठाण मांडतात ते सगळ्या मालिका संपेपर्यंत जागा सोडत नाहीत. मग स्वत:च्या झोपेचे बारा वाजले तरी पर्वा नसते. काल काय झाले याच्या लोकलच्या लेडीज डब्यात रंगीत चर्चा तर ऑफिसच्या लंच टाईमला चविष्ट चर्चा चालतात. म्हणजेच गप्पांचा प्राईम सब्जेक्ट म्हणजे डेलीसोप!
असो, परंतु या अशा भाबड्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या या मालिकांचा तटस्थपणे विचार केला तर ‘हसावं की रडावं’ हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. अगदी प्राईम टाईममध्ये घराघरात पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या मालिका पहाता, मुबलक जाहिराती, मागील भागात, पुढील भागात असे म्हणत कूर्मगतीने चाललेले कथानक केवळ पंधरा ते वीस मिनिटांचा अर्धा तास करीत असते. आता संपेल असे वाटत असतानाच ‘कहानी में ट्विस्ट’ म्हणत उपकथानकाचा जन्म होतो. तुम्हा-आम्हा सर्वांना कळून चुकते, ‘आमटीत पाणी घालून वाढविली आहे आणि पांचट लागू नये म्हणून वरून तिखट मीठ!’ पण आश्चर्य हे की मूळची चव संपली हे कळूनसुध्दा सवयीचे गुलाम झालेले आम्ही प्रेक्षक तसेच चिकटून राहतो.
कधी कॉमेडीची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या म्हणते तसेच फू बाई फू म्हणत हास्यसम्राट हसवणूक करतात की फसवणूक कोण जाणे? ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आणि कलाकृतींची चेष्टा आणि पाणउतारा म्हणजे विनोद, असे समीकरण तयार होतेय की काय अशी भीती वाटते. दर्जेदार विनोद लोकांना समजत नाहीत असा गोड गैरसमज तर नाही ना यांचा? खरंच राहून वाटतं आज पु.ल. किंवा अत्रे असते तर यांचे कान धरून म्हणाले असते, अरे काय हे? कुठे नेऊन ठेवलाय विनोद आमचा!’
डिटेक्टिव मालिकांचं तर विचारूच नका. वर्षानुवर्षे एकाच डायलॉगवर चालतात, ‘कुछ तो गडबड है, दया दरवाजा तोड दे.’ आँखे उघडून अस्मिता गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करते खरी, परंतु प्रेक्षकांची आँखे उघडतात की गुन्हेगारीची नवनविन तंत्र गरजूंना मिळतात हा खरा प्रश्न आहे.
भूतप्रेत, बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक हे खेळसुद्धा रात्री किंवा दिवसा चालत असतात. अंधश्रध्दा निर्मूलन कि अंधश्रध्दा प्रसारण? सिगारेट पॅकवरच्या लेबलप्रमाणे ‘धुम्रपान हानिकारक आहे’ एवढे म्हणून विक्री सुरू. ‘देशी दारूचे दुकान, परवाना क्रमांक …… ‘ म्हणत राजरोस विक्री सुरू. यासारखेच नाही का ते?
पूर्वी फक्त दूरदर्शनच्या काळातल्या ‘हमलोग, सर्कस, मालगुडी डेज, तेनाली रामा’ अशा अनेक मालिका आजही आठवतात. त्यांनी समाजाला सुसंस्कार दिले आणि अनेक चांगले कलाकारही चित्रपट दृष्टीला दिले. आतासुद्धा काही मालिका चांगले विषय मांडतात, मनोरंजन बरोबरच समाज शिक्षणही देतात. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे हे दुर्दैव! बाकी बहुसंख्य मालिका केवळ आणि केवळ टिआरपीकडे लक्ष ठेवून मागणी तसा पुरवठा करताना दिसतात.
कधी कधी मनात विचार येतो, आपण प्रेक्षक आपला महत्त्वाचा वेळ आणि पैसा खर्च करून अलगद त्या गुंत्यात गुंतत जातो. त्यांचा टिआरपी वाढतो आणि आमचा केवळ टाईमपास होतो. बुद्धीला टाळे लावून डोळे आणि कानांचे मनोरंजन हाच मनोरंजनाचा अर्थ लावला जातो का ? पाहताना विचारही करायला हवाच ना? म्हणूनच म्हणावेसे वाटते, माणसाचा तिसरा डोळाही उघडा असायलाच हवा. आणि टीआरपी च्या हवेत तरंगणाऱ्या ‘कांहीही….’ ला ‘काही ही चालणार नाही’ हे सांगायला हवे.
(“ठाणे वैभव” च्या सौजन्याने)
— नूतन बांदेकर
Leave a Reply