कधी मनाच्या फुलती पाकळ्या
काट्यांचाही डंख जिव्हारी
अदृष्टाच्या पानावरती
कशी लिहावी मौनडायरी
धूळमाखल्या आयुष्याला
प्रश्न विचारू नये फुकाचे
काजळकाळ्या रात्री तरीही
उघड्या डोळी स्वप्न सुखाचे
रुणझुणत्या इच्छांची माया
खुणावितो शुक्राचा तारा
जागवितो विश्वास आतला
पहाटचा प्राजक्ती वारा
पैलपार त्या अंधाराच्या
जाईन उडुनी पंख पालवित
आभाळाच्या माथी लाविन
या मातीचा टिळा सुगंधित
पाचोळ्यातून फुलवित राहिन
हिरवा अंकुर नव्या दमाचा
अभीष्टचिंतन करा दिशांनी
क्षण जपतो त्या अंतःस्थाचा
– वृंदा भांबुरे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply