तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा,
अविरत निष्काम सेवेला,
दिनरात अंगिकारणारा,
तू वाटतोस पावसासारखा,
चिंब भिजवून टाकणारा,
परिसरच काय, ओलेता,
तनमनही धुवून काढणारा,
तू असशी वाऱ्यासारखा,
करारी, स्वयंभू विचरणारा,
माहित नाही दिशा रस्ता,
सरळ जाऊन थडकणारा,
तू विस्तीर्ण समुद्रासारखा,
अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा,
तू झऱ्यागत नाचणारा ,
निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना,
आनंद तुषार उडवणारा,
प्रतीत होशी नदीसारखा,
गावांनाच कुशीत घेणारा,
दूर सारत अस्वच्छता,
देखभाल शेतांची करणारा,
तू आधारच हतबलां,
धीरगंभीर खंबीर उभा,
सोडवत साऱ्या समस्या,
मदतीचा वसा जपणारा,
तू अगदी पर्वतासारखा,
अचल निश्चल राहणारा,
स्मरून नीर – क्षीर विवेका, जगण्याला तोंड देणारा,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply