तू कळ्या दिल्या की फुलं
पानगळ मात्र झाली
विरल्या मनात तुझी
चाहूल बंदिस्त झाली
तू शब्द दिले की अर्थ
घालमेल वाक्यांची झाली
हळव्या आठवणीत तुझी
ओळख खोलवर रुतली
तू तोडलस की फटकारलस
जीवाची घालमेल उरली
अलगद हृदयात तुझी
सय हलकेच मोहरली
तुझा स्पर्श तुझी मिठी
आभास अंतरी विरली
मोहक चांदण्यात तुझी
ओळख अनामिक झाली
तू होतास की नव्हतास
मण्यांची माळ आल्हाद तुटली
विणलेल्या हारात तुझी
ओढ अवचित तुटून गेली
तू असाही तू तसाही
भावनांची गाठ विणली
ऋणानुबंध मागचे उरले
तुझी वाट वेगळी झाली
तू बहरला तू मोहरला
पापणींची कढ ओल भिजली
फुलांच्या गंधित बागेत मग
तुझी रेशीमगाठ अलवार सुटली
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply