सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता. माहेराहून तिच्या भावाने मागच्या भेटीच्या येळंला तीळं देलेले व्हते,तेच लावून ठुले होते नाही तर हितं काय? तेलाला कधी मीठ हाये तर कधी मिठाला तेल न्हायी,अशी गत व्हती.
बरं घरात काही न्हायी असं सांगायचीबी मगदूर नव्हती कारण सखूच्या बापानं पाटलाचं घर म्हणून तिला हितं देलेलं होतं.धा एकराचा धनी तिचा नवरा मातंर सखूला काडीचंबी सुख नव्हतं पण सांगंल कोणाला..? बाप घरी आला तर खुशाल हाय,सुखात हाय, असाच निरोप मायीला सांगा म्हणूनशिनी खोटंच हासून सांगायची..एवढ्या खस्ता खाऊन बापानं व्याजी-दिडी करून हुंडा देऊन पाटलाचं घर बघून थाटात लगन लावून देल्तं मातंर कशात काय अन फाटक्यात पाय..तिला पाटलाच्या घरची म्हणून शेतात काम करायला जमायचं न्हायी.. अन् घरी तर ब-याच येळंला उतरंडी हुडकून दानाय निघायचा नाही…काय करील बिचारी..? खाणारे चार तोंडं हुते…बरं कुणाच्या पुढं हात पसरावं तेबी पाटलाच्या इज्जतीला बट्टा लागंल म्हणून जमायचं न्हायी.
घरात घोषा पाटलाच्या बायकोनं शेताच्या कामावर कसं जावं ? घरच्या शेतात कामाला भायेरचेच माणसं.पाटलाच्या माणसायनं शेतात काम केलं तर पाटील कोण म्हणंल ?म्हणून सगळ्या कामाला माणसं,जरी परवडंत नसंल तरीबी. सदा बी आपण पाटील हायेत, लोकं काय म्हणतेन, हे भ्याव -हायचं…नव-याचा पाटीलकीचा नुस्ताच थाट होता..…घरात न्हायी दाना अन् म्हणं नुस्तंच मला पाटील म्हणा ही आवस्था..बखंळ धा एकंर वावर पण काय अर्धा माल तर गड्यायचे साल अन् बायाचा रोजगार ह्याच्यातंच जायचा…अर्धा माल खात अन् बी- बियाणात.. वरुन गावचं इलक्शन अन् राजकारण ह्यांच्यात तर समदा बुकना पडायचा..कामानं तर कामानंबी…अन् वरुन खाणे पेणे अन् पार्ट्या.मंग काय बुजाबुजी करण्यातच बेजार. मंग सांगा शेताकडं कोण बघंल..? सगळं काम भाहेरचे माणसं करणार..नवरा बायको फकस्त माणसायं म्हागं पाटीलकी करणार..हे शेतीचं असंल..गणित काही सखूला पटंत नव्हतं..ल्हानपणापासून सखू खरंतर शेतीच्या कामाला हारसंड होती? जवारी पाडणे असो की पेरणी, खुरपणी माहेरी बापाच्या बराबरीनं काम करू लागायची..अंगाला हाळद लागुपस्तोर सखू कामात व्हती..म्हणूनंच बापानं लेकराला आराम रहावा म्हणून पाटलाचं घर बघून ऐपत नसतांना हुंडा देऊन लगन लाऊन देलं होतं..हितं आलं तर सुरूला सखू काम करायला गेली की सासरा,नवरा सगळेच नावं ठेवू लागले. उरले सुरले भावकीचे माणसं नावं ठुवायला होतेचं मंग काय बसा घरातंच…लावा माणसं कामाला.भाहेरचे माणसं काम तरी कुठं बराबर करत्यात.?फकस्त पाट्या टाकून पैसा खरा करत्यात..दर हफ्त्याला बायाचा रोजगार अन् शेताला लागणा-या खर्च्याची बुजाबुज बी व्हाची न्हायी. म्हागलं निस्तारायला मंग धनी कर्ज काढत राहायचा अन् वर्सा झालेला माल सावकाराच्या भद्यावरं घातला तरी बी ऊजूक डोक्यावरं मुद्दल तसंच ! बरं नवरा कारभारी..कायबी म्हणायला जमंत नव्हतं. तिला गणित कळंत असंलं तरी इचारायची टाप न्हायी..मंग काय सालोसाल बुडा कर्जात…कुठली हौस न्हायी की मौज न्हायी…सखूच्या बापानं लग्नात देलेले जे काही सणगं व्हते,ते सरेs सावकाराकडे ठुले व्हते कर्ज फिटंलं तर वापीस येणार, न्हायी तर सणगंय तिकडंच अन् सावकराचं कर्जय डोस्क्यावरं तसंच..सावकार घरी आला की त्येची मनधरणी करा..एवढंच घ्या, एवढीबार.. पुडच्या बारी देतावं…गारपीटीनं पिकं गेलीत..यंदा मालंच आला न्हायी..मोरल्या साली माल न्हायी झाला तरीबी दोन एकर इक्री काढतो अन् तुमची भरती करून देतावं असं नवरा म्हणायचा…सखू मधल्या खोलीत च्या करंत करंत सरंs,ऐकायची…सावकाराच्या नावानं बोटं मोडायची पण काई इलाज नव्हता. सावकारबी काही बाई बोलून जायचा. गपं गुमान ऐकून घेत नवरा दोन दोन दिसं त्याच इचारात –हायचा.ना जेवाय खायाचं भान ना कशाचं…सारखं एकंच इचार, मोरल्या साली दोन एकंर इकल्या बिगर जमणार न्हायी..आजवर झालं…तेवढं संभाळलं…आता मातंर सावकरानं लयीच तगादा लावलाया…असं म्हणू म्हणू झुरत-हायचा…डोळ्याला डोळा लावायचा न्हायी..मागच्या दिवाळीच्या ऐन सणाच्या दिशी दुकानदारानं..केवढा गोंधळ घातला हुता..हजार रूपयाच्या उधारीसाठी दिवाळीचा अख्खां सण गोड लागू देला न्हायी मेल्यानं..जवा त्येच्या भद्यावर ववाळणीचे आलेले पैसे घातले तवाच हालला कडू..त्या परसंगातून तर सखू म्हणली हुती उपास धरू पर आता उधार आणू नगा..बरं..ते तिच्या धन्याला पटलं हुतं…नावं ठुवायला येणा-या एकातरी भावकीच्या माणसानं केली का हजार रूपायाची तरी मदत..? तवा उलटं तुम्हालाच चार शब्द सुनवले आपण उगीच लोक काय म्हणतेनं म्हणून करंत बसताव..चार दिस म्हणू द्या काय बी लोकास्नी आता..
कधी टिई-रेडीओवर बातम्या ऐकायला यायच्या आमुक गावात शेतक-याची कर्जापायी कटाळून आत्महत्या..तमूक गावात शेतक-याने गळफास घेतला…असं काही बाई ऐकून तर सखूलाबी रात्रं रात्रं झोप लागायची न्हायी..अन् घरात काही सामान सरलेलंबी तिला नव-याला सांगू वाटायचं न्हायी…लेकरं जेवले की दोघंयबी मला भूकंच न्हायी म्हणून तसेच झोपी जायचे…याज भरता भरता नाके नऊ यायलेत माय..?असं आपल्याच मनाला सांगून सखू मातंर रोज वनवास सहन करत दिवस रेटायची.चांगलं बारावी पर्यंत शिक्षाण झालं हुतं..हुशार असलेली सखू…हिशेब अन् व्यवहार सुध्दा तिला चांगले जमते व्हते..पण ह्या घरात मात्र संधी नव्हती..
तिच्या मागुन येऊन मधवी भहिण कालिंदा इळेगावात देलेली दिड एकराच्या धन्याला देऊन लगन लावून देलं तवा आपणंच बापाला बोलला व्हताव, एवढ्या लेकी जड झाल्या काय वं बाबा?तुम्हाला दिड एकरावाल्याच्या गळयात घालालावं..तवा टंचकन् बापानं डोळ्यात पाणी आणून सांगतिलं हुतं बाई,कोणत्या बापाला लेकी जड व्हत्यात व्हयं ?..खाईल कष्ट करुन अन् तुयावणी तीला लेव्हणं बी न्हायी…आता बगाया गेलं तर त्या भहिणंचंच किती चांगलं झालंय..दोघं नवरा बायकोनं कष्ट करून वर्सा एकरा दोन एकरानं वावरं घेऊन आता चांगलं धा एकंर वावरबी झालंय अन् दुधाचा ध्ंदा करून गेल्यावर्षीच रोडाच्या वावरात टोलंजंग घर बांधलं अन् उजूक लागलं सागलं तर बापाला बी लान्ह्या बहिणीच्या लगनात पाच पन्नास हजाराची मदत केल्ती..अन् सखूला वाईट वाटायचं आपला नवरा तर धा एकराचा धनी मातंर..सदाय तंगीच….घरचीच बुजाबुज हुईना अन् दुस-यासनी कुठं मदत करणार ? सदाबी एकादशीच्या घरी शिवरातंर.. तिच्या मागून येऊन ल्हान्ही बहिण बी पाच भाऊ अन् धा एकर वावर अशा खटराकात देल्ती तिला बी काही कमी न्हायी…आपलं नशीबंच फुटकं अन् दुसरं काय?….बरं कोणाला सांगावं ? तोंड दाबून बुक्क्यायचा मारं..सखूला सगळं कळंत हुतं कष्टं केल्याबिगर काहीचं हुणार न्हायी.शेतात काम करायची काय लाज?असं झालं तर जलमभर बी आपल्याला वावरं सुटणार न्हायी..एक दिवंस नवराबी असंचं इचार करून करून त्या बळीरामावाणी लटकून जाईल..मग काय लेकरं बाळं उघडयावरं..आपणंच काय तरी कराय पाहिजे…इतक्यात धनी जवळ इऊन हुभं –हायल्याची चाहूल लागली…सखूच्या इचाराची तंद्री भंगली.”आवं च्या करते मी..”असं म्हणून सखू घरात गेली..”
तिच्या मनात सारखं चाललं हुतं सगळ्या मोठेपणाच्या झुली अंगावरून काढून टाकून स्वत: दिवसरात्र कष्ट कराव…सगळं चांगलं हुईल..च्या प्येतांनी तिनं इषय काढला..आवं तूर कापायला आलीया आपली..मी म्हणते ह्या गड्याव्हायचे हिशेब करावं अन् यंदा आपण दोघंबी तूर कापायला जावावं म्हणते मी..कामाची काय लाज हाय वं मी म्हणते…लोकं दोन्हीकूनबी बोलत्यात..उद्या वावरं इकून पाटील भिकंला लागला असं बी लोकं म्हणतेल..त्यापरीस आत्ताच डोळं उघडलेले बरे…
तिचा धनी खाली मान घालून च्या प्येत बोलला ”..हे बघ सखू, मला तर आता काय करावं कळंत न्हायी…मी कारभार कसा करु ते बी कळंना..कायबी करा हाताला यसंच न्हायी..सरं उलटंच..आता मी काय म्हणतो..मी थकलो सगळे हिशेबं लावून..लावून..आता तू म्हणतीस तसंच करायचं –हायलंय….बघू ते बी करून यंदा..उद्याच दोन्ही गड्यायचे हिशेबं करून टाकूतो..पाडव्यापस्तूरचे दाम त्यैला पोहचलेले हायतं..आता पुढी सगळं वावर आपल्या हिमंतीवर करायचं…मला बी तू म्हणतीस ते समजालंय जरा…जरा..कोणी काय बी म्हणो आपण दोघंयबी सकाळी भेगीनंच शेताला जायाचं..स्वत:च सारं काम करायचं..गड्याला द्यायाचे दोन लाख वाचतेल त्येच सावकाराचं याज तरी फिटंल… दोन दिवसं आपल्या इळेगावच्या सोय-याकडं हुतो तवा म्या समदं बघितलं…तवापासून मला बी तसंच वाटतंया.बैलासंगं एक म्हसरूडं संभाळूत..आर्धालिनं का हुईना?..चुलीत गेलं ते..गावंचं राजकारण अन् ती पाटीलकी..लई वैताग आला बघं…धन्याचे हे शब्द ऐकून सखूला आज तर सूर्य पश्चिमेकडून निघाल्यासारखं वाटंत हुतं..
— संतोष सेलूकर परभणी
7709515110
#तिचीकथा
#ग्रामीणकथाकविता
#महिलादिनविशेष
#कथा क्रमांक
Leave a Reply