हिंदी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री अशा झाल्या की, त्यांनी एकाच चित्रपटामुळे रसिकांच्या मनात त्यांनी कायमस्वरूपी घर केले..
शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं..
११ एप्रिल १९४० रोजी कलकत्यामध्ये कमर सुलतानाचा जन्म झाला. नंतर कुटुंबासोबत ती मुंबईत आली. वयाच्या तेराव्या वर्षापासून तिने बालकलाकार म्हणून काम केले. आधी जयजयवंती नावाने काम करणाऱ्या कमर सुलतानाला ‘चैतन्य महाप्रभु’ चित्रपटापासून ‘अमिता’ हे नाव मिळाले.. ती मधुबालाची जबरदस्त फॅन होती.. ‘शिरी फरहाद’ चित्रपटात तिने मधुबालासोबत काम केले. त्यानंतर तिचे ‘अभिमान’, ‘जमाना’, ‘हम सब चोर है’, ‘देख कबीरा रोया’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.. मात्र तिला नाव मिळालं ते ‘तुमसा..’ नच!!
‘चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती.. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.. फक्त राजेंद्र कुमार!!
त्यानंतर १९६३ सालात प्रदर्शित झालेल्या ‘मेरे मेहबूब’ चित्रपटात अमिताने, साधनाची सहनायिका म्हणून काम केलं. चित्रपट यशस्वी झाला. फिल्मफेअर पुरस्कारासाठी सहायक अभिनेत्री म्हणून तिचं नामांकन झालंही, मात्र पुरस्कार दिला गेला, ‘गुमराह’ मधील शशिकलाला! मग अमिताने बी ग्रेडच्या चित्रपटात काम करणं सुरु केलं.. ‘हम सब उस्ताद है’, ‘रिश्ते नाते’, ‘आसरा’ इ. चित्रपटांनंतर तिला ‘हसीना मान जायेगी’ मध्ये जाॅनी वाॅकरच्या प्रेयसीची भूमिका मिळाली.. दहा वर्षांच्या कालावधीत नायिकेचं काम करणारी, सहायक भूमिका करु लागली.. अमिताला असं काम नकोसं वाटू लागल्याने, तिने चित्रपटात काम करणं थांबवलं..
लग्न केल्यानंतर अमिताला मुलगी झाली, तिचं नाव साबिया.. तिनं ‘अनोखा रिश्ता’ चित्रपटापासून आपलं नशीब अजमावलं.. दुसरा चित्रपट ‘खिलाडी’.. १९९२ मध्ये ‘कयामत की रात’ हा चित्रपट करुन तीदेखील चित्रपटसृष्टीपासून दूर झाली..
आज अमिताचं वय झालंय, ८२ वर्षे! १७ वर्षांची असताना आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणारी ‘तुमसा नहीं देखा’ ची नायिका, आता ओळखू येणार नाही इतकी बदलून गेली आहे.. चित्रपटात काम करणं आणि आपलं अस्तित्व टिकवणं हे सर्वांनाच जमतंच असं नाही.. आज तिच्याच बरोबरची आशा पारेख, वहिदा रहमान सोशल मीडियावर व्यस्त आहे.. अर्थात त्यासाठी, नशीबही लागतं..
अजूनही मला कधी वेळ मिळाला तर मी युट्युबवर ‘तुमसा नहीं देखा’ लावतो आणि ‘रोमन हाॅलीडे’ मधील अॅन्ड्री हेपबर्न सारख्या दिसणाऱ्या अमिताला पहात राहतो…
त्यातील ‘यु तो हमने लाख हसीं देखे है, तुमसा नहीं देखा..’ असं शम्मीने म्हटल्यावर अमिता त्याच्या डोक्यावर दोन बोटांची खारीक मारते, हे पाहून माझा हात नकळत माझ्या डोक्यावर जातो…
अमिताला, ८२व्या वाढदिवसानिमित्त शतायुषी होण्यासाठी, हार्दिक शुभेच्छा!!
© – सुरेश नावडकर ११-४-२२
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply