अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये अनंत कदम यांनी लिहिलेला हा लेख
संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी साहित्यातील एक महान तेजस्वी हिरा, दुःखितांना त्यांच्या अंधकारमय जीवनात वाट दाखवणारा तेजोमय ताराच! तुकारामांचं हृदय आकाशाएवढं. त्यांचं मन पर्वताएवढं उत्तुंग! गरिबांविषयी अफाट कळवळा! अपार उमाळा. गांजलेल्या- रंजलेल्यां विषयी अफाट कळवळा. असा हा थोर कवी मराठी साहित्याला लाभला. हे मराठी साहित्याचे मोठे भाग्यच! मराठी भाषेचे देखील. आणि महाराष्ट्राचे आणि भारताचेही.
तुकारामांसारखा अफाट काव्य-प्रतिभा असलेला, दुःखितांविषयी, रंजल्या-गांजलेल्यांविषयी सागरा एवढा कळवळा असणारा कवी मराठी साहित्यातच काय पण अखिल जागतिक साहित्यात, जगांतील भाषांमध्ये सापडेल असं वाटत नाही.
असा कवी प्रत्येक भाषेत एक तरी जन्मावा, असं वाटतं.
– त्यामुळे माणसाची ‘मानव’ म्हणून काहीतरी प्रगती होईल, असा विश्वास वाटतो.
तुकाराम महाराज हे एक वेगळ्या तऱ्हेची ईश्वर-भक्ती करणारे, महान भावभावना असणारे प्रखर विचारवंत, मानवतावादी, निष्ठावंत, वारकरी पंथातले संत कबीर (संत साहित्यिक). जुन्या मराठी साहित्य परंपरेत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास इत्यादी संतकवी (संत साहित्यिक) होऊन गेले. पण तुकाराम त्या सर्वांपेक्षा पिंडाने, वृत्तीने, विचारांनी अगदी निराळे आहेत. त्यांची अभिव्यक्ती, ईश्वराविषयीची कल्पना, मानवाविषयीचे विचार, इत्यादी गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. मानवतेविषयी त्यांच्यात जो एक अफाट धो धो वहाणारा उमाळा, कळवळा आहे तो कोणातही नाही.
“पापाची वासना नको दावू डोळा ।
त्याहुनि आंधळा बराच ।।
निंदेचे श्रवण नको माझे कानी ।
बधिर करोनि ठेवा देवा ।।
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
त्याहुनि मुका बरा बराच मी ।।
नको मज कधी परस्त्री संगति ।
जनांतु माती उठता भली ।।”
भीत नाही आता आपुल्या मरणा ।
दुःखी होता जना न देखवे ।।
पराविया नारी रखुमाई समान ।
हे गेले नेमून ठायींचेचि ।।
जाई वो तू माते न करी सायास ।
आम्ही विष्णुदास नव्हे तैसे ।।
न साहावे मज तुझे हे पतन ।
नको हे वचन दुष्ट वदो ।।
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार ।
तरी काय नर थोडे जाले ।।
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदू ऐसे ।।
मेली जित असो निजोनिया जागे ।
जो जो जे जे मागे ते ते देऊ ।।
भले तरी देऊ गांडीची लंगोटी ।
नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
माय बापाहूनि बहु मायावंत ।
करू घातपात शत्रूहूनि ॥
अमृत ते काय गोड आम्हांपुढे ।
विष ते बापुडे कडू किती ।।
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड
त्याचे पुरे कोड त्याचेपरि ।।
अशा तऱ्हेचे काव्य (लेखन) जगातील कुठल्या भाषेत सापडेल का? असो.
तुकारामांचे अभंग म्हणजे दर्जेदार चांगल्या कविताच आहेत. त्या त्यांच्या स्व-तंत्र कविता आहेत. त्या ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ।।’ या जातीच्या आहेत.
महान विचार-वैभव, भाव-भावनांची श्रीमंती, उच्च नैतिकता, वास्तवाचे भान, व्यवहारात शुद्धता राखण्याचे मार्गदर्शन, कल्पनाविलासाचे भय नाही, थेट खऱ्या वास्तवाचे दर्शन, भावशुद्धीचे मनस्वी आवाहन, मानवी जीवन जगण्याचे उत्तेजन, अशा गोष्टींनी तुकारामांचे अभंग खचून भरलेले आहेत. त्यांची सारी काव्यनिर्मिती मानवतेला फारच उपकारक झालेली आहे. तुकाराम माणसाला जीवनातला एक आधार वाटतात. (आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणे तुकारामांची गाथा उशाला घेऊन झोपत असत!)
तुकारामांनी ४६०० च्या वर अभंग लिहिले आहेत. त्यांच्या अभंगांची घडण (रचना) अगदी वेगळीच, त्यांचीच स्वतःची अशी आहे. कुणाचं अनुकरण नाही. ‘कैवल्या’ची जाण द्यावी, आत्म्याचा लोकांना साक्षात्कार घडवावा, हा उद्देश ज्ञानेश्वरांच्या साहित्यनिर्मितीचा होता. ज्ञानेश्वरांच्या कल्पनाशक्तीने, व्यक्तीमत्त्वाने, प्रतिभेने श्रोता मंत्रमुग्ध होतो. त्या दृष्टीने ज्ञानेश्वर थोरच. पण प्रत्यक्ष वास्तवात माणसाच्या जगण्याचे काय?
तुकारामांनी आपल्या काव्यातून जे विचार, भाव व्यक्त केले आहेत त्यातून माणसाला जीवनात जगण्यासाठी उभारी मिळते. तुकारामांचे अभंग म्हणजे तीव्र संवेदनाक्षम व चिंतनशील मौलिक अनुभवांचा अर्कच होय! ओतप्रोतपणे भरलेल्या मानव्यातच तुकारामांचं मोठेपण आहे. ज्ञानेश्वरांच्या व्यक्तीमत्त्वाभोवती चमत्कारांचे दैवी वलय आहे. तुकारामांच्या चरित्रात आणि साहित्यात चमत्कारांचा आढळ नाही.
तुकाराम एक तथाकथित हलक्या जातीत जन्मलेले साधेसुधे प्रापंचिक गृहस्थ होते. संसाराची धुळधाण झालेले, तरी परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाला चांगले वळण लावण्याचा मनाचा निर्धार असलेले जिद्दी पुरुष होते.
अशा स्वभावामुळे तुकाराम सामान्य माणसाला देखील आपलेसे वाटतात. मानवी जीवनातील आशा-निराशा, ताकद-दुबळेपण, सामर्थ्य व विकलता, सत्य-असत्य वागणूक, प्रांजलपणा-ढोंगीपणा, सज्जनपणा-दुर्जनपणा, अशा द्वंद्वांचा तुकारामांच्या अभंगांमध्ये प्रखरपणे, उरस्फोडी जोमदार आविष्कार झालेला आहे.
तुकारामांना संतपण सहजासहजी मिळाले नाही. संतपण मिळावे, अशी इच्छा किंचित देखील त्यांच्या मनात कधी डोकावली नाही. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ या वृत्तीने त्यांचा रात्रंदिन संघर्ष चालला होता-स्वतःशी आणि जगाशी! त्यांतून त्यांना संतपद आपोआप प्राप्त झाले.
अशा या संतकवी तुकारामांचा जन्म पुणे शहराजवळ असलेल्या देहू या खेडेगावी इ.स. १६०८ मध्ये झाला. (मृत्यू १६५०) आडनाव-आंबिले. कुळी-मोरे.
गावात इतर लोकांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांचे घराणे काहीसे ऐपतदार, ‘पत’दार होते. शेती, सावकारी, व्यापार-उदीम हे त्यांच्या घराण्याचे पिढीजात व्यवसाय होते.
जातीचे कुणबी (शेतात, मातीत श्रमणारे), पण उद्योगधंद्याने वाणी! त्यामुळे तुकारामांचे कुटुंबीय आपल्याला ‘कुणब-वाणी’ म्हणवीत असत. त्यात जातीय कमीपणा होता. तो एका व्यवस्थेने आपल्यावर लादलेला आहे, हे तुकाराम पूर्ण जाणून होते. उलट ते मोठ्या स्वाभिमानाने उपहासात्मक भाषेत आपल्या जातीय कमीपणाचा गौरवपूर्ण आविष्कार करतात…
बरा कुणबी केलो ।
नाही तर दंभेचि असतो मेलो ।।
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ।।
तुकारामांना जन्मावरून उच्चनीचपणा ठरवणे मान्य नव्हते. त्यांची चांगल्या कर्मावर निष्ठा होती. ज्याचं कर्म चांगलं, तो ‘उच्च’ जातीचा, प्रतीचा, अशी त्यांची श्रद्धा होती.
तथाकथित शूद्राति शूद्रांच्या मूक भावनांना चव्हाट्यावर मांडून त्यांना तुकारामांची बोलकं केलं आहे.
तुकाराम विठ्ठलभक्त होते. पण ‘विठ्ठल’ हा त्यांचा देव संकुचित नाही. तो कुठल्या एका जातीचा, धर्माचा, वंशाचा, देशाचा आहे, या भावनेने तुकाराम त्याची पूजा करीत नाहीत. हा देव सर्व मानवतेचा आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. देवाविषयी तुकारामांची एक ठाम कल्पना आहे. ते म्हणतात- ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे!’
तुकारामांचा ईश्वर सर्वांचा आहे, अखिल मानवतेचा आहे. तो कुठल्या तथाकथित जातीचा, वंशाचा, देशाचा, धर्माचा नाही.
तुकाराम म्हणजे सर्व जाती, धर्म, वंश, देश असल्या भेदांना ओलांडून गेलेले एक अफाट ‘मन’ होते!
तुकारामांचे आईवडील सत्प्रवृत्तीचे होते. घरच्या विशुद्ध सोज्ज्वळ वातावरणात तुकाराम लहानाचे मोठे झाले.
‘जोडोनिया धन उत्तम वेव्हहारे । उदास विचारे वेच करी,’ अशा सत्त्वशील वृत्तीने तुकारामांनी आपल्या वडिलांचा धंदा पुढे चालवला. त्यामुळे समाजात तुकोबांना मान होता. प्रापंचिक जीवनातील त्यांची सुरवातीची वर्षे काहीशी सुखात गेली.
पण तुकोबांचे सुखाचे दिवस जास्त काळ टिकले नाहीत… एकाएकी दुष्काळ आला. अन्न नाही, लोकांची उपासमार. दैव फिरले.
एकामागून एक संकटे तुकोबांवर कोसळली.
जीवनाची घडी पार बिघडली, विस्कटली. वयाच्या सतराव्या वर्षी आई व वडील, त्यानंतर वडील भावजय मरण पावली. त्यामुळे माठा भाऊ संसारत्याग करून घर सोडून तीर्थाटनास निघून गेला. तुकोबांच्या मायेचे घरचे छत्र कायमचे हरपले होते. चार प्रेमाचे शब्द बोलून धीर देणारे कुणी उरले नव्हते. त्यामुळे एकाकीपण, अस्वस्थपण आले. कामधंद्यावरून त्यांचं मन उडालं.
या त्यांच्या मनःस्थितीचा गावातील स्वार्थी लोकांनी फायदा घेतला. त्यात तुकोबांना गरिबांविषयी अपार अनुकंपा. गरिबांची उपासमार पाहून त्यांचं मन कळवळत असे. गरिबांना दुकानातला माल ते सरळ उचलून देत. दुकान तोट्यात! दोन वेळच्या जेवणाइतपतही आवक राहिली नाही. पोटाला उपास पडू लागले. परोपकार, आत्मा, परमात्मा या गोष्टींचं स्मरण ठीक आहे. पण या पोटाचं काय? त्याला भूक लागते.
त्याच्यात तीन वेळा अन्न टाकावे लागते. त्याची भूक फारच वाईट. ती पोटाला जाळून काढते. ही भूक जन्मभर माणसाला वणवणायला लावते. या पोटापायी माणसाला आयुष्यभर वणवणावं लागतं, धडपडावं लागतं. तुकोबांना हा अनुभव तीव्रपणे जाणवतो. तो त्वेषपूर्ण प्रत्ययकारक शब्दांत ओसंडून त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडतो –
किती येवढेसे पोट । केवढा बोभाट तयाचा ।।
जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ।।
सुमारे दोन वर्षे फारच वाईट गेली. ज्यांच्याकडून येणे होते ते लोक तोंडे लपवायचे. त्यामुळे तुकोबांची परिस्थिती अधिकच बिकट झाली. कर्जाचा बोजा वाढला. सावकारांचे तगादे सुरू झाले.
काय खावे, आता कोणीकडे जावे ।
गावात रहावे कोण्या बळे ।।
कोपला पाटील, गावचे हे लोक ।
आता घाली भीक कोण मज ।।
अशी परिस्थिती तुकोबांची झाली. शेवटी त्यांचे दिवाळे निघाले.
मग काय? गावात कुटाळक्या करणाऱ्या लोकांना चांगलेच फावले. सगळीकडे तुकोबांची छी-थू! अवहेलनेने तुकोबांचे हृदय पिळवटून गेले. हताशपणे अशा वेळी तुकोबांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-
तुका जाला सांडा । विटंबिती पोरे रांडा ।।
या उद्गारात मोठी वेदना आहे, तरी या शब्दांत वाईट परिस्थितीशी टक्कर देण्याची वृत्ती दिसते, जिद्द दिसते. या शब्दांत ‘कुठल्याही परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करायचाच,’ हा संदेश मिळतो.
दुष्काळात हजारो माणसे मेली. दुष्काळात तुकारामांची पहिली बायको मरण पावली. तिच्या नंतर त्यांचा मुलगा मृत्यूमुखी पडला. तुकोबांचा संसार कुठे आकाराला येत होता तोच दैवाने घाला घातला. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं.
साऱ्या घटनांचा तुकोबांच्या मनावर खोल परिणाम झाला. अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत आई, वडील, भावजय, बायको, मुलगा ही कुटुंबातली माणसं मृत्यूने ओढून नेली. संपत्ती आली आणि आल्या पावलानेच निघून गेली. व्यवसायाचे मातेरे झाले. मान-प्रतिष्ठा धुळीस मिळाली. सगेसोयरे, गडीमाणसे, गुरेढोरे यांनी गजबजलेल्या घरावर अवकळा पसरली. जीवनातल्या नश्वरतेची, क्षणभंगुरतेची भयाण कल्पना तुकोबांना आली. ‘देह मृत्याचे भातुके’ हे त्यांना कळून चुकले.
(भातुके म्हणजे खाऊ, साधे जेवण.)
पडत्या काळात नातेवाईक, सदिच्छा, प्रेम या गोष्टी किती उथळ असतात, हे त्यांनी अनुभवले.
बरे जाळीयाचे अवघे सांगाती ।
वाईटाचे अंती कोणी नाही ।।
जव मोठा चाले धंदा ।
तंव बहिण म्हणे दादा ||
हे वास्तव तुकारामांच्या चांगलंच अनुभवास आलं.
त्यांना प्रपंचाचा वीट आला. भले भले लोक माणूसकीला पारखे झालेले पाहून ते एकदम वैतागले. प्रपंच, जग, सारं सारं त्यांना निरर्थक वाटले – त्यांच्या तोंडून शब्द ओसंडले
बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
वरी या दुष्काळे पीडा केली ।।
अनुतापे तुझे राहिले चिंतन |
जाला हा वमन संवसार ।।
बरे झाले देवा बाईल कर्कशा ।
बरी हे दुर्दशा जनामध्ये ।।
बरे जाले जगी पावलो अपमान ।
बरे गेले धन ढोरे गुरे ।।
बरे झाले नाही धरिली लोकलाज ।
बरा आलो तुज शरण देवा ।।
बरे जाले तुझे केले देवाईल ।
लेकरे बाईल उपेक्षिली ।।
तुका म्हणे बरे व्रत एकादशी ।
केले उपवासी जागरण ||
तुकोबांनी प्रपंचाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यांनी हरी भक्तीचा मार्ग निश्चयाने कवटाळला. ‘देव उभा उभी भेट,’ असा त्यांना विश्वास होता. ते विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त झाले. ‘केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । या त्यांच्या उद्गारावरून देवाविषयीची त्यांची कल्पना समजते.
तुकोबांना आधार हवा होता. त्यांनी आपला भार पांडुरंगावर टाकला.
ईश्वर भक्तीसाठी चित्तशुद्धी व मूलग्राही दृष्टीची आवश्यकता आहे, असे ठाम मत तुकोबांचं होतं. साधनसामुग्री, कर्मकांडे त्यांना निरर्थक वाटत होती. तुकारामांची आत्मप्राप्तीची, ईश्वर प्राप्तीची साधना स्वतंत्र, स्वतःची अशी, एकाकी होती. त्यांना ईश्वरप्राप्तीसाठी गुरूची जरूरी लागल्याचं दिसत नाही.
माणसाचं मन हे सर्व गोष्टींचे कारण आहे. मनाचे सामर्थ्य व कमकुवतपणा, मनाचे चांगलेपण व वाईटपण, यांवरच माणसाची उन्नती किंवा अधःपात या गोष्टी अवलंबून आहेत – जोपर्यंत अहंकार सुटत नाही, चित्त शुद्ध झाले नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या, मोक्षसिद्धीच्या गोष्टी फोल आहेत, या ज्ञानाने त्यांचं मन, हृदय, वृत्ती, सारी प्रकाशित झाली.
नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे ।
आणूनि द्यावे निराळे हो ।
इंद्रियांचा जय साधुनिया मन ।
निर्विषय कारण असे तेथे ।।
असे झाले. तुकारामांना ईशज्ञान !
परमात्म्याच्या शोधासाठी धर्मग्रंथांनी, ईशतत्त्वज्ञांनी, धर्मपंथांनी आपापला प्रपंच थाटला आहे.
पण परमात्मा आपल्या अंतर्यामीच आहे!- असा तुकोबांचा ठाम विश्वास आहे.
परमात्म्याशी तादात्म्य पावण्यासाठी आपल्यापाशी मनाखेरीज दुसरे काहीच साधन नाही म्हणून तुकोबांनी सत्यासत्य स्वतः तपासून पाहिलं आणि स्वतःला जे पटलं त्याचाच स्वीकार केला. त्यासाठी त्यांना स्वतःच्या मनाशी व भोवतालच्या जगाशी सततसंघर्ष करावा लागला.
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन! – या अभंगातून हा अनुभव प्रकट झाला आहे.
भक्तीच्या मार्गात निराशेचे प्रसंग आले. पण त्यांनी उपासना अधिक नेटानेच चालविली. ते खचले नाहीत. हा अनुभव त्यांच्या ‘ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ।।’ अशा अभंगातून येतो.
भक्ती म्हणजे लाचारी, दीनवाणेपणा नव्हे, अशा वृत्तीची तुकोबांची भक्ती होती.
शास्त्रांचं जे सार वेदांची जो मूर्ति ।
तो माझा सांगाती प्राणसखा ।।
सगुण निर्गुण जयाची ही अंगे ।
तोचि आम्हा संगे क्रीडा करी ।।
तुका म्हणे मी तो सगळाच विरालो ।
विठ्ठलचि जालो दर्शनाने ।।
देशकालवस्तू भेद मावळला ।
आत्मा निर्वाळला विश्वाकार ।। –
(हे भक्तीमुळे भक्ती प्रेमात बुडाल्यामुळे घडतं!)
लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ।
तैसा समरस जालो । तुज माजी हरपलो ।।
अग्निकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ।।
तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ।।
– अशी होती तुकोबांची भक्ती. परमात्माच मिळाला मग काय मागायचे? स्वर्गभोग, इंद्रपद, ऋद्धीसिद्धी, वैकुंठवास वगैरे या सर्व गोष्टी तुकोबांना तुच्छ, फोल वाटतात. ते लौकिक सुखाच्या पलीकडे गेलेले होते.
………..
………….
तुकाराम वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत, विचारवंत, संत होते. समाजाच्या धर्म श्रद्धेला तत्त्वचिंतनाची व चित्तशुद्धीची जोड देऊन ईश्वर भक्तीबाबत विवेकशील मार्गदर्शन करणारे विचारवंत म्हणून संतांमध्ये अग्रेसर ठरतात.
ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास आणि तुकाराम यांच्या जीवन निष्ठा भिन्न नाहीत. माणूसकीविषयी सर्वांना उमाळा. प्रेम, सत्य, चांगलेपण, करुणा इत्यादी गोष्टी सर्वांना मान्य आहेत. पण तुकाराम इतर संतांहून वेगळेवाटतात, वेगळे आहेत, ते त्यांच्या निवेदन शैलीमुळे, वृत्तीमुळे, धडक बाज व्यक्तीत्वामुळे आणि दुःखितांविषयी त्यांच्या हृदयात असलेल्या अफाट कळवळ्यामुळे.
ज्ञानेश्वरांची, एकनाथांची भाषा सौम्य, शांत आहे. तुकाराम सज्जनांचा गौरव करतात. दुर्जनांचे वाभाडे काढतात. तिथे त्यांची भाषा फार कठोर होते. तुकोबा सत्य कथनाच्या बाबतीत कुणाची भीड मुरवत ठेवत नाहीत. ते नीचतेचा कठोर शब्दांत निषेध करतात. हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी पराकाष्ठेची निस्पृहता व निर्भयता हे गुण अंगी लागतात. तिथे नुसते सिद्धान्त सांगून चालत नाही.
धर्मासारख्या पवित्र गोष्टींचा बाजार मांडून भोळ्याभाबड्या लोकांना फसविणाऱ्या वेषधारी लोकांची तुकोबांना भयंकर चीड होती.
समाजातील दुष्ट, दुर्जन लोकांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना मेणाहून मऊ असलेले मन वज्राहून कठीण करावे लागले.
देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथे पैजाराचे काम । अधमाशी तो अधम ।।
अशी त्यांची रोखठोक विचारसरणी होती.
निर्वैर बुद्धीची आणि कठोर कर्तव्यनिष्ठेची मनोमन साक्ष त्यांच्या ‘देता तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे।’ या अभंगातून मिळते.
योगविद्येच्या श्रेष्ठत्त्वाची, सामर्थ्याची त्यांना कल्पना होती. पण सिद्धी व चमत्कार यांच्या भजनी लागल्याची लोकांची प्रवृत्ती अनर्थकारक वाटत होती.
शील, सद्गुणी, चांगले आचार-विचार त्यांना हवेसे होते. कर्मठपणाचा बडेजाव त्यांना नकोसा होता.
ज्ञानेश्वरांच्या सिद्धान्तावर तुकोबांची श्रद्धा होती.
पण वितंडवाद, विद्वज्जडता, कोरडा वेदान्त, अर्थशून्य पाठांतर, या गोष्टींची त्यांना ‘नावड’ होती. त्यांच्या बाबतीत ते म्हणतात – “तुका म्हणजे वादे । वाया गेली ब्रह्मवृंदे ।।”
तुकोबांनी सोंगं ढोंग उघडी पाडून लोकांना जागे करण्याचं काम चांगले केले.
सर्व संप्रदायातील संकुचितपणा, दुराग्रह, ढोंगीपणा, साचेबंदपणा या गोष्टींवर तुकोबांचा डोळा होता.
समाजधारणेला आवश्यक, शाश्वत असणाऱ्या अशा नीतीमूल्यांचा पाठपुरावा तुकोबांनी ज्या तळमळीने केला तसा फारच थोड्या सत्पुरुषांनी केला असेल.
तुकारामांइतका दुःखितांसाठी असलेला डोंगराएवढा उमाळा आणि सागराएवढा कळवळा जगातील कुणाही कवी/लेखकांमध्ये असेल, असं वाटत नाही.
शेक्सपियर जगातला महान लेखक म्हणून समजला जातो. मुळात तो कवी आहे. त्याने सदतीस नाटके लिहिली आहेत. त्याची सारी नाटके राजे-राण्या, राजपुत्र- राजकन्या यांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी असली तरी त्या नाटकांमध्ये मानवी भाव-भावनांचंच चित्रण असतं. शेक्सपिअरला अखिल मानवतेचं आकर्षण आहे. त्याचं मानवतेवर प्रेम आहे. साऱ्याच नाटकांतून काव्यमय विचार वाहत असतात. त्याच्या सुनितांमधून उच्च प्रतीचं काव्य वाहतं – प्रेम वाहतं. त्याची “Let me not adm impediments to the marriage of true minds,” ही जगातील श्रेष्ठ, अप्रतिम प्रेमकविता (सुनीत) मानली जाते. या कवितेत प्रेम-भावना फारच उदात्त, उत्तुंग आहे. तिच्यात एकनिष्ठ प्रेमाचं अप्रतिम चित्र रेखाटले आहे.
त्या कवितेतल्या काही ओळी उद्धृत करतो –
“Let me not to the marriage of true minds Admit impediments. Love is not love which alters when it alteration finds, Or bends with the remover to remove O no! It is an ever-fixed mark, That looks on tempests and is never shake. It is the star to every wandering bank Whose worth’s unknown….. Love is not times’s fool though rosy lips and cheeks within his bending sickde’s compass come; Love alters not with his brief hours and weeks, But bears it out even to the edge of doom.”
– अशा अमर ओळी शेक्सपियरच्या नाटकांतून व कवितांतून सतत वाहत असतात. शेक्सपीयर जगभर पसरला. तो एकट्या इंग्लंडचा राहिला नाही. तो अखिल जगाचा झाला.
शेक्सपियरच्या काळात त्याचे काही समकालीन स्कॉलर नाटककार, लेखक, समीक्षक त्याला कमी लेखायचे. खूप मोठा काळ उलटून गेला आहे. शेक्सपियरचे ते समकालीन काळाच्या ओघात विस्मृतीत गेले. शेक्सपियर अद्याप जिवंत आहे. त्याची नाटके, कविता वाचकांना अद्याप दंगवित, गुंगवित आहेत.
तुकारामांचे अभंगांतील विचार अखिल मानवतेसाठी आहेत. तुकारामही अखिल जगाचा कवी आहे. पण तो जगभर पसरला नाही. त्याचे अभंग जगभर पोचवण्याचं काम झालं नाही. काही वर्षांपूर्वी कवी दिलीप चित्रे यांनी तुकारामांच्या काही अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करून, त्यांचा ग्रंथ प्रकाशित करून, तुकारामांना जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न किती यशस्वी झाला हे काही सांगता येत नाही.
सुमारे चारशे वर्षे उलटून गेली. आजही तुकारामाचे अभंग मराठी मनांना दंगवित, गुंगवित असतात. त्यांच्यातील आशय आजच्या काळालाही, आजच्या जीवनालाही लागू पडतो.
शेक्सपिअर जगातला महान लेखक, कवी तरी तुकारामांमध्ये दुःखितांसाठी, रंजलेल्या-गांजलेल्यांसाठी जो अफाट, सुसाट उमाळा, कळवळा आहे तसा तो शेक्सपियरमध्ये नाही. या बाबतीत तुकारामांना कुणी ओलांडून गेलेला दिसत नाही.
तुकाराम आणि शेक्सपियर या दोहोंमध्ये एक साम्य आहे. तुकारामांनाही काहींनी कमी लेखलं होतं. पण हे दोघे काळाला पुरून उरले आहेत.
असो.
भावशुद्धी, संयम, सत्यनिष्ठा, सदाचरण, भूतदया, समबुद्धी, परोपकार यांतच खरी ईश्वराची पूजा (भक्ती) आहे, असं तुकोबांचं ठाम मत होतं.
भूतदया जाचे मनी । त्याचे घरी चक्रपाणी ।।
तोचि देवभक्त । भेदाभेद नाही ज्यात ।।
‘निर्वैर होणे साधनाचे मूळा’ इत्यादी अभंगांतून त्यांचं देवभक्तीविषयी मत व्यक्त झालेलं आहे.
जातपात वगैरे या भेदाभेदाच्या गोष्टी तुकोबांना मुळीच मान्य नव्हत्या. नैतिकतेतच माणसाची खरी थोरवी, हे तुकोबांचं ठाम मत होते. जीवनातील सर्व दुःखांचं मूळ भेदभावनेत आहे, हे ते जाणून होते.
परमात्मतत्त्व सगुण व निर्गुण, द्वैत व अद्वैत या द्वंद्वांच्या पलीकडचे आहे, अशी तुकोबांची श्रद्धा होती. मोक्षाची कल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांना भक्ती महत्त्वाची वाटत होती. ज्ञान, योग वगैरे मार्गांच्या ती तोडीची त्यांना वाटत होती.
देवाची कल्पना उदात्त असायला हवी. क्षुद्र देवतांच्या पूजनाला त्यांचा विरोध होता. परमार्थ ‘याचि देही, याचि डोळा’ पहाता आला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. शरीर आत्म्याचे मंदीर बनावे, हे मनावर अवलंबून आहे. अंतःकरण निर्मळ हवे, मग सर्व काही कल्याणप्रद होते, अशी त्यांची मतं होती. प्रपंच आणि परमार्थ, नीती आणि व्यवहार यांच्यातील विसंवाद त्यांना काढून टाकायचा होता.
चित्त निर्मळ हवे, उपासतपासांची जरूरी नाही, सदाचारी वागणे हवे, मन निर्वैर हवे, असा त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला.
कुठल्याही गोष्टीचा योग्य उपयोग करायला हवा, उपकारक गोष्ट अपकारक होऊ न देण्याची काळजी घ्यावी, असं त्यांचे सांगणे होते.
तुकारामांचं काव्य म्हणजे अकृत्रिम आत्माविष्कार आहे. त्याविषयी ते सांगतात –
अंतरीचे द्यावे स्वभावे बाहेरी।
धरिता ही परी आवरेना ।।
काय मी पामर जाणे अर्थभेद ।
वदवी गोविंद ते चि वदे ।।
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करुनी ।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करू ।।
तुकाराम स्वभावाने तीव्र संवेदनशील व चिंतनशील होते. त्यांच्या वाणीत तत्त्वनिष्ठेचा कस व सहानुभूतीचा ओलावा होता वैयक्तिक हितावर त्यांनी कधीच पाणी सोडलेले होते. त्यामुळे अलिप्तपणा व निस्वार्थीपणा त्यांच्या अंगी बाणवला गेला होता.
त्यांचा झगडा दुष्ट प्रवृत्तींशी होता. कुणाही व्यक्तीशी नव्हता. त्यांची दृष्टी व्यापक व वस्तुनिष्ठ, वास्तववादी होती. त्या दृष्टीत अंतरीची ओल होती.
त्यांच्या अनुभवांत उथळपणा व एकांगीपणा नाही. त्यांचे अनुभव संपन्न, सकस आहेत. त्यांचे विचार व भावना एकमेकांना पुरक आहेत. त्यांची भाषा मराठमोळी व दणकट आहे. त्यांच्या भाषेवर ‘संस्कृत भाषे’ची अवास्तव छाप नाही! – त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, समर्पक, उठावदार आहेत.
थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ ओतण्याची ताकद तुकोबांमध्ये आहे. त्यांची भाषा काहीशी राकट आहे. रोखठोक आहे. त्यांनी दिलेले दाखले रोजच्या जीवनातले आहेत, मर्मग्राही व परिणामकारक आहेत, त्यांचा वाक्प्रवाह धो धो वाहणारा आहे – शांत, संथ नाही. भाषेत उत्कटता, आवेश आहे. त्वेष व तिरसटपणाही आहे.
दुर्जनांना दहशत बसेल असं सामर्थ्य सज्जनांनी संपादन केले पाहिजे तरच जगात सत्याचा आणि सद्गुणांचा जय होईल, अशी त्यांची धारणा होती. सौजन्य व सामर्थ्य यांचा संयोग घडवून आणण्याची तळमळ त्यांच्या हृदयात सतत घुसळत होती.
आकाशाएवढे अफाट हृदय व पर्वताएवढे उत्तुंग मन असलेले संतकवी तुकाराम महाराज यांच्या अभंगांतील अगदी थोड्याश्या ओळी उद्धृत करून मी त्यांच्यावरील लेखाचा शेवट करतो –
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।
जाऊनिया तीर्था काय तुवा केले ।
चर्म प्रक्षाळिले वरी वरी ।
दया क्षमा शांति । तेथे देवाची वसति ।।
दया तिचे नाव भूतांचे पाळण ।
आणिक निर्दाळण कंटकांचे ।।
क्षमा शस्त्र जया नराचिया हाती ।
दुष्ट तया प्रति काय करी ।।
तृण नाही तेथे पडला अग्नि ।
जाय तो विझोनि आपसया ।।
मुंगी आणि राव । आम्हा सारखाची जीव ।।
बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ।।
चित्त शुद्ध तर शत्रूही मित्र होती ।।
शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।
ओले मातीचा भरवसा । का रे धरिशी मानसा ।।
डोळे चिरीव चांगले । वृद्धपणी सरक्या झाले ।।
नाक सरळ चांगले । येऊन हनुवटी लागले ।।
तुका म्हणे आले नाही । तंव हरिला भज रे काही।।
धन मेळवूनि कोटी । सवे न ये रे लंगोटी ।।
भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाऊठी ।।
देव आहे अंतर्यामी । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी ।।
दुधी असता नवनीत । नेणे तयाचे मथित ।।
भोगावरी आम्ही घातला पाषाण ।
मरणा मरण आणियले ।।
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।
तुडता हे जन न देखवे डोळा ।
येतो कळवळा म्हणवुनि ।।
जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।
हिरा ठेविता ऐरणी । वाचे मारिता जो घणी ।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
गाईचा जो भक्ष अमंगळ खाय ।
तिचे दुध काय सेवू नये ।।
तुका म्हणे काय सल पहासी काज ।
फणसातील बीज काढुनि घ्यावे ।।
अर्थेविण पाठांतर कासया करावे ।
व्यर्थचि मरावे घोकूनिया ।।
आलिया भोगासी असावे सादर ।
देवावरी भार घालू नये ।।
आता तरी पुढे हाच उपदेश ।
नका करू नाश आयुष्याचा ।।
सकळांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ।।
भाग्यवंत घेती वेचुनिया मोले ।
भारवाही मेले वाहता ओझे ।।
आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे ।
आपणासि डोळे दृष्टी नाही ।।
रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न ।
तोंडासि कारण चवी नाही ।।
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण ।
तया त्रिभुवन अवघे खोटे ।।
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
ऐरावा रत्न थोर । तया अंकुशाचा मार ।।
ज्याचे अंगी मोठेपण; तया यातना कठीण ||
तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहुनि लहान ।।
हालवूनि खुंट। आधी करावा बळकट ।।
मग तयाच्या आधारे । करणे अवघेचि बरे ।।
–अनंत कदम,
वसई रोड
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply