अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये विजय मडव यांनी लिहिलेला हा लेख
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही नावे वारकरी संप्रदायासाठी संजीवक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्या भागवत धर्माचा संत नामदेवांनी पार पंढरपूरपासून पंजाबपर्यंत विस्तार केला. त्यामुळे या संप्रदायामध्ये अगदी विविध स्तरातील विविध जातीतील अगदी तळागाळातील लोकसुद्धा सामील झाले. ह्याच कारणामुळे एक अखंड संतपरंपरा अव्याहतपणे प्रवाहीत झाली.
ज्ञानेश्वरांनंतर सुमारे तीनशे वर्षांनी आलेल्या संत एकनाथांनी नामदेवप्रणीत भक्तिविचार विविध रूपांनी समाजाच्या तळागाळा पर्यंत संक्रमित केले आणि प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो हे सिद्ध करून दाखविले.
त्यानंतर त्या काळात कथित धर्ममार्तंडांनी भोळ्याभाबड्या समाजमनाचा गैरफायदा उठवित निर्मळ समाजजीवन कलुषित वा दुषित करण्याचा चंग बांधला. तेव्हा या विकृत अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी संत तुकारामांसारखा समाजरक्षक जागा झाला आणि आपल्या रोखठोक अभंगरचनांच्या आधारे त्यांनी या भागवत धर्माच्या कळसाची भूमिका सार्थ ठरविली. म्हणूनच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना परमार्थमार्गातील सूर्य-चंद्र म्हटले जाते.
देहू येथे इ. स. १६०८ मध्ये आंबिले घराण्यात तुकारामांचा जन्म झाला. आम्बिल्यांच्या घरात पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. शिवाय घरात महाजनकी आणि दुकानदारीचा व्यवसाय होता अशा पार्श्वभूमीत तुकाराम लहानाचे मोठे झाले. त्याकाळात पडलेल्या एका मोठ्या दुष्काळात त्यांची पहिली पत्नी, अपत्ये मृत्यूमुखी पडली. व्यापार थंडावला. यातच वडिलभाऊ घर सोडून गेला. दुष्काळात झालेल्या आप्तांच्या मृत्यूमुळे जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता त्यांना अस्वस्थ करू लागली. त्यांचे मन पुन्हापुन्हा अस्वस्थतेच्या जाणीवेत बुडू लागले. ही जाणीव त्यांना असह्य होऊ लागली. त्यामुळे त्यांचे मन संसारापासून दूर दूर जाऊ लागले. त्यातच दुसऱ्या पत्नीच्या भांडखोर स्वभावामुळे ते पूर्णतः उदासीन झाले. विरंगुळ्यासाठी त्यांनी भक्तिमार्गाची कास धरली. वंशपरंपरेने त्यांच्या घराण्यात चालत आलेल्या विठ्ठलोपासनेच्या, संतवचनांच्या निवाऱ्याला जाताच त्यांच्या वैतागाची जागा विरक्तीने घेतली.
भक्तिसंप्रदायाचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले होते म्हणूनच या घोर निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग भगवतचिंतनाशिवाय दुसरा नाही हे त्यांनी ओळखले आणि त्यांचे सांसारिक आसक्तीचे रूपांतर अनासक्तीयोगात झाले.
त्यानंतर एकदा स्वप्नात त्यांना केशव (बाबाजी) चैतन्याचा गुरूपदेश झाला. हा गुरूपदेश कसा झाला हे त्यांनी स्वतःच एका अभंगात सांगून ठेवले आहे.
सद्गुरुराये कृपा मज केली ।
परी नाही घडली सेवा काही ।। (क्र. ३६८)
माघ शुद्ध दशमीला गुरुवारी तुकाराम गंगास्नानाला निघाले असता गुरूंनी – बाबाजी चैतन्यांनी आपला कृपाहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला.
यानंतर तुकाराम हे केवळ नामस्मरणाच्या अभ्यासाने ईश्वराशी पूर्ण समरस होऊन गेले. यावरी या जाळी । कवित्वाची स्फूर्ती ।। पाय धरिले चित्ती । विठोबाचे ।।’ अशी अंतःस्फूर्ती झाली. तुकारामाच्या ठायी मुळीचा झरा होताच, सद्गुरूस्पर्शाने तो वाहू लागला. या उपासनेनंतर त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला.
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ।।
माझी वदवितो वाणी । ज्याने धरिली धरणी ।।
जोडिली अक्षरें । नव्हती बुद्धीची उत्तरें ।।
नाही केली आटी । कांहीं मानदंभासाटी ।।
कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ।।
तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ।।
या अभंगात तुकाराम स्वतःमधील या कवित्वासंबंधी जे काही सांगत आहेत त्यावरून त्यांची ईश्वरावर असलेली श्रद्धाच दिसून येते. ‘हे सारे अगदी उत्स्फूर्त आहे, अकृत्रिम आहे. या साऱ्यात सहजपणा आहे. त्यात माझ्या चातुर्याचा वा कलाकाराचा लवलेशही नाही अथवा लोकांना आवडावी म्हणून केलेली कारागीरीही नाही.’ आपल्या मुखातून जे बाहेर पडते ते आपले आहे असाही त्यांचा दावा नाही. आपण केवळ मध्यस्थ आहोत. आपल्या मुखाच्या माध्यमातून देवच सारे बोलत आहे असेच ते सुचवतात. ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी खडकातून, डोंगरदऱ्यातून प्रकटणाऱ्या आणि अव्याहतपणे खळाळणाऱ्या झऱ्याची प्रतिमा उपयोजिली आहे.
कथाकीर्तने, प्रवचने ऐकून त्यांना बहुश्रुतता लाभली. शिवाय ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेवांचे अभंग अभ्यासून त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत गेले. आपल्या अभंगवाणीविषयी तुकारामांची भूमिका विनम्रतेची आहे. आपणाला लेखनासाठी नामदेवांनी प्रेरणा दिली असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नामदेव आणि पांडुरंग आपल्या स्वप्नात आले आणि त्यांनी काव्य करण्याची आज्ञा केली असं ते म्हणत
नामदेवे केले स्वप्नामाजी जागें ।
सवें पांडुरंगे येऊनियां ।।
सांगितलें काम करावें कवित्व ।
वाउगें निमित्य बोलो नको ।। (अ.क्र.१३१५)
असे जरी असले तरीही भगवंताच्या कृपाप्रसादाशिवाय काव्य स्फुरत नाही अशीच त्यांची भूमिका राहिली.
करितों कवित्व म्हणाले हे कोणी ।
नव्हे माझी वाणी पदरींची ।।
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार ।
मज विश्वंभर बोलवितो ।।
काय मी पामर जाणे अर्थभेद ।
वदवीं गोविंद तें चि वदें ।।
निमित्त मापासी बैसविलों आहे ।
मी तो कांहीं नव्हे स्वामिसत्ता ।।
तुका म्हणे आहे पाईक चि खरा
वागवितों मुद्रा नामाची हे ।। (अ.क्र. १००१)
काव्य निर्मितीबाबतचा तुकारामांनी केलेला उल्लेख त्यांच्या विनम्र पण आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्यांच्या अभंगांच्या निर्मिती प्रक्रियेमागील दुसरी प्रेरणा ही त्यावेळच्या वर्तमान जीवनाच्या अवलोकनातून अवतरली आहे. तुकारामांच्या अभंगातील काव्याचा विचार करताना आपणास प्रखरपणे जाणवतो तो त्यांच्या सांगण्यातील स्पष्टपणा…
संतांचे सेविलें तीर्थ पायवणी ।
लाज नाही मनीयेऊ दिली ।।
टाकला तो कांहीं केला उपकार
केलें हे शरीर कष्टवूनी ।।
वचन मानिलें नाहीं सहृदांचे ।
समूळ प्रपंचें वीट आला ।।
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही ।
मानियेले नाही बहुमता ।।
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश ।
धरिला विश्वास दृढ नामीं ।।
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति ।
पाय धरिले चित्तीं विठोबाचे ।। (अ.क्र.१३२८)
असे असले तरीही त्यांचा स्वप्नावरचा विश्वासही आपल्यास जाणवतो, कारण गुरूंनी स्वप्नांत दिलेला गुरूमंत्राचा उपदेश ते श्रद्धेने स्वीकारतात. सत्य, स्वप्न, वास्तव, कल्पित अशा परस्परविरोधी भावना तुकारामांच्या व्यक्तित्त्वात एकत्रितपणे दिसून येतात. शिवाय आत्मनिष्ठा हा त्यांचा स्थायिभाव असल्याचेही आपणास जाणवते. जे जे मनाला जाणवले आणि मनाला भावले ते ते अनुभव उत्कटपणे प्रकट झालेले दिसून येतात. त्यामुळे ते थेट मनाला भिडणारे, सर्वसामान्यांना भावणारे ठरतात आणि त्यामुळे यात तुकारामांच्या मनाच्या संवेदनशीलतेचाही अनुभव देतात.
तुकारामांच्या अभंगाचे स्थूलपणाने दोन भाग करता येतात. पहिल्या भागात त्यांचे सुरुवातीच्या काळातील प्रापंचिक कटकटी सांगणारे अनुभव तसेच ईश्वरी साक्षात्कारानंतरचे मनःशांती सांगणारे अनुभव! आणि दुसऱ्या भागात लोकांना, समाजाला काहीतरी सांगण्याकरीता केलेले अभंग !
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ||
ऐसे जागवितों मना । सरसें जनासहित ।।
अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें।।
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या।।
(अ.क्र. २७२३)
असे त्यांच्या मनात आले आणि ते भक्तिमार्गाकडे वळले –
वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथे मन क्रीडा करी ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवश्वरु ||
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनी प्रकार सेवूं रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणासी ।।
(अ.क्र. २४७१)
त्यातूनच अशाप्रकारे त्यांना एकांतवास आवडू लागला. एकांतवासात आपल्याच मनाशी ते संवाद साधू लागले. स्वतःच्या मनाशीच वाद घालू लागले. याच मनन चिंतनातून पुढे त्यांना आपल्या परमेशाचे-विठ्ठलाचे रूप दिसले.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ।।
कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ।।
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ।।
कासे सोनसळा पांघरे पाटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ।।
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ।। (अ.क्र. ४)
विठ्ठलाच्या या रुपासारखेच त्यांना भावलेले विठ्ठलाचे हेही रूप आपल्याला दिसते
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।।
तुळसीच हार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ।।
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठी कौस्तुभमणी विराजित ।।
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें || (अ.क्र. २)
आणि या भावणाऱ्या रूपालाच ते म्हणतात –
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ।।
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देई मज प्रेम सर्व काळ ।।
विठो माउलिये हा चि वर दई ।
संचरोनि राही हृदयामाजी ।।
तुका म्हणे कांहीं न मागे आणिक !
तुझे पायीं सुख सर्व आहे ।। (अ.क्र. ३)
ते विठ्ठलालाच म्हणजे स्व-ईशालाच विनवताना दिसतात. तुझं रूप नित्य माझ्या डोळ्यासमोरच राहो. माझ्या हृदयात तुझा अखंड वास असू दे. हे सारे सांगत किंवा विनवत असतानाच ते विठ्ठलाला विठाईच्या म्हणजेच माऊलीच्या रुपात अधिक पाहतात. विठ्ठल म्हणजेच विठाई हीच आपली माऊली, आपली ‘कृपेची साऊली’ आहे असे त्यांना वाटते. त्यापुढे जाऊन ते म्हणतात
माये मोकलिले कोठें जावें बळें ।
आपुलिया बळें न वंचे तें ।।
रुसोनियां पळे सांडूनीयां ताट ।
मागें पाहे वाट यावें ऐसीं ।।
भांडवल आम्हां आळी करावी हे ।
आपणें माय धांवसील ।।
तुका म्हणे आळी करुनिया निकी ।
देसील भातुकी बुझाऊनि ।। (अ.क्र.२३७६)
विठाई म्हणजे माऊली-विठ्ठलाकडेच ते लडिवाळ हट्टही करतात – आई रुसली, रागावली तर बाळाने कोठे जावे? असा लाडिक प्रश्नही टाकतात. त्यामुळेच येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळविता ।। असं येण्यासाठी विनवून जीवाला सांत्वना देण्यासाठीही सांगतात
देऊनि आलिंगन प्रीतीची पडिभरे ।
अशी गळामिठी झाल्यावर पुढे ते म्हणतात
धवळलें जगदाकार | आंधार तो निरसला ।।
लपों जातां नाहीं ठाव । प्रगट या पसारा ।।
खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे।।
तुका म्हणे जीवें साटी । पडिली मिठी धुरेसी।।
(अ.क्र. ३४०९)
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगले ।।
मनें धरिला अभिळास । मिठी घातली पायास।।
होता दृष्टादृष्टी । ताप गेला उठाउठी ।।
असे झाल्यावर मग तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ।।
(अ.क्र. २००८)
अशी स्थिती होते आणि त्यानंतर –
आजि आनंदु रे एकी परमानंदु रे ।
जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ।।
विठोबाची वेडीं आम्हां आनंदु सदा ।
गाऊ नाचों वाऊ टाळी रंजवूं गोविंदा ।।
सदा सन सांत आम्हां नित्य दिवाळी ।
आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ।।
तुका म्हणे नाहीं जन्ममरणांचा धाक ।
संत सनकादिक तें आमचें कवतुक ।।
(अ.क्र. २४९३)
अशा प्रकारे आनंदाच्या धारा बरसू लागतात, त्यानंतर –
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें ।
विश्व अवघें कोंदाटले ।।
रूप गुण नाम अवघा मेघश्याम ।
वेगळें ते काय उरलें ।। (अ.क्र. १८२४)
संत तुकारामांच्या अभंगात ‘नामाचा’ विषय बऱ्याच वेळां येतो.
रामें सनानसंध्या केलें क्रियाकर्म ।
त्याचा भवश्रम निवारला ।।
आणिकें दुरावली करितां खटपट ।
वाउगे बोभाट वर्माविण ।।
रामनामीं जिहीं धरिला विश्वास ।
तिंहीं भवपाश तोडियेले ।।
तुका म्हणे केलें कळीकाळ ठेंगणे ।
नामसंकीर्तनें भाविकांनी ।। (अ.क्र.२००१)
जीवाचा उद्धार करण्यासाठी भक्ती आणि भक्तीचा मार्ग चोखाळताना नामस्मरण, /नामसंकीर्तन हा एक साधा आणि सोपा मार्ग तुकारामांनी सांगितला आहे. नामस्मरणामुळे मन स्वच्छ आणि पवित्र बनते. संसारातील सारी विघ्ने आणि दुःख विरून जातात असं तुकाराम म्हणत
नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।
जळतील पापें जन्मांतरें ।।
न लगे सायास जावें वनांतरा ।
सुखें येतो घरा नारायण ।।
ठायींच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा ||
रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा ।
मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।
याहूनि आणीक नाहीं पैं साधन ।
वाहातसे आण विठोबाची ।।
तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि ।
शाहाणा तो धणी घेतो येथें ।। (अ.क्र.२४४८)
यज्ञयागादी विविध बाह्य उपचारांपेक्षा केवळ नामसंकीर्तनाचे साधनच श्रेष्ठ आहे. कारण यात मनातील अहंकार, अभिमान विरत जाऊन आनंदाचा बहर फुलत जातो.
संत तुकारामांनी आपल्या मनास परोपरीने आळविलेले अभंगही आढळतात. कारण मनोजयावाचून परमार्थ होऊच शकत नाही हे ही त्यांचंच मत!
नको नको मना गुंतूं मायाजाळी ।
काळ आला जवळी ग्रासावया ।।
काळाची हे उडी पडेल बा जेव्हां ।
सोडविना तेव्हा मायबाप ।।
सोडविना राजा देशीचा चौधरी ।
आणीक सोइरीं भलीं भलीं ।।
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी ।
एका चक्रपाणी वांचूनियां ।। (अ.क्र. २७९८)
जीवनाचे एक महान रहस्य ते या अभंगाद्वारे स्वतःच्या मनाला आणि सामान्य समाजमनाला समजावतात. माया, मोहजाल यात गुंतून न पडता सावध हो, ईश्वरचरणी लीन हो, त्यामुळेच तुझ्या उद्धरणाचा मार्ग सुकर होईल.
संत तुकारामांच्या काव्यात्मक कर्तृत्वाला सामाजिक अधिष्ठानही आहे. मनाची मोहवशता आणि समाजातील प्रतिष्ठितांचा विरोध या दोहोंशी झगडूनच त्यांना आपली आत्मिक प्रगती करून घ्यावी लागली.
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ।।
जीवा ही आगोज पडती आघात ।
येऊनियां नित्य नित्य करी ।।
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे ।
अवघीयांचे काळें केले तोंड ।। (अ.क्र.४०७१)
अशा प्रकारे त्यांचा हा संघर्ष सामाजिक आणि मानसिक, लौकीक आणि पारलौकीक अशा दोन्ही पातळ्यांवर चाललेला होता हे या अभंगावरून जाणवते. स्वतःच्या साधनेचा विकास, आध्यात्मिक अनुभव, ईश्वरविषयक तळमळ, आत्मसाक्षात्कार या गोष्टींबरोबरच त्यांच्या अभंगातून तात्कालीन समाजाकडून होणारा त्रास, समाजात अस्तित्वात असलेला भोंदूपणा यावरही त्यांनी केलेले प्रहारही त्यांच्या अभंगातून दिसून येतात.
मुंगी होउनि साकर खावी ।
निजवस्तूची भेटी घ्यावी ।।
वाळवंटी साकर पडे ।
गज येऊनि काय रडे ।।
जाला हरिदास गोसावी ।
अवघी मायिक क्रिया दावी ।।
पाठ पाठांतरिक विद्या ।
जनरंजवणी संध्या ।।
प्रेम नसतां अंगा आणी ।
दृढ भाव नाहीं मनीं ।।
ब्रह्मज्ञान याचे बोले ।
करणी पाहातां न निवती डोळे ।।
मिथ्या भगल वाढविती ।
आपुली आपण पूजा घेती ।।
तुका म्हणे धाकुटें व्हावें ।
निजवस्तूसी मागुनी घ्यावें ।। (अ.क्र. २८८२)
मनात भाव नसतानाही खोटे ढोंग रचून समाजातील काही लोक आपली आपणच पूजा करवून घेतात, स्वतःचे स्तोम माजवितात. यापेक्षा लहानपण पत्करावे, लीनत्व पत्करावे, नम्र असावे आणि स्वस्वरूपाच्या अनुभवाचा आनंद घ्यावा. तुकाराम ह्या अभंगातून हेंच दर्शवितात.
भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा । काय पंथ ।।
तेथें अनुभवाचा वाढवनी चटा फिरे दाही दिशा ।
तरी जंबुवेषा सहज स्थिति ।।
कोरोनियां भूमी करिती मधी वास ।
तरी उदरास काय वाणी ।।
तुका म्हणे ऐसें कासया करावें ।
देहासी दंडावे वाउगें चि ।। (अ.क्र. ३८५२)
समाजात जगत असताना विविध सोंगे घेऊन समाजाला फसविणारे बरेच असतात. त्यांच्यावर प्रहार करताना तुकारामांनी हा अभंग रचला आहे. बाह्य गोष्टींवरून साधुत्व प्राप्त होत नाही, हे सांगताना त्यांनी कुत्रा, कोल्हा आणि उंदीर यांचे दृष्टान्त योजिले आहेत.
काय बा करिशी सोवळे ओवळें ।
मन नाहीं निर्मळ वाउगें चि ।।
काय बा करीसी पुस्तकांची मोट ।
घोकितां हृदयस्फोट हाता नये ।।
काय बा करीसी टाळ आणि मृदंग ।
जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥
काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी ।
करणी नाहीं पोटी बोलण्याची ।।
काय बा करीसी दंभलौकिकातें ।
हित नाहीं मातें तुका म्हणे ।। (अ.क्र.४३०९)
धर्म आणि भक्तीच्या नावावर बाह्य देखावे उपयोगाचे नाहीत तो केवळ दिखावा ठरतो. मनच निर्मळ नसेल तर या सोवळ्या ओवळ्याचं स्तोम काय कामाचं? ते सारंच व्यर्थ ठरतं! असं तुकाराम म्हणतात.
गुळें माखोनिया दगड ठेविला ।
वर दिसे भला लोकाचार ।।
अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें ।
बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ।।
ऐसिया डांभिका कैची हरिसेवा ।
नेणे चि सद्भावा कोणे काळीं ।।
तुका म्हणे येणें कैसा होय संत ।
विटाळलें चित्त कामक्राधें ।। (अ.क्र.४०८६)
गुळाने माखून ठेवलेला दगड गुळाच्या ढेपेसारखाच दिसतो. त्याचप्रमाणे अंतःकरणात पाप आणि वासनेचे ओझे वागवतो तो बाह्य रूपात संतपणा पांघरून समाजाला फसवत असतो. तुकाराम म्हणतात की असे चित्त कामक्रोधाने विटाळलेल्या दांभिकाचा संत कसा होईल?
तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना ।
जंव त्या पंचानना देखीलें नाहीं ।।
तोंवरि तोंवरि सिंधु करि गर्जना ।
जंव त्या अगस्तिब्राह्मणा देखिलें नाहीं ।।
तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ।।
तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी ।
जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ।।
तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें ।
जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं ।।
(अ.क्र. २७७३)
समाजाला आपल्या बाह्य दिखाव्यावरून फसविणारे किती काळ टिकाव धरतील? जोवर मी (तुकाराम महाराज) आहे तोपर्यंत यांचे काहीही चालणार नाही आणि मी त्यांचे काहीही चालू देणार नाही हे सांगताना त्यांनी सिंह-कोल्हा, अगस्तीऋषी-समुद्र, सुंदर ललना-वैराग्य, शूरत्वाच्या गोष्टी-वीरमातेचा शूरपुत्र असे दाखले दिलेले आहेत.
जेथें जातों तेथें पडतो मतोळा ।
न देखिजे डोळा लाभ कांहीं ।।
कपाळीची रेखा असती उत्तम ।
तरि कां हा श्रम पावतों मी ।।
नव्हे चि तुम्हांस माझा अंगीकार ।
थीता संवसार अंतरला ।।
भोग तंव जाला खरा भोगावया तो ।
भांडवल नेतो आयुष्य काळ ||
कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा ।
मुकतों कां जीवा तुका म्हणे ।। (अ.क्र.३६१५)
संसार असो की परमार्थ, जे करावे त्यात तोटाच होतो, लाभ दिसतंच नाही. अवघ्या दीनांचा त्राता, विश्वरक्षक प्रत्यक्ष परमेश्वरही आपणास संरक्षण देऊ शकत नाही कारण आपलं प्रारब्धच तसं आहे असं तुकाराम म्हणतात. जीवनात सर्व ठिकाणी घोटाळाच घोटाळा होत आहे. नुकसान होत आहे.
आध्यात्मिकदृष्ट्या समाधान प्राप्त होताच ‘आता उरलो उपकारा पुरता’ या भावनेने तुकाराम आपल्या अभंगातून लोकांना उपदेश करू लागले. तेव्हा समाजातील तथाकथित हितसंबंधी लोकांकडून त्यांचा छळवादच मांडला गेला. कर्मकांडाच्या बडीवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. सदाचाराचा गोडवा गात म्हणूनच त्यांना समाजातील उच्चवर्णीयांचा रोष सहन करावा लागत होता. एवढेच नव्हे तर रामेश्वर भट्टासारख्या धर्ममार्तंडाच्या आज्ञेने तुकारामांच्या अभंगवह्या इंद्रायणीत बुडविण्याचा घाट ब्राह्मण मंडळींनी घातला. अभंगवह्या इंद्रायणीत बुडविल्यानंतर तुकारामांनी इंद्रायणीकाठीच काही न खाता, न पिता बसून राहिले –
त्यांच्या अभंगातील काव्य रसरशीत आहे. प्रसाद हा त्यांच्या लेखणीचा प्रमुख विशेष आहे.
तेरा दिवस जाले निश्चक्र करितां ।
न पवसी अनंता मायबापा ।।
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी ।
काय हृषीकेशी जालें तुज ।।
तुजवरी आतां प्राण मी तजीन ।
हत्या मी घालीन पांडुरंगा ।।
फार विठाबाई धरिली तुझी आस ।
करीन जीवा नास पांडुरंगा ।।
तुका म्हणे आता मांडिलें निर्वाण ।
प्राण हा सांडीन तुजवरी ।। (अ.क्र.२४८३)
जीवनातील अशा विविध खडतर प्रसंगांना तुकारामांना सामोरे जावे लागले. परंतु केवळ विठ्ठलाची-परमेश्वराची साथ होती म्हणूनच ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले अशी त्यांची श्रद्धा होती. तुकाराम म्हणतात, आता मी अखेरचा उपाय म्हणून तुझ्यासाठी प्राणांचा त्याग करीन. इंद्रायणीत त्यांच्या अभंगांना जलसमाधी द्यावी लागली तेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या काठावर अन्नत्याग करून जणू निर्वाणच मांडले होते.
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळा ।
तो जाला सोहळा अनुपम्य ।।
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें ।
सर्वात्मकपणें भोग जाला ।।
एकदेशीं होतों अहंकारें आथिला ।
त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ।।
फिटलें सुतक जन्ममरणाचें ।
मनी माझ्या संकोचें दुरी जालों ।।
नारायणे दिला वस्तीस ठाव ।
ठेवूनिया भाव ठेलो पायीं ।।
तुका म्हणे दिले उमटूनि जगीं
घेतलें तें अंगी लावूनिया ।। (अ.क्र.२६५९)
मी माझ्या देहबुद्धीच्या मरणाचा सोहळा पाहिला त्यासाठी मला माझे प्रज्ञाचक्षु कामी आले. आज मी निरहंकारी झालो. ‘मी’ ‘माझे’ या संकोची वृत्तीपासून दूर झालो. स्वतःची देहबुद्धी नष्ट होणे, अहंभाव नष्ट होणे हेच तर मरण आहे. असे रूपक योजून त्यांनी कल्पनेची वेगळीच पातळी गाठलेली दिसून येते.
संत तुकारामांनी भागवत, ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा इ. ग्रंथांच्या अभ्यासाने स्वतःच्या इंद्रिय विकारावर ताबा मिळविला. त्यानंतर ज्ञान आणि भक्ती या दोहोंच्या सहाय्याने परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त करून घेतला त्यानंतर त्यांनी रचलेले अभंग हीच त्याची काव्यसंपदा!
झेला रे झेला वरचेवर झेला ।
हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ।।
त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा ।
वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ।।
(अ.क्र. १३९)
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे ।
लाज सांडोनि एक एकी पाहे ।।
फुगडी गे अवघें मोडी गे ।
तरीच गोडी गे संसार तोडी गे ।। (अ.क्र. १५०)
घाली सुतूतू फिरोनी पाही आपुणासि ।
पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ।।
(अ.क्र.१७१)
खेळ मांडियेला वाळवंटी घाई ।
नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ।। (अ.क्र. १८९)
माग विटू दांडू ।
आणीक कांही खेळ मांडूं ।
बहु अंगा आले डाव ।
स्थिर नाहीं कोठें पाव । (अ.क्र.२०१)
मागें पुढे पाहे सांभाळूनि दोनी ठाय ।
चुकावूनि जाय गडी राखे गडियांसी ।।
(अ.क्र.२२७)
हास्य, करुण, भक्ति इ. भावनांची पखरण त्यांच्या अभंगात झालेली दिसून येते. त्याचबरोबर सांकेतिक उपमा, उपमानापेक्षा ते व्यवहारातीलच दृष्टान्ताची योजना करताना दिसतात. तुकारामांच्या अभंगातील प्रतिमासृष्टीत डोकावलं तर त्यात सारा निसर्ग सामावलेला दिसतो. त्यातील अंधार-प्रकाश, दिवस-रात्र, झाडे-झुडुपे, पशुपक्षी, नद्या-सागर, वारा-पाऊस, राने-वने, वाटा-आडवाटा, मेघ-विजा, जलचर अशा विविध गोष्टी येतात. व्यावसायिक दृट्या असलेल्या शेती, व्यापार, दुकानदारी, सावकारी, खाटीक, परीट, वाणी, न्हावी, वैद्य, सोनार इ. निगडीत प्रतिमाही विपुलतेने आढळतात.
पांगुळ, आंधळा, वासुदेव, गावगुंड, जोगी, वैद्यगोळी, गोंधळी असे लोकजीवनातील व्यक्तित्वही त्यांच्या भारुडसदृश केलेल्या रूपकात्मक रचनांतून सामोरे येतात. बऱ्याच वेळा काला चेंडूफळी, फुगड्या, विटीदांडू, हुतूतू, मृदंगपाट्या अशासारखी क्रीडाविषयक रुपकेही आपल्या समोर येतात.
रोजची सोपी, सुटसुटीत अशी शब्दात्मक काव्यरचना ते करतात. कणखर बोलीतून अस्सल मराठी भाषा, व्यापार, शेती, युद्ध, संसार इ. व्यावहारीक क्षेत्रांतील कल्पना वापरून तुकारामांनी-‘अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी’ अशाप्रकारे लेखन केले.
त्यामुळेच त्यात जिव्हाळा आला, औचित्य आले!
निवडावे तण । शेती करावी राखण ।
मूलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ।
विकेल तिथे विका । माती नाव ठेवूनी तुका ।
आम्ही रामाचे राऊत । वीर झुंजार बहुत
कन्या सासुऱ्यासि जाये । मागें परतोनी पाहे ।
या साऱ्यातून त्यांचे व्यावहारिक ज्ञान, मनुष्य स्वभावाची माहिती, समक्ष अवलोकन या साऱ्याचा प्रत्यय येतो. उपमानाची व्यापकता आणि व्यावहारिकता प्रकट होते. शिवाय यात ‘तीक्ष्ण शब्दांची उत्तरे । हात बाण घेऊनी फिरे’ असा बाणाही आहे कारण –
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठिण वज्रास भेदू ऐसे ।
मेले जित असो निजोनिया जागे ।
जो जो जो जे मागे तें तें देऊं ।
भले तरि देऊ कांसेची लंगोटी ।
नाठायाळा चि काठी देऊं माथा ।।
मायबापाहूनि बहु मायावंत ।
करूं घातपात शत्रूहूनि ।
अमृत तें काय गोड आम्हांपुढे ।
विष तें बापुडें कडू किती ।
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड ।
ज्याचें पुरे कोड त्याचेपरि । (अ.क्र.९८१)
हे ब्रीद तुकाराम आपल्या उपदेशपर अभंगातून किबहूना जेथे जेथे दंभ आहे, दुटप्पी वृत्ती आहे, खोटेपणा आहे त्या साऱ्या ठिकाणी कडाडून हल्ला करतात. अरे ला कारे म्हणताना त्यांना विलक्षण त्वेष चढतो. शब्दातील ग्राम्यता, गावंढळपणा याची त्यांना फिकीर नसते.
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड ।
काय त्यास रांड प्रसविली ।।
कुंकवाची ठेवावी बोडकादेवी कशाला ।
तुका म्हणे रांडे लेका, अंती जाशील यमलोका।।
गाढव शृंगारिले कोडे ।
काही केल्या नव्हे घोडे ।।
तुका म्हणे ऐशा नरा ।
मोजून माराव्या पैजारा ।।
असे म्हणताना ते कसलाही संकोच बाळगत नाहीत. कारण त्यांचे हे सारे लेखन म्हणजे ‘तुका म्हणे झरा, आहे मुळीचा चि खरा ।’ या स्वानुभवाच्या तेजामुळेच! त्यांच्या अभंगातील सडेतोडपणा, मार्मिक शब्दरचना यामुळेच त्यांच्या कित्येक अभंगातील चरणाची आज सुभाषिते झाली आहेत.
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।
भिक्षापात्र अवलंबिणे । जळो जिणे लाजिरवाणे।।
आलीया भोगासी असावे सादर
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
महापुरे झाडे जाती । तेथें लव्हाळे वाचती ।
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
असाध्य ते साध्य करीता सायास ।
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।
साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण |
मोले घातले रडाया । नाही आसू आणि माया ।।
अशी अनेक सूत्रे सुभाषिते होऊन सर्वांच्या मुखी झाली आहेत. बहुजन समाजाचे, मनाचे, अनुभवाचे प्रतिनिधीत्व करणारे हे बोल तुकारामाचे श्रेष्ठत्वच पटवून देतात.
तुकारामांचे हे अभंग आजवरच्या काळात अगदी लोकांच्या, या समाजाच्या मुखावर विराजले आहेत. आजही अगदी सर्वसामान्य माणसाच्या मनात आणि ओठांत तुकारामांचे अभंग आहेत. आपल्या आवडीचा चरण मनाशी गुणगुणतांना त्याला अत्यानंद होतो. त्यामुळे आपोआपच तुकारामांबाबत आपलेपणाची भावना मनात रूजते. तुकाराम हे आपल्यातीलच आहेत ही भावना दृढ होते. आपल्याला जे साध्य करता आलेले नाही ते त्यांनी साध्य केलेले आहे. अगदी यशस्वीतेने पार पाडलेले आहे. आपल्यासारखेच किंबहूना आपल्यापेक्षाही जास्त कष्ट सहन करून त्यांनी हे पार पाडलेले आहे हे जाणवल्यामुळेच सर्वसामान्य माणसाला तुकाराम जवळचे वाटतात कारण तुकारामांच्या अभंगातील शब्द हे मनाला दिलासा देणारे वाटतात, ते आश्वासक वाटतात. मनातील विकारांना, इच्छाआकांक्षांना, भावभावनांना दडपून न टाकता तुकारामांनी आपल्या अभंगातून त्यांना मोकळं केलेलं आहे.
तुकारामांची अभंगवाणी ही शहरी-सुशिक्षितांच्या आणि गावंढळ अशिक्षितांच्याही मुखावर नाचत असते. त्यांच्या अभंगांना लाभलेलं हे भाग्य अपूर्व असंच आहे.
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें।
तोचि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ।।
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे ।
आपणासि डोळे दृष्टी नाहीं ।।
दया क्षमा शांति । तेथे देवाची वसति ।।
किंवा
आलिया भोगासि असावे सादर ।
देवावरी भार घालूनिया ||
टाकीचे घाव सोसल्याविना देवकळा येत नाही ।।
अशी भाषा बोलताना आपण तुकारामांचीच अवतरणं वापरत आहोत याची जाणसुद्धा आपल्याला नसते. इतकी ती आपल्या बोलीभाषेशी एकरूप झालेली आहे.
तुकारामांचे हे काव्यविचार त्यांच्या जीवनानुभवातून आणि आत्मानुभवातून व्यक्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यातून उपदेश असला तरी तो प्रत्यक्षानुभवी आहे हे जाणवते. त्यांनी जे जे उत्कटपणे स्वतःला जाणवले व मनाला भावले ते ते अनुभव त्यांच्या अभंगातून व्यक्त केलेले दिसून येतात. म्हणूनच ते थेट मनाला भिडणारे आणि त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देणारे ठरले आहेत.
त्यांना उत्कटपणे जाणवलेले अनुभव आणि त्यांनी अभंगांतून आपल्या जाणिवेचा केलेला आविष्कार अंतर्विरोधी असला तरी त्यामुळेच तर त्यांच्या अभंगांना काव्यात्मकता प्राप्त होते. तुकारामांना आपल्या वैयक्तिक जीवन आणि समाजजीवन यातील आंतर्विरोध जाणवत असावा म्हणूनच आत्मशोध आणि समाजशुद्धी करण्याकरीता घेतलेल्या अनुभवाचे हे प्रकटीकरण प्रत्ययकारी ठरते.
आपली कविता ही इतरेजन लिहीतात तशी शृंगारिक नाही किंवा सजवलेली नाही
उष्टावळी करुनी जमा ।
कुंथुनि प्रेमा आणितसे ।। (अ.क्र. ७९ )
न ये नेत्रां जळ ।
नाहीं अंतरी कळवळ ||
तों हे चावटीचे बोल |
जन रंजवणें फोल ।। (अ.क्र. ८२)
अनुभव आल्याशिवाय मी काही लिहीत नाही. माझ्या अनुभवांशी माझे ईमान आहे हे आपल्या अभंगांतून ते सागतात-
अंतरीं सबाही सारिखा चि रंग ।
वीट आणि भंग नाहीं रसा ।। (अ.क्र.३१७०)
मोकळे मन रसाळ वाणी ।
या चि गुणीं संपन्न ।। (अ.क्र. ९९९)
अशाप्रकारे त्यांनी आपल्या कवित्वासंबंधी उद्गार काढलेले आहेत.
कवी म्हणून तुकारामांची दृष्टी समाजप्रबोधकाची आहे. ते संतकवी असल्यामुळे जनसामान्यांविषयी त्यांच्या मनात कळवळा आहे. जनसामान्यांच्या दुःखात बुडत असता त्यांना धीर देऊन सावरण्यासाठी प्रसंगी कठोर शब्दांनी प्रहार करून त्यांना मार्ग दाखवणे ही गरज आहे. या गरजेपोटीच त्या कळवळ्यातून त्यांचे कवित्व फुलले. तुकारामांचे खरे सामर्थ्य हे त्यांनी घेतलेल्या उत्कट अनुभवात आहे. म्हणूनच ती प्रसंगी तीक्ष्ण बनते तर कधी माधुर्याने ओथंबून येते.
दृष्टान्त आणि रूपक या अलंकाराबरोबर त्यांच्या अभंगातील उपमानसृष्टीही व्यापक असलेली आपणास आढळून येते याचे कारण म्हणजे तुकारामांचे व्यापक असलेले अनुभवक्षेत्र! तुकारामांची ही अभंगवाणी भावकोमलही आहे. याचे कारण कमीत कमी शब्दात एखादा अनुभव साकार करणं! यावरून ती भावकविताही ठरते. प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनातील दर्शन घडवताना ती वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर जाऊन भावकवितेचेच रूप घेते.
संत तुकाराम हे सामान्यातून संतत्वाकडे गेलेले व्यक्तिमत्त्व होते. ते लोकमानसाशी संवाद साधणारे संतकवी होते. त्यांची जीवनदृष्टी व्यापक होती. त्यांनी ‘स्व’चा कधी स्वतःपुरता विचार केला नाही. त्यांचा ‘स्व’ म्हणजे संपूर्ण विश्व! त्यामुळे या जगाच्या कल्याणातच स्वतःचं कल्याण असं त्यांचं मत होतं.
तुकारामांच्या कवितेतून विरोधाभासही जाणवत राहातो. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील ऊन-सावलीच्या खेळासारखा! विफलता-आनंद, भक्ती-क्रोध, आक्रमकता-करुणा अशा भावनांचा खेळ तुकाराम आपल्या काव्यातून घडवितात. यातूनच त्यांच्या काव्य-जाणिवाचे दर्शन घडते.
तुकारामांची कविता सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधीत्व करताना दिसून येते. मनाचे-देहाचे विकार, इच्छा-आकांक्षांची विविध रूपं, क्रोध-संताप- प्रिती अशा प्रकारच्या भावनांचा मुक्त वापर त्यांच्या काव्यातून झालेला दिसतो. त्यात त्यांनी योजलेल्या उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांच्या अलौकिक सौंदर्याने नटलेली ही काव्यसंपदा मराठी भाषेत अजरामर आहे.
कवी म्हणून तुकारामांचं अलौकिकत्व, असामान्यत्व आणि आकाशाएवढं रूप त्यांच्या अभंगातून ठायी ठायी दिसून येतं. भावाभिव्यक्ती आणि प्रत्यक्ष आविष्कार यातील वैशिष्ट्य हे तुकारामांच्या कवितेचं वैशिट्य ठरतं!
(टीप: अ.क्र. ‘अभंगाची गाथा’ श्री विठोबा- रखुमादेवी देवस्थान संस्था, श्री क्षेत्र देहू-नुसार.
— विजय मडव
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
छानच…. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा.🙏🌸