अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये नीता पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख
तुकोबांच्या संपूर्ण प्रपंच विज्ञानाची बैठक त्यांच्या अतिशय खडतर अशा परिस्थितीतूनच निर्माण झालेली आहे. त्यांचा संसार हा इतर सर्वसामान्य जनांसारखा निश्चितच नव्हता. आपल्या संसाराबद्दल आणि त्यातील आपल्या भूमिकेबद्दल तुकारामांनी अनेक अभंगांतून आपले मत स्पष्टपणे मांडलेले आपल्याला दिसते.
तुकारामांनी आपल्या आयुष्यातील खडतर अनुभव आणि अवती – भवती दिसणारे, दुःखाकष्टात राहणारे लोक, विविध यातना सहन करीत जगणाऱ्या लोकांना बघून ते दुःखी होत आपल्या मनातील हे शल्य त्यांनी आपल्या अभंगांतून व्यक्त केले –
आता मी न पडो सायासी ।
संसार दुःखाचिया पाशी ।
आणिक दुःखे सांगों मी किती ।
सकळ संसाराची स्थिती ।
आतां न मज साहवे सर्वथा ।
संसार गंधींची ही वार्ता ।
झालो वेडा असोनि जाणता ।
पावे अनंता तुका म्हणे ।। (४०७८)
(सार्थ तुकारामाची गाथा)
तुकारामांचे संवेदनशील मन तडफडत असायचे. त्याची तीव्रता आपल्याला त्यांच्या शब्दांशब्दांतून जाणवल्याशिवाय राहत नाही.
१६२९ -३० च्या सुमारास दुष्काळ पडला आणि तुकारामांच्या जीवनांतील आनंद, सुख हळूहळू नष्ट होत गेले तेव्हा त्यांनी संसाराचा त्याग न करता त्यांतील आसक्ती काढून घेतली. तुकाराम म्हणतात –
बरे जाले देवा निघाले दिवाळी ।
बरी चा दुष्काळे पीडा केली ।
अनुतापे तुझे राहिले चिंतन |
जाला हा वमन संवसार ।
बरे जाले देवा बाईल कर्कशा ।
बरी हे दुर्दशा जनामध्ये |
बरे जाले जगी पावलो अपमान ।
बरे गेले धन ढोरे गुरे ।
बरे जाले नाहीं धरिली लोकलाज ।
बरा आलो तुज शरण देवा ।। ( ३ ९ ४१ )
मुगल सैन्याकडून झालेला विध्वंस, दुष्काळ अन् त्या पाठोपाठ आलेल्या साथी इतक्या झपाट्याने फैलावत होत्या की खेडीच्या खेडी बेचिराख झाली. अशा स्थितीत संवेदनाशील व्यक्तिच्या मनात ‘जाला हा वमन संवसार’ असे विचार येणे क्रमप्राप्तच आहे.
संसारातील सर्व सुखे रसिकतेने भोगलेल्या तुकोबांना नंतर दारिद्र्याच्या दुःखाचा व उदासीनतेचा मोठा विलक्षण अनुभव आला. त्यामुळे त्यांचे आंतर जीवन ढवळून निघाले. संसार दुःखाच्या तीव्र तापाने त्यांच्या अंतःकरणाची भूमी भाजून निघाली.
तुकोबांची जीवनपद्धती आघातांनी , संकटांनी बदलून गेली होती. तरीही जीवनापासून ते पळून गेले नाहीत. प्रपंच सुख, संसारसुख त्यांनी भोगले होते. पण ते सर्व सामान्य राहिले नाहीत. जीवनात अडकून न पडता त्यातून त्यांनी बाहेर येण्याचा मार्ग शोधला.
आपल्या स्वानुभवाने ते सांगतात की, व्यवहारात हिशोब चुकला तर मेळ बसेपर्यंत माणूस त्याचा पाठलाग करतो. त्याचप्रमाणे आपले हित होण्यासाठी चित्ताला जागे करा. मातीत पुरून ठेवलेल्या धनाच्या ठिकाणी कृपणाचे मन गुंतलेले असते . माणसाने आपले मन नाशवंत विषयांवर न गुंतवता हरी चरणी गुंतविण्याचा प्रयत्न करावा.
संसार ही परमार्थाची पहिली पायरी आहे हे समजून माणसाने संसार करावा. त्यामुळे त्याची सामान्यांतून असामान्याकडे वाटचाल सुरू होते. आपण संसाराच्या मोहात अडकून पडल्याची कबुली देऊन ते म्हणतात मलाही ईश्वराचा विसर पडला होता –
पडिला नामाचा विसर | वाढविला संवसार ।
अशी कबुली तुकोबा देऊन टाकतात.
एका पाठोपाठ एक अशी संकटांची माळ तुकोबांच्या मागे लागल्यामुळे त्यांची साधना अधिक दृढ होत गेली. संकटांनी घेरलेली माणसे एक तर अगतिक होतात किंवा वासनांच्या आहारी जातात. पण तुकारामांनी मात्र संकटांना न घाबरता, संसाराकडे पाठ न वळवता आपले लक्ष ईश्वराकडे वळविले. आपल्या पत्नी व मुलांकडे त्यांचे लक्ष असे. आपली विहित कर्मे पूर्ण करावी हाच त्यांचा आग्रह असे. प्रपंच हे जीवनाचे सर्वस्व निश्चितच नाहीये. परमार्थ संपादन करण्याचे ते केवळ एक साधन आहे. अहंकार, त्याग मोह, मद, मत्सर, परोपकार, क्षमा, शांति अशा सर्व गुणांवर प्रपंचात राहूनच मनुष्य विषय प्राप्त करू शकतो
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचार वेंच करी ।
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ।
भूतदया गाई पशुंचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ।
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे ।
तुका म्हणे हेंचि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ।। (२०८५)
प्रपंचात तारतम्य बाळगून आत्मविकासाच्या पायऱ्या माणसाने चढायला हव्या. ईश्वर भक्तिसाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही.
ज्या संसारात व समाजात तुकाराम वावरले, काही काळ का होईना त्यांनी ते लौकिक सुख अनुभवले होते. त्यात ते रमले होते. परंतु काळाने घातलेल्या घावामुळे ते सावरले. हे सुख किती क्षणभंगूर आहे याची जाणीव प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर ते उदासीन झाले. त्यांची संसारातील एकरुपता, प्रत्यक्ष अनुभूतीतील सखोलता वेगळीच होती. जो अनुभव त्यांनी घेतला तो जगासमोर मांडायचा ही ठाम भूमिका त्यामागे आहे असे दिसते.
तुकाराम म्हणतात गृहस्थाश्रम हे दुःखाचे मूळ कारण नाही. दुःखाचे मूळ कारण म्हणजे संसार संसार ही खरं म्हणजे परमार्थाची पहिली पायरी आहे. हाच मार्ग माणसाला परमार्थाकडे नेतो. परमार्थ प्राप्तीसाठी घर संसार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही –
नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापें जन्मांतरींचीं ।
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण । तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनि ।
शहाणा तो धणी घेतो येथे ।। ( १६९८ )
संसार आणि त्यातील लौकिक सांभाळणे हे अत्यंत अवघड आहे. या अनुभवातून तुकाराम देखील पोळून निघाले होते. मनुष्य प्रवृत्ति अशी आहे की ती दोन्हीकडून बोलत असते. कोणत्याही एका मार्गाने ती तुम्हाला जावू देत नाही. एखादा माणूस व्यवस्थित संसार करीत असेल तर त्यास लोक म्हणतात की सदा सर्वकाळ हा माणूस संसारात मग्न असतो. देवाचे करण्याकडे काही याचे लक्ष नाही. व्यवस्थित पूजापाठ, सत्संग करणाऱ्या माणसालाही लोक बोल लावतात. संसारात लक्ष नाहीये, नपुंसक असणार म्हणायलाही कमी करत नाहीत. हे सांगताना तुकाराम म्हणतात
ऐसा हा लौकिक कदा राखवेना ।
पतित पावना देवराया ।
संसार करिता म्हणती ही दोषी ।
टाकिता आळसी पोट पोसा ।
आचार करिता म्हणती हा पसारा ।
न करिता नरा निंदिताती ।
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासी ज्ञान नाही ।
लग्न करूं जाता म्हणती हा मातला |
न करितां जाला नपुंसक ।
निपुत्रिका म्हणती पहा हा चांडाळ ।
पातकाचे मूळ पोरवडा |
लोक जैसा ओक धरिता धरवेना ।
अभक्ता जिरेना संतसंग ।। ( १२४ )
आजच्या काळातच नव्हे तर तुकारामांच्या काळात देखील लग्न झालेल्या मुलींना वेगळा संसार थाटायची इच्छा असायची. कुटुंबातील बंधने, बांधिलकी त्यांना नकोशी वाटायची वेगळे राहिल्यामुळे मिळणारे स्वातंत्र्य, अधिकार आणि हवा असलेला मोकळेपणा मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यासाठी स्त्री आपल्या पतिकडे घरातल्यांच्या तक्रारी करते.
कधी त्याला लाडीगोडीने तर कधी हावभावाने संभ्रमाने जिंकायचा प्रयत्न करते. कधी कधी तर ती त्याच्यापासून दूर राहून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करते. तिच्या या वागण्यामुळे नवरा तिच्या कह्यात जातो. हा प्रातिनिधिक स्वरुपाचा मानवी स्वभाव दर्शविताना तुकोबा म्हणतात.
भ्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी ।
मज ऐसी कष्टी नाही दुजी ।
अखंड तुमचे धंद्यावरी मन ।
माझे तो हेळण करिती सर्व ।
जोडितसा तुम्ही खाती येर चोर ।
माझीं तंव पोरे हळहळती ।
तुमची ल्याली माझे डाईं हो पेटली ।
सदा दुष्ट बोली सोसवेना ।
दुष्टवृत्ति नंदुली सदा द्वेष करी ।
नांदों मी संसारी कोण्या सुखें ।
जावा दीर कांहीं धड ही न बोले ।
नांदो कोणाखालें कैंसी आता ।
माझ्या अंगसंगे तुम्हांसी विश्रांती ।
मग धडगति नाही तुमची ।
टाकते ठमकते जीव मुठी धरूनि ।
परि तुम्ही अजूनि न धरा लाज ।
वेगळे निघतां संसार करीन ।
नाहीं तरी प्राण देते आता ।
तुका म्हणे झाला कामाचा अंकित ।
सांगे मनोगत तैसा वर्ते ।। ( ३२१२ )
संसारातील नाजूक जागा स्पष्ट करण्यामागील अनुभवाचे बोल सांगताना तुकोबा वाचकांसमोर हे सांगण्याचा प्रयत्न करतात की स्त्री मोह, वासनेपुढे माणसाचा विवेक विचार कसा निष्प्रभ होतो. संसारातील हा अनुभव घेतल्याशिवाय केवळ कल्पनेने या गोष्टी लिहिणे अशक्य वाटते. माणूस संसारात प्रेमाच्या, मायेच्या, स्वार्थाच्या आहारी अधिकाधिक गुंतत जातो. पण तरीही त्याला प्रपंचातील फोलपणा, विफलता लक्षात येत नाही. माणूस आत्मकेंद्रित झालेला असतो. आपल्या पलीकडचा विचार करणे तो विसरून जातो .
तुकोबा एवढेच सांगून थांबत नाहीत . स्त्रीच्या आहारी जावून पुरुष किती हतबल होतो ही गोष्ट स्पष्ट करताना , वासनाधीन होऊन तो बायकोला आश्वस्त करीत म्हणतो-
कामाचा अंकित कांतेते प्रार्थीत ।
तू कां हो दुश्चित निरंतर माझी मायबापे बंधु हो बहिण।
तूज करिती सीण त्यागीन मी ।
त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता ।
तरी मज हत्या घडो तुझी ।
सकाळी उठोन वेगळा निघेन।
वाटतों तुझी आण निश्चयेंसी।
वेगळे निघता घडीन दोरे चुडा ।
तूं तब माझा जोडा जन्माचा की ।
ताईत सााळी गळांची दुल्लडी ।
बाजुबंद जोडी हातसर ।
वेणीचे जे नग सर्वही करीन ।
नको धरू सीण मनी कांहीं ।
नेसावया साडी सेलारी चुनडी ।
अंगींची काचोळी जाळिया फुले ।
तुका म्हणे केला रांडेने गाढव ।
मनासवें धाव घेतलीसे || ( ३२१३ )
स्वार्थाने अंध झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा विरोध करून विभक्त होण्याच्या पत्नीच्या विचाराशी सहमत होणाऱ्या माणसाचे वर्णन करून ते जनतेला सावधतेचा इशारा देतात . आयुष्यात अनेक ठिकाणी ठेचकाळणाऱ्या संसाराच्या वणव्यात देहाची अभिलाषा धरणाऱ्या अज्ञान माणसांना ते वेळीच सावरण्यास सांगतात .
अशा प्रकारच्या कुटुंब कथांतून प्रपंचातील आसक्ती , मोह यावर तुकोबा उपहासात्मक टीका करताना दिसतात .
अनादि काळापासून मानवामध्ये वासनापूर्तीची इच्छा आहे . वासना त्याग केल्यानंतरच तो जीवनाचे रहस्य जाणू शकेल . परंतु आजची स्थिती उलटी झाली आहे . लोक वाईट गोष्टी करतात अन् त्याचे समर्थनही करतात . वरून हे आमच्या कर्माचे फळ आहे , आम्ही काय करू शकतो म्हणून मोकळे . हा युक्तिवाद अत्यंत घातक आहे . कर्माच्या फळामुळे भोग उत्पन्न झाले तरीही त्यावर आसक्ती ठेवू नये ही गोष्ट लोकांना पटविण्याचा तुकारामांनी प्रयत्न केला-
माकडे मुठीसी धरिले फुटाणे ।
गुंतले ते नेणे हात तेथें ।
काय तो तयाचा लेखावा अन्याय |
हित नेणें काय आपुले तें ।
शुके नळिकेशीं गोविचळे पाय |
विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।
तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।
न चलें उपाव तेथे कांहीं ।। ( १०४ )
संसाराचा मोह कैफ आणतो . माणसे बेभान होऊन जातात . त्यांतून बाहेर पडणे देखील अशक्य होऊन जाते . माणसाचे मन क्षुद्र असू नये . कमजोर मनाची माणसे हतबल होतात , लंपट होतात . माणसाने प्रपंच जरूर करावा पण वासनेच्या आहारी जाऊ नये . देह क्षुद्र नाही , पण देह पूजाही नसावी . माणसाची बुद्धी कुशाग्र असावी . सूक्ष्म निरीक्षण , अवलोकन असावे . विचार सर्वंकष असावे . जीवनातील प्रपंचातील गोडी जरूर चाखावी परंतु गुळाभोवती घुटमळणाऱ्या मुंगळ्याची लोचट वृत्ती असू नये.
मोहाच्या दुष्ट चक्रांतून बाहेर पडणे कठिण होऊन बसते . अर्थात अभ्यासपूर्वक या चक्रांतून प्रयत्नांनी बाहेर पडणें शक्य असते , असे तुकोबा सांगतात .
सांसारिक गोष्टींकडे माणसाचे मन त्वरेने धाव घेते . संसाराविषयीचे संकल्प सतत त्याच्या मनात असतात . ईश्वराचे नाव घेताना त्याला कष्ट होतात पण संसाराच्या इतर सर्व गोष्टीत मात्र तो रममाण असतो –
संसाराचे धावें वेठी ।
आवडी पोटी केवढी ।
हागो जातां दगड सांची ।
अंतरींही ( हे ) संकल्प |
लाज तेवढी नारायणी ।
वांकडी वाडी पोरांपे ।
तुका म्हणे बेशरमा ।
श्रमावरी पडिभरू ।।
( २७५३ )
संसाराच्या वणव्यात देहाची अभिलाषा धरणारी भोवतालची माणसे अज्ञानी आहेत हे जाणून तुकाराम त्यांना सांगतात – कोणत्याही प्रकारे परस्त्री , परद्रव्याचा प्रयत्न करू नका . अति तृष्णा वाढल्याने माणसाला कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही . ईश्वरावर विश्वास ठेवून संसार करा . मग तोच तुमचा योगक्षेम चालवितो . त्यात काही तूट होऊ देत नाही . कर्ता – करविता देव आहे यावर विश्वास ठेवा –
इतुले करी भलत्यापरी । परद्रव्य पर नारी ।
सांडुनी अभिलाष अंतरी । वर्ते वेव्हारी सुखरूप ।।
न करी दंभाचा सायास । शांति राहे बहुवस ।।
जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळस रामनामी ।।
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ।।
संग न धरावा दुर्जनाचा । करी संतांचा सायास ।।
( ४११४ )
तुकाराम महाराज म्हणतात माणसाला स्वार्थ अन् परमार्थ देहोंचा समन्वय साधता आला पाहिजे . माणसाच्या जीवनाचा प्रवास हा तिमिराकडून प्रकाशाकडे , जीवात्म्याकडून शिवात्म्याकडे , स्वार्थापासून परमार्थाकडे व्हायला हवा .
माणसाने अद्वैत बुद्धीचा अंगीकार करून वसुधैव कुटुम्बकम बुद्धीने गृहस्थाश्रमाचे पालन केले पाहिजे . गीतेत म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाचा मार्ग अंगिकार केला तर जीवनमुक्तता प्राप्त होऊ शकते . कर्तव्याचे पालन करताना आपोआप सारासार विचार , सदविवेक , नैतिकता सर्वांचा समावेश होतो . तेव्हा यश – अपयशाची चिंता करत बसू नये . यथाशक्ति सर्वांना मदत करावी . सर्वांना आपले मानावे . हाच खरा गृहस्थधर्म आहे जी व्यक्ति या धर्माचे पालन करते त्याला निश्चितच गृहसौख्य प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो .
संसारी माणसाने षडरिपूंवर विजय प्राप्त करणे गरजेचे आहे . दया , क्षमा , शांती हे त्याचे अलंकार असायला हवेत . असत्य बोलणे , खोटेपणाने लोकांस फसविणाऱ्या भोंदू , बैरागी , दांभिक गुरूंपासून सावध राहाण्याचा इशारा ते देतात . मद्यपान , वेश्यागमन करणाऱ्या लोकांची व खोटेपणाने परमार्थाची दुकाने मांडणाऱ्या लोकांची तुकोबा भर्त्सना करतात . संसारी लोकांना मध्य मार्ग दाखवून ते सांगतात की , माणसाने संसारातून निवृत्त होऊ नये . सुख भोगावे पण ‘ परमार्थासी सोडू नये प्रपंच बळे । ‘ तुकोबांनी हा उपदेश स्वतः आचरिला होता . प्रत्यक्षानुभूतीतून व संसाराच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघाल्यामुळे त्यांचा उपदेश जास्त सार्थ वाटतो –
अनुभवा आले अंगा । ते या जगा देतसे ।।
नव्हती ( हाततुके ) आहाततुके बोल |
मूळ ओल अंतरीची । उतरूनी दिले कशीं ।
शुद्धरशीं सरतें । तुका म्हणे दुसरे नाहीं ।
ऐसी ग्वाही गुजरली ।।
( २०६७ )
तुकोबांच्या सांसारिक एकरूपतेतील व प्रत्यक्षानुभूतीतील सखोलता , उत्कटता इतरांच्यापेक्षा खूप वेगळी आहे असे स्पष्ट दिसून येते.
संसार करताना माणसे त्यांत गुरफटून जातात . अलिप्तपणे संसार करणे अधिकांश लोकांना शक्य होत नाही . मायेच्या मोहांतून म्हातारपण आल्यानंतरही त्याला बाहेर पडता येत नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात-
परिसें गे सुनबाई । नको वेंचूं दूध दहीं ।।
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ।।
ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटके पाळें ।।
माझे हातींचा कलवडू । मजवांचूनि नको फोडूं ।।
वळवटक्षिरींचें लिंपन । नको फोडूं मजवांचून।
उखळ मुसळ जातें । माझे मन गुंतले तेथें ।।
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ।।
सून म्हणे बहुत निके । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ।।
सासूबाई स्वहित सोडा । सर्व मागील आशा सोडा ।।
सूनमुखींचे वचन कार्नी । ऐकोनि सासू विवंची मनी ।।
संसार हा क्षणिक , नाशवंत आहे याची कल्पना असूनही मानवी मनाची ओढ सुटत नाही . अनंत ईश्वराला विसरून तो विनाशी संसाराच्या मोहांत अधिकाधिक गुरफटत जातो अन् शेवटपर्यंत त्यापासून मुक्त होऊ शकत नाही .
तुकारामांनी संसाराचा जीवन कलह बघितला होता . धगधगत्या आगीत ते स्वतः होरपळून निघाले होते . त्यामुळे मनातील दाह लोकांसमोर मांडताना ज्वालेची प्रखरता त्यांच्या शब्दांना लाभलेली दिसते . संसार हा विलक्षण दुःखानी भरलेला आहे . नियतीसारख्या बलाढ्य शक्तीसमोर माणूस अतिशय दुबळा ठरतो .
तुकोबांनी ‘ याचि देही याचि डोळा ‘ संसाराची दाहकता अनुभवली होती . या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार खोलवर परिणाम झाला होता . सुखदुःखाची झळ सोसून ते त्यातून तावून सुलाखून निघाले . त्यांच्या वाटेला आलेल्या उग्र कठोर संसाराला ते सामोरे गेले . म्हणूनच संसारात अडकून पडलेल्या , अगतिक झालेल्या लोकांना तुकाराम म्हणतात-
सुख नाही कोठे आलिया संसारी ।
वाया हावभरी होऊ नका ||
दुःख बांदवडी आहे हा संसार ।
सुखाचा विचार नाही कोठे ।।
चवदा कल्पेवरी आयुष्य जयाला ।
परी तो राहिला ताटीतळी ( खाली ) ।।
तुका म्हणे वगी जाय सुटोनिया ।
धरूनि हृदयामाजी हरि ।। ( १७२४ )
तुकोबा म्हणतात माणसाने आपली विहित कर्म निष्ठेने करायला हवी . संसार करताना वाईट वागून समाजाला भार स्वरूप होऊ नये . प्रपंचात विवेक असणे अत्यंत गरजेचे असते . परस्त्रीला आईप्रमाणे मानावे . दुसऱ्याची निंदा करू नये . खरे बोलण्यासाठी माणसाला पदरचे काहीही खर्चावे लागत नाही . हे सांगताना तुकोबा म्हणतात –
परकिया नारी माउली समान ।
मानिलिया धन काय वेचे ।।
न करितां परनिंदा परद्रव्य अभिलाष ।
काय तुमचे वेचें सांगा ।।
खरे बोलता कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसे सांगा ।।
तुका म्हणे देव जोडे याजसाठी ।
आणिक ते आटी न लगे काही ।। ( ३८ )
संसार करता करता , कुटुंबाची देखभाल करताना आपणाला अत्यंत शीण आला आहे , ही गोष्ट ते विठ्ठलाजवळ कबूल करताना तुकोबा म्हणतात-
संसारतापें तापलो मी देवा ।
करिता या सेवा कुटुंबाची ।।
म्हणऊनि तुझे आठविले पाय ।
ये वो माझे माय पांडुरगा ।। ( ६६ )
संसारात रमणारे तुकाराम आपण वैराग्याकडे कसे वळलो हे सांगताना संतांना म्हणतात-
ऐका वचन हे संत ।
मी तो आगळा पतित ।।
बहु पीडिलो संसारे ।
मोडी पुसे ( पिसें ) पिटीं ढोरें ।।
न पडता पुरें ।
या विचारें राहिलों ।। (३९४० )
आणि
बरें जालें देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळे पीडा केली ।
अनुतापें तुझे राहिले चिंतन ।
झाला हा वमन संवसार ।
हे सांगताना आपल्या संसाराचे अलिप्तपणे वर्णन तुकोबांनी केलेले दिसून येते .
प्रपंचसुखासाठी तुकोबांनी सांगितलेली गृहस्थाश्रमाची कर्तव्ये कौटुंबिक व्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही . त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समाजोन्मुखता , परखडपणा , निधडेपणा , स्पष्टवक्तेपणा आहे व त्यांच्या जीवनानुभावाने त्याची वीण घट्ट केली आहे . म्हणूनच त्यांचे उपदेश हे आजही संसारी लोकांसाठी अतिशय मोलाचे ठरतात . संसारात गुरफटून घेणार असोत किंवा स्वार्थासाठी आपल्या आईवडिलांचा त्याग करून त्यांना वृद्धाश्रमात पाठविणारी मुले असोत सर्वांचे डोळे उघडण्याचे महत्त्वाचे कार्य तुकोबांनी केलेले आहे .
– नीता पांढरीपांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply