एका परीच्या घरी काही रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत फिरत आली. ती त्यांच्या घरून निघतांना उपाशीच निघाली होती. परीने ही गोष्ट त्यांच्या म्लान झालेल्या चेहर्यांकडे पाहून ताडली होती. बराच लांबचा प्रवास झाला होता त्यांचा. परंतु परी तिच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. हातचे काम आटोपून मग फुलपाखरांचे स्वागत करावे असे तिने आपल्या मनाशी ठरवले होते. परीच्या परस बागेत घिरट्या घालत ती फुलपाखरे वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या या झाडावरून त्या झाडावर मकरंद खात आपापली तहानभुक भागवत होती.
तितक्यात ती परी परसबागेत आली. परीने फुलपाखरांचे स्वागत करण्यासाठी गुळपाणी आणले. फुलांच्या मकरंदाने ज्यांची मने तृप्त झाली नव्हती त्यांनी गुळपाण्यावर मनसोक्त ताव मारला. नंतर गप्पाटप्पाला तसेच ख्यालीखुशालीला सुरुवात झाली.
एक एक फुलपाखरू प्रवासात झालेल्या फजितीचे वर्णन करू लागले. फुलपाखरांच्या गोड चिमण्या आवाजातील कथा ऐकतांना परी अगदी तल्लीन झाली होती. तितक्यात एक फुलपाखरू शिंका देत आहे हे परीच्या लक्षात आले. परीने लगबगीने एका झाडाची चारपाच पाने तोडली. पाटावरवंट्याने रगडुन एका पांढर्या स्वच्छ कपड्यात घालून इवल्याशा भांड्यात त्याचा रस पिळून काढला. त्या रसात चवीला मध घातला आणि ते मिश्रण शिंका देणार्या फुलपाखराला चाटण्यास दिले. ते मिश्रण चाटून झाल्यावर त्या फुलपाखराच्या शिंका देणे कमी झाले.
तेव्हड्यात दुसरे फुलपाखरू खोकलत आहे हे परीच्या लक्षात आले. परीने पुन्हा लगबगीने त्याच झुडपाची पाचसहा पाने तोडली. पाटावरवंट्याने रगडली. एका पांढर्या स्वच्छ कपड्याने त्याचा रस पिळून काढला. त्या रसात चविला मध घातला आणि ते मिश्रण सतत खोकलणार्या फुलपाखराला चाटण्यास दिले. ते मिश्रण चाटून झाल्यावर त्या फुलपाखराचचे खोकलणे कमी झाले.
पुन्हा त्याच्या गप्पा, धिंगामस्तीला सुरुवात झाली. तर तिकडे परीची आपली वेगळीच घाई सुरू. परी आपल्या दैनदिन कामात व्यस्त. फुलपाखरे मात्र कुणी या झाडावरून त्या झाडावर उडत होते तर कुणी झाडांच्या पानाफांद्यासोबत झोके घेत आनंद लुटत होते. परी जरी तिच्या कामात व्यस्त होती तरी आलेल्या पाहुण्यांकडे तिने दुर्लक्ष केले नव्हते. मधून मधून ती पाहुण्यांच्या करामती न्याहाळत होती. तितक्यात एक फुलपाखरू आपली स्वत:ची छाती आपल्या उजव्या हाताने चोळत आहे हे परीच्या काकदृष्टीने टिपले. परी हळूच पावलांनी त्या फुलपाखराजवळ गेली. त्या फुलपाखराच्या पाठीवरून तिने मायेने हात फिरविला. त्या फुलपाखराला काय त्रास होत आहे याची आपुलकीने चौकशी केली. तेंव्हा त्या फुलपाखराने त्याच्या छातीत जळजळ होत असल्याचे परीच्या कानात संगितले . ते फुलपाखरू परीच्या कानात कुजबुजत असतांना परीच्या कानाला गोड गुद्गुद्ल्या होऊ लागल्या. परीला तो स्पर्श खूप हवाहवासा वाटला. परंतु त्या फुलपाखराच्या छातीत जळजळ होत होती, त्यावर काही इलाज करणे तातडीचे होते. म्हणून परी पुन्हा त्याच झाडाजवळ गेली. यावेळी मात्र परीने त्या झाडाची पाने तोडली नाहीत. तर यावेळी परीने त्या झाडाच्या मंजुळा तोडल्या. तोडलेल्या सगळ्या मंजुळा एका भांड्यात ठेवल्या. हळुवार सगळ्या मंजुळा स्वत:च्या मऊमऊ हाताने कुस्करल्या. काडीकचरा भांड्याच्या बाहेर काढला. एका कागदाच्या पुडीत तो बांधून ठेवला. भांड्यात आता फक्त त्या झाडाच्या बिया उरल्या होत्या. परीने त्या सगळ्या बियांची मिक्सरने पूड केली. परीच्या घरी एक कपिला गाय होती. त्या गायीचे तिने दुध काढले. या दुधासोबत बियांची पूड उकळून छातीत जळजळ होत असलेल्या फुलपाखराला पिण्यासाठी दिले. त्या फुलपाखराने ते दूध पिले आणि काही क्षणात ते फुलपाखरू आनंदाने इतर सवंगड्यांसोबत बागेत बागडू लागले.
परी पुन्हा आपल्या दैनदिन कामात व्यस्त. तितक्यात चार फुलपाखरे रडत रडत परीकडे आली . परीने आपल्यापरिने त्यांची विचारपूस केली. समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या फुलपाखरांचे रडणे काही थांबत नव्हते. मग परीने त्यांच्या आरोग्याबद्दल विचारणा केली. तेंव्हा तिसरे फुलपाखरू रडतरडत सांगू लागले, “ माझ्या की नाही पायाची आग होत आहे.” तर चौथे फुलपाखरू सांगू लागले, “ माझ्या नाकातून रक्त येत आहे. मी माक्स लावून तोंड झाकून ठेवले म्हणून कुणालाही ते दिसले नाही.” पाचव्या फुलपाखराने संगितले, “ माझ्या तोंडातले आले आहे.” सहाव्या फुलपाखराचा आजार सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो आजार सांगण्यासाठी ते फुलपाखरू कां कू करू लागले. मग परी त्याला सगळ्या फुलपाखरांपासून दूर एकांतात घेऊन गेली. त्याची तिने एकांतात विचारपूस केली. तेंव्हा त्याने संगितले की, “ मला मूळव्यादीचा त्रास होत आहे.”
परीने सगळ्या फुलपाखरांचे आजार समजून घेतले . सगळ्यांना एका फुलाच्या झाडावर एकत्र बोलविले. त्यांची सभा भरविली. सगळ्यांना वहीपेन काढण्यास सांगितले. सर्वांनी आपापले वहीपेन काढले. परीने सूचना केली, “ आज मी तुम्हाला आरोग्य विषयक खूप महत्वाची माहिती आणि काही उपाय सांगणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या वहीमध्ये मी सांगितलेली सगळी टिपणे सुवाच्च अक्षरात लिहून ठेवायची आहेत. एवढेच नाही तर त्याचा दररोज उपयोग करावयाचा आहे.”
सगळी फुलपाखरे कान देऊन ऐकत होती. टिपणे काढत होती. परी सांगू लागली, “ हे झाड आहे …आपल्या अंगणात असलेली तुळस. हिची आपण तुलसी माता म्हणून पूजा करतो. त्याचे कारण काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला ? ….. हे झाड अनेक आजारावर गुणकारी औषध पुरविते. तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’’ असे आहे. तुळशीची पाने उष्ण असतात म्हणून कफदोषांमध्ये वापरतात. ही पाने आपण नुसतीदेखील चावून खावू शकतो. याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणार्या असतात. म्हणून आपल्या शरीरातील उष्णतेचे दोष ( पित्तदोष) घालविण्यासाठी म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, मूळव्याद, इत्यादीकरिता घेतात. ह्या बिया दूध किंवा तुपासोबत घ्याव्यात. 20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्यात आणि एकावेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीनचार वेळा करावे.
सर्दी आणि तापाकरिता तुळशीचा रस काढणे – एक कप तुळशीची पाने पाच मिनिट पाण्यात भिजवावित. मग ती वाटून कपडातून गाळावी. याचा 20 मिलि. म्हणजे साधारण अर्धा कप रस काढावा. हा मोठ्या माणसांकरिता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा.”
सगळ्या फुलपाखरांनी ‘तुलसी माता की जय’ चा नारा दिला. परीचे सगळे संभाषण सगळ्या फुलपाखरांनी आपआपल्या वहीत नोंदवून घेतले आणि परिताई कडून आपआपल्या घरी परत जाण्याची परवानगी घेतली.
— श्रीपाद यशवंतराव देशपांडे
परभणी
9421083255
shripad1765@gmail.com
Leave a Reply