सिध्दार्थने डोळ्यातील अश्रू पुसत लहान ओवीकडे पाहिले. ओवी गाढ झोपेत होती. तो लवकर उठला आणि फ्रेश झाला आणि ओवीच्या नाश्ता आणि जेवणाच्या तयारीला लागला. मध्येच तो घड्याळाकडे बघत राहिला. ऊठ बेटा शाळेत जायचं आहे. मला नाही जायचं शाळेत बाबा कुजबुजत ओवी म्हणाली. ओवी, उठ बेटा आणि आपल्या लेकीला मिठीत घेत गुदगुल्या करून सिध्दार्थने उठविले. सिध्दार्थच्या आयुष्यात फक्त एक ओवी उरली होती, तीच त्याच्या जगण्याचं कारण होती. ओवीला तयार करणं, तिला नाश्ता भरवणं आणि बसमध्ये बसणं, त्यातच आपल्या ऑफीसची तयारी करणं हे सगळं त्याच्या सकाळच्या धावपळीत गुंतलेलं होतं. रोज सकाळी ओवी तिच्या आईच्या फोटोसोबत बोलते, “आई, बाबा खूप चांगल्या प्रकारे माझ्या वेण्या बनवायला शिकला आहे. आणि तुला माहित आहे का, शाळेत राहुलने माझी पेन्सिल घेतली आणि काय काय ती त्या फोटोकडे बघुन सांगत रहायची, आणि जाता जाता फोटोतल्या आईला गोड पापा देत ती शाळेत जायची. वडील आणि आई अशी दुहेरी भूमिका सिध्दार्थ खुप चांगल्या प्रकारे वठवित होता. आता तर शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सगळ्या आईंसोबत सामील झाला होता, सुरुवातीला सगळं काही विचित्र होतं पण आता सवय झाली होती.
सगळ्यांनी खूप म्हटलं, पुन्हा लग्न कर, ओवीला आई मिळेल आणि तुला बायको मिळेल, पण सिध्दार्थ नेहमी काहीतरी कारणं काढुन नाकार द्यायचा, माझी बायको फक्त तूच होतीस, बाकी कोणी कसं तुझी जागा घेणार? संपूर्ण घर समिधाच्या फोटोंनी भरले होते ज्यामुळे त्याला ती कायम आपल्या जवळ असल्याचे जाणवायचे. आत्ता स्वयंपाकघरातून आवाज येईल. “हे काय सिध्दार्थ ? आवर लवकर, नाश्ता थंड होत आहे…! आलोच समिधा…. ओह्ह….” डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. सारे सुख वाळूसारखे हातातून निसटले होते, आणि उरले होते फक्त सिध्दार्थ आणि ओवी याला नशिबाचा खेळ म्हणा की समिधाच्या बाजुने गाडीची टक्कर झाली होती. मागच्या सीटवर बसलेल्या ओवीला फक्त ओरखडेच आले होते आणि मलाही किरकोळ दुखापत झाली होती, त्यामुळे मृत्यू फक्त माझ्या समिधाचाच आला होता का? हाच प्रश्न समोर घेऊन तो रोजचं विचारात पडायचा. माझे न जन्मलेले मूलंही सोबत आईच्या पोटातच गेले. ओवीला सांभाळणे खूप अवघड होते. आणि त्यापेक्षाही आज तुम्ही दोघं जर असता तर आपला संसार पूर्ण झाला असता, “तू माझं पहिलं प्रेम आहेस, समिधा, का मला एकटं सोडुन जायची एवढी घाई केलीस, रोज समिधाच्या फोटासमोर तो तक्रार करायचा, पण आता ती कुठे होती रुसायला.
आता जगण्याचा एकमेव आधार ओवी आहे. आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत. मी तुझ्या मुलीला तुझ्यासारखीच बनवीन समिधा हे माझं वचन आहे तुला. सात जन्माची साथ मागायचीस ना माझ्याकडून, आता पुढच्या जन्मी अशी घाई करु नकोस. आता सवय झाली आहे या भेसुर शांततेसह आयुष्य जगण्याची. कारण “माझ्या आयुष्याचं संगीत तर तु तुझ्यासोबत घेऊन गेली आहेस समिधा. तरीही जगतोय मी आयुष्य अश्वस्थाम्यासारखं भळभळती जखम कपाळावर घेऊन, तुझ्यासोबत जगण्याची नवी पहाट पुन्हा नव्याने उगवण्याची आशा उरी बाळगुन.
© शरद कुसारे
दि.०५.०२.२०२२
Leave a Reply