“जैत रे जैत” मधील “जांभूळ पिकल्या झाडाखाली —- ” ची नजाकत जावेद अख्तरने – ” होली आई ,होली आई, देखो होली आई रे ” मध्ये बरहुकूम आणली आहे. संपूर्ण गाणं रंगछटांनी भरल्यावर, विशेषतः पिकलेल्या जोडीने ” तुम हो तो हर दिवाली, हर दिन मेरी होली हैं ” हे जीवनोत्सवावर भैरवी भाष्य करणं आणि यातून त्यांचे अभिन्नत्व दाखविणे हे फक्त केवळ !
हिंदीत अपवादानेच आढळलेल्या पंडीत हृदयनाथांनी ” मशाल” मध्ये अप्रतिम संगीत दिले. गुलाबी चित्रपट काढणारे यश चोप्रा इथे प्रौढ दिलीप कुमारला ” अँग्री ओल्ड मॅन ” म्हणून पडद्यावर घेऊन आले. आपली ट्रॅजेडी प्रतिमा दूर ठेवीत या गृहस्थाने येथे आयुष्यातील एक उत्कृष्ट भूमिका साकारली. म्हणतात की कानेटकरांच्या (ज्यांची सध्या जन्मशताब्दी धडाक्यात साजरी होत आहे) “अश्रूंची —- ” वर आधारीत हे कथानक आहे. पण हिंदीतील मसाला येथे व्यवस्थित कोंबून तो चित्रपट प्रेम-अंगार-सूड-विरह आणि काय काय जॉनरचा बनवलाय.
आमचे मराठीतील दिलीपकुमार (निळू भाऊ) येथे तोडीस तोड आहेत. आज हा चित्रपट बघितला की कोवळा आलोकनाथ आणि अन्नू कपूर पटकन ओळखू येत नाहीत. करिअरच्या सुरुवातीला खूप छान छटा असलेली भूमिका अनिल कपूरला मिळाली आहे. होतकरू अनिलने एकतानतेने गुरु “दिलीप ” कडून पाठ गिरवले आहेत, त्यापुढे मानधनाची मातब्बरी ती काय? तसा “शक्ती “मध्ये थोडावेळ तो दिलीप समोर होता पण त्यांत दोघांच्या मधील पडदा अमिताभने व्यापला होता.
इथे मात्र रोखठोक समोरासमोर – दिलीप आणि अनिल !
सूर्य अस्ताला निघाला तरी तो “सूर्य ” असतो आणि जातानाही आभाळ व्यापून जातो हे अभिनयाच्या विद्यापीठाने येथे पडदाभर (आणि सिनेमाभर) दाखविले आहे. वहिदानेही जीव तोडून त्याला साथ दिलीय.
दिलीप ही चीज सिद्ध करणारा या चित्रपटातील एक अजरामर प्रसंग मला कायम भावतो-
पत्नी सुधाला रस्त्यावर बसवून हा बेभान पती पावसाळी रात्रीच्या रस्त्यातील दिसणाऱ्या प्रत्येक गाडीला अडवितो, हात जोडून मदतीची अजीजी करतो,मध्येच बायकोला धीर देतो, बंद दारे ठोठावतो आणि चक्क पत्थरही भिरकावतो. हृदयनाथजी पार्श्वभूमीला ” असा बेभान हा वारा, कुठे ही नांव मी नेऊ ? ” ही सांद्र धून लावतात. यापेक्षा पती-पत्नींची तडफड अधिक चांगली शब्दांकित होऊच शकली नसती.
” तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?” म्हणत वहिदा उरलेलं सहजीवन त्याच्या झोळीत टाकून न परतीच्या प्रवासाला निघून जाते.
सारे प्रयत्न विफल झाल्यावर वेदनेने जीव गेलेल्या पत्नीला दिलीप आपल्या कुशीत घेऊन बसतो. पण त्याआधी शेवटच्या श्वासामागे ” तुम हो तो हर रात दिवाली, हर दिन मेरी होली हैं !” हे निःशब्दपणे वाजत असते.
दिलीपची ऊंची इथे संपत नाही.
अनिल कपूरला आपल्या पडझडीचे हिशेब देण्यापूर्वी तो पुन्हा एका रात्री त्याच ठिकाणी अनिल कपूरला घेऊन येतो आणि तो अजरामर प्रसंग तितक्याच भावनिक इंटेन्सिटीने recreate करतो. आपण बघतच राहतो. असा प्रयोग /प्रसंग यापूर्वी पडद्यावर कधी दिसला नव्हता.
जोपर्यंत दिलीपसाब आपणांत आहेत, तोपर्यंत निर्धास्तपणे म्हणू या – “ तुम हो तो हर रात दिवाली, हर दिन हमारी होली हैं !”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply