देव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात. खरे सांगू? मी याच्या या ‘कुल’पणावरच आशिक होते. नाहीतरी लग्नाच्या आधी थोडं मर्यादाच पाळायला हव्यात, नाही का? तो हि माझ्यासारखाच आय टीवाला, त्या मुळे प्रोफेशनल क्ल्याशेषचा प्रश्न नव्हता. आणि मी हाडाची रसिक आहे! रोमँटिक नेचरची! तेव्हा याला बदलणे माझ्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ, तेव्हा मला वाटलं होत!
आज लग्नाला दोन वर्ष झाली. माझी आशा फोल ठरली! हा अतिशय काटेकोर अरसिक आहे! अजिबात बदलत नाही! माझे सगळे प्रयत्न याच्या ‘कुल’ वागण्याने फेल गेले! याचा परिणाम, या बाबावर तर शून्यच झाला, माझी मात्र चिडचिड कमालीची वाढली आहे. शेजारच्या शहा अँटी सुद्धा आज म्हणाल्या, ‘काल काय झालं होत हो? तुमचा रागावलेला आवाज आमच्या घरात ऐकू येत होता!’
आता तुम्हीच सांगा अश्या ‘दगडा’ बरोबर आयुष्य कसे काढावे? रसिकता, प्रेम फुलवणे, कोमल भावना! शून्य मार्क! हा आज्ञाधारकपणाचा एक मार्क मात्र देईन! आपली काम आपणच करतो. खरे सांगू? आम्हा बायकांना काही प्रमाणात नवऱ्याने ‘अधिकार’ गाजवलेला आवडतो, म्हणजे मला तरी आवडतो.
‘चहा कर ग थोडासा!’ या नवऱ्याच्या ऑर्डरला, ‘घ्या हातानं करून!’ म्हणून आधी झटकून टाकायचं, अन मग हळूच, आद्रकवाला चहाचा कप हाती द्यायचा! यात जो एक गोडवा असतो, तो नाही शब्दात मांडता येत. पण इथं चहा मागणं तर सोडाच, स्वतः सोबत माझाही करतो, वर कप पण विसळून टाकतो! तुम्ही म्हणाल ‘बर आहे की!’ पण नवऱ्यानं ‘नवऱ्या’ सारखच वागलेलं मला आवडत.
मी त्याच्या ज्या ‘कुल’ क्वालिटी साठी त्याच्या प्रेमात पडले, तेच आता माझ्या त्रासाचे कारण झाले आहे. शेवटी मी थकले आणि त्याला एक दिवस सांगून टाकले.
“आता तुझा सोबत, मला रहाणे शक्य नाही! आपण वेगळे होऊ!”
“अरे! असे कसे? तू पुन्हा विचार कर!”
“नो! मी माझे मत बदलणार नाही!”
“मी काय केले तर तुझे मत बदलेल?”
“समज, गुलेबकावलीचे फुल आणायचे आहे. त्यात तुझा मृत्यू होणार हे तुला आणि मला पक्के माहित आहे! जाशील आणायला? तरच माझे मत मी बदलेन!”
तो माझ्या अगस्ताळ्या चेहऱ्याकडे बावळटासारखा पहात पाहिला, हातात चष्मा धरून. मग त्याने सावकाश चष्म्याची काच पुसली, आणि नाकावर चढवला.
“मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर सकाळी देईन.” नेहमीच्या शांत स्वरात म्हणाला आणि बेडरूम बाहेर निघून गेला!
०००
माझी रात्र तळमळत गेली. अरे, बायको तुला कायमचा दूर करती आहे! आता तरी आक्रमक हो! खाणकावून विचार तिला. हा काय गाढवपणा आहे! हे राहील बाजूला, म्हणे ‘सकाळी उत्तर देतो!’ या आणि अशाच विचारात मला झोप लागली. सहाजिकच सकाळी उठायला उशीर झाला.
मी उठले तेव्हा तो आसपास नव्हता. मी गॅलरी, किचन आणि सगळे घर चेक केले. तो घरात नव्हता! त्याच्या कॉम्पुटर टेबलवर एक चिट्ठी मात्र माझी वाट पहात होती!
धडधडत्या अंतकरणाने मी ती वाचायला घेतली.
‘ डार्लिंग, गुड मॉर्निंग.
तुझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर, मी ते गुलेबकावलीचे फुल आणायला मुळीच जाणार नाही! कारण मी मूर्ख नाही!
पण थांब क्षणभर, का जाणार नाही? हे हि वाचून जा!
तू लॅपटॉपवर सॉफ्टवेयर प्रोग्रामिंगचा मेस करून ठेवतेस आणि मग त्या स्क्रीन समोर रडत बसतेस. तो प्रोग्राम, रिस्टोअर करायला मला माझी बोटे हवी आहेत. म्हणून मी जाणार नाही!
तू ऑफिसला जाताना घराच्या किल्ल्या घरातच ठेवून, घर लैच करून जातेस. मला तुझ्या साठी दार उघडायचे असते. त्या धावपळी साठी माझे पाय मला प्रिय आहेत. म्हणून मी त्या फुलांसाठी मरणार नाही!
तुला प्रवासाची आवड आहे. नवख्या शहरात तू भरकटतेस. तुझ्या दिशा लक्षात रहात नाहीत. तुला हुडकून, परत घरी आणण्या साठी मला माझे डोळे शाबूत ठेवायचे आहेत!
तू बरेचदा घरी बसून बोर होतेस, तेव्हा काही विनोदी कथा, चुटके सांगून तुझी करमणूक करण्यासाठी मला माझे तोंड हवे आहे.
तू निष्कारणच कॉम्पुटर स्क्रीनवर डोळे लावून बसतेस. तुझ्या डोळ्याची, तू अजिबात काळजी घेत नाहीस. दर दोन महिन्यांनी तुझा नंबर वाढतोय! उद्या तू थकलीस तर, तुझे केस विचारण्यासाठी, तुला संध्याकाळच्या सोनेरी किरणात समुद्रकिनारी नेण्यासाठी, प्रत्येक पावलावर तुझा हात हाती घेऊन मलाच न्यावे लागणार आहे. मग मी का जाऊ ते फुल आणायला?
जर या गोष्टी साठी कोणीतरी असेल आणि त्याबद्दल माझी खात्री पटली तर मात्र मी जरून निघून जाईल—–
आहे का कोणी माझ्या पेक्ष्या ज्यास्त प्रेम करणार?——-
जर तुझे येथवर वाचून झाले असेल तर दार उघड. मी तुझ्या साठी ताजी ब्रेड आणि दूध घेऊन आलोय! तुला खूप आवडत ना? साखरेच्या गरम दुधासोबत ब्रेड खायला! म्हणून!
मी दार उघडले. दारात तो दुधाचे पाऊच आणि ब्रेडचे ताजे पाकीट घट्ट धरून उभा होता!
डबडबत्या डोळ्यांनी मी त्याला दारातच घट्ट मिठी मारली!
तुमसे आच्छा कौन है?
आज हि मला त्याच्या भक्कम खांद्याचा आधार, आश्वासक वाटला!
पटतंय?
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)
Leave a Reply