टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा आम्हां भुसावळकरांसाठी क्रेझ असायच्या- पाचवीपासून ते दहावीपर्यंत. (आमच्या काळी ११ वी SSC होती.) त्यामुळे हिंदी/इंग्रजी/गणित/संस्कृत या विषयांच्या परीक्षांसाठी शाळा आणि पालक दोघेही आग्रही असत. आम्हीही ते अतिरिक्त शिकणं आनंदाने स्वीकारत असू. आजही ती सगळी प्रमाणपत्रे मी जपून ठेवली आहेत.
नारखेडे सरांकडे संध्याकाळी आम्ही गणिताच्या शिकवणीसाठी जात असू शाळा सुटल्यावर. परीक्षेचा रिझल्ट त्यांच्याकडे आल्यावर आमच्या बॅचचे आम्ही काहीजण सरांच्या घरी गेलो. (अजूनही बिनदिक्कतपणे जातो). सरांनी बाकीच्यांना रिझल्ट सांगितला. माझ्याबद्दल काही बोलले नाहीत. दांडी उडाली की काय ही स्वाभाविक शंका मलाच काय सगळ्यांना आली. तेवढ्यात मनमोकळेपणे हसून सर म्हणाले – ” तुझ्याकडून पेढे हवेत. ” सगळ्यांचा जीव भांड्यात (माझा तुलनेने मोठ्या भांड्यात आणि चेहेऱ्यावर नवी उत्सुकता). ” अरे, तुला १०० पैकी ९८ मार्क्स मिळाले आहेत. ” आनंदाने घरी परतलो. सगळे आनंदित. सरांना पेढे नेऊन दिले.
दुसऱ्या दिवशी वर्गात सुनील म्हणाला – ” अरे, तुझं नांव टिमवि च्या पत्रिकेत छापून आलंय. आई सांगत होती. (त्याची आई आमच्या संस्थेच्या शाखेत-गर्ल्स हायस्कुल मध्ये शिकवित असे.) तू गणिताच्या परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा आला आहेस आणि तुला ११ रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.” सहावीतल्या मला पंख देण्यासाठी ही उत्तेजना पुरेशी होती. घरी येऊन मी हे वृत्त सगळ्यांना सांगितले.
(नारखेडे सरांना हे माहीत नव्हते. मी सांगितल्यावर ते आणखी आनंदले.)
रात्री वडील घरी आल्यावर त्यांना आईने ही बातमी दिली. लगोलग मी, आई-वडील सुनीलच्या घरी गेलो. बाई म्हणाल्या – “ती पत्रिका माझ्याकडे नाही. शाळेत आहे. उद्या आणून ठेवते.”
किंचित हिरमुसून आम्ही परतलो. यथाकाल ११ रुपयांची मनिऑर्डर आली, पत्रिकेचा अंक मिळाला आणि टिमवि चे पत्रही ! इतकं निर्व्याज प्रेम करणाऱ्या शिक्षकांची ५ सप्टेंबर निमित्त ही प्रातिनिधिक आठवण. माझ्या हातावर भाग्यरेखा अजूनही तशाच आहेत.
याच्याशी विसंगत आठवण (जी आजही काळजात रुतून आहे, तीही लिहितो त्याशिवाय ५ सप्टेंबर अपूर्ण राहील.) इयत्ता पहिली आणि दुसरीला आम्हांला एदलाबादकर बाई वर्गशिक्षिका होत्या. वर्गात पहिला नंबरवाला म्हणून मी साहजिक त्यांचा लाडका.
केव्हांतरी नववीत असताना मी आणि आजी अकोल्याला एका विवाहानिमित्त भुसावळहून जात होतो. आमच्या डब्यात एदलाबादकर बाई ! त्या माझ्याकडे बघत होत्या, पण मी त्यांना ओळख दाखवत नव्हतो. लाजत असेन किंवा इतक्या वर्षांनी बाई आपल्याला ओळखणार नाहीत असा घट्ट गैरसमज असेल.
अकोल्याला स्टेशन वर उतरून आम्ही रिक्षाने लग्नघरी गेलो. पाठोपाठ बाई तेथे. तरीही संवाद नाही. दुपारी जेवणं झाल्यावर आजी बाईंशी बोलत बसल्या असताना सहज म्हणाल्या – ” ओळखलं की नाही ? हा तुमचा विद्यार्थी नितीन.”
बाई हसून म्हणाल्या – ” न ओळखायला काय झालं? मी नाही विसरले त्याला. पण तोच ओळख देत नाहीए. सकाळी डब्यात आम्ही एकमेकांना बघितलं पण याच्या चेहेऱ्यावर काही भाव नव्हता. मीही मग बोलले नाही. मोठा झालाय तो आता. ”
त्या मोठ्या झालेल्या नितीनकडून आज पुन्हा एकवार माफी ! मुहूर्त -५ सप्टेंबर.
विद्यार्थी (शारीरिक दृष्ट्या) मोठे झाले तरी शिक्षक तेथेच थबकलेले असतात – विद्यार्थ्यांना आठवत. हे सत्य कळायला मला शिक्षक व्हावं लागलं नाहीतर नारखेडे सरांचा / सुनीलच्या आईचा आनंद आणि एदलाबादकर बाईंची वेदना मला या जन्मात कधीच समजली नसती.
माझ्या ज्ञात-अज्ञात शिक्षकांना प्रणाम !
” तुम्ही नसता,तर आम्ही नसतो !!”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply